Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Wednesday, 23 June 2021

ध्यान साधनेची लस


      आजच्या कोविडच्या वातावरणामुळे प्रत्येकाला भयभीत केलंय. आणि ही भीती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका ठराविक कालावधीपेक्षा जास्त दिवस भीती, नकारात्मक विचार, चिंता, काळजी हे कायम राहीलं तर त्यातून मानसिक आणि शारीरिक व्याधी निर्माण होतात. आणि तस चित्र आज सर्वत्र दिसतय. हा कोरोनाचा विषाणू अनेकांना झपाट्याने  आपला विखारी डंख मारत सुटलेला असताना...आपले लोक, आपल्या जवळचे लोक अत्यवस्थ अवस्थेत असताना,  मरत असताना आपलं मन शांत कस राहू शकेल? असा प्रश्न कित्येकांना पडू शकतो. आणि हा असा  विचार येणही सहाजिकच  आहे. पण या अस्वस्थ,बेचैन, भयभीत मनःस्थितीला , नकारात्मक विचारांना सावरण खूप गरजेचं आहे. नाहीतर ही भीतीच अनेक निरोगी लोकांनाही  विविध रोगांनी ग्रस्त करून टाकेल...अगदी प्रदीर्घ कालावधीसाठी.

      मग करायच तरी काय? कसे थांबवावेत हे विचार? अस्वस्थ मनस्थिती स्थिर कशी होणार? ही चिंता, हे वाढत भय, भयाण वातावरण असल तरी त्याच्याशी सामना करण्याचं बळ आपल्याला कस येणार? असे अनेक प्रश्न अनेकांना पडू शकतात. 

       यावर आहे एक उत्तम उपाय.... कोणत्याही औषधाशिवाय ही भीती, चिंता, मानसिक ताण,अस्थिरपणा दूर होऊ शकतो. आपलं मन आलेल्या वातावरणाशी झुंजायला सक्षम होऊ शकत. किंवा जरी दुर्दैवाने आपल्याला काही   आजार झालाच तरी सहीसलामत यातून आपण बाहेर पडू शकतो. तो उपाय म्हणजे.... ध्यान! (मेडिटेशन).

      ध्यानाने मन शांत होत. चंचल मन एकाग्र होत.सकारात्मक होत.आणि मन शांततेच्या आल्हाददायी कारंज्यात भिजून निघालं  की कोणतेही बाहेरील विचार आपल्याला त्रास देऊ शकत नाहीत. ध्यानाच्या अधिकाधिक साधनेने, सरावाने भीती,अवस्थपणा, मानसिक ताण पर्यायाने शारीरिक ताण नाहीसा होतो. आंतरिक शक्ती वाढल्याचे जाणवते. कार्यक्षमता वाढते. व्यक्ती सृजनशील झाल्याची जाणीव होते. 

      ध्यानाचेही शुद्ध शास्त्र आहे. ध्यानाचा शास्त्रोक्त अभ्यास करणे महत्वाचे आहे. ध्यान म्हणजे आपल्या प्राणशक्तीला - इच्छा शक्तीच्या अधिन आणणारी शक्ती!

        ध्यान म्हणजे  नुसतेच मांडी घालून ,डोळे मिटून बसणे नव्हे. ध्यानाद्वारे आपल्या देहात,अंतरात प्राणशक्ती निर्माण करणे आणि शरीर हे प्रत्यक्ष ऊर्जेचे स्रोत बनवणे .

        शरीरातील स्नायू,पेशी,हाडं, मज्जासंस्था, रक्त या सर्वांमध्ये ऊर्जा साठवलेली असते. ही ऊर्जा दैनंदिन जीवनात सतत वापरली जाते. मग अशीच अधिकाधिक ऊर्जा आपण आपल्या इच्छाशक्तीच्या वापराने ध्यान साधनेच्या शास्त्र शुद्ध पद्धतीतून  निर्माण करू शकतो.आणि आपली प्राणशक्ती अधिकाधिक चैतन्यमय बनवू शकतो. शरीरातील पेशी अधिकाधिक क्रियाशील होतात. त्यामुळे आपल्याला शांत,  सकारात्मक वाटू लागतं. कोणतेही आजार आपल्या जवळ येऊ शकत नाहीत, आणि आले तरी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपण त्यावर मात करू शकतो.

