Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Monday, 3 January 2022

सोशल मीडिया आणि मेंदू


पहिली पिढी

जिच्या सामाजिक आंतरक्रिया आणि संवाद प्रामुख्याने ऑनलाईन जगात आकाराला येतात, अशी मानवी इतिहासातील पहिली किशोरवयीन पिढी आपण एकविसाव्या शतकात पाहतो आहोत. तिचे भावविश्व सोशल मिडियाने व्यापलेले आहे. या माध्यमाने देहाने दूर असणाऱ्यांना परस्परांच्या जवळ आणले. जीवनातल्या सुख-दु:खाला त्वरित व्यक्त करण्याची संधी दिली. जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटनांची माहिती २४×७ पुरवायची जबाबदारी घेतली. आणीबाणीच्या प्रसंगात तात्काळ मदतीसाठीचे मार्ग उपलब्ध करून दिले. अन्न-वस्त्र-निवारा या शारीरिक गरजांइतकीच ‘संवाद’ ही मूलभूत मानसिक गरज असल्याने ती भागवण्याची मोठीच सोय करणारा हा ‘सोशल मिडिया’ आता केवळ त्यांच्याच नाही तर प्रौढांच्याही जीवनाचा अविभाज्य घटक बनू पाहतो आहे! मात्र, छोट्या-छोट्या सुखांचे आवळे सतत चाखायला देणाऱ्या या सोशल मीडियाला त्याबदल्यात आपण ‘बुद्धीचा कोहळा’ तर काढून देत नाही आहोत ना? प्रश्न थोडा विचित्र वाटेल, पण मेंदूचे अभ्यासक, डॉक्टर्स, मानसोपचारतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, सुजाण पालक या साऱ्यांनाच हा प्रश्न भेडसावतो आहे. एवढेच नव्हे, तर ज्यांनी हा उद्योग यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली त्यांनीही आता ‘जागल्या’ची भूमिका घेत या संभाव्य धोकयांचे स्पष्ट संकेत दिले आहेत.


हि खालील काही उदाहरणे पहा :

१. ‘मादक द्रव्यसेवन आणि जुगार खेळताना मेंदूतील जे चेतामार्ग उत्तेजित होतात, तेच मार्ग स्मार्टफोनवर सोशल मीडिया वापरताना उत्तेजित होतात’ – ख्रिस मारसिलिनो, ‘आय फोन’चे ‘पुश’ नोटिफिकेशन विकसित करणारा तज्ञ


२. ‘मेंदूतील डोपामाइन या चेतरसायनावर आधारीत तात्काळ सुख देणारी जुळणी खऱ्याखुऱ्या सामाजिक संवादास मारक ठरेल हे माहीत असूनही, याच मानवी कमजोरीचा फायदा घेत आम्ही ‘फेसबुक’चे आर्थिक साम्राज्य उभारले. त्याबद्दल मला प्रचंड अपराधी वाटते’. – चामथ पलिहापितीया, माजी व्हाईस प्रेसिडेंट, ‘फेसबुक’ ग्राहक वृद्धी विभाग


३. ‘अवधान क्षमतेचा ऱ्हास/नाश करणारी बलाढ्य अर्थव्यवस्था आम्ही निर्माण केलीयं. आता तिचे धोके समाजाला समजावून सांगत, तिचा सर्व पातळ्यांवर विवेकी वापर वाढावा यासाठी मी प्रयत्नशील आहे’. – ट्रायस्टन हॅरिस, प्रॉडक्ट व्यवस्थापक, ‘गुगल’ कॉर्पोरेशन


४. ‘स्क्रीनच्या वापराने होणाऱ्या अवधान क्षमतेच्या ऱ्हासापासून आपल्या देशाची पुढची पिढी वाचवण्यासाठी शाळांमध्ये स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घातलेली आहे’. – जिन-मिशेल ब्लॅक्वेर, फ्रान्सचे शिक्षण मंत्री (सप्टेंबर, २०१८ पासून हा कायदा तिथे अंमलात आलाय).


डोपामाईनवर आधारीत उद्योग...


