*कन्या महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त व्याख्यान*
मिरज: दि न्यु मिरज एज्युकेशन सोसायटीच्या कन्या महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त व्याख्याते, लेखक, प्रवचनकार प्रा. मिथुन माने यांचे "वाचन संस्कृती काळाची गरज" या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शर्वरी कुलकर्णी होत्या. या व्याख्यानाचे आयोजन ग्रंथालय व मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. झुम वेब प्लॅटफॉर्म द्वारे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुमारे २०० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
प्रारंभी डॉ. जे. पी. चंदनशिवे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. माने यांनी आपल्या व्याख्यानातून, अनेक महापुरुषांचे दाखले देऊन त्यांच्या विचारांचे अवलोकन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. नवीन तंत्रज्ञानामुळे पुस्तक हातातुन सुटत गेले, ग्रंथालयात हजारो पुस्तके धूळ खात पडून आहेत, तरुण वाचकवर्ग लुप्त होत चालला असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतातून, डॉ. शर्वरी कुलकर्णी यांनी वाचनाचे महत्व विशद करून वाचन संस्कृती जपणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे नमूद केले.
प्रा. सुजाता आवटी यांनी या पाहुण्यांची ओळख करून दिली. आभार डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी मानले. संयोजन प्रा. रमेश कट्टीमणी व श्री. राजकुमार बोमान्ना यांनी केले. प्रा. बाबासाहेब सरगर यांनी तांत्रिक सहकार्य केले. कार्यक्रमासाठी नॅक समन्वयक प्रा. माधुरी देशमुख, उपप्राचार्या मंजिरी कुलकर्णी, पर्यवेक्षिका डॉ. सुनीता माळी, सर्व प्राध्यापक, ग्रंथालय सेवकवर्ग यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment