Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Wednesday, 31 March 2021

आनंदी क्षणाच्या आठवणी

तरुण संजय अचानक वारला. त्याचे आई वडील, पत्नी व नऊ वर्षाचा मुलगा त्याच्या शवाजवळ  रडत बसले.

ते सर्वजण एका साधुला खूप मानत होते.


 त्या  साधुनांं  संजयची दुखःद बातमी कळताच ते संजयच्या कुटुंबियाना भेटायला आले.


घरात प्रवेश करताच संजयचे पूर्ण कुटूंब रडत असल्याचे पाहिले. साधुनां  पहाताच संजयची बायको अजून जोरात रडू लागली.

दुखाःने म्हणाली, " महाराज, हे तरुण वयात आम्हाला सोडून गेले आता माझ्या मुलाच कसे होईल...?😭

याना परत आणा.

 त्याना परत आणण्यासाठी मी काही क़रायला तयार आहे." साधुमहाराजानी पत्नी व वृध्द आई वडिलांचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला पण संजयच्या अकाली मृत्यूचा आघात पचविणे त्याना जड जात होते.


शेवटी साधुमहाराज  म्हणाले, " ठिक आहे, मला पंचपात्रभर पाणी द्या." ते शवाजवळ पंचपात्र घेवून बसले

व म्हणाले, "ज्याला कोणाला संजय जिवंत व्हावा असं वाटते त्याने पंचपात्रातील पाणी प्यावे. संजय जिवंत होईल पण पाणी पिणारा मरण पावेल"


स्मशान शांतता.!🤕


"चला, तुम्हीच म्हणाला होता ना की, संजय कुटुंबातील एकुलता एक कमविता आहे? त्याच्या ऐवजी कोण मरायला तयार आहे? ही एक आदलाबदलीची चांगली संधी आहे,


 हो ना?"


संजयची बायको व वृध्द आई एकामेकीच्याकडे पाहू लागल्या. वृध्द वडिल संजयच्या मुलाकडे पाहू लागले. पण कोणी पुढे येईना 

साधु वडिलांना  म्हणाले, " बाबूजी, तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या मुलासाठी देत नाही का?"

बाबूजी म्हणाले, "माझ्या पत्नीची

जबाबदारी माझ्यावर आहे. मी मेलो तर तिच्याकडे कोण पाहिल? मी नाही आयुष्य देवू शकत."


महाराजांनी  प्रश्नार्थक मुद्रेने वृध्द आईकडे पहात विचारले, " आई..तुम्ही ?"

आई म्हणाली, "माझ्या मुलीचे पहिले बाळंतपण आहे. ती आता येणार आहे. मी मेले तर मुलगी व होणार्‍या बाळाला कोण पाहिल? तुम्ही संजयच्या बायकोला का विचारीत नाही?”

साधु महाराजांनी हसून संजयच्या तरुण पत्नीकडे पाहिले. ती अश्रूने भरलेले डोळे विस्फारुन म्हणाली, "महाराज, मला माझ्या मुलासाठी जगले पाहिजे. मी मेले तर त्याला कोण? कृपा करुन मला हा त्याग करायला सांगू नका..”साधुनी संजयच्या मुलाला विचारले, "बाळा! तू तुझे आयुष्य वडिलाना देण्यास तयार आहे?"


मुलगा काही बोलायच्या आत त्याच्या आईने मुलाला ओढून छातीजवळ धरून म्हणाली,

"साधु महाराज, 

तुम्हाला वेड लागलय "?

माझा पोरगा फक्त नऊ वर्षाचा आहे. त्याने अजून पुरेसं जग पण पाहिलं नाही. तुम्ही त्याचा कसा विचार करु शकतो.

साधुमहाराज म्हणाले, "बहुतेक याचा अर्थ तुम्हा सर्वांची या जगात काही ना काही कारणासाठी जरुरी आहे. संजयचं एकटा बिन कामाचा होता म्हणून तो गेला. तरी आता त्याचे अंतिम संस्कार करायला सुरवात करायची का? आधीच ऊशीर झाला आहे”


एवढे बोलून साधु निघून गेले. 

तात्पर्य :---

जोपर्यत जीवंत आहात प्रेम तोपर्यंतच.

त्यानंतर फक्त आनंदी क्षणाच्या आठवणी..!


संकट समयी प्रामाणिक व श्रीमंतीत साधे रहा.

अधिकार असताना समंजस व रागावलेला असताना शांत रहा. .....


म्हणुनच कवी भा. रा. तांबे 

म्हणतात......जन पळभर म्हणतील हाय हाय ............

              🙏🙏🙏🙏


संदर्भ: मनसंवाद

Saturday, 27 March 2021

जीवन

 त्रासाने भरलेल्या खोक्यावर

मी "आनंद" असं लिहितो

...आणि दुःख confuse होतं


येणाऱ्या प्रत्येक संकटाला

एक छानशी smile देतो

...आणि दुःख confuse होतं


खरं सांगायचं तर खूप वेळा

मी कोलमडून जातो

सगळं संपलं असं वाटून

अगदी गर्भगळीत होतो

कुठूनतरी देव येऊन

माझ्या हातात हात देतो

...आणि दुःख confuse होतं


संकटाच काय? ती येणारच

आल्यावर थोडं फार छळणारच

आपण स्थिर राहायचं काही काळ

संकटाचं पाणी पाणी होणारच

आलेलं संकट हसता हसता

नकळत नाहीसं होतं

...आणि दुःख confuse होतं


किती दिवसाचं हे आयुष्य

आज ना उद्या संपणारच

अमुक आहे-तमुक नाही 

आपलं चालू राहणारच

फाटक्या गोधडीत पाय आखडून

मी सुखाने झोपी जातो

...आणि दुःख confuse होतं


म्हटलं तर जीवन सुंदर 

म्हटलं तर वाईट आहे

मग त्याला सुंदर म्हणण्यात 

सांगा काय वाईट आहे? 

जीवनाकडे बघण्याचा

मी चष्मा विकत घेतो

...आणि दुःख confuse होतं.

Friday, 26 March 2021

भावना व्यक्त करणे

दिवसभरात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भावनानुभव येतात . त्यातील काही अनुभव सुखद तर काही अनुभव दुःखद असतात . मानसिक स्वास्थ्यासाठी स्वत : च्या भावना स्वीकारा. अगदी राग , भीती , आक्रमता , हेवा , तिरस्कार या स्वत : च्या भावनासुद्धा मान्य करा . कारण दुसऱ्यांचा राग येणे , कधीतरी हेवा वाटणे हे नैसर्गिकच आहे . तेव्हा त्या भावना टाळण्याचा किंवा दडपून टाकण्याचा प्रयत्न करू नका . मात्र त्या भावनांच्या आहारी जावू नका . त्यांना चिकटून राहू नका . भावना सतत दडपण्याची सवय लागली, तर नंतर कधीतरी त्या विकृत रूपात उफाळून येण्याची किंवा भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता असते . तेव्हा भावतरंग उमटू द्या. भावना नियंत्रित प्रमाणात व योग्य पद्धतीने व्यक्त करता आल्या पाहिजेत. मानसिक स्वास्थ्यासाठी एक भावना अत्यावश्यक असते. ती म्हणजे प्रत्येक दिवशी थोडेतरी मनमोकळे हसावे. आनंद व समाधान ही मानसिक स्वास्थ्याचा प्राणवायू आहे. हल्ली बऱ्याच मोठ्या शहरांतून हास्य क्लब ' सुरू झाले आहेत हे तुम्हाला माहितच असेल. हसण्यामुळे चेहऱ्याचे स्नायू, श्वसन संस्था व पचनसंस्था यांना चांगला व्यायाम मिळतो. तसेच हसण्याने जे जैवरस स्त्रवतात ते शारीरिक व मानसिक स्वास्थ्याला पोषक असतात, असे काही शास्त्रज्ञांनी संशोधनाअंती सांगितले आहे.  म्हणून रोज आनंद , सुख या भावना जरूर अनुभवा. शिवाय तुम्ही हसतमुख असलात तर तुमचा सहवास इतरांना प्रिय वाटतो. तुमच्याबरोबर राहून तेही आनंदी होतात. हसतमुख राहायचे की स्वत : च्या दुःखाचे, तक्रारींचे रडगाण गात राहायच हे तुमच्याच ( हातात ) इच्छेवर अवलंबून असत . यासंदर्भात कवी मंगेश पाडगावकरांची एक छान कविता आहे. 

सांगा ! कस जगायचं ?

कण्हत, कण्हत की गाण म्हणत

तुम्हीच सांगा !

Thursday, 25 March 2021

सुविचार

 💞बिरबलाच्या हजर जबाबीपणाची सतत परीक्षा घेणाऱ्या अकबरानं नेहमीप्रमाणे त्याला ‘अवघड’ कोडं घातलं. 


💞 अकबर ने जमिनीवर एक रेष ओढली आणि बोलला ‘काढलेली रेषा न पुसता छोटी करून दाखव.’ 


💞बिरबलाचं उत्तर तयारच होतं. त्यानं त्याच रेषेजवळ एक मोठी रेष मारली आणि जुनी रेष आपसूकच ‘छोटी’ होऊन गेली.


💞तसंच माणसाच्या मनाचंही आहे. जेव्हा 

मनात नकोसे वाटणारे विचार येतात तेव्हा ते त्रास देतात,असे दुःखाची अनुभूती करून देणारे विचार आपल्याच मनात निर्माण होतात


💞 अशा विचारांना पराभूत करून मनाला स्वास्थ्याकडे घेऊन जाणारे सामर्थ्य ही आपल्याच मनात दडलेले असते


💞 जेव्हा एखादी दुर्दैवी घटना घडते तेव्हा त्या घटने बाबत येणाऱ्या विचाराचे स्रोत आपोआप मनात सरू होते. आपले मन सातत्याने त्यावर विचार प्रवाहित करते.


💞आपण प्रवाहाला वेळीच लगाम न घातल्यामुळे जास्त विचार प्रवाहित होऊन  मनाची शक्ती कमी कमी होत जाते आणि आपला तणाव वाढत जाऊन आपण तणावग्रस्त बनतो


💞अशा वेळी आपण बिरबला प्रमाणे  नकारात्मक रेषे शेजारी एक सकारात्मक विचारांची मोठी रेषा ओडून नकारात्मक विचाराची लांबी वेळीच कमी करावी ....


💞 दुःखाला मोठ करायचं किंवा सुखाला मोठ करायचं हे मनाच्या हातात असते. 

फक्त गरज असते तुम्ही सतर्क राहून वेळीच आपल्या मनाला आदेश देण्याची..


- अजय ढगे

Wednesday, 24 March 2021

अतिनैराश्य

अकारण दुःखी मन, कशातही रस नसणे, निद्रानाश इतरांशी मिळून मिसळून न राहणे या सर्व ‘अतिनैराश्याच्या’ खाणाखुणा आहेत. या मानसिक लक्षणांबरोबरच काही शारीरिक लक्षणेही (भूक नसणे, बध्दकोष्ठ, सैलपणा, थकवा, इ.) आढळतात. असा रुग्ण आत्महत्या करण्याचा संभव असतो. मृत्यू हेच औषध आहे अशी त्यांतल्या ब-याच जणांची खात्री असते. अशा दर दहा मनोरुग्णांपैकी एखादा तरी आत्महत्या करतो.

उदाहरण

रघुनाथ वकिलांची वकिली हळूहळू बंद झाली. सुरुवातीला अगदी हुशार म्हणून त्यांचा लौकिक होता. नंतर त्यांच्यात बदल दिसू लागले. सुरुवातीला खूप बडबड, चिडकेपणा सुरू झाला. त्यानंतर अशीलांना उर्मटपणे बोलणे, आरडाओरड करणे, कामावरचे लक्ष कमी होणे, स्वतःबद्दल अव्वाच्या सव्वा बोलणे, अनोळखी माणसांनाही हसून खेळून सलगी दाखवणे, खूप महत्त्वाकांक्षा, इत्यादी प्रकार दिसून येऊ लागले. आक्रमक बोलणे, वागणे जास्त झाल्यावर व्यवसायाला उतरण लागली. एक-दोन वर्षातच त्यांच्याकडे अशील जाणे थांबले, पण कोर्टात जाणे-येणे चालूच होते. काम मिळेनासे झाल्यावर ही सर्व लक्षणे जास्त वाढली. मध्येमध्ये यामध्ये चढउतार व्हायचे आणि आठवडा-दोन आठवडे चांगले जायचे. डॉक्टरकडून मानसोपचार झाल्यावर हळूहळू त्यांची लक्षणे सौम्य झाली. यानंतर त्यांचे वागणे बरेच सुसह्य झाले. हा ‘उन्माद’ आजार म्हणता येईल.

