प्रिय राजू,
तुझ्या लॅपटाॅपजवळ हे माझं पत्र पाहून तू कसा चकित झाला असशील हे मला कल्पनेने दिसत आहे. आपण घरात रोज भेटतो , तरी असं पत्र लिहण्याचा वेडेपणा आईने का बरं केला , असाही तुला प्रश्न पडला असेल; पण तरीही तू हे पत्र वाचणार आहेस.
कारण काल रात्री माझ्या प्रमाणे तूही रात्री खुप वेळ झोपू शकला नसशील . तुझ्या संवेदनशीलतेवर माझा तेवढा विश्वास आहे .म्हणून तर मी हे पत्र लिहीत आहे.
तू म्हणशील ,त्यात पत्र काय लिहायचं ? बोलायचं ,स्पष्ट सांगायचं .पण गेल्या वर्ष -दीड वर्षाचा माझा अनुभव वेगळा आहे.' मनातलं काही सांगायची माझी हक्काची जागा असलेला तु फक्त समोर दिसतोय; पण समोर नसतोस.तुझ्यातच तू इतका रमलेला असतोस की, तुझ्यावर जीव लावणारे आई आणि बाबा घरात आहेत याचाच तुला विसर पडलाय की काय असं वाटतंय.
एखादी न थांबणारी गाडी स्टेशनवरुन धडधडत जावी तसं तुझं घरात येणं अन् दिवसाचे अनेक तास निघुन जाणं,मग उरतं फक्त वाट पहाणं;खिडकीला डोळे आणि फोनला कान लावून !.
कालच्या तुझ्या वाढदिवसाला आवडेल ते आणि तसं करण्याच्या मागे मी होते .तब्बेत बरी नव्हती , संध्यकाळी औक्षणाचे ताम्हण देव्हार्याजवळ तयार होते.रात्र वाढत गेली.फोन उचलत नव्हतास.मग बंद केलास .
बाबा दमून झोपले.शेवयाच्या खिरीवर थंडपणाची साय आली.मऊ पुर्या सुकत गेल्या.हूरहुर वाढत होती.वाट पहाताना केव्हातरी डोळा लागला .लॅच की नं तू आलास तेव्हा चाहुलीनं मी जागी झाले ,तेव्हा दीड वाजला होता.मी जेवलेही नव्हते रे.!
फक्त एवढा उशीर? एवढंच विचारलं आणि एक अनोळखी अहंकाराचं , फार ह्रदयद्रावक दर्शन घडलं ."
आता माझी वाट पहाण्याइतका मी लहान उरलोय का?'
फ्रेण्डस् नी पार्टी केली .जरा मजा करीत होतो ,तोच तुझे इरिटेटिंग फोन ! वैताग ! मूडषजात होता .
मग बंद केला फोन आणि हे ओवाळणं बिवाळणं बकवास रीतीरिवाज यात मला काडीचा इंटरेस्ट नाही !
यापुढे हे बंद !
मला वाटलं तु शुद्धीवर नसावास! पण असावासही ! काही नीटसं कळत नव्हतं .एक-दोन वर्ष तु थोडा तापट झालायस मला माहित आहे ; पण त्या क्रोधानं इतकं आधळं रुप घेतलंय हे माहित नव्हतं .
तरीही मी म्हटलं ,"बाळा ठिकाय् , पण तुझ्या आवडीची शेवयाची खीर केलेय् थोडी खा ना !"
तर तु उसळलासच !
खीर ! शेवयाची ? नाॅनव्हेज खाऊन आलोय . त्यावर खीर ! इरिटेटिंग ! कुणी सांगितलं खीर करायला ?
चिकन मोगलाई कुठे- खीर कुठे ?'
धक्काच बसला .मी तरीही चिवटपणे म्हटलं ," निदान वाढदिवसाला तरी तु ?' '
ते आता जुनं झालं .
आई तु आता अगदी जुनी- जुनाट झालीस गं !
आता इतकं ऑर्थोडाॅक्स ?
बर्थ डे पार्टी म्हणजे नाॅनव्हेज आणि सगळंच आलं !
झोप आता ! आणि सकाळी लवकर उठवू नकोस ! आणि आता कायम ध्यानात ठेव ,तुझा राजू कुक्कुलं बाळ राहिलेला नाहो .बावीशीचा आयटीत शिकलेला आणि पंधरा- वीस लाखांच्या पॅकेज असलेल्या कंपनीची ऑफर आलेला जवान आहे .
