मानवी वर्तनाचे, स्वभावाचे दोन मुख्य पैलू म्हणजे त्या व्यक्तीचे शारीरिक वर्तन व दुसरे मानसिक वर्तन. या दोन्ही प्रकारच्या वर्तनावर मुख्यतः मेंदूचे व एकूण मज्जासंस्थेचे नियंत्रण असते. भोवतालच्या परिस्थितीचे वेदन व त्याच्या अनुषंगाने घडणारी प्रतिक्रिया ही मेंदूकडून ठरवली जाते. तेंव्हा त्यापूर्वी वेदनांचा जो अर्थ लावला जातो, त्यावर बौद्धिक व मानसिक घटकांचा प्रभाव असतो. आपले सर्व वर्तन हे शरीर व मन यांच्या एकात्म परिणामाने घडते. शरीर व मन यांच्यातील संबंध द्विमार्गी आहे. शरीराचे कार्य व स्वास्थ्य हे व्यक्तीच्या मानसिक वृत्तीने प्रभावित होते. ज्या व्यक्ती हसतमुख, उत्साही, आशावादी असतात, त्यांची शारीरिक स्थिती चांगली राहते. या व्यक्ती सारख्या आजाराच्या तक्रारी करीत नाहीत. तसेच व्यक्तीच्या बोधात्मक कार्यावर, विचार प्रक्रियांवर शारीरिक स्वास्थ्याचा परिणाम होतो. व्यक्तीला शारीरिक आजार झाला असला, की तिच्या विचारांवर परिणाम होतो. व्यक्ती चिडचिडी होते किंवा उदास होते. तेंव्हा शरीर व मन हे परस्परपूरक व परस्परावलंबी आहेत.
प्राचीन काळी शरीर स्वास्थ्यावर अधिक भर दिला जात होता. त्या काळची समजूत म्हणजे स्वस्थ मूल हे सुखी मूल असते. (Healthy child is a happy child). सुदृढ शरीरयष्टीची व्यक्ती जास्त क्रियाशील असते, समाधानी असते. शरीर सुदृढ असेल तर मनही सुदृढ राहते. तसेच शरीरस्वास्थ्य बिघडले तर मानसिक बैचेनही वाढते. फार वर्षांपूर्वी ग्रीक वैद्यकतज्ञ हिप्पोक्रेटस यांनी असे सांगितले आहे की, शरीरातील जैवरसांच्या कमी-अधिक प्रमाणामुळे मानसिक आजार होतात. हल्लीच्या शास्त्रीय संशोधनातून हे आपणास माहिती झाले आहे, की शरीराचा जैव-रासायनिक समतोल ग्रंथींच्या कार्यावर अवलंबून असतो. ग्रंथींच्या कार्यावर स्वायत्त चेतासंस्थेचे नियंत्रण असते. या स्वायत्त चेतासंस्थेचे उद्दीपन मेंदूतील एक अवयव हायपोथँ हायपोथॅलामसमुळे होते. भावनिक अनुभवात मेंदूमुळे स्वायत्त चेतासंस्था कार्यान्वित होते व शरीरांतर्गत विविध बदल घडून येतात. भावनिक अनुभव, मानसिक विचार हे मनाचे कार्य आहे. म्हणून हल्ली म्हटले जाते की, "सुखी मूल हे स्वस्थ मूल" असते. व्यक्तीला सामर्थ्यशाली जीवन जगायचे असेल तर त्याला शरीरस्वास्थ्य व मनस्वास्थ्य या दोन्हीचा समतोल राखता आला पाहिजे.
(संदर्भ : मानसिक स्वास्थ्य)
No comments:
Post a Comment