उन्माद व अतिनैराश्य या दोन्ही प्रकारच्या रुग्णांवर औषधोपचाराचा चांगला उपयोग होतो. याबरोबरच इतर नातेवाईकांनी मानसिक आधार देऊन समजूतदारपणा दाखवून मनोरुग्णास मदत केली पाहिजे.

उन्माद व अतिनैराश्य ही दोन टोके आहेत. एकाच रुग्णात ही दोन्ही टोके दिसू शकतात. कधी उन्माद तर कधी अतिनैराश्य.

(संदर्भ : आरोग्यविद्या डॉट कॉम)

Tuesday, 23 March 2021

मेंदूची उचकी



मनात येणाऱ्या विचारांच्या प्रवाहापासून अलग होऊन ते विचार जाणणे हे मेंदूतील सर्वात पुढील भागाचे कार्य आहे. कपाळावर माणसे टिळा किंवा कुंकू लावतात तेथेच मेंदूचा हा भाग असतो. गेल्या मिनिटांत आपापल्या मनात कोणते विचार होते हे सामान्यत: सर्वाना पाहता येते. याला मेटाकॉग्निशन म्हणतात. रोज काही वेळ विचारांच्या प्रवाहापासून असा अलग होण्याचा सराव करता येतो. असा सराव करत असताना मेंदूचे परीक्षण केले असता वरील भाग सक्रिय झालेला दिसतो. त्याच्या शेजारी असलेला भाग माणूस ठरवून एखाद्या ठिकाणी लक्ष देतो त्या वेळी सक्रिय होतो. ओसीडीचा (ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर) त्रास होत असतो त्या वेळी या दोन्ही भागांचे कार्य नीट होत नाही. वय वर्षे सहा ते अठरा या वयातील २०० मुलांपैकी एकाला मानसोपचार आवश्यक आहेत असा ओसीडीचा तीव्र त्रास असतो. सौम्य स्वरूपात हा त्रास खूप मुलांना असतो. वय वाढते तसा हा त्रास वाढत जातो आणि १८ वर्षे वयातील मुलात त्याचे प्रमाण दुप्पट झालेले दिसून येते. अनेक हुशार मुलांचे करिअर अशा त्रासाने धोक्यात येते. ओसीडीला ‘मेंदूची उचकी’ अशी उपमा देतात. माणसाच्या छाती व पोट यांच्या मध्ये श्वासपटल असते. त्याचे झटका आल्यासारखे आकुंचन होते त्या वेळी उचकी लागते. काही कारण नसतानाही उचकी लागू शकते. ‘ओसीडी’मध्ये मेंदूतील ठरावीक विचाराची फाइल अशीच खूप वेळ पण झटका आल्यासारखी प्रबळ होऊन राहते. त्या वेळी अन्य कोणतेही भान राहत नाही. सतत विचारात राहणे हे असे होण्याचे एक कारण असू शकते. पण असे कारण नसते म्हणजे मुलेमुली नृत्य करणारी किंवा मैदानी खेळ खेळणारी असली तरी त्यांनाही असा त्रास होऊ शकतो. काहींना असा त्रास ठरावीक प्रसंगात होत नाही. म्हणजे एखाद्या सर्जनला ऑपरेशन करत असताना विचारांचा त्रास होत नाही, पण कुणाशीही अनौपचारिक गप्पा मारत असताना त्रासदायक विचार छळत राहतो. लक्ष देत असताना मेंदूतील पुढील भाग सक्रिय राहात असल्यानेच ऑपरेशन करीत असताना त्रास होत नाही. मात्र सतत असे लक्ष देणे शक्य नसते. याचसाठी अधूनमधून मनात आपोआप येणाऱ्या विचारांना प्रतिक्रिया न करता जाणणे हे कौशल्य उपयोगी ठरते. ते शालेय वयापासून शिकवायला हवे.


🖋 *डॉ. यश वेलणकर* yashwel@gmail.com

=================

*संकलन- नितीन खंडाळे*

        -चाळीसगाव

*दै_लोकसत्ता*

Monday, 22 March 2021

मानवी मेंदूची रचना व कार्य


Brain Structureप्राणीजगताच्या उत्क्रांतीमध्ये मानवाचा मेंदू सर्वात प्रगत आहे. अर्थातच मानवी मेंदूच्या उत्क्रांतीत इतर प्राण्यांच्या मेंदूच्या विकासाचे टप्पे पायाभूत आहेतच. इतर प्राण्यांच्या मेंदूच्या मूलभूत घडणीखेरीज काही नवे ‘थर’ मानवी मेंदूत आहेत. मेंदूरचनेत हे ‘थर’ स्पष्टपणे दिसून येतात. मेंदूच्या रचनेत लहान मेंदू व मोठा मेंदू ही सामान्यपणे प्रचलित विभागणी आहे. मानसशास्त्राच्या दृष्टीने तीन विभाग धरलेले आहेत.

  • मूळ मेंदू – सर्वात खालचा, चेतारज्जूशी जोडलेला ‘देठाचा’ भाग (ब्रेनस्टेम)
  • मध्यमेंदू – मधला थर (मिडब्रेन)
  • मुख्यमेंदू – वरचा थर (सेरेब्रम)

मूळ मेंदू अगदी मूलभूत शारीरिक कामांचे नियंत्रण करतो – यात श्वसन, रक्ताभिसरण, शुध्दी किंवा जाणीव, इत्यादी प्राणिजीवनाला लागणारी प्राथमिक कामे येतात. मूळ मेंदूला इजा झाल्यास बेशुध्दी, श्वसन व हृदयक्रिया थांबणे आणि मृत्यू येणे संभवते.

मध्यमेंदू हा भावना, वासना, लैंगिक इच्छा, इत्यादी नियंत्रित करतो. प्रजननासाठी लैंगिक इच्छा, स्वसंरक्षण व आक्रमण या प्राणिजीवनासाठी आवश्यक पण उत्क्रांतीतल्या नंतरच्या प्रवृत्ती आहेत. या सर्व मध्यमेंदूतून नियंत्रित होतात. हिंसा आणि लैंगिक वासना या काही ‘पाशवी’ वाटणा-या गोष्टी मध्यमेंदूत आहेत, त्यांचा वारसा प्राचीन आहे. झोपेचे केंद्रही यातच आहे.

मुख्यमेंदू हा मध्यमेंदूच्या वर, पुढे, मागे, बाजूला पसरलेला असतो. याचे डावा-उजवा असे दोन स्पष्ट भाग असतात. या दोन्ही भागांचे काम जरा वेगळे असते. डावा भाग विचारशक्ती, बोलणे, भाषा, तंत्रज्ञान, इत्यादी प्रगत कामे पार पडतो. उजवा भाग संगीत, नृत्य, भावना, जाणिवा, आध्यात्मिक उर्मी आणि अवकाशज्ञान (म्हणजे आपल्या आजूबाजूला कोठली वस्तू कोठे कशी आहे याचे ज्ञान), इत्यादी जबाबदा-या सांभाळतो. यातही मोठया मेंदूचा पुढचा कपाळातला भाग विचारशक्ती आणि सामाजिक भान सांभाळतो. या भागाला इजा झाली तर विचारशक्ती दुबळी होईल आणि सामाजिकदृष्टया अयोग्य गोष्टी त्या व्यक्तीकडून होतील (उदा. चारचौघांत लघवी करणे, नागवे होणे, इ.). मेंदूचा मानेकडचा मागचा भाग हा दृष्टीज्ञानाशी संबंधित आहे. कानाकडचा भाग ध्वनिज्ञान आणि वासाचे ज्ञान सांभाळतो. वरचा मध्यभाग शरीराची हालचाल आणि संवेदना ज्ञान सांभाळतो.

मेंदूचे काम कोटयवधी मेंदूपेशींमार्फत (चेतापेशी) चालते. या मेंदूपेशींना असंख्य टोके असतात. ही टोके आजूबाजूच्या पेशींच्या टोकांना जोडलेली असतात. या जोडणीचे स्वरूप ‘रासायनिक + विद्युत’ असे असते. एका पेशीतून निर्माण झालेला संदेश दुस-या पेशीपर्यंत असा पोहोचतो यात टोकांमध्ये असलेले ‘रासायनिक ‘ माध्यम आणि त्यातून जाणारा ‘विद्युत’ संदेश यांचा मुख्य वाटा असतो. या रासायनिक पदार्थाचे प्रमाण वाढले किंवा कमी झाले किंवा विद्युतसंदेशांमध्ये बिघाड झाला तर मेंदूचे कामकाज बिघडते. अल्झायमरच्या आजारात असाच बिघाड होतो.

एवढे आता माहीत असले तरी मन व मानसिक आजार यांबद्दल शास्त्राला अजूनही पुष्कळ कळायचे शिल्लक आहे.

संदर्भ: आरोग्यविद्या डॉट कॉम

Sunday, 21 March 2021

विचारधारा

 एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही ह्या 

अश्या स्वतःच्या 

ग्रेट स्वभावाचा

काही लोकांना प्रचंड गर्व असतो 

म्हणूनच हा मेसेज मला सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला ...

नाती


कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, 

लक्षात येतं की, 

असे अनेकजण ... 

ज्यांनी  "आपल्याला दुखावलं" म्हणून आपल्या आयुष्यातून आपण वजा केलं होतं ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच ...


भावना दुखावल्या असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो 

आणि 

सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली. 


त्यांची एखादी कृती, 

चूक हा जणूकाही 

जन्म - मरणाचा प्रश्न बनवून 

ती हकनाक 

आपल्या अहंकाराची बळी कधी झाली 

हे कळलंच नाही. 

नाजूक नात्यांना शेवटी अहंकार नाही, 

तर मायेच्या ओलाव्याचीच गरज असते ...


आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसंतसं लक्षात येतं की, 

भावना आणि अहंकार

 ह्यांच्यात असलेली 

सूक्ष्म रेषा 

योग्य वेळी जाणून वागायला हवं होतं. 

त्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या होत्या. 

स्वतःच्या चुकासुद्धा आठवून 

निदान स्वतःशी तरी मान्य करायला हव्या होत्या ... 

भावना क्षमाशील असते 

तर अहंकार मात्र 

एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो ...

भावना दुखावली 

असं आपण म्हणतो 

तेव्हा खूप वेळा भावना नाही 

तर अहंकार दुखावलेला असतो ...


अगदी एखादी आनंदाची बातमी जरी कुणी आपल्याला उशिरा दिली 

तर त्या गोष्टीचं दुःख आणि राग म्हणून त्यांचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं आणि हे अनेकदा घडतं ...


जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं तर त्या जगण्यालाही स्वतःचं असं वेगळं रूप आणि अस्तित्व असतं ...


कुणाचंच कुणावाचून काही अडत नाही, 

पण आयुष्यात आलेली चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतींमुळे दुरावतात, 

तेव्हा मात्र जर ती माणसं आपल्या आयुष्यात राहिली असती तर जगणं अजून सुंदर आणि अर्थपूर्ण झालं असतं 

असं मात्र नक्कीच वाटून जातं ... 

क्षणभंगुर आयुष्याचे लाड करताना 

आपल्या जगण्याचा दर्जा आपण राखायला हवा आणि ह्यासाठीच ते जगणं सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या चांगल्या माणसांची ओळख आणि जोपासना करणं आणि अहंकारामुळे त्यांना न गमावणे हे जाणीवपूर्वक आपण करावं असं मनापासून वाटतं ...

बऱ्याचदा तर समोरच्या व्यक्तिच्या वागण्याचा आपण 

आपल्या मतानुसार अर्थ काढतो, 

तसा विचारही समोरच्याचा नसतो, 

तो सहज आपलं म्हणून वागत असतो ...

परंतु आपण चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आयुष्यातून सहज काढून टाकतो ... 

आणि आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही ... म्हणून ...


कुणाची कितीही मोठी चूक असली तरी ती आयुष्यापेक्षा आणि नात्यापेक्षा मोठी निश्चितच नाही ...!!


 अप्रतिम.

आपल्या सगळ्यानाच अंतर्मुख करायला लावेल असा लेख.👌🏻👌🏻🙂

नक्की वाचा.🙏🏻

Saturday, 20 March 2021

म्हणून मी नेहमी आनंदी असतो..