      ध्यानातही विविध तंत्र असतात, त्यातील विशिष्ट तंत्र, प्राणायाम,श्वासावर नियंत्रण या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे शरीरात निर्माण होणारी शक्ती(ऊर्जा) आणि त्याद्वारे राखले जाणारे मानसिक, शारीरिक संतुलन!

      ध्यानाच्या विज्ञानाला राजयोग म्हणूनही ओळखले जाते.. म्हणजेच ईश्वर प्राप्तीचा राजमार्ग!

        आपलं मन एखाद्या चुंबकासारखं असत. चांगले विचार केले तर आपण स्वतः कडे सगळं चांगलच आकर्षित करू, सतत भीतीदायक  निराशाजनक, नकारात्मक विचार केले तर आपल्याला मिळणारं फळही तसच असत. आपण चिंता, भय, अस्वस्थपणा आपल्या नकळतच आकर्षित करत असतो.आणि नकारात्मक विचारांनी सकारात्मक आणि प्रसन्न जीवन कधीच जगता येत नाही.

       ध्यान करणे आणि त्यातून मिळणारा आनंद  अनुभवणे हे प्रत्यक्ष ध्यान केल्याशिवाय कळू शकणार नाही. 

       आपल्या दैनंदिनीत कितीतरी वेळ आपण वाया घालवत असतो. त्यातून ध्यानासाठी आपण  २० मिनिटं  दिली तर आपणच रोज नव्याने रिचार्ज होऊ शकतो. ९० दिवस आपण सातत्याने ध्यान केलं तर आपल्यामध्ये आणि आपल्या आजूबाजूलाही त्याचा परिणाम दिसू शकतो. आपल्या स्वभावामध्ये, वर्तनामध्ये, बोलण्यामध्येही चांगली सुधारणा होऊ शकते. 

       दैनंदिन धावपळीच्या युगात, सतत कोणत्या न कोणत्या ताणात असलेले आपण, काही  कारणांनी आनंदी होतो....हो ना? किंवा आनंदी होण्यासाठी कारण शोधतो. पण कायम स्वरूपी आनंदी ,प्रसन्न ,ताणमुक्त राहण्यासाठी ध्यान साधनेची लस कायम स्वरूपी घेतली तर अशी कोणतीही कारण कधीही शोधण्याची गरजच नाही. मनाला अशा पद्धतीने सक्षम करायला, मनालाच समजून सांगावं आणि तयार कराव म्हणजे ध्यान ही फक्त एक क्रिया म्हणून होणार नाही तर शास्त्र शुद्ध चैतन्याचा स्रोत नक्कीच होईल आणि मन होईल  सकारात्मकतेच आगर! 


©® सौ अश्विनी कुलकर्णी

   सांगली

Thursday, 17 June 2021

आरोग्य

        सध्या सगळ्यात जास्त महत्त्वाचे काय आहे अस जर कोणाला विचारल तर 80% लोक हेच सांगितलं की आपल आरोग्य सगळ्यात महत्त्वाचे आहे. कोरोनानी आपल्याला दिलेल्या शिकवणीत महत्त्वाची ही शिकवण आहे आणि नक्की ते सर्वांना पटले असावे, असे मला वाटते. खर तर आपल्या पूर्वजांनी पूर्वीच आपल्याला शिकवल आहे आरोग्यंम धनसंपदा. आपण मात्र ते आरोग्य आणि धनसःपदा अस वेगवेगळे केले आणि त्यातली संपदा महत्त्वाची मानली. 

   त्यात आपण हेही विसरलो हे आपल शरीर आहे ते मशिनसारख काम करत असेल तर ते मशिन कधीकधी सव्हिंसिंग मागत. त्याची एक सिस्टीम आहे, त्यात बिघाड होऊ  शकतो , तीपण दुरूस्त करायला लागते .  

  लोक सांगतात अहो माणूस काल पर्यत चांगला होता अचानक त्याला हार्टॲंटॕक आला. पण मला सांगा शरीर खरच काहीच इशारा देत नाही का? 

