आनुवंशिक/ जैविक (जेनेटिक) मानसशास्त्र :
विकास मानसशास्त्र ही मानवी वर्तनलक्षणांचा उगम व विकास यांचा अभ्यास करणारी मानसशास्त्राची शाखा होय. सुरुवातीला या विषयाच्या अभ्यासक्षेत्रामध्ये वर्तनाचा जातिविकास (फायलोजेनेसिस), वर्तनाची आनुवंशिकता (इन्हेरिटन्स) व व्यक्तीच्या जन्मानंतरचा विकास (ऑन्टोजेनेसिस) अशा तीन उपक्षेत्रांचा समावेश होत होता. आता तुलनात्मक मानसशास्त्र जातिविकासाचा अभ्यास करते. विकासात्मक (डेव्हलपमेंटल) मानसशास्त्रात व्यक्तीच्या जन्मानंतरच्या विकासाचा अभ्यास होतो. परंतु वर्तनाची आनुवंशिकता हे अजूनही पूर्णपणे न उलगडलेले संशोधनक्षेत्र आहे. त्याचा मानसशास्त्राच्या शाखेमध्ये पूर्ण विकास झालेला नाही. या संसोधनक्षेत्राला आता वर्तन-आनुवंशिकी (बिहेव्हिअर जेनेटिक्स) हे नाव देण्यात आले आहे.
व्यक्तीच्या वर्तनामध्ये दृश्यमान होणारी जी गुणलक्षणे असतात त्यांना सरूपविधा (फेनोटाईप) म्हणतात आणि ती आनुवंशिकतेने मिळणाऱ्याजनुकविधांद्वारे (जेनोटाईप) मिळतात. त्यांचे स्वरूप विशिष्ट गुणलक्षणांमध्ये विकास होण्याची सुप्तशक्ती असे असते. ह्या जनुकविधा शरीरपेशींमधील रंगसूत्रांवरील जनुके (जीन्स) आहेत. कोणत्या जनुकामधून कोणत्या गुणलक्षणाचा विकास होतो ते शोधणे हा वर्तन-आनुवंशिकीचा प्रधान हेतू आहे. त्यासाठी कोणती गुणलक्षणे आनुवंशिकतेने प्राप्त होत असतात व वर्तनाच्या दृश्यमान गुणलक्षणांच्या विकासामध्ये आनुवंशिकतेचा भाग किती, याचा अभ्यास करण्यासाठी एकच गुणलक्षण किंवा गुणलक्षणसमूह अनेक पिढ्यांमध्ये दिसून येणाऱ्यावंशावळींचा (पेडिग्री) अभ्यास, नात्यातील व्यक्तींच्या गुणलक्षणांचा सहसंबंध, एकबीजजन्य व द्विबीजजन्य जुळ्या मुलांमधील सहसंबंध, दत्तक घरे (फोस्टर होम्स) त्याचप्रमाणे निरनिराळ्या कुटुंबांमध्ये किंवा सांस्कृतिक पर्यावरणांमध्ये वाढलेल्या जुळ्या सहोदरांचा अभ्यास वगैरे संशोधनपद्धती वापरतात. यामध्ये आता प्रायोगिक आनुवंशिकी या नावाच्या संशोधन पद्धतीची भर पडली आहे. आण्विक विकीकरण, सूक्ष्मतरंग वगैरेंच्या साहाय्याने जनुकांमध्ये फेरबदल घडवून आणून त्याचा वर्तनाच्या विकासावर काय परिणाम होतो, याचा प्रायोगिक रीतीने अभ्यास केला जातो. हा अभ्यास सध्या फळांवरील ड्रॉसोफिला ही माशी व तत्सम प्राण्यांपुरताच मर्यादित आहे. पण वर्तन- आनुवंशिकी शास्त्रज्ञांची आकांक्षा आहे, की या विज्ञानामुळे नजिकच्या भविष्याकाळात जनुकां मध्ये इच्छित फेरफार करून आपल्याला पाहिजे तशा गुणलक्षणांनी युक्त नवी पिढी जन्माला घालता येईल.
संदर्भ : मानसरंग
No comments:
Post a Comment