मी भुतकाळ चघळत नाही

ना मी भविष्याची चिंता करतो

मी वर्तमानात जगतो

म्हणून नेहमी आनंदी असतो......


मी कुणाकडुन काडीची अपेक्षा करत नाही

मी कुणाबद्दल राग मनात 

धरत नाही

मी लगेच सगळ्यांना माफ करतो

म्हणून मी नेहमी आनंदी असतो...


मी कसलाच हव्यास आणि लोभ करत नाही

बकरीचा मी दिवसभर सारखाच 

चरत नाही

मी समाधानी राहुन  फक्त दोन वेळाच खातो

म्हणून मी नेहमी आनंदी असतो


मी हायफाय राहण्यासाठी धडपडत नाही

कोणासाठी कधीच दुःखाने

तडफडत नाही

साधं राहुन आपल्या माणसांत सुखानं रमतो

म्हणून मी नेहमी आनंदी असतो


कोण काय बोलतं ह्याचा मी कधीच विचार करत नाही

कोणी काहीही बोलल तरी 

पुन्हा मी ते स्मरत नाही

माझां जीवन स्वछंदी आहे ते

मी मजेत जगतो

म्हणून मी नेहमी आनंदी असतो...


मला पदाचा ना ज्ञानाचा अहंकार

कधी शिवला नाही

तुच्छतेचा विचार कधी

मनाला भावला नाही

पाय जमिनीवर ठेऊन प्रसंगी 

अनवाणी चालतो 

म्हणून मी नेहमी आनंदी असतो..


जगायला काहीच भौतिक सुख 

लागत नाही

म्हणून मी गर्वाने कधीच

वागत नाही

सगळ्यांशी प्रेमाने आदराने 

आपुलकीने वागतो

म्हणून मी नेहमी आनंदी असतो


जन्म शाश्वत आहे तसा मृत्यू देखील शाश्वत आहे ही जाणीव आहे

माझ्यातही दोष आहेत आणि 

काहीतरी नक्कीच उणीव 

आहे

माझ्या दोष मी रोजच पाहुन

सुधारण्याचा प्रयत्न करतो

म्हणून मी नेहमी आनंदी असतो....,......😊😊


संदर्भ : आपले मानसशास्त्र

Friday, 19 March 2021

Thursday, 18 March 2021

सुख म्हणजे काय?

 सुख म्हणजे काय? दोन परंपरा ( What is Happiness ? Two Traditions ) 


आपले कसे चालले आहे ? या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिगत व अनेक पद्धतीने आपणास देता येते . चांगले जीवन म्हणजे काय ? सुख म्हणजे काय ? समाधानकारक जीवनाची व्याख्या काय आहे ? चांगले जीवन जगणे म्हणजे काय ? कोणत्या प्रकारच्या जीवनाचे आपणास मार्गदर्शन करावे असे वाटते ? लोक मला कसे आठवू शकतील ? इत्यादी प्रश्नांचे नेमके उत्तर आपणास हवे आहे. 
१. विलासी सुख ( Hedonic Happiness ) 
विलासी सुखाता सुखासक्ती सुख, ऐहिक सुख किंवा भौतिक सुख या नावानेही ओळखले जाते. विशेषतः बिलासी सुख हे इंद्रियजन्य सुख समजले जाते. सुख हेच अंतिम ध्येय असा विचारप्रवाह या सुखामध्ये मोडतो. आपल्यापैकी प्रत्येकजण दीर्घायुष्याची आशा बाळगत असतो. अपरिपक्वनामुळे एखाद्याचा शेवट होत नाही, ' आत्महत्या ' या संकल्पनेद्वारे आपणाला जीवनातील संख्यात्मकतेऐवजी जीवनातील गुणात्मकता अधिक महत्त्वाची वाटते. गुणात्मक जीवनामध्ये हर्ष / आनंद फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक जण हर्षभरीत ( आनंदी ) आणि समाधानी जीवन जगण्याची आशा करतो. अशी आशा बाळगण्यानेच आपल्यातील चांगल्या गोष्टी आणि सुखदायक अनुभव आपल्यातीलच वाईट गोष्टींचा समूळ नायनाट करीत असतात. विशेषतः अमेरिकन संस्कृतीनुसार चांगल्या जीवनाची व्याख्या ही एखाद्याच्या व्यक्तिगत सुखावर अवलंबून असते ; हाच खुशालीच्या विलासी ( सुखासक्ती ) दृष्टिकोनाचा सर्वसामान्य बीजविषय आहे. विलासी तत्वज्ञानाच्या समांतर रेषेत विलासी मानसशास्त्राचे घटक सामावलेले दिसून येतात. प्राचीन ग्रीक काळापासून सुख जावज्ञानाचे अनेक प्रकार पुढे आले आहेत. विलासी सुख म्हणजे हर्ष ( आनंद ) आणि सुखाचा पाठपुरावा करणे होय , हेच जीवनाचे मुख्य ध्येय आहे. मानसशास्त्राच्या विचारधारेतून खुशालीचा दृष्टिकोन व्यक्तिनिष्ठ खुशाली मधून उदयुक्त होतो ( डायनर , १९८४ ; डायनर व इतर , १९९९ ). सुखाचा अल्पतम पाठपुरावा किंवा शारीरिक सुख या विलासी सुखासक्तीच्या संकुचित दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन व्यक्तिनिष्ठ खुशालीकडे अधिक विस्ताराने पाहिले जाते. सुखाच्या विस्तारित दृष्टिकोनाचा व्यक्तिनिष्ठ खुशाली हा एक मर्यादित घटक आहे . ' व्यक्तिनिष्ठ खुशाली ' ( Subjective Well - Being - SWB ) म्हणजे जीवन समाधान , सकारात्मक भावविकारांची उपस्थिती आणि सापेक्षतः नकारात्मक भावविकारांची अनुपस्थिती होय . एकंदरीत, या तीन घटकांना मिळून सुखाचा संदर्भ लावला जातो. यामुळे व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आणि जीवनानुभवातून ' कोण सुखी आहे ? काय केल्याने सुखी बनता येते ? ह्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत होते . 

२. आत्मसुख ( Eudaimonic Happiness )
आत्मसुखाला स्त्र - वास्तविकीकरण, विशुद्ध सुख, वा पारलौकिक सुख असेही प्रतिशब्द आहेत. चांगल्या जीवनासाठी सुख पुरसे असते काय ? जर तुम्ही सुखी असाल तर तुम्ही तृप्त आणि समाधानी असू शकता काय ? सेलिग्मन ( २००१ अ ) यानी सूचित केलेल्या अभ्युपगमी उदाहरणांचा येथे विचार करावा लागेल. जर तुम्हाला कार्यक्षम यंत्राच्या साहाय्याने उदा. गळाच्या साहाय्याने मासा पकडतात तसे आकड्यासारखे वाकडे बांधून ठेवले तर काय होईल ? यामुळे तुम्हाला सातत्याने हर्षभरीत सुखाच्या अवस्थेत राहता येईल किंवा तुम्ही कोणत्याही सकारात्मक भावनांची इच्छा व्यक्त करीत असाल वा तुमच्या जीवनात काहीही घडले असले, तरीसुद्धा विलासी दृष्टिकोनानुसार, सदा सर्वकाळ तुम्हाला सुखाचा विपुल प्रमाणात अनुभव येत राहील. तुम्ही आकड्यासारखे बांधून ठेवलेल्या जीवनाची निवड करू शकता काय ? काही क्षणांसाठी तुम्हाला ते आवडेल ; परंतु, आपल्या पुष्कळ भावनांपैकी केवळ एक भावना आणि जीवन घटना - प्रसंगांच्या विविधतेसाठी सारखीच सुखी प्रतिक्रिया आणि आव्हाने प्रत्यक्षात जीवनानुभवांना दुर्बल करू शकतात . आपण जे काही गमावतो ते मौल्यवान असू शकते. उदा. भीतीसारख्या नकारात्मक भावना आपल्याला निवड करण्यास मदत करतात ; त्यामुळे आपल्या खुशालीऐवजी जीवनात बाधा निर्माण होऊ शकते. भीतीशिवाय आणि इतर सकारात्मक भावनेमुळे आपण वाईटातल्या वाईट गोष्टींची निवडी करीत असतो. आपण सुखी असू शकतो परंतु दीर्घकाळ शकत नाही .

संदर्भ : सकारात्मक मानसशास्त्र ; 
          डॉ. विश्वनाथ शिंदे

Wednesday, 17 March 2021

सामाजिक मानसशास्त्र

 

( सोशल सायकॉलॉजी ). सामाजिक–सांस्कृतिक संदर्भांत मानवी वर्तनाचा शास्त्रशुद्घ अभ्यास करणारी मानसशास्त्राची एक शाखा वा उपक्षेत्र. सामाजिक मानसशास्त्राची बीजे प्राचीन तत्त्ववेत्त्यांच्या लेखनातूनही आढळतात. ⇨प्लेटो आणि ⇨ ॲरिस्टॉटल ह्या तत्त्वज्ञांनी सामाजिक जीवनातील प्रश्नांचा विचार केला होता. त्यानंतर ⇨झां बॉदँ, ⇨टॉमस हॉब्ज, ⇨ जॉन लॉक, ⇨ झां झाक रुसो ह्यांनीही व्यक्ती आणि समाज ह्यांच्या संबंधांबाबत चिंतन केले होते. एकोणिसाव्या शतकात फ्रेंच तत्त्वज्ञ ⇨ऑग्यूस्त काँत ह्याने मानवाच्या सामाजिक जीवनाची रचना कशी करता येईल ह्याचा विचार केला. समाजजीवनाच्या स्थित्यंतरावरही त्याने विचार मांडले. विख्यात फ्रेंच समाजशास्त्रज्ञ ⇨एमील द्यूरकेम (१८५८–१९१७) ह्याने समूहाच्या वा सामुदायिक जाणिवेच्या अभिव्यक्तीचे तत्त्व मांडले. इंग्लंडमध्ये ⇨हर्बट स्पेन्सर ह्या तत्त्ववेत्त्याने क्रमविकासाच्या कल्पना सामाजिक विकासाला लावण्याचा प्रयत्न केला. ⇨गाबीएल तार्द (१८४३–१९०४) आणि ल बों (१८४१–१९३१) ह्या दोन सामाजिक विचारवंतांनी समाजजीवनाविषयी महत्त्वाचे लेखन केले.समाजजीवन हे मुख्यत्वेकरून अनुकरणावर अवलंबून असते, हा विचार तार्दने मांडला, तर ल बों याने समूहाच्या वर्तनाचे स्पष्टीकरण ⇨सूचन आणि सूचनक्षमता ह्यांच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला. विसाव्या शतकाच्या आरंभी सामाजिक मानसशास्त्राला स्वतंत्र अभ्यासक्षेत्राचे स्थान मिळवून देणारे दोन ग्रंथ प्रसिद्घ झाले : (१)⇨ एडवर्ड ॲल्झवर्थ रॉस ह्याचा सोशल सायकॉलॉजी (१९०८) आणि (२) ⇨विल्यम मॅक्डूगल (१८७१–१९३८) ह्याचा ॲन इंट्रोडक्शन टू सोशल सायकॉलॉजी (१९०८). रॉसवर तार्दच्या अनुकरणप्रणालीचा प्रभाव होता. मॅक्डूगलने ⇨सहजप्रेरणांची प्रणाली मांडली. समूहजीवन आणि सामाजिक आंतरप्रक्रिया ह्यांचा आधार म्हणून त्याने काही सहजप्रेरणांची सूचीच दिली.माणसे आणि मानवेतर प्राणी ह्यांच्या कृतींच्या मूलचालक (प्राइम मूव्हर्स) म्हणून त्याने सहजप्रेरणांना महत्त्व दिले. सी. एच्. कुली ह्याने ह्यूमन नेचर अँड द सोशल ऑर्डर (१९०२) ह्या त्याच्या ग्रंथात व्यक्ती आणि समाज ह्यांच्यातील नात्याच्या अतूटपणाचा मुद्दा मांडला. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कुटुंब, बालोद्यान, प्ले ग्रू प अशा ठिकाणी कसा होतो, हे त्याने सोशल ऑर्गनायझेशन (१९०९) मध्ये दाखवून दिले. ए स्टडी ऑफ द लार्जर माइंड मध्ये शहरीकरण, जलद वाहतूक आणि संदेशवहन, औद्योगिकीकरण आणि विशेषीकरण, वर्गसंघर्ष इत्यादींचा मानवी व्यक्तिमत्त्वावर काय परिणाम होतो, ह्याचे विवेचन केले. आनुभविक (एम्पिरिकल) पद्घतीचा प्रथम वापर १९२० च्या दशकात सुरू झाला. या पद्घतींनी सामाजिक प्रभाव आणि व्यक्तिगत वर्तन यांमधील संबंधांची साधनसामग्री पुरविली. या क्षेत्रात सर्वप्रथम अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात संशोधनास सुरू वात झाली. त्यावेळेपासून सामाजिक मानसशास्त्र ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक प्रणाली वा शास्त्र म्हणून विकासित झाले. साहजिकच अमेरिकेतील संशोधकांचा या क्षेत्रावर अधिकतर प्रभाव जाणवतो. माणसाच्या भोवतालचा परिसर जसा भौतिक, तसा सामाजिक आणि सांस्कृतिकही असतो. व्यक्तीचा समाजातील अन्य व्यक्तींशी वा व्यक्तिसमूहांशी संपर्क येत असतो. त्यांच्याशी व्यक्तीच्या आंतरक्रिया (इंटरॲक्शन्स) होत असतात. त्या व्यक्तींची काही एक संस्कृतीही असतेच. त्यांची मूल्यव्यवस्था, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोण, रीतिरिवाज, विधिनिषेध, जीवनशैली ह्या संस्कृतीचा भाग असतात. ह्या साऱ्यांचा व्यक्तीवर काही प्रभावही पडत असतो. अशा सामाजिक–सांस्कृतिक आंतरक्रियांमधूनच व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते.