   स्त्रियांचे असे काॕमन आजार आहेत जे १०० पैकी ८० स्त्रीयांना होतात . ज्यातला एक आजार म्हणजे गर्भाशयाचा आजार . पण किती स्त्रीया याची काळजी घेतात. यावर एक साधा उपाय आहे तो म्हणजे स्त्रीयांची मासिक पाळी बंद झाली की एकदा डाॕक्टर कडे जाऊन तपासणी करून घ्यायची असते, पण आज कमवत्या अगदी ऊच्च शिक्षित महिला सुध्दा हे करताना दिसत नाहीत. ब्यूटीपार्लर मध्ये चार तास घालवणार्या बायकांकडे डाॕक्टर कडे जाण्यासाठी वेळच नसतो.

साध डोक तर दुखतय त्या साठी कशाला डाॕक्टर कडे जायच ? मान्य , पण हे जर वारंवार होत आहे तर प्रत्येक वेळी पेनकिलर घेऊन काम चालवण किती योग्य आहे ? 

  मागच्या आठवड्यात मला पण असच झाल होत मी हाहा उपाय केला आजपर्यंत त्रास नाही .तू पण हे करुन बघ. कशाला डाॕक्टर हवा.  पण एखाद्याला निळा रंग आवडतो तर एखाद्याला नाही आवडत,, एवढा बाह्य बदल आपल्याला मान्य आहे, मग तुमच शरीर आतून एकच असेल ? कस काय शक्य  आहे? 

    आता वेळ आली आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. आतातरी आपण जर विचार नाही केला तर आपल्या हातात काहीही राहणार नाही . आपणही ह्या निसर्गाचा अविभाज्य भाग आहोत, त्याने मोठ्या मेहनतीने कदाचित हा मानव बनवला असेल जो सगळ्याच संवर्धन करण्यासाठी त्याने बनवला आहे .त्यासाठीच त्याला सगळ्यात मोठी ताकद दिली आहे ती म्हणजे बुद्धी . तिचा वापर करा आणि विचार करा .


  - समूदेशक सुजाता डोंगरे 

   

Thursday, 10 June 2021

सकारात्मक राहून, रोगप्रतिकार शक्ती वाढवा

      सद्याची कोविडची परिस्थिती.... आणि त्यावरील सोशिअल मिडीया वरील बातम्या,

      ब्रेकिंग न्युज च्या सरपटणाऱ्या मसालेदार- चटपटीत पट्ट्या, ह्यामुळे निरोगी व्यक्तींच्याही हृदयाची धडधड  वाढू लागली आहे. त्याच त्यांचं गोष्टींची घराघरात चर्चा, फोन वरून गप्पा, आजाराचे फॉरवर्ड मेसेज, आजारावरील उपायांचे शेकडो मेसेज, आजार होऊन गेल्यावरचे  नुकसान.... धुमाकूळ घातलाय या मेसेजनी.यामुळे तर  लोकांना घरबसल्या आजारी असल्यासारखं वाटू लागलंय. जरा काही झालं ... शिंक आली, ढास लागली तरी  आपल्याला काय होऊ लागलय ? कोरोना तर नाही ना? अशा कोरोना बद्दलच्या विचारांच्या चक्रव्यूहात लोक अडकू लागलेत. स्वतः घाबरून दुसऱ्यांनाही घाबरवत आहेत.   कित्येक जण फक्त टीव्ही वरील बातम्या बघून भीती, चिंता आणि नकारात्मक मानसिकतेने त्रस्त झाले आहेत. त्याचे शरीरावर वाईट परिणाम होताना दिसत आहेत.

   मान्य आहे हे वातावरण भीतीदायक आहे. पण यातून आपल्याला आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवायचे आहे. त्यासाठी काय काय करता येईल?