मानवी उत्क्रांतीचा विचार केला तर सुख देणाऱ्या वर्तनाची माणूस पुनरावृत्ती करताना दिसतो. चविष्ट अन्नाची मेजवानी, लैंगिक सुख, केली गेलेली स्तुती अशा अनेक गोष्टींसाठी माणूस हपापलेला असतो. ते मिळाले की डोपामाईन नावाचे रसायन (तांत्रिक भाषेत चेतपारेषक) मेंदूत स्त्रवते आणि सुखाची अनुभूती येते. मात्र, हे हवहवेसे वाटणारे सुख तात्पुरत्या काळापुरते असते. त्यामुळे ते पुन्हापुन्हा मिळावे यासाठी माणूस खटपट करीत राहतो. नेमकी हीच मानवाची कमजोर बाजू सोशल मिडियाने विविध संशोधनांतून सखोल अभ्यासली आहे. त्यांचे फायद्याचे गणितच मुळात जाहिरातींवर आधारलेले असल्याने त्या मिळवण्यासाठी वापरकर्त्यांची नजर सतत स्क्रीनवर खिळवून ठेवण्याची आवश्यकता त्यांना आधी जाणवलेली होतीच. मग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर सुखाची झुळूक सतत निर्माण करण्यासाठी  ‘डोपामाइन’ कार्यन्वित करू शकणारे अत्युच्च दर्जाचे संगणकीय ‘अल्गोरीदम्स’ म्हणजेच प्रोग्राम्स या कंपन्यांनी बनवले आणि अब्जावधी डॉलर्सचा धंदा उभारला! विविध प्रकारचे भाव व्यक्त करणारे इमोजी, रंगीबेरंगी शब्दांच्या-चित्रांच्या-‘गिफ’च्या माध्यमातून केलेले कौतुक, ओळखीच्या व्यक्तींचे सकारात्मक संदेश, चोवीस तास नोटिफिकेशनची आणि अलर्टची सुविधा, भूतकाळातील स्मृतींचे कोलाज उपलब्ध करून देणे, लाईक्सची संख्या देणे, अनेकांशी संपर्क करण्यास सुचवणे, आवडीनिवडीनुसार विविध गोष्टी सतत पुरवत राहणे...किती गोष्टी सांगाव्यात! अशा सुखावणाऱ्या पर्यावरणाची करोडो लोकांना भुरळ पडली नसती तरच नवल! त्यातही तात्कालिक सुखाच्या पाठीमागे धावण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांना तर सोशल मिडियाचे व्यसन लागणेही ओघानेच आले. कोरोनाच्या महामारीने यात भरच घातली आणि आता सोशल मीडिया नियमितपणे न वापरणारे शोधावे लागतील अशी स्थिती आहे.


माणसाची आवड सवयीत कशी बदलते आणि सवय व्यसनात कशी परावर्तित होते याबाबतचे अनेक सिद्धांत मानसशास्त्रातील संशोधकांनी प्रस्थापित केलेले आहेत. त्यातील स्कीनर नावाच्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने (याने पहिल्या महायुद्धात कबूतरांना प्रशिक्षण देऊन शत्रूपक्षांवर बॉम्ब टाकण्याचा प्रस्ताव अमेरिकन लष्कराला सादर केला होता.) प्रथम सिद्ध करून दाखवलेली ‘बदलती प्रबलन सारणी’ सोशल मीडिया कंपन्या सर्रास वापरताना दिसतात. यात वापरकर्त्याची आशा सतत वाढती राहील आणि तो पुन्हापुन्हा आपल्या वॉलवर येत राहील अशा पद्धतीने त्याला संदेश देण्याची व्यवस्था अतिशय सूत्रबद्ध रीतीने केलेली असते. त्यासाठी जागतिक दर्जाच्या तज्ञांची भलीमोठी फौज कंपन्यांच्या दिमतील असते. ‘डोपामाइन लॅब’ या कॅलिफोर्नियामधील कंपनीच्या अभ्यासानुसार इन्स्टाग्राम नव्या ग्राहकांना मिळणारे सुरुवातीचे ‘लाईक्स’ हेतूपूर्वक दडवून ठेवते की जेणेकरून वापरकर्त्यांचे मन खट्टू होईल आणि ते पुन्हापुन्हा ‘इन्स्टा’वर येतील. नंतर मग एकदम सारे ‘लाईक्स’ दाखवले जातात आणि डोपामाइनचा प्रवाह मेंदूत वाहू लागून ते खूप खुश होताना दिसतात! ‘फेसबुक’ यासाठी शब्दांचे रंग, उडणारे फुगे आदी अनेक क्लृप्त्या सतत लढवत असते. नोटिफिकेशन ‘ऑन’ ठेवण्याचे डिफॉल्ट सेटिंग यासाठीच तर असते. आता आपण म्हणू की छोटे-छोटे विरंगुळयाचे, संवादाचे, विनोदाचे, कौतुकाचे क्षण आपल्याला सोशल मीडिया उपलब्ध करून देत असेल तर छानच आहे की. त्यात बिघडले कोठे? तर्क खरंच बिनतोड आहे पण जरा गंभीर विचार केला तर दुसरी बाजूही समोर येते.