Sunday, 14 March 2021

नाते

 💞 नाते या विषयावर आज खूप बोललं जातं आहे.आजकाल नात्यातली पारदर्शकता प्रत्येकाला अपेक्षित असते..


💞 आज वर्तमान समयी जी व्यक्ती आपेक्षा रहीत नाते निभावताना दिसते, त्याच व्यक्तीला सगळ्यात जास्त किंमत मोजावी लागते.


💞तुम्ही किती ही निस्वार्थ भावनेने नाती जपली तरी समोरच्या व्यक्तीला तुमच्या मध्ये स्वार्थ हा दिसणारच,

कारण त्याच्या कडे तुमच्या भावनांना साद घालण्याची समज आलेली नसते.


💞 अशा परिस्थिती मध्ये समोरची व्यक्ती किती ही चुकत असली तरी, तुम्ही त्याच्यावर  दोषारोपण करण्यात आपला वेळ वाया घालू  नका व आपल्या निस्वार्थ व्यक्तिमत्त्वावर ठाम रहा, 


💞कारण समोरच्या व्यक्ती मध्ये तुमच्या प्रामाणिक भावनांना  समजण्याची मानस दृष्टीच आलेली नसेल तर त्याला दोष देण्यात काहीच अर्थ नाही..


💞 अशा वेळी आपली पारदर्शकता, शुद्ध भावना टिकून ठेवणे हेच खूप महत्त्वाच आहे. 


💞समोरची व्यक्ती तुमच्यावर दोषारोपण करत आहे म्हणून, तुम्ही ही त्याच्या चुका काढत त्याच्या वर दोषारोपण करण्यास सुरुवात केली तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाला कधी ठेस लागेल हे तुम्हाला ही कळणार नाही. 


💞 जर आपला स्वाभिमान टिकून ठेवायचा असेल तर कोणाच्या ही चुकांकडे लक्ष न देता आपल्या प्रामाणिक भावनांना आपण स्वतःच न्याय द्यावा....

- Ajay Dhage

Saturday, 13 March 2021

B. A. I मानसशास्त्र प्रश्नसंच

बी. ए. भाग १ मानसशास्त्र विषयाचा प्रश्नसंच मिळवण्यासाठी येथे क्लिक करा. 

 https://drive.google.com/file/d/1pp8D1jNVkOrZQWptNb93JiSyH4FF3Y6O/view?usp=drivesdk

जीवन कौशल्ये

  आजच्या जीवनामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. ह्या बदलांमुळे विद्यार्थी गोंधळून गेलेला आहे. पालकांच्या आणि शिक्षकांच्या मोठ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली विद्यार्थी दडपला गेला आहे. त्यामुळे स्वत:ला समजून घेण्याची क्षमता विकसित होण्यास त्यास अडसर निर्माण होत आहे. व्यक्तिचा सर्वांगिण विकास करणे हे शिक्षणाचे अंतीम उद्दिष्ट मानले जाते. त्या सर्वांगिण विकासामध्ये मानसिक क्षमतांचा जास्तीत जास्त उपयोग करून शिक्षण अधिकाधिक जीवनकेंद्रित करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधता येतो. व्यक्तिविकास हा चारित्र्यनिर्मितीशी निगडीत असतो. चारित्र्याची उत्तमप्रकारे जडणघडण होण्यासाठी मानवाला महत्त्वपूर्ण जीवन कौशल्यांची आवश्यकता आहे. म्हणूनच जीवन कौशल्यांचा विकास शिक्षणातून होणे गरजेचे आहे. यास मानसशास्त्रीय कौशल्य (Psychological Skill) म्हणूनही ओळखले जाते.

जागतिक आरोग्य संघटनेने १९९९ मध्ये पुढील दहा जीवन कौशल्यांचा पुरस्कार केला :

  • ‘स्व’ची जाणीव : व्यक्तीची स्वत:च्या शारीरिक व मानसिक अवस्थांची जाण असण्याची क्षमता म्हणजे ‘स्व’ची जाणीव. या क्षमतेमुळे व्यक्तीला स्वत:च्या आवडी-निवडी, भावना व वृत्ती यांच्याबद्दल स्पष्टपणे विचार करता येतो. तसेच व्यक्तीला आपल्या जीवनाचा व अस्तित्त्वाचा खरा अर्थ समजून येतो.
  • समानानुभूती : दुसऱ्याच्या भूमिकेत शिरण्याची क्षमता अथवा दुसऱ्या व्यक्तीला तिच्या दृष्टिकोनातून जाणून घेण्याची प्रामाणिक जिज्ञासा म्हणजे समानानुभूती. म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण आहोत असे समजून तिचा दृष्टिकोन जाणून धेण्याची कुवत होय.
  • समस्या निराकरण : अनेक पर्यायांचा विचार करून त्यांतील योग्य तो पर्याय निवडणे व आपली समस्या सोडविणे म्हणजे समस्या निराकरण होय. जीवनात आपल्याला पदोपदी समस्यांना तोंड द्यावे लागते. आपल्या समस्या आपण कितपत परिणामकारकपणे आणि कार्यक्षमतेने सोडवू शकतो, यावर आपल्या जीवनातील यश अवलंबून असते.
  • निर्णयक्षमता : निर्णयक्षमता ही अशी प्रक्रिया आहे की, ज्यामध्ये व्यक्ती किंवा व्यक्तीगट एखाद्या प्रसंगाच्या किंवा समस्येच्या संदर्भात माहिती गोळा करतो. मिळालेल्या माहितीचे पृथक्करण करून योग्य पर्यायाची निवड निश्चित करतो. व्यवहार्य दृष्टिकोनातून पाहता येाग्य वेळी योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे कौशल्य आहे. ते जीवनाच्या दर्जावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करते. जीवन कौशल्य शिक्षणासाठी हे मुलभूत कौशल्य आहे.
  • परिणामकारक संप्रेषण : स्वत:च्या विचारांची शाब्दिक अथवा अशाब्दिक पद्धतीने प्रभावीपणे अभिव्यक्ती करता येणे म्हणजेच परिणामकारक संप्रेषण कौशल्य होय. आपण आपले विचार किती प्रभावीपणे व्यक्त करतो आणि ते दुसऱ्यांपर्यंत पोचवतो ही बाब आपल्या जीवनातील यश निश्चित करते. अपेक्षित असलेल्या पद्घतीने त्याचा संदेश ज्या वेळी स्वीकारला जातो, त्या वेळी परिणामकारक संप्रेषण घडते. परिणामकारक संप्रेषण ही द्विमार्गी प्रक्रिया आहे. यामध्ये प्रेषक आपला संदेश प्रेषित करतो आणि प्राप्तकर्त्यास अशी खात्री करण्याची संधी असते की, पाठवणाऱ्याचा जो उद्देश होता त्याचप्रमाणे त्याला तो संदशे समजला आहे.
  • व्यक्ती व्यक्तींमधील सहसंबंध : व्यक्ती व्यक्तींमधील आदर, प्रामाणिकपणा, विश्वास यांवर परस्परसंबंध अवलंबून असतात. समजूतदारपणा, सहकार्य या आधारांवर परस्परांशी नाती जुळविली जातात. जेव्हा आपल्याला परस्पर संबंधाचे महत्त्व व फायदे जाणवतात, तेव्हा खरे परस्परसंबंध निर्माण होतात.
  • सर्जनशील विचार : काही तरी नवीन, उपयुक्त व असाधारण निर्माण करण्याचा विचार म्हणजे सर्जनशील विचार होय. जेव्हा एखादी व्यक्ती आजपर्यंत अस्तित्वात नसलेली एखादी गोष्ट शोधून काढते, तेव्हा त्यामध्ये सर्जनशीलता दिसून येते. ज्या वेळी एखादी व्यक्ती एखादी गोष्ट करण्याची नवीन रीत शोधून काढते किंवा अस्तित्वात असलेल्या प्रक्रियेचा नवीन गोष्टीच्या निर्मितीसाठी पूर्णपणे वापर करते, तेव्हा सर्जनशीलता अस्तित्वात येते.
  • चिकित्सक विचार : एखाद्या विषयाची विशिष्ट माहिती स्वीकारण्यापूर्वी अनेक लहानलहान प्रश्नांच्या साह्याने त्या विषयाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची विचार प्रक्रिया म्हणजे चिकित्सक विचार होय. चिकित्सक विचार हे तर्कशुद्ध विचार करण्याच्या क्षमतेची निर्मिती होय.
  • भावनांचे समायोजन : भावना हा शब्द कोणताही क्षोभ, मानसिक स्थैर्याचा भंग, सहनशीलता अथवा मनाची प्रक्षुब्धावस्था यांच्याशी संबंधित आहे. भावना समारात्मक असो की, नकारात्मक जर त्यांना विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाऊ दिले, तर त्या अपायकारक ठरतात.
  • ताणतणावाचे समायोजन : एखादे कार्य करीत असतांना अनेक समस्या उद्भवतात व दडपण येते. जेव्हा अशी परिस्थिती नि‌र्माण होते, तेव्हा सामान्यपणे लोक तणावग्रस्त होतात. एखादी व्यक्ती दीर्घकाळ तणावाखाली राहिली, तर त्याचे पर्यावसान शारीरिक तसेच मानसिक स्वरूपाच्या अनेक समस्यांमध्ये होते. म्हणून ताणतणावाची यशस्वीपणे हाताळणी करण्याकरिता शिक्षणाची आवश्यकता आहे.

सर्व स्तरांतील अभ्यासक्रमांतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या वरील दहा जीवन कौशल्यांचा विकास होणे अपेक्षित आहे. अभ्यासक्रमाची रचना करतांना त्यांचा प्रामुख्याने विचार केला जात आहे.

वैशिष्टे :

  • व्यक्तींमध्ये असलेल्या आंतरिक शक्ती आणि गुणवैशिष्ट्यांची जाणीव होण्यास मदत करणे आणि आवश्यकतेनुसार त्यांच्यात बदल घडवून आणण्यास प्रेरित करणे.
  • दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी व समस्या यांवर विचारपूर्वक निर्णय घेऊन त्यांमधून योग्य यशस्वी मार्ग काढण्यास समर्थ करणे.
  • परिसरातील माहिती, ज्ञान, इतरांचे चांगले विचार इत्यादी आत्मसात करून त्यानुसार स्वत:चे मत बनविण्यास, ते योग्यप्रकारे मांडण्यास आणि इतरांशी प्रभावी संवाद साधण्यास सक्षम करणे.
  • परिस्थितीची जाणीव करून घेऊन योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे.
  • इतरांबद्दल कोणत्याही प्रकारे द्वेष, मत्सर, दूषित विचार मनात न बाळगता त्यांच्याबद्दल आदर, प्रेम, सहानुभूती बाळगून समाजहिताची वृत्ती निर्माण होण्यास तसेच एकमेकांप्रती वैयक्तिक व सामाजिक संबंध निकोप ठेवण्यास प्रवृत्त करणे.
  • परिसरातील घटना, कृती, प्रसंग इत्यादींबाबत सहज व विचारपूर्वक निर्णय घेण्याची, तसेच ताणतणावविरहित जीवन जगता येण्याची क्षमता निर्माण करणे. त्याचप्रमाणे सखोल माहितीच्या आधारे घटनांचा विचार करून त्यावर तर्क, निष्कर्ष काढण्याची क्षमता निर्माण करणे.
  • आपल्या स्वत:च्या सुखदु:खाच्या प्रसंगात सहभागी होण्यास प्रवृत्त करणे.
  • एखादी कृती, विचार हे पारंपारिकपणे मांडण्यापेक्षा त्यामध्ये नावीन्य, सोपेपणा, उत्साह निर्माण करून ते वेगळेपणाने मांडण्यास साह्य करणे इत्यादी.

