Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Wednesday, 7 April 2021

जागतिक आरोग्य दिन विशेष

      प्रतिवर्षी संपूर्ण जगभरात 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर आरोग्य समस्यांवर  विचारमंथन करण्यासाठी 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संमेलन झाले. या संमेलनात मानवासमोर असणाऱ्या आरोग्याच्या समस्या सर्वांनी एकत्र येऊन सोडवाव्यात यावर एकमत झाले. या जगात अनेक वंशाचे लोक राहतात. वंश जरी वेगळे असले तरी मानव या नात्याने सर्वांच्या आरोग्याच्या समस्या या सारख्याच आहेत आणि त्या समस्यांवरील उपाय देखील सर्वसामान्यतः समान आहेत.  त्यामुळे मानवास भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर उपाय शोधणे, जनजागृती करणे या अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटना कार्यरत आहे.  त्यानंतर दोन वर्षानंतर 7 एप्रिल 1950 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरूवात झाली. 
      या जगात काही देश विकसित आहेत, काही देश विकसनशील तर काही देश हे मागास आहेत. आर्थिक स्थितीनुसार प्रत्येक देशाची आरोग्य समस्यांवर खर्च करण्याचे प्रमाण हे वेगवेगळे दिसून येते. फक्त पैसाच आरोग्य समस्या कमी करण्यासाठी प्रभावशाली ठरतो असे नाही तर त्यासाठी राबविलेले प्रबोधनपर उपक्रम खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रबोधनपर उपक्रमातून अनेक देशातील विविध आरोग्याच्या समस्या दूर झाली असल्याची काही उदाहरणे आहेत.  भारतात  पोलीओ  मुक्ती, क्षयरोग यांचे त्यामध्ये नाव घ्यावे लागेल.  बदलत्या काळानुसार शारीरिक व मानसिक आरोग्याच्या समस्या खूप मोठया प्रमाणात वाढताना दिसत आहेत. अनेक प्रकारचे विषाणू म्हणजेच व्हायरस आरोग्याची समस्या अधिक गंभीर बनवत आहेत. विषाणूच्या संसर्गामुळे मानवी शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा कमकुवत बनत जाऊन अनारोग्य वाढले आहे. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात असुरक्षित लैंगिक संबंध आणि रक्तसंक्रमणातून पसरणारा एचआयव्हीचा विषाणूने गंभीर रूप दाखविले तर गेल्या दशकात अनेक नवीन संसर्गजन्य गंभीर आजार अस्तित्वात आले. उदा. बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू इ. मधल्या काळात आफ्रिकेत निर्माण झालेला ईबोला, भारतात मोठ्या प्रमाणात झालेले चिकणगुणिया, डेंग्यू हे आजार जीवघेणे ठरले. सद्यस्थितीत मधुमेह, रक्तदाब, हृदय विकार, कर्करोग अश्या आजारांनी अनेकांना ग्रासलेले आहे. या आजारांना रोखण्यासाठी अनेकविध उपायदेखील शोधले गेले व ते प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्नही केला जात आहे. या सर्व बाबींचा विचार करता जागतिक आरोग्य संघटनचे कार्य, महत्व आणि जबाबदारी आणखी वाढल्याचे दिसून येते. 
      जसजसा काळ बदलत चालला आहे तसतसे मानसिक आरोग्य संघटनेपुढे नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत. बदलत्या काळात आरोग्य समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन जागतिक आरोग्य संघटना काम करते. गतवर्षी आरोग्य दिन साजरा करण्यासाठीची थीम म्हणून ‘डिप्रेशन अर्थात नैराश्य’ या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला. सुमारे 7 अब्ज इतक्या लोकसंख्येच्या या जगात यातील साधारण 35 कोटी लोक नैराश्याच्या विकाराने ग्रस्त आहेत. नैराश्याला उदासीनता असेही म्हणतात. नैराश्य ही संकल्पना मानसिक आरोग्याशी संबंधित असून डी. एस. एम. 5 मध्ये यावरील उपचारपद्धती देखील सांगण्यात आली आहे.  नैराश्य या विकृतीने त्रस्त असणाऱ्या व्यक्तीमध्ये आत्महत्येचे विचार सतत भेडसावतात.  तसे प्रयत्नही केले जातात त्यामुळे या विकृतीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. सध्याच्या स्पर्धात्मक व धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला ताणतणावाला सामोरे जावे लागते. जो निर्माण झालेल्या प्रत्येक परिस्थितीतिला  सामोरे जातो तो प्रगतीच्या दिशेने पुढे जातो व जो सतत अपयशी ठरतो तो नैराश्याला बळी पडतो. सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ सततची आढळून येणारी उदासीनतेची लक्षणे ही व्यक्तीच्या दैनंदिन कार्य पार पाडण्यात अडचणी निर्माण करतात. नैराश्याची बाल्यावस्थेतील कटू प्रसंग, सदोष पालकत्व, लिंग असमानता, व्यक्तिमत्व जडणघडणीतील दोष, घटस्फोट, आर्थिक नुकसान, प्रेमभंग, कौटुंबिक विसंवाद, कमीपणाची भावना, आत्मविश्वासाचा अभाव, विघातक वर्तन अशी अनेक कारणे सांगता येतील. एकाकीपणा, अतिसंवेदनशीलता, नकारात्मक विचार, स्वतःला दोषी समजणे, अती काळजी, अबोलपणा, झोपेचा अभाव, भूक न लागणे, आत्महत्येचे विचार ही काही नैराश्याची ठळक लक्षणे होत. मनातील चुकीची विचारधारा काढून टाकून सकारात्मक विचारांची पेरणी करणे हाच त्यावरील सर्वोत्तम उपाय. यासाठी समुपदेशनाचा मार्ग अत्यंत प्रभावी ठरतो. सध्या जगात अनेक मानसिक सेवा देणाऱ्या संस्था, मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक विविध मानसशास्त्रीय उपचार पद्धती वापरून नैराश्य कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या जोडीला भारतात ध्यान धारणा व अध्यात्माचा देखील वापर केला जात आहे.

