Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Wednesday, 10 March 2021

चांगल्या सवयींपेक्षा वाईट सवयी लवकर का लागतात?


      १८९८ मध्ये मानसशास्त्रज्ञ एडवर्ड थोर्नडाईक ह्यांनी सवय कशी बनते? सवय म्हणजे नेमके काय? ह्यावर एक भन्नाट प्रयोग केला होता. तो प्रयोग खालीलप्रमाणे:


एका मांजरीला एका पज्जल, कोडी असलेल्या खोक्यात कोंडले. त्यामध्ये काहीच नव्हते आणि बाहेर जाण्याचा रस्तासुद्धा एकच होता जो बंद होता. तिथे कोपऱ्यात एक तरफ (Lever) ठेवलेलं होते. जसं त्या मांजरीला समजले की ह्या खोक्यात काहीच नाहीये तर ती बाहेर जायचा दरवाजा शोधू लागली. जो एकमेव दरवाजा होता तिथे जाऊन म्याव म्याव करायला लागली, बोचकू लागली पण दरवाजा काही उघडला नाही.


असे करून दमल्यावर मांजराने त्या खोक्यात काही दुसरे काही आहे का ते पाहण्यात सुरुवात केली. इकडे मांजरीची हालचाल थोर्नडाईक पाहत होते. जसे ते मांजर तरफपाशी गेले आणि त्याला स्पर्श केला की थोर्नडाईक ह्यांनी बटण दाबून दरवाजा उघडून दिला. मांजराच्या ते लक्षात आले आणि मांजर त्या उघडलेल्या दरवाज्यातून पळून गेले. त्याने परत मांजराला त्या पज्जल असलेल्या खोक्यात ठेवले – परत मांजर इकडेतिकडे फिरायला लागले – दरवाज्याला ओरबाडू लागले. मग जिथे तरफ ठेवले होते तिथे गेले – जसा तिने त्या तरफाला स्पर्श केला थोर्नडाईक ने दरवाजा उघडून दिला.


त्यांनी ते कसे केले होते ते इथे मी दाखवले आहे.


असा प्रयोग थोर्नडाईकने अनेक वेळा केला. मांजराला आता हळू हळू समजायला लागले की “तरफाला स्पर्श केले असता दरवाजा उघडतो.” पुढच्या वेळेस मांजराला खोक्यात ठेवले की ते क्षणाचा ही विलंब न करता सरळ तरफाकडे धाव घ्यायला लागले आणि त्याला स्पर्श करून दरवाजा उघडला की बाहेर जाऊ लागले. थोडक्यात ते मांजर पटकन शिकले की, “तरफाला स्पर्श केले असता दरवाजा उघडतो”.


थोर्नडाईक ह्यांनी मांजर किती सेकंद त्या खोक्यात राहतेय तो वेळ मोजला. तो असा होता: १६०, ३०, ९०, ६०, १५, २८, २०, ३०, २२, ११, १५, २०, १२, १०, १४, १०, ८, ८, ५… जसा जसा प्रयोग पुढे जात गेला मांजर शिकत गेले – ते बाहेर निघण्यासाठी कमीतकमी वेळ वापरू लागले. ह्या प्रयोगावरून त्यांना समजले की बाहेर निघण्यासाठी मांजराने “तरफाला स्पर्श करणे गरजेच आहे” हे लगेच शिकले आणि नंतर त्याला त्याची “सवय” झाली. कारण नंतर नंतर मांजर फक्त ५ सेकंदात बाहेर यायला लागले. जसे मांजर खोक्यात ठेवले ते क्षणाचा ही विलंब न करता तरफाकडे पाळायला लागले.


थोर्नडाईक ह्यांनी लिहून ठेवलेय:


आपली वागणूक, ज्यामुळे त्वरित आनंद मिळतो, प्रोब्लेममधून सुटका होते ह्या क्रिया आपला मेंदू लगेच शिकतो आणि पुढच्या वेळेस तसेच काहीतरी करायचा प्रयत्न करतो. आणि ज्या वागणुकीमुळे, क्रियेमुळे आपल्याला त्रास होतो, चांगले वाटत नाही त्या क्रिया करण्याचे तो सतत टाळतो.


आणि बहुतेक आपल्या प्रश्नाचे उत्तर थोर्नडाईकच्या ह्या प्रयोगातून मिळेलच.


सवय का लागते?


कारण आपला मेंदू हा सीमित स्त्रोत आहे. एकाच वेळेस त्याला अनेक गोष्टी करायच्या असतात, ज्यांच्याकडे जातीने लक्ष देणे त्याला शक्य नसते. म्हणून आपला मेंदू दररोज होणाऱ्या, घडणाऱ्या, आपण करतो ते, होते ते अशा सगळ्या गोष्टी एकदाच शिकतो आणि नंतर त्याला सवय म्हणून अपोआप करतो. सवय दुसरे तिसरे काही नसून “स्वयंचलित वागणूक (Automatic Behaviour)” आहे.


