मनात येणाऱ्या विचारांच्या प्रवाहापासून अलग होऊन ते विचार जाणणे हे मेंदूतील सर्वात पुढील भागाचे कार्य आहे. कपाळावर माणसे टिळा किंवा कुंकू लावतात तेथेच मेंदूचा हा भाग असतो. गेल्या मिनिटांत आपापल्या मनात कोणते विचार होते हे सामान्यत: सर्वाना पाहता येते. याला मेटाकॉग्निशन म्हणतात. रोज काही वेळ विचारांच्या प्रवाहापासून असा अलग होण्याचा सराव करता येतो. असा सराव करत असताना मेंदूचे परीक्षण केले असता वरील भाग सक्रिय झालेला दिसतो. त्याच्या शेजारी असलेला भाग माणूस ठरवून एखाद्या ठिकाणी लक्ष देतो त्या वेळी सक्रिय होतो. ओसीडीचा (ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर) त्रास होत असतो त्या वेळी या दोन्ही भागांचे कार्य नीट होत नाही. वय वर्षे सहा ते अठरा या वयातील २०० मुलांपैकी एकाला मानसोपचार आवश्यक आहेत असा ओसीडीचा तीव्र त्रास असतो. सौम्य स्वरूपात हा त्रास खूप मुलांना असतो. वय वाढते तसा हा त्रास वाढत जातो आणि १८ वर्षे वयातील मुलात त्याचे प्रमाण दुप्पट झालेले दिसून येते. अनेक हुशार मुलांचे करिअर अशा त्रासाने धोक्यात येते. ओसीडीला ‘मेंदूची उचकी’ अशी उपमा देतात. माणसाच्या छाती व पोट यांच्या मध्ये श्वासपटल असते. त्याचे झटका आल्यासारखे आकुंचन होते त्या वेळी उचकी लागते. काही कारण नसतानाही उचकी लागू शकते. ‘ओसीडी’मध्ये मेंदूतील ठरावीक विचाराची फाइल अशीच खूप वेळ पण झटका आल्यासारखी प्रबळ होऊन राहते. त्या वेळी अन्य कोणतेही भान राहत नाही. सतत विचारात राहणे हे असे होण्याचे एक कारण असू शकते. पण असे कारण नसते म्हणजे मुलेमुली नृत्य करणारी किंवा मैदानी खेळ खेळणारी असली तरी त्यांनाही असा त्रास होऊ शकतो. काहींना असा त्रास ठरावीक प्रसंगात होत नाही. म्हणजे एखाद्या सर्जनला ऑपरेशन करत असताना विचारांचा त्रास होत नाही, पण कुणाशीही अनौपचारिक गप्पा मारत असताना त्रासदायक विचार छळत राहतो. लक्ष देत असताना मेंदूतील पुढील भाग सक्रिय राहात असल्यानेच ऑपरेशन करीत असताना त्रास होत नाही. मात्र सतत असे लक्ष देणे शक्य नसते. याचसाठी अधूनमधून मनात आपोआप येणाऱ्या विचारांना प्रतिक्रिया न करता जाणणे हे कौशल्य उपयोगी ठरते. ते शालेय वयापासून शिकवायला हवे.
🖋 *डॉ. यश वेलणकर* yashwel@gmail.com
=================
*संकलन- नितीन खंडाळे*
-चाळीसगाव
*दै_लोकसत्ता*
No comments:
Post a Comment