Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Wednesday, 14 April 2021

समाधान हेच सर्वोत्तम ध्येय

      आयुष्यात तुम्हाला काय हवे आहे? हा प्रश्न बऱ्याच जणांना विचारल्यावर आपल्याला उत्तरे मिळतात की, मला सुखी व्हायचंय, यश मिळवायचं आहे. मुलांबाबतच्या ईच्छा विचारल्या असता बहुतांशी हेच उत्तर मिळते. आयुष्यात जोपर्यंत आपल्या बाबतीत चांगले घडत असते तोपर्यंत आपल्याला ते हवे असते. परंतु दुःख देणारी परिस्थिती निर्माण झाली की मानसिक संघर्ष अनुभवावा लागतो. पूर्ण जीवनकालामध्ये अनेक प्रसंग येतात मग ती सुखकारक असोत अथवा दुःखदायक असोत. येणाऱ्या प्रत्येक घटना, प्रसंगाकडे आपण कशा  पद्धतीने पाहतो यावर तर समाधान अवलंबून असत. चांगलं जीवन जगण्यासाठी चांगले विचार, योग्य संधी निर्माण करणं, निकोप नातेसंबंध इ. बाबींची आवश्यकता असते. 

        'सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे' या उक्तीप्रमाणे सुखाची मात्रा कमी मानली जाते. याचे कारण म्हणजे सुख शोधण्याऐवजी दुःखाचाच आपण जास्त बाऊ करतो. सुख हे मृगजळासारखे असते. त्याच्या पाठीमागे आपण जितके लागू तितके ते आभासी वाटते. इंद्रधनुष्याच्या एका बाजूला सुख तर दुसऱ्या बाजूला दुःख असते. एका बाजूला सुख आणि  दुसऱ्या बाजूला दुःख असल्याने बऱ्याचदा टोकाची परिस्थिती निर्माण होते. आयुष्यातील अशा अनेक घटनांचा आढावा आपल्या घटनात्मक स्मृतीच्या आधारे घेतल्यास  या घटनांना  दुःखाचीही झालर असल्याची जाणीव  आपणास होईल. उदा. मुलाचा जन्म ही घटना विचारात घेतल्यास एकीकडे नवीन सदस्य घरी येणार याचा आनंद तर दुसरीकडे कसलाही धोका न निर्माण होता जन्म होईल का, याची काळजी. सहलीला गेल्यावर लोकांना वाटते की आपण आनंदी होऊ. या विचाराने ते सहलीला जातात, मौजमजा करतात, आनंदित होतात, काळजी दूर ठेवतात आणि सुख अनुभवतात. 

    खरंतर सुख अनुभवण्यासाठी सुखाचे ध्येय ठेवावं लागतं. सुखाचे ध्येय ठेवणे म्हणजे 'उच्चतम उत्तम विचार' करणे होय. सुखाला सीमा नाही त्यामुळे सुखाचे ध्येय गाठण्यासाठी समाधानाचे ध्येय ठेवावे लागेल. कारण सुख मिळविण्यापेक्षा समाधान मिळविणे हीच  आरोग्यासाठी संजीवनी आहे. आयुष्य म्हटलं की थोडं डाव उजव होणारच, मानसिक द्वंद्व निर्माण होणारच. कधी कधी आपणास भरभरून मिळेल, कधी थोडस तर कधी काहीच आपल्या पदरी पडणार नाही. मग जे मिळालंय त्यावर रडत बसायचं की त्यात समाधान शोधण्याचा प्रयत्न करायचा हे फक्त आपल्याच हाती आहे. 

      शेवटी काय तर, आपल्याला निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना व स्वीकार करावाच लागेल. आयुष्य पुढे चालू ठेवावेच लागेल. नेहमी त्या तीव्र दुःखाच्या भावना घेऊन उदासपणे कोणीच जगू शकत नाही. आनंद विरून गेला की समाधानाचीच आशा आपण करू शकतो आणि सुखी होऊ शकतो. त्यामुळे समाधान हेच सर्वोत्तम ध्येय आहे. 


- प्रा. रमेश कट्टीमणी

2 comments:

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...