विद्यार्थ्यांना तसेच सर्वसामान्य व्यक्तीला जीवन आणि शिक्षण यांची सांगड घालतांना जीवन कौशल्यांचा उपयोग होत असून त्यामध्ये आणखी मोठ्याप्रमाणात विकास होणे अपेक्षित आहे. यशस्वी जीवन जगण्यासाठी विचारपूर्वक शिक्षणाची, प्रशिक्षणाची व कौशल्य विकसनाची अत्यंत गरज आहे. तसेच जीवन कौशल्यांमुळे जीवन जास्तीतजास्त कार्यक्षमपणे व यशस्वीपणे जगता येते. विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण हे जीवनकेंद्रीत केले पाहिजे. विद्यार्थ्यांचा बोधात्मक, भावात्मक व कार्यात्मक एकंदरीत सर्वांगिण विकास होण्यासाठी जीवन कौशल्यांचा विकास शाळांमध्ये, वर्गांमध्ये योग्य त्या वातावरण निर्माण करण्याची गरज असते.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ मध्ये भारतीय शिक्षण पद्धतीत संभाव्य बदलावर काळानुरूप भर देण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक वर्ष २००९ पासून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात दहा जीवन कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे. आजच्या आधुनिक युगात व्यक्तीला प्रभावीपणे जीवन जगण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाद्वारे जीवन कौशल्यांच्या अध्यापनाची आवश्यक आहे.

समीक्षक – रघुनाथ चौत्रे

Wednesday, 10 March 2021

चांगल्या सवयींपेक्षा वाईट सवयी लवकर का लागतात?


      १८९८ मध्ये मानसशास्त्रज्ञ एडवर्ड थोर्नडाईक ह्यांनी सवय कशी बनते? सवय म्हणजे नेमके काय? ह्यावर एक भन्नाट प्रयोग केला होता. तो प्रयोग खालीलप्रमाणे:


एका मांजरीला एका पज्जल, कोडी असलेल्या खोक्यात कोंडले. त्यामध्ये काहीच नव्हते आणि बाहेर जाण्याचा रस्तासुद्धा एकच होता जो बंद होता. तिथे कोपऱ्यात एक तरफ (Lever) ठेवलेलं होते. जसं त्या मांजरीला समजले की ह्या खोक्यात काहीच नाहीये तर ती बाहेर जायचा दरवाजा शोधू लागली. जो एकमेव दरवाजा होता तिथे जाऊन म्याव म्याव करायला लागली, बोचकू लागली पण दरवाजा काही उघडला नाही.


असे करून दमल्यावर मांजराने त्या खोक्यात काही दुसरे काही आहे का ते पाहण्यात सुरुवात केली. इकडे मांजरीची हालचाल थोर्नडाईक पाहत होते. जसे ते मांजर तरफपाशी गेले आणि त्याला स्पर्श केला की थोर्नडाईक ह्यांनी बटण दाबून दरवाजा उघडून दिला. मांजराच्या ते लक्षात आले आणि मांजर त्या उघडलेल्या दरवाज्यातून पळून गेले. त्याने परत मांजराला त्या पज्जल असलेल्या खोक्यात ठेवले – परत मांजर इकडेतिकडे फिरायला लागले – दरवाज्याला ओरबाडू लागले. मग जिथे तरफ ठेवले होते तिथे गेले – जसा तिने त्या तरफाला स्पर्श केला थोर्नडाईक ने दरवाजा उघडून दिला.


त्यांनी ते कसे केले होते ते इथे मी दाखवले आहे.


असा प्रयोग थोर्नडाईकने अनेक वेळा केला. मांजराला आता हळू हळू समजायला लागले की “तरफाला स्पर्श केले असता दरवाजा उघडतो.” पुढच्या वेळेस मांजराला खोक्यात ठेवले की ते क्षणाचा ही विलंब न करता सरळ तरफाकडे धाव घ्यायला लागले आणि त्याला स्पर्श करून दरवाजा उघडला की बाहेर जाऊ लागले. थोडक्यात ते मांजर पटकन शिकले की, “तरफाला स्पर्श केले असता दरवाजा उघडतो”.


थोर्नडाईक ह्यांनी मांजर किती सेकंद त्या खोक्यात राहतेय तो वेळ मोजला. तो असा होता: १६०, ३०, ९०, ६०, १५, २८, २०, ३०, २२, ११, १५, २०, १२, १०, १४, १०, ८, ८, ५… जसा जसा प्रयोग पुढे जात गेला मांजर शिकत गेले – ते बाहेर निघण्यासाठी कमीतकमी वेळ वापरू लागले. ह्या प्रयोगावरून त्यांना समजले की बाहेर निघण्यासाठी मांजराने “तरफाला स्पर्श करणे गरजेच आहे” हे लगेच शिकले आणि नंतर त्याला त्याची “सवय” झाली. कारण नंतर नंतर मांजर फक्त ५ सेकंदात बाहेर यायला लागले. जसे मांजर खोक्यात ठेवले ते क्षणाचा ही विलंब न करता तरफाकडे पाळायला लागले.


थोर्नडाईक ह्यांनी लिहून ठेवलेय:


आपली वागणूक, ज्यामुळे त्वरित आनंद मिळतो, प्रोब्लेममधून सुटका होते ह्या क्रिया आपला मेंदू लगेच शिकतो आणि पुढच्या वेळेस तसेच काहीतरी करायचा प्रयत्न करतो. आणि ज्या वागणुकीमुळे, क्रियेमुळे आपल्याला त्रास होतो, चांगले वाटत नाही त्या क्रिया करण्याचे तो सतत टाळतो.


आणि बहुतेक आपल्या प्रश्नाचे उत्तर थोर्नडाईकच्या ह्या प्रयोगातून मिळेलच.


सवय का लागते?


कारण आपला मेंदू हा सीमित स्त्रोत आहे. एकाच वेळेस त्याला अनेक गोष्टी करायच्या असतात, ज्यांच्याकडे जातीने लक्ष देणे त्याला शक्य नसते. म्हणून आपला मेंदू दररोज होणाऱ्या, घडणाऱ्या, आपण करतो ते, होते ते अशा सगळ्या गोष्टी एकदाच शिकतो आणि नंतर त्याला सवय म्हणून अपोआप करतो. सवय दुसरे तिसरे काही नसून “स्वयंचलित वागणूक (Automatic Behaviour)” आहे.


एकदा, दोनदा, तीनदा जर आपण काही केले आणि त्यामुळे त्वरित चांगले, आल्हाददायक वाटले तर आपला मेंदू ती संरचना, तो Pattern लगेच समजतो आणि शिकतो. पुढच्या वेळेस तो ते काम आपोआप करतो.


उदाहरण:


दुपारी झोपणे. एकदोन दिवस तुम्ही दुपारी मस्त झोप घ्या. तुमच्या मेंदूला ते लगेच समजेल की दुपारी झोपल्यावर मस्त भारी वाटत. तिसऱ्या दिवशी दुपारी तुमची इच्छा नसली तरी तुम्हाला आळस येईल, झोप येईल. का? कारण की तुमचा मेंदू दुपारी झोपायचे pattern शिकला आहे.


चांगल्या सवयीपेक्षा वाईट सवयी का लावतात?


वेल, सामान्य दृष्टीने पाहिले की चांगले आणि वाईट दिसते. शरीरासाठी, मेंदूसाठी चांगल – वाईट काही नाही. आपण जे काही करतो त्याचा एका परिणाम होतो ज्याला आम्ही (Outcome) म्हणतो. हा आउटकम शरीरावर, मेंदूवर नक्कीच परिणाम करतो. सगळा खेळ ह्या आउटकमचा आहे.


मेंदूचा नियम:


जर काही केल्याने आउटकम मस्त, भारी आहे तर तो आपल्यासाठी चांगला आहे, ते आपण नेहमी करावे. जर आउटकम खराब आहे, त्रासदायक आहे तर ते आपल्यासाठी चांगले नाही म्हणून ते करू नये.


मस्त, भारी परिणाम असणारे काम कोणती:


मोबाईल वापरणे.

दारू, सिगारेट ओढणे.

जास्त झोपणे, जास्त खाणे.

चित्रपट पाहणे, जास्त फिरणे.

काम लांब लांब ढकलणे.

आळस करणे, मैथुन करणे.

सट्टा बाजी खेळणे. शिव्या देणे.

हे काम करताना मेंदूला जास्त काही करावे लागत नाही शिवाय सगळ्यांत महत्वाचे म्हणजे हे केल्यावर मेंदूत डोपामिन तयार होते आणि आपल्याला भारी, ताजेतवाने, मस्त वाटते ते पण क्षणात.


त्रासदायक, नकोस परिणाम असणारे कामे कोणती:


अभ्यास करणे.

पुस्तक वाचणे.

दररोज सकाळी लवकर उठणे, जिमला जाणे.

गणिते सोडवणे. ध्यानाला बसणे.

लक्ष देऊन काहीतरी काम करणे, स्वच्छता राखणे.

हे काम करतांना मेंदूला फोकस्ड राहावे लागते – सारासार विचार करावा लागतो – आणि हे काम केल्यावर लागलीच मेंदूला किक मिळत नाही.


आपला मेंदू बरोबर अशा गोष्टीना करायचे टाळतो कारण तो शिकलाय, “जो आनंद गेम खेळून येईल तो पुस्तक वाचून नाही मिळणार.. जो आनंद झोपण्यात आहे तो आनंद सकाळी उठण्यात नाही.” आणि म्हणून तो सकाळी उठण्यास मदत करत नाही, अभ्यास करण्यास मदत करत नाही कारण त्याला माहिती आहे “अभ्यास करतांना त्रास होतो, पुस्तक वाचतांना मेहनत लागते, सकाळी लवकर उठायला इच्छाशक्ती जास्त लागते..मग आपण ते का करावे.”


एका वाक्यात आपल्याला उत्तर द्यायचे झाले तर हेच असेल की, “जिस चीज मे मज्जा है और वो भी अभी इसी वक्त.. अपना दिमाग वो करेगा!!” आणि हे आपले दुदैव आहे की “मज्जा सगळ्या चुकीच्या गोष्टी करण्यातच असतो.”


पुस्तक संदर्भ:

द पॉवर ऑफ हेबीट्स, चार्ल्स दुहीग.

आटोमिक हेबीट्स, जेम्स क्लीअर

थिंकिंग फास्ट अंड स्लोवं, डेनिअल कणमेन.

रेडी, स्टडी, गो, खुर्शेद बाटलीवाला अंड दिनेश घोडके.


कॉपी पेस्ट पोस्ट .

Tuesday, 9 March 2021

भावनिक समायोजन

 मनोभाव (Emotion) यात सुसंवाद निर्माण करून एकमेकांशी भावनिक दृष्ट्या जुळवून घेणे, म्हणजे भावनिक समायोजन होय. संपूर्ण जग भावभावनांनी व्यापले असून त्याचे पडसाद अनेक घटनांद्वारे आपल्या समोर वेळोवेळी येतच असतात. प्रत्येक मनुष्य प्राप्त परिस्थितीशी यशस्वी रीत्या समायोजन साधण्याचा प्रयत्न करीत असतो. या समायोजनकार्यात शिक्षणाचे साह्य घेत असतो. त्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात समायोजनास विशेष महत्त्व आहे.