... अवधानक्षमतेचा ऱ्हास


एकाचवेळी अनेक कामांमध्ये लक्ष विभागले जात असेल तर ‘समग्रतेकडून सूक्ष्माकडे’ जाण्याचा प्रक्रियेस खीळ बसते. आपली खोलात जाऊन आकलन करण्याची क्षमता कमी कमी होत जाते आणि दीर्घकालीन स्मृती विकसित होण्यात अडथळा निर्माण होतो. खरेतर कोणत्याही कामातली अत्युच्च गुणवत्ता गाठण्यासाठी त्यात खोलवर बुडी मारावी लागते. आजूबाजूची सारी व्यवधाने गळून पडावी लागतात आणि दीर्घकाळ एकाग्रचित्ताने कार्यरत व्हावे लागते. त्यातूनच  सर्जनशील आनंदाची आणि सार्थकतेची अनुभूती येते. सोशल मिडियावर दीर्घकाळ राहणारी मंडळी या अनुभूतीला पारखी होत आहेत अशी अनेक संशोधने सांगत आहेत (उदा. ली, २०१५). त्यांच्या मेदूतील ऍन्टिरिअर सिंग्यूलर कॉर्टेक्समधील ग्रे मॅटरची दिसून आलेली कमतरता याचेच निदर्शक आहे. नोमोफोबिया (नो मोबाईल फोन फोबिया) असणाऱ्या कुमारांच्या मेंदूमध्ये ‘गाबा’ रसायनाची अतिरिक्तता आणि ‘ग्लुटामेट-ग्लुटामाइन’ची कमतरता आढळल्याने अवधान केंद्रित करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दक्षिण कोरियन विद्यापीठातील अभ्यासात दिसून आले आहे. कोणतेही काम करत असताना १५ सेकंदांपेक्षा जास्त काळ इतर गोष्टींकडे आपले अवधान गेल्यास मुख्य कामामधल्या चुकांची संख्या लक्षणियरीत्या वाढते असे अनेक संशोधनांचे एकत्रित निष्कर्ष सांगतात. २००० ते २०१३ या कालावधीत कॅनडामधील लोकांच्या अवधान क्षमतेमध्ये ३३ टक्क्यांनी घट झाल्याचा निष्कर्ष ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीच्या २०१५ च्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलने सोशल मिडियाच्या वापरवृध्दी बरोबरच अवधान अक्षमतेने बाधित विद्यार्थ्यांच्या संख्येतही प्रचंड वाढ होत असल्याचा इशारा दिला आहे. चीनमधील ७००० शालेय विद्यार्थ्यांवरील संशोधनातूनही असेच निष्कर्ष हाती आलेले आहेत. सततच्या सोशल मिडियामध्ये डोकावण्याच्या सवयीमुळे कामातली एकाग्रता वारंवार भंग पावत आहे. त्यामुळे  उत्पादक कार्याचा कालावधी जवळपास ४० टक्क्यांनी कमी होत असून (उदा. मेयर) भविष्याचा सारासार विचार करून बौद्धिक नियमन करणाऱ्या मेंदूमधील प्री-फ्रन्टल कॉर्टेक्सच्या कार्यात गोंधळ निर्माण होतो आहे (लोह व कानाई, २०१५, मोईसाला व सहकारी, २०१६). ‘जगाशी जोडले जात आहोत’ या क्षणभंगूर सुखाच्या लकेरीत बहुतेकांचे या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे.


