जीवनाच्या वाटेवर, विविध रंगात आपण रंगून गेलेले असताना, अचानक येतात काही पॉझ, वेगवगळे प्रसंग घेऊन. कुठेतरी सगळं थांबल्यासारखं, बिथरल्यासारखं वाटत. हे वागणं , अस वाटण, ही अवस्था माणूस म्हणून जगताना, प्रत्येक मनुष्य समाजातील प्रत्येक जीवाकडून, घटकांकडून, प्रसंगानुसार, परिस्थितीनुसार, वातावरणानुसार, वेळेनुसार विविध अनुभव घेत असतो. आलेल्या अनुभवांना ,मिळवलेल्या क्षणांना, दिवसाना, वर्षांना आपण सुखद, दुःखद, आशादायी, निराशादायी, प्रेरणादायी, ऊर्जा देणारे, ऊर्मी देणारे, सकारात्मक अशी अनेक लेबलं लावत असतो.
त्यातीलच एक असा कालावधी, जो अनेक व्यक्ती अनुभवतात. थोड्या फार कमी जास्त फरकाने असा कालावधी मनुष्याच्या जीवनात कधीही येऊ शकतो. मग तो शारीरिक, मानसिक, आर्थिक कोणत्याही समस्या , कठीण प्रसंग, आघात, घरगुती समस्या,कलह, नात्यांमधील दरी, सामाजिक क्लेश , प्रेमभंग, घटस्फोट, अत्याचार, कोर्ट कचेऱ्या, नोकरी जाणे, नोकरीत अडचणी येणे ,इस्टेटीच्या गोष्टी... या समस्यां सोडवताना शेवटी मानसिक त्रास होतो तो वेगळाच ..अशा एक ना अनेक गोष्टी चा सामना करावा लागतो. अशा कोणत्याही रुपात येऊन 'आ' वासून उभा राहतो तो एक 'बॅड पॅच'.
मनुष्याच जीवन सुरळीत सुरू असताना, प्रत्येक व्यक्ती ह्या बॅड पॅच ला बळी पडते.काय असतो हा बॅड पॅच? ....कधी भूतकाळातील आपल्याच चुकांचा वर्तमानातील परिणाम बॅड पॅच म्हणून समोर येतो. परिस्थिती, शारीरिक,मानसिक , आर्थिक समस्या आणि इतर अनेक घटक याला कारणीभूत असतात. ह्या समस्या किंवा संकटं सांगून येत नसतात. प्रत्येक व्यक्तीगणिक वेगळ्या असणाऱ्या ह्या समस्यांचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा होऊ शकतो.
हे बॅड पॅच जीवन विस्कळीत करून टाकतात. अगदी काही वेळेस होत्याच नव्हतंही होत. कित्येक वेळेस चूक असो वा नसो असे काही विचित्र प्रसंग आणि अनुभव येतात की या सर्वातून मग निराशा, उदासीनता, चिंता, भय, नकारात्मक विचार सुरू होतात.
प्रत्येकालाच वाटत असत की हे असे बॅड पॅच मलाच का? माझ्याच वाट्याला अशी दुःख का येतात? पण अशी कोणतीही व्यक्ती नाही जिला एकही दुःख ,वेदना कधीही झालं नसेल. त्यामुळे आलेल्या प्रसंगांना स्वीकारून, सामोरे जाण्याचे मार्ग निवडणे. आपल्या जीवनातील ह्या कठीण प्रसंगात आपल्याच दृष्टीकोनाची ही परीक्षा असते.
विवेक बुद्धी, सारासार विचार, ज्ञान व कृतीच्या संगमाने, मनाच आणि शरीराच संतुलन आपण स्वतःच करू शकतो. आपले धैर्य आणि कमी झालेला आत्मविश्वास नक्कीच परत मिळू शकतो. आणि परत सगळं पूर्ववत होऊ शकत.
पण हिम्मत न हारता चिकाटीने प्रश्न सोडवताना, इथे स्वयंप्रेरणा खूप महत्वाची आहे.