एकविसावे शतक हे मानसिक अस्वास्थ्याचे शतक मानण्यात येते. त्या दृष्टीने मुलांच्या भावनांचे समायोजन करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. मनाचा क्षोभ, मानसिक स्थैर्याचा अभाव, मनाची प्रक्षुब्धावस्था या बाबी भावनेशी निगडित आहेत. भावनांच्या विस्फोटकामुळे शरीरांतर्गत ग्रंथींमध्ये स्राव उत्पन्न होऊन निर्माण होणारी उर्जा व्यक्तीला कार्यप्रवण करीत असते. मनुष्याच्या मनात भावनांची बरी-वाईट निर्मिती होतच असते. उदा., रागात डोके दुखणे, आनंदाच्या क्षणी मन प्रसन्न होणे इत्यादी. भावना निर्माण होत असताना काहीं गोष्टींची जाणीव होते, तर काहींची होत नाही. भावनांचा उद्रेक झाला, तर त्या अपायकारक ठरतात. म्हणून भावना अनावर होण्यापूर्वीच त्यांना आवर घालणे महत्त्वाचे ठरते.

भावनांच्या आहारी जाणाऱ्यांमध्ये विशेषत: पौगंडावस्थेतील मुले मोठ्या प्रमाणात दिसून येतात. ती राग, प्रेम व हिंसा या तीन गोष्टींच्या विशेषत: आहारी जातात. यांतूनच त्यांच्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला सुरुवात होऊन तिच्यात हळूहळू वाढ होते. याच वेळी त्यांच्या भावनिक प्रेरणांना वेळीच आवर घालणे गरजेचे असते. त्या बुद्धीच्या पलीकडच्या असतात. अशा मुलांच्या भावनांचे समायोजन करणे गरजेचे असते. तसेच या वयात मुलांच्या हार्मोन्समध्ये झपाट्याने बदल होत असतात. बदलणाऱ्या शारीरिक आणि भावनिक बदलांचे समायोजन करणे कठीण जाते. त्यामुळे त्यांच्यात कधीकधी नकारात्मक मनोवृत्ती अथवा नकारात्मक स्वप्रतिमा निर्माण होऊन उदासीनता येते.  त्यामुळे मुलांना या मनोवृत्तीतून बाहेर काढणे प्राय: गरजेचे असते.

घरात व समाजात पालकांनी आणि शाळेत शिक्षकांनी अशा मुलांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे हे शिकविले पाहिजे, तरच ती चिंतामुक्त जीवन जगू शकतील. भावनांच्या आहारी गेल्यानंतरचे तोटे आणि भावनांना नियंत्रणात ठेवल्यानंतर होणारे फायदे, यांबद्दलची सविस्तर माहिती मुलांना समजावून सांगितली पाहिजे. म्हणजे मुले विकृत भावनेला आवर घालण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतील. उदा., दोन मुलांमध्ये संघर्ष उद्भवला असताना पालकाने अथवा शिक्षकाने तो मिटवून त्याच्या विपरीत परिणामांची मुलांना कल्पना दिली पाहिजे आणि तो बुद्धिपुरस्सर थांबवला पाहिजे. त्यामुळे ती मुले क्षमाशील होतील. भविष्यात त्यांना जेव्हा राग येईल असा एखादा प्रसंग उद्भवल्यास ती आपल्या भावनेवर नियंत्रण ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. याउलट, जर भावनांवर नियंत्रण ठेवण्याची मानसिकता त्यांच्यात नसेल, तर ती दुराग्रही, रागीट, खोडकर, एकलकोंडी आणि निराश होण्याचा धोका संभवतो. या बाबी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासात अडसर ठरू शकतात. यासाठी पालक, शिक्षक व मुले यांच्यात समन्वय साधणे आवश्यक आहे.

आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे फायदे मुलांना समजून देण्याबरोबरच त्यांना आपल्या भावना योग्य प्रकारे कशा व्यक्त कराव्यात याचे ज्ञान होणे, म्हणजेच भावनिक समायोजन होय. मुलांना आपल्यावर कोणत्या भावनेचा प्रभाव आहे आणि तिचे उगमस्थान कुठे आहे, या मूलभूत बाबींची जाणीव करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे भावनांवर यशस्वीपणे नियंत्रण ठेवण्याची कला त्यांना साध्य होईल. तसेच भावना अनावर झाल्यावर दिसणारी शारीरिक लक्षणेसुद्धा त्यांना माहीत असावी. या जाणिवांमुळे मुले साहजिकच समाजमान्य पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करण्यास प्रवृत्त होतील. परिणामी, ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून मानसिक अपप्रवृत्तीत संयम राखतील. भावनिक समायोजन साधणारी मुले अभ्यासात उत्कृष्ट यश संपादन करू शकतात, असे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. शिवाय सामाजिक, नैतिक आणि बौद्धिक दृष्ट्याही ती यशस्वी होतात.

                                                                                                    - प्रतिभा लोखंडे

समीक्षक – सु. र. देशपांडे

Monday, 8 March 2021

तुमचे आयुष्य कसे घालवाल?

 तुम्हाला तुमचे आयुष्य घडवायची प्रामाणिक इच्छा असेल तर तुम्ही आपल्या पध्दतीने आयुष्य घडवू शकता. ही गोष्ट अविश्वसनीय वाटत असली तरी सत्य नक्‍कीच आहे. आयुष्य घडविणे याचा अर्थ आपले आयुष्य आपल्या नियंत्रणाखाली ठेवणे आणि आपले ध्येय, आपल्या इच्छा-आकांक्षा यांना आपल्या पध्दतीने आकार देणे.


याचा आणखी एक अर्थ असा की आपल्या आयुष्यातील दु:खद घटना योग्य रीतीने हाताळणे. जीवनातील औदासीन्य, अपयश, नाकारलेपण याची तिव्रता कमी करण्यासाठी स्वत:च प्रयत्‍न करणे.

बबीताने पदवीपर्यंत शिक्षण घेतले आणि त्यानंतर मात्र पुढील आयुष्यात काय करावे या विचाराने ती गोंधळून गेली. विवाह, उच्च शिक्षण, की नोकरी यापैकी कोणता मार्ग स्वीकारावा हे प्रश्नचिन्ह तिच्यासमोर उभे राहिले.

विवाह केला तर नवरा कसा मिळेल? प्रेमळ, श्रीमंत, सुंदर याची कल्पना करता येत नव्हती. नोकरीचा विचार करू लागल्यावर आपल्याला कोणती नोकरी मिळेल? ती मिळवायची कशी? त्यापासून आपल्याला त्यात रस वाटेल की नाही, अशा अनेक शंका तिच्या मनात येत होत. उच्च शिक्षणासंबधीही अनेक विचार मनात धैमान घालत होते. या वैचारीक गुंत्यातून बाहेर पडण्यासाठी ति माझ्याकडे आली आणि पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत तिने आपल्या आयुष्याबद्दलचे निर्णय ठामपणे घेतले.

रमी ही चौदा वर्षाची मुलगी! तिचे व तिच्या आईवडिलांचे सतत खटके उडत. आईवडिल दोघेही त्याबद्दल तिलाच दोष देत. आई तर निष्कारण तिच्या अगांवर खेकसत असे आपल्या सांगण्याबरहुकूम तिचे वागणे नसेल तर आई आत्महत्येची धमकीही देई पालकांच्या अशा पध्दतीच्या वागणुकीमुळे त्या मुलींच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण झाले होते. रमा संशयी, चिडचिडी, उदसीन होत गेली. एकलकोंडी बनत चालली. पण नंतर पाच महिन्यातच तिने स्वत:ला सावरले.

आपल्या आयुष्याला मार्गी लावणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नव्हे. ही गोष्ट फार कठीण आहे, असेही नव्हे पण त्यासाठी जीवनातील वास्तवाला योग्य प्रकारे भिडायला हवे.
आपले आयुष्य सुरळीतपणे घालविण्यासाठी पुढे काही मार्गदर्शनपर सूचना क्रमवार दिलेल्या आहेत.
स्वत:ला ओळखा (स्वत:ची ओळख)

  1. आपण कोण आहोत, कसे आहोत हे जाणून घ्या. उदा. आपण स्वार्थी आहोत का?, लहरी आहोत का?, बुध्दीमान आहोत का?, वगैरे वगैरे! एखाद्या प्रसंगात आपण असे का वागलो? याचे पृथ:करण करा असे केल्याने तुम्ही स्वत:ला जास्त तुमच्या व्यक्तीमत्वाच्या सकारात्मक आणि नकारात्मक घटकांबद्दल जागरूक रहाल. तुमच्या व्यक्तीमत्वातील उणीवांवर दर वेळी कुरघोडी करण्याच्या फंदात पडू नका. कारण तो मार्ग नेहमीच शक्य नसतो.
  2. स्वत:बद्दल सजग राहा, तुमच्या इच्छा, आकांक्षा, विचार याबद्दल सतर्क राहा. आपली खाण्याची, बोलण्याची, चालण्याची पध्दत तपासून, जाणून घ्या. उदा. चालताना तुम्ही लांब ढांगा टाकता का, हात हलविता का, दुसऱ्याशी संभाषण करताना तुमच्या व समोरच्याच्या आवाजाची पट्‍टी व तीव्रता, चेहऱ्यांच्या स्नायूंची हालचाल, बोलण्याची लकब, हे नीट जाणून घेण्याचा प्रयत्‍न करा. परस्पर संभाषणाचा अभ्यास केलात तर बोलण्यातून निष्पन्न होणारे गैरसमज कळतील, टाळता येतील.

    तुम्ही स्वत:बद्दल जागरूक राहा. पण त्या जागरूकतेच्या जाणीवेत गुरफटून राहू नका.

    या मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी पुढील उदहरण घेऊ. तुम्ही कॉलेजच्या आवारातून चालत आहात. तिथे जागोजाग कॉलेज विद्यार्थी, विद्यार्थीनी घोळक्या घोळक्याने उभे आहेत. अशा वेळी तुम्ही स्वत:बद्दल, अतिजागरूक (Concious) असाल तुम्ही तुमची केशभूषा, वेषभूषा, चालण्याची ढब यात टापटीपपणा, नीटनेटकेपणा आणाल, स्वत:चे रूप चांगले भासविण्यासाठी गंभीरपणे विचार कराल, मानसिक तणावात राहाल.

    या उलट तुम्ही तुमच्या पेहरावाबद्दल, चालण्याबद्दल सहज जाणकार (Overconcious नव्हे)असाल तर तुमचा माणसिक ताण नाहीसा होईल. स्वत:बद्दल सतर्क रहाल तर वेळोवेळी घडणाऱ्या चुका सुधाराल.
  3. जर तुम्ही स्वत:बद्दल सतर्क, रहात असाल तर युमच्या वेगवेगळ्या चित्तवत्तींच्या बाबतीतही तुम्ही डोळस रहाल, उदा. निराशा, अपयश, मत्सर, अस्थिर मनोवस्था, संताप, उद्वेग, गर्व... वगैरे! तुमच्या भावनांचे प्रकटीकरण, त्याची तीव्रता, त्यामागील कार्यकारणभाव, त्याचा तुमच्यार व इतरांवर होणारा परिणाम याचेही भान तुम्हाला हवे एकदा का तुम्ही भावभावनांचा उगम व पर्यावसन याबद्दल निष्कर्षाप्रत पोचू शकलात तर तुम्ही त्यांना आटोक्यात आणू शकाल/नकारात्मक भावनांचे प्रमाण कमी करू शकाल, त्यांच्यावर विजय मिळवू शकाल.

नकारात्मक भावभावनांवर विजय मिळविण्याचे काही मार्ग पुढीलप्रमाणे
अ. स्वयंसूचना (Autosuggestions)
याचा अर्थ आपण स्वत: काय करावे व करू नये यासंबंधीच्या सूचना स्वत:च्या स्वत:ला देणे, दिवसातून किमान पाच सहा वेळा स्वत:ला सूचना देत चला. अशा प्रकारे स्वयंसूचना देणे एक आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीपर्यंत चालू ठेवा. स्वयंसूचना देणे किती काळापर्यंत चालू ठेवायचे ते आपल्या नकारात्मक भावनांच्या तीव्रतेवर अवलंबून राहील.

