Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Wednesday, 23 June 2021

ध्यान साधनेची लस


      आजच्या कोविडच्या वातावरणामुळे प्रत्येकाला भयभीत केलंय. आणि ही भीती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका ठराविक कालावधीपेक्षा जास्त दिवस भीती, नकारात्मक विचार, चिंता, काळजी हे कायम राहीलं तर त्यातून मानसिक आणि शारीरिक व्याधी निर्माण होतात. आणि तस चित्र आज सर्वत्र दिसतय. हा कोरोनाचा विषाणू अनेकांना झपाट्याने  आपला विखारी डंख मारत सुटलेला असताना...आपले लोक, आपल्या जवळचे लोक अत्यवस्थ अवस्थेत असताना,  मरत असताना आपलं मन शांत कस राहू शकेल? असा प्रश्न कित्येकांना पडू शकतो. आणि हा असा  विचार येणही सहाजिकच  आहे. पण या अस्वस्थ,बेचैन, भयभीत मनःस्थितीला , नकारात्मक विचारांना सावरण खूप गरजेचं आहे. नाहीतर ही भीतीच अनेक निरोगी लोकांनाही  विविध रोगांनी ग्रस्त करून टाकेल...अगदी प्रदीर्घ कालावधीसाठी.

      मग करायच तरी काय? कसे थांबवावेत हे विचार? अस्वस्थ मनस्थिती स्थिर कशी होणार? ही चिंता, हे वाढत भय, भयाण वातावरण असल तरी त्याच्याशी सामना करण्याचं बळ आपल्याला कस येणार? असे अनेक प्रश्न अनेकांना पडू शकतात. 

       यावर आहे एक उत्तम उपाय.... कोणत्याही औषधाशिवाय ही भीती, चिंता, मानसिक ताण,अस्थिरपणा दूर होऊ शकतो. आपलं मन आलेल्या वातावरणाशी झुंजायला सक्षम होऊ शकत. किंवा जरी दुर्दैवाने आपल्याला काही   आजार झालाच तरी सहीसलामत यातून आपण बाहेर पडू शकतो. तो उपाय म्हणजे.... ध्यान! (मेडिटेशन).

      ध्यानाने मन शांत होत. चंचल मन एकाग्र होत.सकारात्मक होत.आणि मन शांततेच्या आल्हाददायी कारंज्यात भिजून निघालं  की कोणतेही बाहेरील विचार आपल्याला त्रास देऊ शकत नाहीत. ध्यानाच्या अधिकाधिक साधनेने, सरावाने भीती,अवस्थपणा, मानसिक ताण पर्यायाने शारीरिक ताण नाहीसा होतो. आंतरिक शक्ती वाढल्याचे जाणवते. कार्यक्षमता वाढते. व्यक्ती सृजनशील झाल्याची जाणीव होते. 

      ध्यानाचेही शुद्ध शास्त्र आहे. ध्यानाचा शास्त्रोक्त अभ्यास करणे महत्वाचे आहे. ध्यान म्हणजे आपल्या प्राणशक्तीला - इच्छा शक्तीच्या अधिन आणणारी शक्ती!

        ध्यान म्हणजे  नुसतेच मांडी घालून ,डोळे मिटून बसणे नव्हे. ध्यानाद्वारे आपल्या देहात,अंतरात प्राणशक्ती निर्माण करणे आणि शरीर हे प्रत्यक्ष ऊर्जेचे स्रोत बनवणे .

        शरीरातील स्नायू,पेशी,हाडं, मज्जासंस्था, रक्त या सर्वांमध्ये ऊर्जा साठवलेली असते. ही ऊर्जा दैनंदिन जीवनात सतत वापरली जाते. मग अशीच अधिकाधिक ऊर्जा आपण आपल्या इच्छाशक्तीच्या वापराने ध्यान साधनेच्या शास्त्र शुद्ध पद्धतीतून  निर्माण करू शकतो.आणि आपली प्राणशक्ती अधिकाधिक चैतन्यमय बनवू शकतो. शरीरातील पेशी अधिकाधिक क्रियाशील होतात. त्यामुळे आपल्याला शांत,  सकारात्मक वाटू लागतं. कोणतेही आजार आपल्या जवळ येऊ शकत नाहीत, आणि आले तरी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपण त्यावर मात करू शकतो.

      ध्यानातही विविध तंत्र असतात, त्यातील विशिष्ट तंत्र, प्राणायाम,श्वासावर नियंत्रण या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे शरीरात निर्माण होणारी शक्ती(ऊर्जा) आणि त्याद्वारे राखले जाणारे मानसिक, शारीरिक संतुलन!

      ध्यानाच्या विज्ञानाला राजयोग म्हणूनही ओळखले जाते.. म्हणजेच ईश्वर प्राप्तीचा राजमार्ग!

        आपलं मन एखाद्या चुंबकासारखं असत. चांगले विचार केले तर आपण स्वतः कडे सगळं चांगलच आकर्षित करू, सतत भीतीदायक  निराशाजनक, नकारात्मक विचार केले तर आपल्याला मिळणारं फळही तसच असत. आपण चिंता, भय, अस्वस्थपणा आपल्या नकळतच आकर्षित करत असतो.आणि नकारात्मक विचारांनी सकारात्मक आणि प्रसन्न जीवन कधीच जगता येत नाही.

       ध्यान करणे आणि त्यातून मिळणारा आनंद  अनुभवणे हे प्रत्यक्ष ध्यान केल्याशिवाय कळू शकणार नाही. 

       आपल्या दैनंदिनीत कितीतरी वेळ आपण वाया घालवत असतो. त्यातून ध्यानासाठी आपण  २० मिनिटं  दिली तर आपणच रोज नव्याने रिचार्ज होऊ शकतो. ९० दिवस आपण सातत्याने ध्यान केलं तर आपल्यामध्ये आणि आपल्या आजूबाजूलाही त्याचा परिणाम दिसू शकतो. आपल्या स्वभावामध्ये, वर्तनामध्ये, बोलण्यामध्येही चांगली सुधारणा होऊ शकते. 

       दैनंदिन धावपळीच्या युगात, सतत कोणत्या न कोणत्या ताणात असलेले आपण, काही  कारणांनी आनंदी होतो....हो ना? किंवा आनंदी होण्यासाठी कारण शोधतो. पण कायम स्वरूपी आनंदी ,प्रसन्न ,ताणमुक्त राहण्यासाठी ध्यान साधनेची लस कायम स्वरूपी घेतली तर अशी कोणतीही कारण कधीही शोधण्याची गरजच नाही. मनाला अशा पद्धतीने सक्षम करायला, मनालाच समजून सांगावं आणि तयार कराव म्हणजे ध्यान ही फक्त एक क्रिया म्हणून होणार नाही तर शास्त्र शुद्ध चैतन्याचा स्रोत नक्कीच होईल आणि मन होईल  सकारात्मकतेच आगर! 


©® सौ अश्विनी कुलकर्णी

   सांगली

No comments:

Post a Comment

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...