स्वभावाला औषध नसतं’ असं म्हणतात – म्हणजे एखादी व्यक्ती तिच्या स्वभावानुसार जशी वागत असेल, त्याला काही पर्याय नाही. त्या व्यक्तीचं वागणं बदलू शकत नाही.
मला हे पूर्णतः पटत नाही.. स्वभाव स्वभाव म्हणजे नक्की काय? लोभी, लोभस, आळशी, कंजूस, परोपकारी, रागीट, बेफिकीर, मत्सरी, गप्पिष्ट, भित्रा, धीट, आनंदी, हट्टी, whimsical इत्यादी आणि अजून बरेच.. यातली एखादी गोष्ट तरी प्रत्येकात जास्त प्रमाणात असतेच, आणि तिच्यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव ठरतो (किंबहुना लोक ठरवतात)!!
माणसाचा स्वभाव बदलू शकत नाही का? एखादी व्यक्ती रागीट भासली तर ती जन्मभर रागीटच असते का? एखादी व्यक्ती sarcastic असेल तर ती आयुष्यभर उपहासात्मकच बोलते का?
मी काही मानसशात्रज्ञ वगैरे नाही, पण सहज विचार केला तर वाटतं की हे तितकं खरं नसावं. कुणाच्याही स्वभावात साधारणतः दोन गोष्टी असतात –
१. काही पैलू जे ती व्यक्ती जन्मत:च घेऊन आलेली असते. आणि
२. काही गोष्टी आजूबाजूची लोकं आणि परिस्थिती तिला बहाल करतात, किंवा अंगावर थोपवतात.
पहिल्या प्रकारातून जास्तीत जास्त २०% भाग येत असेल एखाद्याच्या स्वभावात. पण बहुतांश स्वभाव हा दुसऱ्या प्रकारातून येतो – आणि त्यात पण किती भाग हा in-built असतो आणि किती idiosyncrasies (म्हणजे त्या व्यक्तीच्या चालण्याबोलण्याच्या विशिष्ट सवयी) मधून येतो, हा पण एक वेगळा मुद्दा आहे. त्यात अजून ती व्यक्ती actually कशी आहे आणि भासवते कशी हे पण आहेच 🙂 आणि बहुतांशी कुठल्याच दोन व्यक्तींची सोबत आयुष्यभर नसते.. त्या व्यक्ती सोबत असलेल्या काळात कदाचित ती जशी आपल्याला भासली, तशीच ती आयुष्यभर असेल, हे कुणी सांगावं?
दुसऱ्या प्रकारातल्या गोष्टी कदाचित परिस्थिती बदलली की आपोआप बदलतात. पण पहिल्या प्रकारातल्या बदलायला महाकठीण – पण ते करणं अशक्य नाही. अश्या गोष्टी त्या व्यक्तीला स्वतः प्रयत्नपूर्वक कष्ट घेऊन बदलाव्या लागतात.
दुसऱ्या भागाचं उदाहरण द्यायचं तर समजा एखाद्याला आर्थिक परिस्थितीमुळे काटकसर करून जगायची सवय लागली असेल (म्हणजे मग “तो ना.. फार कंजूस आहे हां” – हे आजूबाजूच्या लोकांचं conclusion), तर त्या व्यक्तीची नंतर भरभराट झाली तरी पाण्यासारखा पैसे खर्च करताना कचरते, कारण काटकसर हा त्या व्यक्तीच्या स्वभावाला चिकटलेला एक पैलू आहे – बहुतांश लोकांच्या बाबतीत. पण याउलटही बघायला मिळतं. अगदी हलाखीत आयुष्य घालवलेल्या माणसाला घबाड हाती लागल्यावर राजेशाही जगायला लागतात..
एखाद्याची धिटाई किंवा भित्रेपणा एखाद्या जबरदस्त झटक्यामुळे क्षणात जाऊ शकते, पण हा बदल कायमचाच असेल असं नाही. काही काळानंतर त्या झटक्याचा प्रभाव कमी होऊन परत ती व्यक्ती धैर्यशील होऊ शकते.
एखाद्याचं बालपण खूप त्रासदायक असतं – कायम बोलणी खाणे, दुय्यम वागणूक मिळणे वगैरे.. अशी व्यक्ती पुढे चिडचिडी, सारकॅस्टिक मुखवटा नकळत धारण करते.. पण जर अपेक्षित असलेली आपुलकी मिळाली, त्रास देणारी माणसं आयुष्यातून दूर गेली की कदाचित तो मुखवटा (पुन्हा एकदा नकळत) गळून पडू शकतो.
म्हणजे थोडक्यात काय की या प्रकारातले पैलू माणूस बऱ्यापैकी बदलू शकतो (किंवा परिस्थिती त्याला बदलते..).
आता पहिल्या भागाकडे वळूया..
असं व्यक्तिमत्त्व नक्कीच तुमच्या आजूबाजूला असेल… काही लोक जगात कुठेही काही tension असलं की ते स्वतःच्या अंगावर असल्यासारखं वागतात (व पु काळेंच्या भाषेत – भारतावर असलेलं वर्ल्ड बँक चं कर्ज यांना आपल्या बेसिक मधून फेडायचं आहे असा चेहरा करणारी माणसं). दुसऱ्या कोणी कितीही सांगितलं तरी काळजी करणे सोडणार नाहीत ते.. अनावश्यक काळजी करणं सोडायचं म्हणजे त्यांना खूपच जास्त प्रयत्न करावे लागतील (आणि तरी ते बहुधा लवकर यशस्वी होणार नाहीत)..
काही लोक असतात त्यांना एका जागी स्वस्थ बसवत नाही (माझं स्वतःचंही उदाहरण आहे हे).. निवांत सुट्टी घेऊन काहीच उद्योग न करता पडून राहिलोय असं झालेलं मला आठवत नाही. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी पण दमायला होतं हे माहित असूनही.. “जमतच नाही ते” असं आपल्याला वाटतं! ‘माझ्या स्वभावात बसत नाही’ असं म्हणून आपण मोकळे होतो.
खरं बघायला गेलं तर हे बदलणं अशक्य नसतं, पण comfort zone च्या बाहेर जाऊन कष्ट घेऊन करावं लागतं ना, म्हणून कोणी करायच्या फंदात पडत नाही.
एखाद्या पांढऱ्या कपड्यावर पडलेला चहाचा डाग काढणे आणि दुधाचा डाग काढणे यात जो फरक आहे तोच इथे पण आहे. चहा चा डाग काढणं अशक्य नसतं, पण प्रचंड अवघड असतं.. “जाऊदे.. छोटाच डाग आहे, दिसणार नाही”.. किंवा “आतल्या बाजूला आहे” असली कारणं दिली जातात.
असो.. स्वभाव बदलावा की नाही हा या पोस्ट चा उद्देश नसून बदलला जाऊ शकतो की नाही हा आहे. आणि तो अंशतः का होईना, हाताळला गेला आहे असा आशावाद ठेवणं हे माझ्या स्वभावाला धरून आहे.
- चिन्मय कोरहलकर
No comments:
Post a Comment