ज्या दिवशी रमा नाराज होती त्या दिवशी रमाने स्वत:ला अस बजावलं की, ‘मला स्वत:ला आनंदी राहून इतरांना, आनंदी ठेवावयास हवे. आता कसोटीचा काळ आल्याने मी ठामपणे उभी रहाणे जरूरीचे आहे. मी माझे आयुष्य स्वतंत्रपणे, निर्धाराने घालविण्याचे ठरवले असल्याने माझ्या आनंदास्तव कोणी काही करेल अशी कल्पना करने गैर आहे कोणा परक्या व्यक्तीमुळे मी दु:खी होणार नाही हेही तेवढेच! मला माझ्या आयुष्यात व्यावहारीक दृष्टीकोन बाळगून वाटचाल करायची आहे. इतरांना माझ्या आयुष्याचे मातेरे करण्याचा अधिकार नाही’. स्वयंसूचनापध्दतीचा उपयोग जीवनाकडे होकारात्मक दृष्टीकोनातून बघण्यासाठी होतो. तसेच या दृष्टीकोनामुळे स्वत:तील आळशीपणा, अधीरपणा, धरसोडवृत्ती घालविण्यास मदत होते.
ब. नकारात्मक भावना निर्माण होण्याची पुर्वपीठिका शोधून काढा व त्यावर मात करा.
क. तुम्हाला का उदास वाटते याचा तुमचा तुम्ही शोध घ्या समोरच्या व्यक्तीचा दृष्टीकोनही समजावून घ्या. वास्तवाचा विचार तुम्ही अपघातात सापडलात पण बचावलात.
इथे तुमच्या वाईट मनस्थित्तीमुळे वाहन हाकताना झालेला निष्काळजीपणा - हे झाले अपघातांचे कारण! पण अपघातात तुम्हाला किंवा दुसऱ्या कोणाला इजा झाली नाही तेव्हा अपघातात दोन्ही पक्षांची काहीना काही चूक असू शकेल असे म्हणून विषय सोपविणे हा झाला सकारात्मक दृष्टीकोन!
ड. तुम्ही घटनेचा वस्तुनिष्ठपणे अभ्यास करा व सत्य स्वीकारायला शिका.
उदा.

  1. प्रत्येक माणसाला केव्हा ना केव्हा मृत्यूला सामोरे जायचे आहे.
  2. आयुष्यात जसे यश मिळते तसे अपयशही स्वीकारावे लागते.
  3. प्रत्येक व्यक्ती तिच्या आयुष्यापुरती एकमेवद्वितीयच असते. उदा. तुम्ही कितीही कष्ट घेतलेत तरी काही वेळा घडणारी गोष्ट मनाप्रमाणे घडू शकत नाही. मग तुम्ही निराश होता, अशा वेळी इतर गोष्टी विचारात घ्या आणि आयुष्याला सामोरे जा, त्यामुळे पुढील आयुष्याचा विचका होणे टळेल.
  4. आयुष्याला सामोर जाताना (ध्येयाप्रद पोह्चताना) वरील तीन सूचना साठ टक्‍क्यापर्यंत आत्मसात करा आणि मग पुढच्या आयुष्याची आखणी करा. तुमचे ध्येय कोणत्याही प्रकारचे असेल: व्यावसायिक निवड, विवाह, धंद्यातील यश, नोकरी, साधी ध्येये, वजन कमी करणे, एखाद्या समारंभाचे आयोजन, नोकरीतील पगारवाढीसंबंधी वरीष्ठांना सांगणे, वैगरे, वैगरे.

आपल्या ध्येयाप्रत जाताना नशिबाचा भाग लक्षात घ्या - कारण काही घटना घडणे हे अपरिहार्यच असते. उदा. असे म्हटले जाते की लग्नाच्या गाठी स्वर्गातच मारल्या जातात. पण तुमचा सहचर हा पुर्णपणे तुम्हाल पूर्णपणे अपरिचित असला तरी त्याच्याशी झालेला विवाह हा यशस्वी होणे पूर्णपणे नशिबावर अवलंबून नसते. यशस्वी वैवाहिक जीवनाचे बरेचसे श्रेय पतीपत्‍नीने घेतलेल्या कष्टांना (प्रयत्‍नांना) जाते

तात्पर्य: तुमचे आयुष्य जगताना तुम्ही वर उल्लेखलेल्या पायऱ्यावर वाटचाल केलीत तर तुम्ही तुमचे आयुष्य स्वत: घडवु शकाल. कोणत्याही झंझावातात तुमचे आयुष्य उधळू शकणार नाही. आयुष्याचा प्रवासकितीही खडतर असला तरीही तुम्ही सदैव समाधानी राहाल.

Sunday, 7 March 2021

भावनेचा भार


आपल्या आयुष्यात ओघवती आणि अनपेक्षित येणारे नाती अनेक असतात. पाठीला पाठ लावून येणारे सगेसोयरे आणि त्यांच्या सोबत विकसित झालेला सहवास यावर नात्यांचा बंध अवलंबून असतो. आयुष्य जस जसे जगत जाते तसे वास्तविक, व्यावसायिक आणि  भावनिक स्तरावर अनेक माणसे आपल्याला भेटतात काही नुसती भेटतात आणि आपली तात्विक बाजू सुफल संपूर्ण झाली की अंग काढून घेतात. तसे आपण सगळेच असे वागतो एकमेकांसोबत. तसा माणसाचा उपजत गुणधर्म आहे सहवास निर्माण करताना हेतू प्रस्थापित करणे. पिढी दर पिढी ही नात्यांची संकल्पना आणि जपण्याचे हेतू बदलत चालले आहेत मुळात कोणतेही नाते असो ते मानसिक, शारीरिक व सामाजिक देवाण घेवाणीवर बहरते. हेतू कोणताही असो पण जर तिथे हेतू पुरता किंवा स्वार्था पुरता नात्यांचा आशय असेल तर अनेकदा माणसाची माणसाबद्दल गफलत होते किंवा अपेक्षाभंग झाल्याची जाणीव होते. काळानुसार आपण सध्या याची अनेक उदाहरणे पाहतो. त्यामुळे जिथे मानसिक बंध माणसात नसतो व केवळ एक निमित्त किंवा हेतू असतो तिथे नाती जीव टाकतात. त्यामध्ये जर एक हा हेतू साठी उभा असेल आणि दुसरा निस्वार्थ भाव घेऊन जात असेल तर भावनेचा कोंडमारा होतो. त्यामुळे काळानुसार माणसे माणसांना फार 'इझी वे' भेटताना दिसतात आणि अचानक निशब्द होतानाही दिसतात कारण ही भावनेची रेशीमगाठी गाठ जपता येत नाही. फार सोप्या रीतीने माणसे उबगतात एकमेकांना, न बोलता स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या भावविश्वाचा अंत करतात. हे असे का करतात ? कशा साठी करतात हा नेमका अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न आहे. कारण मुळात आपण सगळेच हेतू साठी जगतो. हेतू संपला की बंध संपला आणि मग उरतो तो भावनेचा बोज. त्यामुळे नात्यांची संकल्पना बदलतेय. जर गुंतून त्रास होत असेल तर पावलांची गती मोजता आली पाहिजे. शब्दांना संवादाची फुंकर टाकून. नात्यांना मोकळा श्वास दिला पाहिजे पण आपण घाबरतो एकमेकांना, एकमेकांना जपायला आणि मनातलं सांगायला की हा भावनेचा भार माझ्या जिव्हारी लागू नये यासाठी त्यामुळे जपता आली तर नाती जपावीत स्वतःच्या आनंदासाठी, हेतू जितका आपला असतो तितका तो निर्मळ असेल तर समोरचा माणूस पण एकरूप होतो. आपण स्वतःला घाबरतो आणि निःशब्द होऊन भावनेच्या बोझ्या खाली अनेक नात्यांचा अंत करत जातो.


अमृता  जोशी

मनस्पंदन फौंडेशन

(लेखिका कन्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत)


Saturday, 6 March 2021

स्वभावाला औषध नसत?

  स्वभावाला औषध नसतं’  असं म्हणतात – म्हणजे एखादी व्यक्ती तिच्या स्वभावानुसार जशी वागत असेल, त्याला काही पर्याय नाही. त्या व्यक्तीचं वागणं बदलू शकत नाही.


मला हे पूर्णतः पटत नाही.. स्वभाव स्वभाव म्हणजे नक्की काय? लोभी, लोभस, आळशी, कंजूस, परोपकारी, रागीट, बेफिकीर, मत्सरी, गप्पिष्ट, भित्रा, धीट, आनंदी, हट्टी, whimsical इत्यादी आणि अजून बरेच.. यातली एखादी गोष्ट तरी प्रत्येकात जास्त प्रमाणात असतेच, आणि तिच्यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव ठरतो (किंबहुना लोक ठरवतात)!!


माणसाचा स्वभाव बदलू शकत नाही का? एखादी व्यक्ती रागीट भासली तर ती जन्मभर रागीटच असते का? एखादी व्यक्ती sarcastic असेल तर ती आयुष्यभर उपहासात्मकच बोलते का?


मी काही मानसशात्रज्ञ वगैरे नाही, पण सहज विचार केला तर वाटतं की हे तितकं खरं नसावं. कुणाच्याही स्वभावात साधारणतः दोन गोष्टी असतात –


१. काही पैलू जे ती व्यक्ती जन्मत:च घेऊन आलेली असते. आणि


२. काही गोष्टी आजूबाजूची लोकं आणि परिस्थिती तिला बहाल करतात, किंवा अंगावर थोपवतात.


पहिल्या प्रकारातून जास्तीत जास्त २०% भाग येत असेल एखाद्याच्या स्वभावात. पण बहुतांश स्वभाव हा दुसऱ्या प्रकारातून येतो – आणि त्यात पण किती भाग हा in-built असतो आणि किती idiosyncrasies (म्हणजे त्या व्यक्तीच्या चालण्याबोलण्याच्या विशिष्ट सवयी) मधून येतो, हा पण एक वेगळा मुद्दा आहे. त्यात अजून ती व्यक्ती actually कशी आहे आणि भासवते कशी हे पण आहेच 🙂 आणि बहुतांशी कुठल्याच दोन व्यक्तींची सोबत आयुष्यभर नसते.. त्या व्यक्ती सोबत असलेल्या काळात कदाचित ती जशी आपल्याला भासली, तशीच ती आयुष्यभर असेल, हे कुणी सांगावं?


दुसऱ्या प्रकारातल्या गोष्टी कदाचित परिस्थिती बदलली की आपोआप बदलतात. पण पहिल्या प्रकारातल्या बदलायला महाकठीण – पण ते करणं अशक्य नाही. अश्या गोष्टी त्या व्यक्तीला स्वतः प्रयत्नपूर्वक कष्ट घेऊन बदलाव्या लागतात.


दुसऱ्या भागाचं उदाहरण द्यायचं तर समजा एखाद्याला आर्थिक परिस्थितीमुळे काटकसर करून जगायची सवय लागली असेल (म्हणजे मग “तो ना.. फार कंजूस आहे हां” – हे आजूबाजूच्या लोकांचं conclusion), तर त्या व्यक्तीची नंतर भरभराट झाली तरी पाण्यासारखा पैसे खर्च करताना कचरते, कारण काटकसर हा त्या व्यक्तीच्या स्वभावाला चिकटलेला एक पैलू आहे – बहुतांश लोकांच्या बाबतीत. पण याउलटही बघायला मिळतं. अगदी हलाखीत आयुष्य घालवलेल्या माणसाला घबाड हाती लागल्यावर राजेशाही जगायला लागतात..


एखाद्याची धिटाई किंवा भित्रेपणा एखाद्या जबरदस्त झटक्यामुळे क्षणात जाऊ शकते, पण हा बदल कायमचाच असेल असं नाही. काही काळानंतर त्या झटक्याचा प्रभाव कमी होऊन परत ती व्यक्ती धैर्यशील होऊ शकते.


एखाद्याचं बालपण खूप त्रासदायक असतं – कायम बोलणी खाणे, दुय्यम वागणूक मिळणे वगैरे.. अशी व्यक्ती पुढे चिडचिडी, सारकॅस्टिक मुखवटा नकळत धारण करते.. पण जर अपेक्षित असलेली आपुलकी मिळाली, त्रास देणारी माणसं आयुष्यातून दूर गेली की कदाचित तो मुखवटा (पुन्हा एकदा नकळत) गळून पडू शकतो.


म्हणजे थोडक्यात काय की या प्रकारातले पैलू माणूस बऱ्यापैकी बदलू शकतो (किंवा परिस्थिती त्याला बदलते..).


आता पहिल्या भागाकडे वळूया..