एकटं रहायची सवय ठेव.हां कदाचित पुढल्या वाढदिवसाला मी सॅन फ्रान्सिसकोला असेन!'
तुझ्या बेडरुमचा दरवाजा धाडकन लागला आणि मी एकटी पडले .सून्न झाले .
तुला काही ऐकण्याची ती वेळही नव्हती आणि मनःस्थितीही नव्हती तुझी .म्हणूनच खुप दिवसांनी कोरे कागद पुढे ठेवले आणि थोडं शोधल्यावर पेनही मिळाला .
म्हटलं मीच कशाला आज असंख्य आयांचे असे राजू घराघरात आहेत आणि त्यांची आईही !
त्यांच्याच वतीनं त्या सगळ्या राजूंना पत्र लिहावं ,
त्यांच्या आईच्या वतीनं !
बाळा तुम्ही तरुण झालात , हा आमच्या आनंदाचा सोहळा आहे .गर्भातल्या पहिल्या चाहूलीचा स्पर्श, पुढे गंध ,पुढे दुपट्यातील अस्तित्वाचा गंध पहिल्यांदा कलेला 'आ..ई...! '
हा उच्चार ! रांगता रांगताच बसणं न मग कशाला तरी धरुन उठणं आणि मग पहिलं पाऊल टाकणं ..
मग शाळेतला पहिला दिवस एक पाऊल पुढे शाळेकडे न् एक पाऊल मागे घराकडे .भोकाड पसरुन आ....ई ...नाही जायचं मला शाळेत .इथपासून 'आयटी 'शिकलेला पंधरा लाखांच्या पॅकेज पर्यंत वाढवलेला आपला राजू वाढत असतांना माझं आईपण वाढत गेलं.
बाळा आमची आई - बाबांची पिढी इतकी भाबडी नाही.परावलंबी तर नाहीच ; पण आम्ही मधल्या पिढीतले पन्नाशीचे आई-बाबा पूर्ण शुष्क-कोरडेही नाही .
बाळा, भरारी घेऊन विश्व काबीज करण्याचं शिक्षण देताना ,ही भरारी ज्या घरातून घेतली, ती घरे आणखी काही देण्यात कमी पडली असावीत.
पण अता त्याची शिक्षा तुम्ही खरंच आम्हाला देऊ नये .हे 'आणखी काही ' म्हणजे , आम्ही तुम्हाला प्रार्थनेनं ,
शुभम् करोतिचं ,चागल्या वाचनाचं बाळकडू नीट नाही दिलं . फक्त टक्के , आणखी टक्के , एवढीच अपेक्षा केली.
माणूस घडवायचाच राहून गेला. त्याचंच हे फळ आहे बेटा !
तुमच्या पिढीची चूक तितकीशी नाही. एवढी माझ्या पिढीची आहे. विशेष म्हणजे आम्ही तुम्हा मुलांची मातृभाषा तोडली!
आई तुटण्याची सुरुवात मातृभाषा तोडण्यापासून होते.हे आमच्या पिढीतील आईला आणि बाबांना कळलंच नाही. हे सगळं खरं, पण आता समजून घ्यायला ते जमलं नाही ते तुम्ही करावं म्हणून या प्रेमासाठीच !
पण त्याची किंमत आमची उपेक्षा करुन आम्हाला चुकती करायला लावू नका.
बाहेरच्या जगाचा चकचकीतपणा आणि घरची ऊब जशी बाळाला हवी असते ना ,तशीच पिकत चाललेल्या आमच्या कोवळ्या प्रौढपणाला बाळाच्या मिठीचीही ऊब हवी असते.थोडी माया ,थोडी दखल,पाय घसरु न देणारी मजा ,प्रसारभाध्यमांच्या मोहजालाचा फजूलपणा, अगदी वर्षभर नाही; पण मोजक्या सणवारी -वाढदिवशी काही तासांचा सहवास , जरा प्रेमाने बोललेले दोन शब्द !
बस्स , एवढंच हवं असतं .नको पैसा - नको तुमचा - तुमच्या प्रगतीआड येणारा वेळ !
फक्त कृतज्ञता !
एक आई - तुझ्या बावीसाव्या वाढदिवशी तुझ्याकडे हे गिफ्ट मागतेय !
- प्रवीण दवणे
No comments:
Post a Comment