बदलती जीवनशैली, ताणतणाव आदी अनेक कारणांमुळे नैराश्याचा आजार वाढत आहे. २०२०पर्यंत हा आजार उग्र रूप धारण करेल आणि क्रमांक दोनचा गंभीर आजार ठरेल, असे अनुमान जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) वर्तविले आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना नैराश्याच्या आजाराचा प्रादूर्भाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यापासून बचावाचे उपाय प्रत्येकाने करायला हवेत.
कशा प्रकारचे वर्तन, भावना आणि कल्पना हा आजार वाढण्यास कारणीभूत ठरल्या हे जाणून घेण्यात सायकोथेरपीची मदत होते. ज्या घटना व प्रसंगांमुळे आजाराला चालना मिळाली, त्यांना त्यावेळी कसे सामोरे गेलो व कसे जायला हवे हे जाणून घेता येणे शक्य होते. भावनांवर ताबा कसा मिळवावा, आनंद कसा मिळवावा आणि टिकवावा यांचे शिक्षण होते. परिस्थितीशी जुळवून घेण्याची कला व समस्येतून मार्ग काढण्याची कला अवगत होते.
तणावाचा उगम शोधता येऊ शकतो. सकारात्मक दृष्टिकोनाची जोपासना करण्यासही यातून शिकविले जाते. आयुष्यातील प्राधान्यक्रम ठरविणे, गरजेनुसार बदलणे आदींचेही शिक्षण होते. योजनाबद्ध पद्धतीने, पायरी पायरीने विचार आणि कृती करण्याची सकारात्मक पद्धत शिकता येते आणि अर्थातच नकारात्मक पद्धत बदलली जाऊ शकते. त्याचबरोबर या उपचार पद्धतीत रिलॅक्सेशन थेरपी, पॉझिटिव्ह रीजनरेशन इमेजरीज, क्लिनिकल ट्रान्स, तसेच तणाव नियोजनाच्या विविध पद्धती शिकवल्या जातात. एमबीसीटीमध्ये प्रत्येक क्षणात, वर्तमानात, स्वस्थ कसे राहावे; तसेच तटस्थपणे स्वतःकडे व परिस्थितीकडे कसे पाहावे हे शिकवले जाते. त्याचबरोबर काही धानाच्या पद्धती शिकवल्या जातात. त्यामुळे चित्त शांत राहू शकते.
नैराश्येच्या आजारातील स्व-मदत
औषधे आणि सायकोथेरपीबरोबरच पुढील गोष्टी आजारातून बाहेर पडण्यासाठी उपयुक्त ठरतात. अर्थात, त्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच केल्या जाव्यात.
१. योग्य आणि संतुलित आहार घेणे.
२. डिप्रेशन जर्नल लिहायला सुरुवात करणे. त्यामुळे भावनांना वाट मिळते.
३. रोज भरपूर व्यायाम करणे. हा व्यायाम चलपद्धतीचा म्हणजे एरोबिक स्वरूपाचा हवा. त्याचबरोबर योगासने आणि प्राणायमही करावा.
४. रोज संगीत ऐकल्यास फायदा होईल.
५. सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करायला हवा. उदाहरणार्थ, सध्याची प्रतिकूल परिस्थिती बदलेल, हेही दिवस जातील, असा विचार करायला हवा.
६. मनात उमटणारे नैराश्याचे विचार, भीती, म्हणजे वास्तव नव्हे, याचे भान ठेवायला हवे.
७. सोपी-सोपी सहज साध्य होतील असे लक्ष्य ठेवणे व ते साध्य करण्याचा प्रयत्न करणे.
८. तणाव नियोजनाचे मार्ग समजून घ्यायला हवे.
९. परिस्थिती हाताबाहेर जात आहे, असे लक्षात आल्याबरोबर ताबडतोब तज्ज्ञाची मदत घ्यावी.
या सर्व गोष्टी तणावजन्य नैराश्य टाळण्यासाठी सर्वांनीच करण्यासारख्या आहेत. लहानपणापासून भावनिक समतोल मिळवण्याचे शिक्षण मनाला दिल्यास, योग्य जीवनशैली राखल्यास, मनोव्यापारांचे स्वरूप समजून घेऊन मनाच्या स्वास्थ्यासाठी प्रयत्न केल्यास, नैराश्याचा आजार टाळण्यास किंवा त्याची तीव्रता कमी होण्यास मदत होईल.
(कॉपी पेस्ट)
No comments:
Post a Comment