   पूर्वीच्या रोजच्या दैनंदिन कामात, धावपळीत अनेक गोष्टी राहून गेलेल्या असतील. त्याला एक उजाळा द्यायचा. अस एकही घर नसेल की जिथे एकही पुस्तक नाही. अनेक पुस्तक घरी असतात, नंतर वाचू म्हणून तशीच ठेवलेली. सामाजिक,  कौटुंबिक, अध्यात्मिक असतील, कविता संग्रह , कथा संग्रह, कादंबऱ्या असतील. काढा त्या बाहेर.....रोज थोडं जरी वाचलं तरी विचारांना वेगळी दिशा मिळू शकते.  रोज एखाद्या पुस्तकातील  थोडं तरी वाचन,मनन,चिंतन करून एखाद्या आवडलेल्या मुद्यावर लिहिता येऊ शकत. आपले विचार मांडून व्यक्त होता येऊ शकत. एक चांगला विचार...पूर्ण विचारांती जर खरोखर आचरणात आणला, तर पूर्ण आयुष्य बदलू शकतो. मग चांगल्या विचाराच बीज आपल्यामध्ये पेरलं तर त्याचे अंकुरही साहजिकच हिरवे आनंद देणारे असतील. आणि दुसर्यांसाठीही हे आदर्श उदाहरण ठरेल.

    अनेक माता भगिनींनी मागील वर्षी लॉक डाउन मध्ये विविध, उत्कृष्ठ पाककृती केल्या. त्या जर एकत्रित लिहून काढल्या तर त्याचा उत्तम संग्रह होऊ शकेल. त्यातून मिळणारा आनंद वेगळाच असेल.

  अनेक जण सोशिअल मीडिया वर नुसतच लाईक व कंमेन्ट देत असतात. त्यांचं वाचन फक्त मोबाईल हातात धरून काय समोर येईल ते आणि तेव्हढंच वाचायचं! खर वाचन म्हणजे फक्त सोशिअल मीडिया नव्हे....हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आपले अनेक धर्मग्रंथ भगवतगीता,

     विविध ग्रंथांनी आपल्या मस्तकावर वरदहस्त ठेवलाय. कस वागावं,कस बोलावं, आलेल्या परिस्थितीत संयम कसा राखावा, मनस्थिती दोलायमान होताना ती स्थिर कशी करावी? मनःशांती कशी टिकवावी...हे तर  अनेक उत्तम उदाहरणं व दाखल्यांसह आपल्याला  पटवून दिलंय...याचा अभ्यास  अशा कठीण परिस्थितीतील शरीर व मानसिक स्वास्थ्यासाठी फारच फलदायी ठरतो.

      काही जण उत्तम लिहितात, लेख ,कविता, गजल,ललित , पुस्तक परीक्षण, रसग्रहण आदी प्रकार. त्यांना लिहायची आवड असतेच आणि लिखाणातून व्यक्त होण तर जीव की प्राण असतो त्यांचा! त्यांनी गुंतवून घेतलंय म्हणण्यापेक्षा त्यात ते आनंदी आहेत  अस म्हणावं लागेल. त्यामुळे त्यांचा जीवन कळलंय... असच म्हणावं लागेल!

       याहून अधिक काय?.... तर छंद जोपासता येतील. राहुन गेलेलं भरतकाम, शिवणकाम नव्याने करता येईल. स्त्री ही 'सृजनाचही सृजन' आहे. त्यातून काही नवीन शोधेल ती  नक्कीच!

        काहीजण शिकले होते संगीत...पण राहील होत अर्धवट. त्याला जवळ करा. ऐका संगीत!जस जमेल तसं चित्र काढा ..  रंगांच्या दुनियेत हरवून जा. ध्यानस्थ व्हा आवडीच्या गोष्टीत!

        आली आहे कठीण परिस्थिती....पण  घरबसल्या  काय करता येईल ह्या  अशा विचाराना थोडं हलवायला हवं. अनेक गोष्टी समोर येतील, मार्ग व दिशा मिळू लागतील. मग विचार मनाच्या पेल्यातून ओसंडून वाहू लागतील.. हे करुया...ते करुया... अनेक गोष्टीनी हा आनंदाचा पेला भरून वाहू लागेल. हा आनंदच एक प्रकारचं ध्यान आहे. जेव्हा हा आनंद अणू व रेणू बनून मेंदूत पसरेल, तेव्हा जाणवेल...मन व सगळं शरीर शांत असेल...कोणतीही अस्वस्थता, भय, चिंता नावालाही नसेल. 

       आता वेळच नसेल अवांतर, नकारात्मक विचारांना... कारण आपला आनंद आपल्यातच होता,आणि तो आपण शोधलाय! शरीरासाठी पौष्टीक अन्न खातोय, तस मनानेही आशावादी, आनंदी स्पदनाना आकर्षित केलं असेल, आणि  तेही सकस विचारांचं , निरोगी झालंय आता. हो ना?



©® सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली

Monday, 7 June 2021

बॅड पॅच


   जीवनाच्या वाटेवर, विविध रंगात आपण  रंगून गेलेले असताना, अचानक येतात काही पॉझ, वेगवगळे प्रसंग घेऊन. कुठेतरी सगळं थांबल्यासारखं, बिथरल्यासारखं वाटत. हे वागणं , अस वाटण, ही अवस्था माणूस म्हणून जगताना, प्रत्येक मनुष्य समाजातील प्रत्येक जीवाकडून, घटकांकडून,   प्रसंगानुसार, परिस्थितीनुसार, वातावरणानुसार,  वेळेनुसार विविध अनुभव घेत असतो. आलेल्या अनुभवांना ,मिळवलेल्या क्षणांना, दिवसाना, वर्षांना आपण सुखद, दुःखद, आशादायी, निराशादायी, प्रेरणादायी, ऊर्जा देणारे, ऊर्मी देणारे, सकारात्मक अशी अनेक  लेबलं लावत असतो. 

       त्यातीलच एक असा कालावधी, जो अनेक व्यक्ती अनुभवतात. थोड्या फार कमी जास्त फरकाने असा कालावधी मनुष्याच्या जीवनात कधीही येऊ शकतो. मग तो शारीरिक, मानसिक, आर्थिक कोणत्याही समस्या , कठीण प्रसंग, आघात, घरगुती समस्या,कलह,  नात्यांमधील दरी, सामाजिक  क्लेश , प्रेमभंग, घटस्फोट, अत्याचार, कोर्ट कचेऱ्या, नोकरी जाणे, नोकरीत अडचणी येणे ,इस्टेटीच्या गोष्टी... या समस्यां सोडवताना शेवटी मानसिक त्रास होतो तो वेगळाच ..अशा एक ना अनेक गोष्टी चा सामना करावा लागतो. अशा कोणत्याही रुपात येऊन 'आ' वासून उभा राहतो तो एक 'बॅड पॅच'. 

     मनुष्याच जीवन सुरळीत सुरू असताना, प्रत्येक व्यक्ती ह्या बॅड पॅच ला बळी पडते.काय असतो हा बॅड पॅच? ....कधी भूतकाळातील आपल्याच चुकांचा वर्तमानातील परिणाम बॅड पॅच म्हणून समोर येतो.  परिस्थिती, शारीरिक,मानसिक , आर्थिक समस्या आणि इतर अनेक घटक याला कारणीभूत असतात. ह्या समस्या किंवा संकटं सांगून येत नसतात. प्रत्येक व्यक्तीगणिक वेगळ्या  असणाऱ्या ह्या समस्यांचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा होऊ शकतो. 

   हे  बॅड पॅच  जीवन विस्कळीत करून टाकतात. अगदी काही वेळेस होत्याच नव्हतंही होत.   कित्येक वेळेस चूक असो वा नसो असे काही विचित्र प्रसंग आणि अनुभव येतात की  या सर्वातून मग निराशा, उदासीनता, चिंता, भय, नकारात्मक विचार सुरू होतात.

   प्रत्येकालाच वाटत असत की हे असे बॅड पॅच मलाच का? माझ्याच वाट्याला अशी दुःख का येतात? पण अशी कोणतीही व्यक्ती नाही जिला एकही दुःख ,वेदना कधीही झालं नसेल. त्यामुळे आलेल्या प्रसंगांना स्वीकारून, सामोरे जाण्याचे मार्ग निवडणे. आपल्या जीवनातील ह्या कठीण प्रसंगात आपल्याच दृष्टीकोनाची  ही परीक्षा असते. 

   विवेक बुद्धी, सारासार विचार,  ज्ञान व कृतीच्या संगमाने, मनाच आणि शरीराच  संतुलन आपण स्वतःच करू शकतो.  आपले धैर्य आणि कमी झालेला आत्मविश्वास नक्कीच परत मिळू शकतो. आणि परत सगळं पूर्ववत होऊ शकत.

      पण हिम्मत न हारता  चिकाटीने प्रश्न सोडवताना, इथे स्वयंप्रेरणा  खूप महत्वाची आहे. 