सोशल मिडियामुळे आपल्याला हवी ती माहिती, फोटो, व्हिडिओ इ. कधीही उपलब्ध होऊ शकणार असल्याने प्रत्यक्ष अनुभव घेताना करावयाचे सूक्ष्म निरीक्षण, होणारी तरल भावनांची निर्मिती, त्रिमीतिय अवकाशाचा विचार आणि त्यातून जगावायचे वर्तमान याकडे माणूस दुर्लक्ष करू लागला आहे. परिणामी, नव्या पिढीला ‘डिजिटल स्मृतिनाश’ नावाच्या नव्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची भीती शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत (काहानमान, २०११; कासपेरस्की लॅब, २०१५). वास्तविक पाहता, हा ‘केवळ व्यत्यय’ नाहीयं. तो आपल्या मनात एकाचवेळी आपण खूप गोष्टी करतो आहोत असा भ्रमित आनंद निर्माण करतो आहे आणि प्रत्यक्षात मात्र आपल्याला प्राधान्याने करावयाच्या गोष्टींपासून भरकटायला लावतो आहे. त्यामुळे वेळीच सावध होणे आवश्यक आहे.


ताण – भीती – बर्नआउट - नैराश्य...


जेव्हा आपण समाज माध्यमावर सतत सक्रीय राहतो तेव्हा मेंदूकडून ग्लुकोजचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे, सततचा ताण, मानसिक ओझे, काम करताना लवकर थकायला होणे, बर्नआउट/कार्य-क्लांती, सहनशीलता कमी होऊन चटकन चिडचिड होणे आदी वर्तनातील बदल होताना दिसत आहेत. मेंदूत ‘ताण-भीती व त्यांची स्मृती’ असे जाळे विकसित होऊन चिंता, नैराश्य, विचारांमधील अस्पष्टता, वास्तवातील सामाजिक संवाद करताना येणारे अडथळे, झोपेच्या समस्या आदी तक्रारींमधील वाढीबाबतही अनेक संशोधने आपल्याला जागे करू पाहात आहेत (अमेरिकन सायकॉलॉजीकल असोसिएशन सर्वेक्षण; कंझ्यूमर मोबिलिटी रिपोर्ट, २०१५; मॅक्स विन्टरमार्क, न्यूरोरेडिओलॉजिस्ट, स्टॅनफोर्ड विद्यापीठ; ह्यूंग सुक सिओ, न्यूरोरेडिओलॉजिस्ट, कोरिया; लस्टिंग, एंडोक्रोनोलॉजिस्ट).    


विचारप्रक्रियेचे ध्रुवीकरण


सोशल मिडियाच्या वापरकर्त्याला हवी तेवढी पण एकाच प्रकारची माहिती सतत पुरवत राहण्याच्या व्यावसायिक गरजेमुळे आभासी दुनियेतील संवादामध्ये समाजाचे वैचारिक ध्रुवीकरण होतानाही दिसते आहे. समोरासमोर होणाऱ्या संवादातील संवेदनशीलता, आपुलकी, आदर कमी होत जाऊन माणसे आक्रमक, तर्कदुष्ट आणि एकारलेपणाकडे झुकत आहेत. मेंदूमध्ये विचारांचे पूर्वग्रहात आणि कट्टरतेत रूपांतर होऊन सामाजिक सौहार्द आणि विविधतेचा आदर कमी होत चालला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोशल मिडियाच्या बेलगाम व्यवहारावर वाजवी बंधने घालण्याबाबत जनमत तयार करण्याच्या चळवळी हळूहळू मूळ धरू लागल्या आहेत.        


