जीवनाचा अनादि, अनंत प्रवाह, त्यातून तुमच्या आमच्या ओंजळीत येणारे काही क्षण. कधी रेशीमलडींसारख्या उलगडणार्या तर कधी धारदार पात्यासारख्या लखलखणार्या जाणिवा. अवतीभवतीच्या जगातले आपणच लोक आपापल्या परीनं एकमेकांची सुखदु:खं वाटून घेत असतो, साथसंगत करत असतो, नातीगोती जपायचा मनापासून प्रयत्न करत असतो. कधी रीत तसं करायला भाग पाडते म्हणून तर कधी अंतरंगात दाटणारी प्रीत, म्हणून.
अख्ख्या जगाबरोबरीने जुळवून घेताना, कधी वाट्याला आलेली, तर कधी असोशीने आपलीशी केलेली नाती जपत असताना, कधी ह्याचं मन, तर कधी तिचं मन जपताना आणि अशाच तर्हेने आणखी कोणाकोणाची मनं जपत जगू पाहताना, एखाद्या लख्ख क्षणी स्वतःलाच उलगडू पाहतं स्वतःचं मन. नजरेला नजर भिडवत, आपल्याला त्याच्या अस्तित्त्वाची ओळख पटवू पाहतं.
आपल्याच मनाशी नातं जुळतानाचा हा प्रवास इतकाही काही सोपा नसतो. मृदूमुलायम पायघड्या घातलेल्या नसतात. सारं काही स्पष्ट दिसासमजायला आणि आहे तसं उमजायला, कित्येक दरवाजे अजून धडका मारून उघडायचे असतात. पलिकडे जे काही असेल, त्याच्याशी डोळा भिडवायची आहे का हिंम्म्मत? का खात्री नाही, म्हणून बंदच दरवाजे?
कधीतरी उभा दावा मांडतं मन. आपलंच असतं, - आपल्याच आधाराने रहात असतं, की आपण राहतो मनाच्या आधाराने? - पण मस्ती तर बघा! आपला काही काही इलाज चालत नाही. हवं तसं फरफटत नेतं आपल्याला, त्याच्या जगात. नाना प्रकारच्या इच्छा, संवेदना, राग-लोभ हे सारं सारं कुठून येतं? श्वास कोंडायला लावणारे प्रश्न, घुसमट करुन टाकणारी सत्यं.. खजिनाच असतो मनापाशी. कुठून जमवतं? कुठे दडवतं? नेमक्या एखाद्या तलम अचूक वेळीच आपल्याला आठवणही करुन देतं. सुख आणि दु:खांच्या नुसत्या तलम धूसर आठवणींवरही जीव प्राण कंठाशी येईपर्यंत झुलवत ठेवतं. तुमच्या आमच्या सवडीनं, कधीतरी निवांत वेळी प्रकाशाची उबदार तिरीप अलगद तुमच्यापर्यंत आणून सोडणार्या खिडकीत बसून शिळोप्याच्या गप्पा केल्यासारखं, अलवारपणे गुपित वगैरे सांगितल्यासारखं वागायला सवड नाही मनापाशी. हजार सुया एकाच वेळी भोसकाव्यात तसं प्रश्नांची, जाणिवांची उधळण करतं मन. बघता बघता छिन्न विछिन्न करुन टाकतं. सावरायचे सोहाळे मागाहून करायचे.
आयुष्याचा गूढ, अनाकलनीय चेहरा, त्याच्याशी डोळे भिडवून पाहणारं मनच. सगळी सुखदु:खं, आनंद, विषाद, आशा, निराशा ह्या सार्यासार्याला आपल्या ठायी आसरा देणारं, आपलंस करणारं आणि कुठेतरी तळागाळात लपवून ठेवून जपणारंही मनच. प्रसंगी भांबावणारं, भयभीतही होणारं आणि तरीही प्रत्येक टप्प्यावर इतर कोणी साथ दिली नाही, प्रसंगी स्वतःची सावलीही दूर झाली, तरीही उभा जन्म आपली अंतःस्थ शक्ती पणाला लावून तोलून धरणारं मन.
अर्ध्य जसा ओंजळीत धरला जन्म उभा शिणलेला..
कधीतरी मनाशी नजरभेट करायची आणि मनाची लख्ख नजर तोलायची उमज येते. ती आली, की हळूहळू सूर लागतो, मनोमन संवादाचा एक सलग धागा जुळतो. भोवतीने पसरलेला कोलाहल विरु लागतो, काळोख उजळू लागतो. मुक्ततेच्या सोहळ्याला सुरुवात झाली का?
ही तर नुकतीच सुरुवात.. तुमचं आमचं टोचणारं दु:खं, सलणारे अपमान, खुपणारे पराभव, झुळझुळणारी सुखं, ह्या सार्याचं गाठोडं तर बांधलेलं असतंच मनाने. ह्याची स्वीकृतीही शिकवतं मन. आनंदसोहळा आता फार दूर उरलेला नसतो. अंतरात जमलेली महफिल आता सरणार नसते.
जगामध्ये, जसा आनंदही भरलेला आहे, त्याचप्रमाणे विषादालाही जागा असणारच आणि, प्रत्येकासाठी कधीना कधी तोही भरुन वाहणार. सारी समष्टी एका सुखदु:खाच्या हेलकाव्यावर झुलत राहणार. जगाचा पसारा असाच.
ह्या सार्याचे मनाशी नाते जुळले, की ह्या सगळ्यांमधून झंकारणारा एक सुरेल नाद सर्व आयुष्याला व्यापून राहूनही उरेल, हे भान एकदा मनाने आणून दिले की अजून काय राहिले? मग एकच मागणे मागायचे..
ओळी स्व. शांता शेळके ह्यांच्या कवितांमधून.
(कॉपी पेस्ट)
No comments:
Post a Comment