असं व्यक्तिमत्त्व नक्कीच तुमच्या आजूबाजूला असेल… काही लोक जगात कुठेही काही tension असलं की ते स्वतःच्या अंगावर असल्यासारखं वागतात (व पु काळेंच्या भाषेत – भारतावर असलेलं वर्ल्ड बँक चं कर्ज यांना आपल्या बेसिक मधून फेडायचं आहे असा चेहरा करणारी माणसं). दुसऱ्या कोणी कितीही सांगितलं तरी काळजी करणे सोडणार नाहीत ते.. अनावश्यक काळजी करणं सोडायचं म्हणजे त्यांना खूपच जास्त प्रयत्न करावे लागतील (आणि तरी ते बहुधा लवकर यशस्वी होणार नाहीत)..


काही लोक असतात त्यांना एका जागी स्वस्थ बसवत नाही (माझं स्वतःचंही उदाहरण आहे हे).. निवांत सुट्टी घेऊन काहीच उद्योग न करता पडून राहिलोय असं झालेलं मला आठवत नाही. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी पण दमायला होतं हे माहित असूनही.. “जमतच नाही ते” असं आपल्याला वाटतं! ‘माझ्या स्वभावात बसत नाही’ असं म्हणून आपण मोकळे होतो.


खरं बघायला गेलं तर हे बदलणं अशक्य नसतं, पण comfort zone च्या बाहेर जाऊन कष्ट घेऊन करावं लागतं ना, म्हणून कोणी करायच्या फंदात पडत नाही.


एखाद्या पांढऱ्या कपड्यावर पडलेला चहाचा डाग काढणे आणि दुधाचा डाग काढणे यात जो फरक आहे तोच इथे पण आहे. चहा चा डाग काढणं अशक्य नसतं, पण प्रचंड अवघड असतं.. “जाऊदे.. छोटाच डाग आहे, दिसणार नाही”.. किंवा “आतल्या बाजूला आहे” असली कारणं दिली जातात.


असो.. स्वभाव बदलावा की नाही हा या पोस्ट चा उद्देश नसून बदलला जाऊ शकतो की नाही हा आहे. आणि तो अंशतः का होईना, हाताळला गेला आहे असा आशावाद ठेवणं हे माझ्या स्वभावाला धरून आहे.


- चिन्मय कोरहलकर


Friday, 5 March 2021

तर थकवा येणारच

 👯👯👯👯👯👯👯

      साधारण ४०वर्षं मागं जाऊन पाहू. स्वयंपाक घरात यंत्रं नव्हती. *ताक करताना रवी* वापरली जात असे, *पाटा-वरवंटा* रोजच्या वापरात होता, शेंगादाण्यांचा कूटासाठी *खलबत्ता* सर्रास वापरला जात होता. लोणची, पापड, मसाले उन्हाळ्यात घरोघरी होत असत, घरातल्या बायका या गोष्टी स्वत: लक्ष घालून करत असत. शारीरिक कष्ट होत असत, पण *आहाराचा दर्जा उत्तम* होता. 


गरीब असो किंवा श्रीमंत, कोणत्याही घरी गेलात की *तांब्या-पितळेची भांडी* असायची. खाली *मांडी घालून जेवायला बसत असत*. दूध, ताक, लोणी, घरचं कढवलेलं शुद्ध तूप हे पदार्थ मुबलक प्रमाणात आहारात होते. स्वयंपाकाकरिता घाण्याचं तेल वापरलं जायचं. *चणे,फुटाणे शेंगदाणे असं खाणं अगदी सहज व्हायचं*. प्रत्येक पदार्थाचा एक विशिष्ट सीझन होता. तेव्हाच तो पदार्थ घरी व्हायचा. पहिला पाऊस पडला की आंबा बंद. पुन्हा नाव काढायचं नाही.  *कैऱ्या, बोरं, आवळे, करवंदं, जांभळं, चिंचा ही फळं भरपूर खाल्ली जात होती*. आताची किती मुलं ही फळं भरपूर खातात? 


*कपडे हातानंच घासावे लागत, धुवावे लागत*. प्रत्येकजण आपापले कपडे स्वत: धूत असे. ती सवय घराघरात होती. माणसं शक्यतो *पायी चालत, सायकल वापरत*. शाळेचा प्रवास पायी असायचा. सकाळ-संध्याकाळ *ग्लासभर दूध* प्यायल्याशिवाय सुटका नसायची. कितीही कंटाळा आला तरीही, *तिन्हीसांजेला रामरक्षा-भीमरूपी असायचेच*.


जेवणंही रात्री आठाच्या सुमारास उरकलेली असायची. आताही जेवणं रात्री आठ वाजता होतात, पण टीव्हीवर *पाताळयंत्री बायकांच्या सीरीयल्स* पाहत पाहत ! रात्री अंगणात किंवा गच्चीवर मुलं एकत्र झोपत असत. 


या सगळ्या आयुष्यात आराम असा नव्हताच, पण आनंद मात्र भरपूर होता. *एकमेकांना देण्यासाठी माणसांकडे पैसा नव्हता, पण वेळ मात्र भरपूर होता*. आता आपल्याकडे वेळच नाही, स्वत:साठीही आणि इतरांसाठीही ! आयुष्यं आता इतक गतिमान नव्हत, पुष्कळ संथ होत. पण, त्यामुळं थकवा नव्हता.  *“लवकर निघा*, *सावकाश जा, सुरक्षित पोहोचा”* हे तत्व माणसं दैनंदिन आयुष्यात वापरत होती. आणि त्यामुळंच, त्यांना आयुष्य जगता आलं.  राहणीमानातला साधेपणा हेही थकव्यापासून दूर असण्याचं एक प्रमुख कारण असावं. आज आपल आयुष्यं नुसत धावपळ करण्यातच जातय..!


लोकांच्या आयुष्यात एकटेपणा नव्हता. बहुतांश वेळ इतरांबरोबरच जायचा. प्रत्येकाच्या आजूबाजूला माणसांचा वावर असायचा. *हेवेदावे, रूसवेफुगवे होते,* पण त्यातही स्पष्टता होती. कारण काही लपवालपवी करण्यासारखं नव्हतंच. बंद दारं नव्हती. *दारांना कुलुपं नव्हती*. *शेजारी एखादा पदार्थ केला तरी त्यातला वाटीभर घरी यायचाच*. त्यात प्रेमही होतं आणि रितही होती. माणसं सांभाळण्याकडे एकूणच कल होता. मानसिक अशांतता नव्हती. चिंतेचे भुंगे नव्हते. रात्री शांत झोप लागू शकत होती. *भरपूर मित्रमंडळी, स्नेहीसोबती, शेजारी यांच्या सहवासात कठीण परिस्थिती पचवण्याचं बळ अंगी यायचं.* धीर वाटायचा.


आज *प्रायव्हसीच्या* नादात हे सगळं आपण तोडून टाकलं आणि एकट्यानंच चालायचं ठरवलं. सगळ्या पातळ्यांवर आपण एकटेच लढायला लागलो, *तर थकवा येणारच !*

🚶🏼🚶🏼🚶🏼🚶🏼‍♀🚶🏼🚶🏼🚶🏼 जाणवतोय ना थकवा,, मग काळजी घ्या

Thursday, 4 March 2021

बुद्धिमत्तेविषयी थोडेसे

 "आमचं लेकरू हुशार आहे पण जरा अभ्यासात कमी आहे", अशा वाक्याला बरेच जण अजुनही हसतात.


शाळेच्या अभ्यासात कमी आहे किंवा परीक्षेत फार मार्क्स मिळत नाहीत, तर ती व्यक्ती 'बुद्धीमान' नाही हा आपल्याकडे एक खूप मोठा गैरसमज आहे.


खरंतर गार्डनर (Howard Gardner) या मानसशास्त्रज्ञाने ही समजूत कशी ठार चूकीची आहे हे सांगितलंय. त्याने बुद्धीमत्तेचे मुख्य आठ प्रकार पाडले. कुठल्याही व्यक्तीमध्ये या आठ प्रकारांपैकी एक किंवा अधिक बुद्धिमत्तांचं कमी-अधिक प्रमाण असतं, असं त्याचं त्याचं मत होतं.


1. Visual - Spatial Intelligence : 

या प्रकारामध्ये अचूक नकाशा बघणे, random भटकत असतानाही दिशांचा योग्य अंदाज येणे, फोटो-ग्राफ्स-तक्ते मधून अर्थ काढणे, कोडी सोडवणे, चित्र, patterns मध्ये गती असणं हे सगळं येतं. आर्किटेक्ट, इंजिनीयर, चित्रकार वगैरे यात येतात.


2. Linguistic - Verbal Intelligence :

या प्रकारात भाषेवर प्रभुत्व, शब्दांवर पकड, भारी बोलता येणं किंवा मध्ये मध्ये शाब्दिक विनोद/कोट्या करता येणं हे सगळं येतं. यात शिक्षक, वकील, पत्रकार, काही राजकारणी वगैरे येतात.


3. Logical - Mathematical Intelligence :

आपल्या शाळेत ज्या लोकांना "हुशार" समजतात, अशी मंडळी या प्रकारात येतात. गणित सोडवणं, abstract गोष्टींची लॉजिकल उत्तरं देणं हे सगळं येतं. वैज्ञानिक, गणितज्ज्ञ, इंजिनीयर, कॉम्प्युटर प्रोग्रामर वगैरे लोक यात येतात.


4. Bodily - Kinesthetic Intelligence :

शरीराची वेगवान हालचाल करणं, शरीरावर प्रचंड कंट्रोल असणं, मेंदू आणि डोळ्यांत/इतर अवयवांत भन्नाट co-ordination असणं, हे सगळं या प्रकारात येतं. खेळाडू, डान्सर, शिल्पकार वगैरे लोक यात येतात.


5. Musical Intelligence :

चाल, धून, ताल वगैरे लक्षात राहणं, वाद्यांबद्दल आवड असणं, लवकर नवीन गाणी किंवा विविध वाद्यं शिकता येणं या सगळ्या गोष्टी म्हणजे सांगीतिक बुद्धीमत्ता होय.

गायक, संगीतकार, कंपोझर वगैरे मंडळी यात येतात.


6. Interpersonal Intelligence :

लोकांशी संवाद साधता येणं, लोकांच्या भावना समजून घेता येणं, त्यानुसार स्वतःच्या वागण्यात बदल करून घेणं, मित्रमंडळी बनवता येणं, त्यांना जपणं, कुठे कसं वागावं हे समजणं, वाद सोडवणं हे सगळं यात येतं. मानसशास्त्रज्ञ, टीम लिडर, काऊन्सीलर, सेल्सपर्सन, राजकारणी माणसं वगैरे .


7. Intrapersonal Intelligence :

हे वरच्या प्रकारच्या उलट. हे स्वतःमध्ये हरवलेले असतात. यांना स्वतःच्या विश्वात दंग राहायला आवडतं. स्वतःचे strengths आणि weaknesses यांना माहिती असतात. नवनवीन कल्पना ते मांडतात (पण मोस्टली मनातल्या मनात 😅). विचारवंत, वैज्ञानिक, लेखक अशी माणसंं या प्रकारची बुद्धीमान असतात.


8. Naturalistic Intelligence :

हा प्रकार त्याने जरा उशीरा मांडला. काही लोकांना निसर्ग आवडत असतो. पक्षी, जंगलं, समुद्र, डोंगर, जैवविविधता अशा सगळ्या गोष्टींचे ते चाहते असतात. शहरात फार मन लागत नाही, खेड्याकडे जाऊन मोकळ्या आभाळाखाली चांदण्यात झोपणंं फार आवडत असतं. पर्यावरणतज्ज्ञ, जीवशास्त्रज्ञ, निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी वगैरे सगळे लोक यात येतात.


अशा प्रकारे आपली एक बुद्धीमत्ता ओळखली आणि त्यानुसार आपल्या जीवनाची दिशा ठरवली तर आनंदमय होईल सगळं भविष्य. एकापेक्षा जास्त बुद्धीमत्ता असल्यास उत्तमच, मग अशा वेळी भविष्याचा स्कोप अजुन मोठा होतो. 


आपल्या शालेय वयात ज्या बॅक बेंचर्सना आपण अभ्यासामुळे, कमी मार्क्स मुळे हलक्यात घेतो ते लोक किती छान खेळाडू, कलाकार असतात हे जरा आठवा. आपल्या एकूणच बोगस शिक्षणव्यवस्थेमुळे कितीतरी लोक depression, न्यूनगंडामध्ये गेले असतील हे सुद्धा आठवा.


त्यामुळे इंटरनेट वर आधीच उपलब्ध असलेली ही माहिती सोप्या शब्दांत इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


लेखन🙏

ॲड.रेवती देव फाटक.

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...