विवेकी वापर शक्य आहे


मानवाच्या प्राणीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या ‘तात्काळ सुख’ मिळवण्याच्या सहजप्रवृत्तीला समाज-माध्यमांमधून आता ‘सामाजिक दर्जा/स्टेटस’चे रूप प्राप्त झाले आहे. ह्या ‘आभासी दर्जा’मध्ये अडकून न राहता अधिक तारतम्याने वागण्याची निकड समजावून घेण्याची आता हीच वेळ आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या चौथ्या क्रांतीचा हा संक्रमणकाळ आहे. अशा संक्रमणकाळात नेहमीच ‘जुने ते सारे कालबाह्य’ आणि ‘नवे ते सारे सोने’ वाटत असते. अशावेळी योग्य काय अन् अयोग्य काय, चूक काय अन् बरोबर काय, इष्ट काय अन् अनिष्ट काय हे ठरवता येणारा सारासार विवेक निरंतर प्रयत्नांनी रूजवावा लागतो. वैज्ञानिक निरीक्षणांचा आधार इथे विशेषत्वाने उपयुक्त ठरतो. सोशल मिडियाने मेंदूलाच ‘लक्ष्य’ केल्याने अवधानक्षमतेबाबत आधुनिक विज्ञान काय सांगते हे पाहणे म्हणूनच कळीचे आहे. ज्याप्रमाणे पैसा हे आर्थिक व्यवहाराचे चलन आहे आणि ते काटकसरीने वापरून आपण आपली प्रगती साधायला शिकलो त्याप्रमाणेच ‘अवधानक्षमता’ हे बौध्दिक व्यवहाराचे चलन आहे! निसर्गाने आपल्याला ते मर्यादीत स्वरूपात दिलेले आहे हे उत्क्रांतीच्या वैज्ञानिक अभ्यासात अधोरेखितही झालेले आहे. सोशल मिडियाच्या आहारी जाऊन तिची उधळपट्टी न करता आपल्या संपन्न आणि समाधानी आयुष्यासाठी ते पैशासारखेच जपून वापरणे म्हणूनच शहाणपणाचे ठरणार आहे. उन्नत अशी मानवी स्तरावरील दीर्घकालीन उद्दिष्टांची निर्मिती करणे, ध्येयपूर्तीसाठी निरंतर ‘लगे रहो’ची वृत्ती घडवणे, प्रतिकूल परिस्थितीतही निर्धाराने उभे राहण्याची ताकद कमावणे आदींसारख्या कुवती विकसित करण्यासाठी अवधानक्षमतेचाच प्रमुख आधार आपल्याला असणार आहे. जागतिक स्पर्धेचे २१ वे शतक छोट्या-छोट्या मोहांना वा व्यत्ययांना बळी न पडता ठरवलेल्या कार्यावर दीर्घकाळाकरता लक्ष केंद्रित करून ते उत्कृष्टरित्या पार पाडणाऱ्यांनाच करिअर बहाल करणार आहे. ‘सोशल मिडियाची आकर्षक भूल’ विरुद्ध ‘स्वयं-शिस्तीचे व्यवधान’ या नव्या द्वंद्वाची सोडवणूक कठोर आत्मपरीक्षणाने शक्य होणार आहे. नोटिफिकेशन ऑफ करणे, स्क्रीनचा प्रकाश मंद करणे, उठसूट स्क्रीन पाहून संदेश पाठवण्यावर लगाम घालणे आदींसारख्या नव्या सवयी आता अंगिकाराव्या लागणार आहेत. स्मार्टफोनमध्ये व्यसनी बनविण्याचे अंगभूत गुण असल्याने आपण ‘मानसिक आजारी तर बनत नाही ना’ हा प्रश्न रोखठोक पद्धतीने विचारावा लागणार आहे. सोशल मिडियावर जाण्याऐवजी पुस्तक वाचणे, वाद्य वाजवणे, मैदानावर खेळणे, न थांबता सलग ३० मिनिटे लिहीणे, गाणे गाणे, व्यायाम करणे, नवी भाषा शिकणे, छंदासाठी पुरेसा वेळ देणे, छोटे- छोटे समाजोपयोगी कार्य करणे, ध्यान करणे, निसर्गात भटकंती करणे, फोटोग्राफी करणे, चित्रे काढणे, नृत्य करणे... अशा कितीतरी उत्पादक गोष्टींची कास धरावी लागणार आहे. दिवसातून विशिष्ट वेळीच सोशल मिडियावर जाणे आणि आठवड्यातून काही दिवस ‘नो सोशल मीडिया डेज’ म्हणून साजरे कराणे ही काळाची गरजसुद्धा ओळखावी लागणार आहे. मेंदूचे आरोग्य तो तरतरीत, तल्लख आणि सर्जनशील राहण्यात आहे ही खूणगाठ मनाशी बांधून आपण सोशल मिडियाचा विवेकी वापर करू शकलो तरच नवे तंत्रज्ञान रुजवू पाहात असलेल्या माहिती-क्रांतीच्या संक्रमणकाळाला सकारात्मक प्रतिसाद दिला असे आपण ठामपणे म्हणू शकू.


- प्रा. डॉ. शिरीष शितोळे, मानसशास्त्र विभाग, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर

2 comments:

  1. This article grab the attention of readers towards current problem in the society. Most of the young generation is facing such psychological crisis because of excess use of social media and smart phone. Very nice article Sir!

    ReplyDelete

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...