*विकासात्मक वा बालमानसशास्त्र*
जन्मानंतरच्या पहिल्या काही महिन्यांत मुलांच्या प्रतिक्रियांमध्ये संयोजन आणि जटिलता यांचा अभाव असतो. त्यांची संवेदने, त्यांच्या भावना, त्यांच्या संकल्पना, इतरांच्या संबंधात त्यांचे वर्तन वगैरेही जटिल नसतात पण मासप्रतिमास त्यांच्या मज्जसंस्थेचा परिपक्वनात्मक विकास होत जातो शिवाय, त्यांचे अनुभवाने शिकणेही चालू असते. परिणामी वर्तन आणि मानसिक जीवन उत्तरोत्तर जटिल होत जाते. वर्तनाच्या आणि मानसिक व सामाजिक जीवनाच्या या उत्तरोत्तर अवस्थांचा अभ्यास म्हणजे विकासात्मक मानसशास्त्र होय. अर्थातच बालमानसशास्त्र हा विकासात्मक मानसशास्त्राचाच एक विभाग होय. तथापि विकासात्मक मानसशास्त्रामध्ये गर्भावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, तारुण्य, वार्धक्य या अवस्थांचाही शारीरिक-मानसिक दृष्ट्या अभ्यास करण्यात येतो. त्या त्या अवस्थेतील विकासास पोषक तसेच बाधक ठरणारे घटक, त्या त्या अवस्थेत घडून येणारे बदल व त्यामुळे अनुकूलनाच्या बाबतीत सर्वसाधारणपणे ज्या समस्या निर्माण होत असतात त्यांचा अभ्यास करणे, हे विकासात्मक मानसशास्त्राचे प्रमुख उद्दिष्ट होय. लहान मुलांची माता-पित्यांनी टिपून ठेवलेली निरीक्षणे विविध प्रसंग निवडून बालकांच्या वर्तनाचे –बोलण्यावागण्याचे-निरीक्षण बालकांना प्रश्न विचारणे तसेच कृतिचाचण्या देणे किशोरांच्या, प्रौढांच्या तसेच वृद्धांच्या मुलाखती इ. पद्धती व तंत्रे विकासात्मक मानसशास्त्रातील संशोधनासाठी वापरली जातात.
No comments:
Post a Comment