   आपण स्वतःच ह्या बॅड पॅच च्या मुळाशी जाऊन शोध घेतला पाहिजे. यालाच रूट कॉझ अनालिसिस म्हणतात. म्हणजेच आपल्या भूमिकेत आपली कुठे चूक झाली ह्याचं थोडं खोलात जाऊन आपणच उत्खनन कराव.  नेमक्या चूका आणि समस्या सापडत गेल्या की त्यावर उत्तरही आपल्यालाच शोधता येतं. त्यासाठी आपणच आत्मशोध घेणं गरजेचं आहे. मग आपल्यातच आपण काय सुधारणा केली पाहिजे हे लगेचच कळू शकत. हेच बॅड पॅच नव्या दिशा दाखवतात, नवे मार्ग मोकळे करून देत असतात. मग ही संधी म्हणून बघायची की हताश होऊन निराशेच्या गर्तेत स्वतःला झोकायच? 

   आपल्यासोबत घडलेल्या चांगल्या वाईट  गोष्टी, त्याचे परिणाम, आपली मानसिकता, आणि त्यावर आपण घेत असलेले निर्णय याबाबत    स्वतःला शोधताना काही वेळेस मित्राचं, वरिष्ठांच, वेळ लागली तर तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शनही जरूर घ्यावं.

    काही वेळेस काही संकटं, घटना ह्या तात्पुरत्या स्वरूपाच्याअसतात तर काही गंभीर आणि परत परत येणाऱ्या.   पण सर्वच घटनांमध्ये ,प्रसंगांमध्ये अतिशय शांत चित्ताने, संयम राखून विचार व कृती करणे हितावह असते.

    श्रीकृष्णांनी हजारो वर्षांपूर्वी सर्व विश्वाला भगवत गीतेच्या माध्यमातून दिलेल्या संदेशात  जीवनात येणाऱ्या सर्व समस्या,त्याची कारण,आणि त्यावर विविध दाखल्यांद्वारे  केलेले समाधानी निवारण आहे.

 कारण हा जीवनातील समस्यांचा रामबाण उपाय आहे!

भगवान सांगतात, मनातून संशयांच्या बिजाच उच्चाटन करा. रागावर नियंत्रण ठेवा.मनावर ताबा ठेवावा.त्याला अनावश्यक भरकटू देऊ नये.जीवनाचं ध्येय ठरवून त्याकडे नेटाने वाटचाल करा.आपण स्वतःवर विश्वास ठेवावा.

आणि चांगल्या कामात ईश्वरी मदत मिळते यावरही विश्वास ठेवावा.मनाची चंचलता नष्ट करण्याचा प्रयत्न करा.प्रत्येक क्षण माणसाला नवी शिकवण देतो.प्रयत्नांना यश मिळतेच.फक्त ते मनापासून व न कंटाळता करावे.आत्मसन्मान टिकवावा,पण अभिमान नसावा.स्वकर्तृत्वावर विश्वास हवा.मनाने कधीहि कमकुवत बनू नये.बुद्धीचा योग्य वापर करा.ज्ञानप्राप्तीने जीवन  यशस्वी होते.भीतीचा त्याग करून नेटाने प्रयत्न करा.

    खर तर, बॅड  पॅच हाच जीवनातला खूप मोठा टर्निंग पॉईंट असतो.  मी तर अस म्हणेन की जीवनात येणारे असे बॅड पॅच नवे टर्निंग पॉईंट घेऊनच येतात. नवीन शिकवण देण्यासाठी! 

      मग अशा वेळीश्रीकृष्णांनी दिलेल्या ह्या दिव्य संदेशाच आचरण केलं तर  बॅड पॅच मधून सहजच बाहेर पडता येऊ शकेल आणि जीवनातील नव्या टर्निंग पॉइंट कडे , नव्याने वाटचाल करता येईल. आत्मशोध घेऊन , स्वतःच स्वतःचा सूर्य होऊन!


©® सौ अश्विनी कुलकर्णी,

सांगली

(लेखिका या य. च. म. महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिकचे कन्या महाविद्यालय, मिरज अभ्यासकेंद्राच्या विद्यार्थिनी आहेत.)

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...