एकदा, दोनदा, तीनदा जर आपण काही केले आणि त्यामुळे त्वरित चांगले, आल्हाददायक वाटले तर आपला मेंदू ती संरचना, तो Pattern लगेच समजतो आणि शिकतो. पुढच्या वेळेस तो ते काम आपोआप करतो.


उदाहरण:


दुपारी झोपणे. एकदोन दिवस तुम्ही दुपारी मस्त झोप घ्या. तुमच्या मेंदूला ते लगेच समजेल की दुपारी झोपल्यावर मस्त भारी वाटत. तिसऱ्या दिवशी दुपारी तुमची इच्छा नसली तरी तुम्हाला आळस येईल, झोप येईल. का? कारण की तुमचा मेंदू दुपारी झोपायचे pattern शिकला आहे.


चांगल्या सवयीपेक्षा वाईट सवयी का लावतात?


वेल, सामान्य दृष्टीने पाहिले की चांगले आणि वाईट दिसते. शरीरासाठी, मेंदूसाठी चांगल – वाईट काही नाही. आपण जे काही करतो त्याचा एका परिणाम होतो ज्याला आम्ही (Outcome) म्हणतो. हा आउटकम शरीरावर, मेंदूवर नक्कीच परिणाम करतो. सगळा खेळ ह्या आउटकमचा आहे.


मेंदूचा नियम:


जर काही केल्याने आउटकम मस्त, भारी आहे तर तो आपल्यासाठी चांगला आहे, ते आपण नेहमी करावे. जर आउटकम खराब आहे, त्रासदायक आहे तर ते आपल्यासाठी चांगले नाही म्हणून ते करू नये.


मस्त, भारी परिणाम असणारे काम कोणती:


मोबाईल वापरणे.

दारू, सिगारेट ओढणे.

जास्त झोपणे, जास्त खाणे.

चित्रपट पाहणे, जास्त फिरणे.

काम लांब लांब ढकलणे.

आळस करणे, मैथुन करणे.

सट्टा बाजी खेळणे. शिव्या देणे.

हे काम करताना मेंदूला जास्त काही करावे लागत नाही शिवाय सगळ्यांत महत्वाचे म्हणजे हे केल्यावर मेंदूत डोपामिन तयार होते आणि आपल्याला भारी, ताजेतवाने, मस्त वाटते ते पण क्षणात.


त्रासदायक, नकोस परिणाम असणारे कामे कोणती:


अभ्यास करणे.

पुस्तक वाचणे.

दररोज सकाळी लवकर उठणे, जिमला जाणे.

गणिते सोडवणे. ध्यानाला बसणे.

लक्ष देऊन काहीतरी काम करणे, स्वच्छता राखणे.

हे काम करतांना मेंदूला फोकस्ड राहावे लागते – सारासार विचार करावा लागतो – आणि हे काम केल्यावर लागलीच मेंदूला किक मिळत नाही.


आपला मेंदू बरोबर अशा गोष्टीना करायचे टाळतो कारण तो शिकलाय, “जो आनंद गेम खेळून येईल तो पुस्तक वाचून नाही मिळणार.. जो आनंद झोपण्यात आहे तो आनंद सकाळी उठण्यात नाही.” आणि म्हणून तो सकाळी उठण्यास मदत करत नाही, अभ्यास करण्यास मदत करत नाही कारण त्याला माहिती आहे “अभ्यास करतांना त्रास होतो, पुस्तक वाचतांना मेहनत लागते, सकाळी लवकर उठायला इच्छाशक्ती जास्त लागते..मग आपण ते का करावे.”


एका वाक्यात आपल्याला उत्तर द्यायचे झाले तर हेच असेल की, “जिस चीज मे मज्जा है और वो भी अभी इसी वक्त.. अपना दिमाग वो करेगा!!” आणि हे आपले दुदैव आहे की “मज्जा सगळ्या चुकीच्या गोष्टी करण्यातच असतो.”


पुस्तक संदर्भ:

द पॉवर ऑफ हेबीट्स, चार्ल्स दुहीग.

आटोमिक हेबीट्स, जेम्स क्लीअर

थिंकिंग फास्ट अंड स्लोवं, डेनिअल कणमेन.

रेडी, स्टडी, गो, खुर्शेद बाटलीवाला अंड दिनेश घोडके.


कॉपी पेस्ट पोस्ट .

No comments:

Post a Comment

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...