आपण स्वतःच ह्या बॅड पॅच च्या मुळाशी जाऊन शोध घेतला पाहिजे. यालाच रूट कॉझ अनालिसिस म्हणतात. म्हणजेच आपल्या भूमिकेत आपली कुठे चूक झाली ह्याचं थोडं खोलात जाऊन आपणच उत्खनन कराव. नेमक्या चूका आणि समस्या सापडत गेल्या की त्यावर उत्तरही आपल्यालाच शोधता येतं. त्यासाठी आपणच आत्मशोध घेणं गरजेचं आहे. मग आपल्यातच आपण काय सुधारणा केली पाहिजे हे लगेचच कळू शकत. हेच बॅड पॅच नव्या दिशा दाखवतात, नवे मार्ग मोकळे करून देत असतात. मग ही संधी म्हणून बघायची की हताश होऊन निराशेच्या गर्तेत स्वतःला झोकायच?
आपल्यासोबत घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी, त्याचे परिणाम, आपली मानसिकता, आणि त्यावर आपण घेत असलेले निर्णय याबाबत स्वतःला शोधताना काही वेळेस मित्राचं, वरिष्ठांच, वेळ लागली तर तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शनही जरूर घ्यावं.
काही वेळेस काही संकटं, घटना ह्या तात्पुरत्या स्वरूपाच्याअसतात तर काही गंभीर आणि परत परत येणाऱ्या. पण सर्वच घटनांमध्ये ,प्रसंगांमध्ये अतिशय शांत चित्ताने, संयम राखून विचार व कृती करणे हितावह असते.
श्रीकृष्णांनी हजारो वर्षांपूर्वी सर्व विश्वाला भगवत गीतेच्या माध्यमातून दिलेल्या संदेशात जीवनात येणाऱ्या सर्व समस्या,त्याची कारण,आणि त्यावर विविध दाखल्यांद्वारे केलेले समाधानी निवारण आहे.
कारण हा जीवनातील समस्यांचा रामबाण उपाय आहे!
भगवान सांगतात, मनातून संशयांच्या बिजाच उच्चाटन करा. रागावर नियंत्रण ठेवा.मनावर ताबा ठेवावा.त्याला अनावश्यक भरकटू देऊ नये.जीवनाचं ध्येय ठरवून त्याकडे नेटाने वाटचाल करा.आपण स्वतःवर विश्वास ठेवावा.
आणि चांगल्या कामात ईश्वरी मदत मिळते यावरही विश्वास ठेवावा.मनाची चंचलता नष्ट करण्याचा प्रयत्न करा.प्रत्येक क्षण माणसाला नवी शिकवण देतो.प्रयत्नांना यश मिळतेच.फक्त ते मनापासून व न कंटाळता करावे.आत्मसन्मान टिकवावा,पण अभिमान नसावा.स्वकर्तृत्वावर विश्वास हवा.मनाने कधीहि कमकुवत बनू नये.बुद्धीचा योग्य वापर करा.ज्ञानप्राप्तीने जीवन यशस्वी होते.भीतीचा त्याग करून नेटाने प्रयत्न करा.
खर तर, बॅड पॅच हाच जीवनातला खूप मोठा टर्निंग पॉईंट असतो. मी तर अस म्हणेन की जीवनात येणारे असे बॅड पॅच नवे टर्निंग पॉईंट घेऊनच येतात. नवीन शिकवण देण्यासाठी!
मग अशा वेळीश्रीकृष्णांनी दिलेल्या ह्या दिव्य संदेशाच आचरण केलं तर बॅड पॅच मधून सहजच बाहेर पडता येऊ शकेल आणि जीवनातील नव्या टर्निंग पॉइंट कडे , नव्याने वाटचाल करता येईल. आत्मशोध घेऊन , स्वतःच स्वतःचा सूर्य होऊन!
©® सौ अश्विनी कुलकर्णी,
सांगली
(लेखिका या य. च. म. महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिकचे कन्या महाविद्यालय, मिरज अभ्यासकेंद्राच्या विद्यार्थिनी आहेत.)
No comments:
Post a Comment