सद्याची कोविडची परिस्थिती.... आणि त्यावरील सोशिअल मिडीया वरील बातम्या,
ब्रेकिंग न्युज च्या सरपटणाऱ्या मसालेदार- चटपटीत पट्ट्या, ह्यामुळे निरोगी व्यक्तींच्याही हृदयाची धडधड वाढू लागली आहे. त्याच त्यांचं गोष्टींची घराघरात चर्चा, फोन वरून गप्पा, आजाराचे फॉरवर्ड मेसेज, आजारावरील उपायांचे शेकडो मेसेज, आजार होऊन गेल्यावरचे नुकसान.... धुमाकूळ घातलाय या मेसेजनी.यामुळे तर लोकांना घरबसल्या आजारी असल्यासारखं वाटू लागलंय. जरा काही झालं ... शिंक आली, ढास लागली तरी आपल्याला काय होऊ लागलय ? कोरोना तर नाही ना? अशा कोरोना बद्दलच्या विचारांच्या चक्रव्यूहात लोक अडकू लागलेत. स्वतः घाबरून दुसऱ्यांनाही घाबरवत आहेत. कित्येक जण फक्त टीव्ही वरील बातम्या बघून भीती, चिंता आणि नकारात्मक मानसिकतेने त्रस्त झाले आहेत. त्याचे शरीरावर वाईट परिणाम होताना दिसत आहेत.
मान्य आहे हे वातावरण भीतीदायक आहे. पण यातून आपल्याला आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवायचे आहे. त्यासाठी काय काय करता येईल?
पूर्वीच्या रोजच्या दैनंदिन कामात, धावपळीत अनेक गोष्टी राहून गेलेल्या असतील. त्याला एक उजाळा द्यायचा. अस एकही घर नसेल की जिथे एकही पुस्तक नाही. अनेक पुस्तक घरी असतात, नंतर वाचू म्हणून तशीच ठेवलेली. सामाजिक, कौटुंबिक, अध्यात्मिक असतील, कविता संग्रह , कथा संग्रह, कादंबऱ्या असतील. काढा त्या बाहेर.....रोज थोडं जरी वाचलं तरी विचारांना वेगळी दिशा मिळू शकते. रोज एखाद्या पुस्तकातील थोडं तरी वाचन,मनन,चिंतन करून एखाद्या आवडलेल्या मुद्यावर लिहिता येऊ शकत. आपले विचार मांडून व्यक्त होता येऊ शकत. एक चांगला विचार...पूर्ण विचारांती जर खरोखर आचरणात आणला, तर पूर्ण आयुष्य बदलू शकतो. मग चांगल्या विचाराच बीज आपल्यामध्ये पेरलं तर त्याचे अंकुरही साहजिकच हिरवे आनंद देणारे असतील. आणि दुसर्यांसाठीही हे आदर्श उदाहरण ठरेल.
अनेक माता भगिनींनी मागील वर्षी लॉक डाउन मध्ये विविध, उत्कृष्ठ पाककृती केल्या. त्या जर एकत्रित लिहून काढल्या तर त्याचा उत्तम संग्रह होऊ शकेल. त्यातून मिळणारा आनंद वेगळाच असेल.
अनेक जण सोशिअल मीडिया वर नुसतच लाईक व कंमेन्ट देत असतात. त्यांचं वाचन फक्त मोबाईल हातात धरून काय समोर येईल ते आणि तेव्हढंच वाचायचं! खर वाचन म्हणजे फक्त सोशिअल मीडिया नव्हे....हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आपले अनेक धर्मग्रंथ भगवतगीता,
विविध ग्रंथांनी आपल्या मस्तकावर वरदहस्त ठेवलाय. कस वागावं,कस बोलावं, आलेल्या परिस्थितीत संयम कसा राखावा, मनस्थिती दोलायमान होताना ती स्थिर कशी करावी? मनःशांती कशी टिकवावी...हे तर अनेक उत्तम उदाहरणं व दाखल्यांसह आपल्याला पटवून दिलंय...याचा अभ्यास अशा कठीण परिस्थितीतील शरीर व मानसिक स्वास्थ्यासाठी फारच फलदायी ठरतो.
काही जण उत्तम लिहितात, लेख ,कविता, गजल,ललित , पुस्तक परीक्षण, रसग्रहण आदी प्रकार. त्यांना लिहायची आवड असतेच आणि लिखाणातून व्यक्त होण तर जीव की प्राण असतो त्यांचा! त्यांनी गुंतवून घेतलंय म्हणण्यापेक्षा त्यात ते आनंदी आहेत अस म्हणावं लागेल. त्यामुळे त्यांचा जीवन कळलंय... असच म्हणावं लागेल!
याहून अधिक काय?.... तर छंद जोपासता येतील. राहुन गेलेलं भरतकाम, शिवणकाम नव्याने करता येईल. स्त्री ही 'सृजनाचही सृजन' आहे. त्यातून काही नवीन शोधेल ती नक्कीच!
काहीजण शिकले होते संगीत...पण राहील होत अर्धवट. त्याला जवळ करा. ऐका संगीत!जस जमेल तसं चित्र काढा .. रंगांच्या दुनियेत हरवून जा. ध्यानस्थ व्हा आवडीच्या गोष्टीत!
आली आहे कठीण परिस्थिती....पण घरबसल्या काय करता येईल ह्या अशा विचाराना थोडं हलवायला हवं. अनेक गोष्टी समोर येतील, मार्ग व दिशा मिळू लागतील. मग विचार मनाच्या पेल्यातून ओसंडून वाहू लागतील.. हे करुया...ते करुया... अनेक गोष्टीनी हा आनंदाचा पेला भरून वाहू लागेल. हा आनंदच एक प्रकारचं ध्यान आहे. जेव्हा हा आनंद अणू व रेणू बनून मेंदूत पसरेल, तेव्हा जाणवेल...मन व सगळं शरीर शांत असेल...कोणतीही अस्वस्थता, भय, चिंता नावालाही नसेल.
आता वेळच नसेल अवांतर, नकारात्मक विचारांना... कारण आपला आनंद आपल्यातच होता,आणि तो आपण शोधलाय! शरीरासाठी पौष्टीक अन्न खातोय, तस मनानेही आशावादी, आनंदी स्पदनाना आकर्षित केलं असेल, आणि तेही सकस विचारांचं , निरोगी झालंय आता. हो ना?
©® सौ अश्विनी कुलकर्णी
सांगली
No comments:
Post a Comment