         गेल्यावर्षी म्हणजेच वर्ष 2019 च्या शेवटी आणखी एका नवीन व्हायरस चा जन्म झाला आणि पुन्हा आरोग्य संघटनेसमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले. तो म्हणजे कोरोना व्हायरस. यातून होणाऱ्या आजाराला कोविड-19 असे नाव दिले गेले. चीनच्या वुहान प्रांतातून आढळलेला हा विषाणू संसर्गाच्या माध्यमातून बघता बघता संपूर्ण जगभर पसरला आणि या आजाराने जागतिक महामारीचे रूप धारण केले. अनेक देशांना आजाराला प्रतिबंध करण्यासाठी पूर्ण देश लॉकडाउन करावा लागला. सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, घशात खवखवणे अशी या आजाराची सामान्य लक्षणे. संसर्गजन्य असल्याने व शरीरातील प्रतिकारशक्ती संपवत असल्याने हा आजार जीवघेणा ठरला. यात कित्येक व्यक्तींचा बळी गेला. कित्येक महिन्याच्या कठोर उपाययोजनानंतर काही प्रमाणात यावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले परंतु आता पुन्हा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून लॉकडाउन सारखे पर्याय प्रशासनाला अवलंबावे लागत आहेत. या आजारापासून दूर राहण्यासाठी आपली वैयक्तिक जबाबदारी म्हणून गर्दीत जाणे टाळणे, मास्कचा वापर करणे, सॅनीटायझरचा वापर, सुरक्षित अंतर राखणे, गरज असेल तेंव्हाच बाहेर पडणे, वेळीच तपासणी व उपचार करून घेणे, लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. शासन व प्रशासन त्यांच्या परीने करीत असलेल्या उपाययोजनांना प्रतिसाद सर्वानी देणे गरजेचे आहे. शेवटी प्रत्येकांनी नियम पाळले, आपली स्वतःची काळजी घेतली तर याचा प्रसार बऱ्याच अंशी कमी होण्यास मदत होईल.  

      आज ७ एप्रिल २०२१ जागतिक आरोग्य दिवस. "प्रत्येकासाठी सुदृढ व आरोग्यदायी जग बनविणे" ही यावर्षीच्या या दिनाची मुख्य संकल्पना आहे. या दिनाच्या निमित्ताने या लेखाच्या माध्यमातून जुन्या आजारापासून ते सद्यस्थितीत थैमान घालत असलेल्या काही शारीरिक व मानसिक आजारांचा आढावा प्रयत्न केला आहे. आज या दिनाच्या निमित्ताने शेवटी इतकाच संदेश द्यावासा वाटतो.....

वेळ नाजूक आहे, जरा  सांभाळून राहा !

हे युद्ध थोडं वेगळं आहे, अंतर राखूनच लढा..!

खर पाहीलं तर, जीवनावश्यक काहीच नाही !

आपले जीवनच आवश्यक आहे.!!!


लेखक - प्रा. रमेश कट्टीमणी
सहाय्यक प्राध्यापक
कन्या महाविद्यालय, मिरज 


2 comments:

  1. आरोग्य संपन्न लेखन
    छान मांडणी

    ReplyDelete

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...