Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Saturday, 27 February 2021

चिमूटभर विष


       आरती चे लग्न झाले आणि ती आपला नवरा व सासू च्या सोबत सासरी नांदायला आली. 

       काही दिवसांतच आरतीला जानवू लागले की तिचे सासू सोबत काही पटणार नाही. सासू जुन्या विचारांची होती आणि सून आधुनिक विचारांची. आरती आणि तिच्या सासूचे दररोज भांडण होऊ लागले.  

      असेच दिवस जात राहिले, महीने गेले व वर्ष ही सरले. सासूने चुका काढणं, टोचून बोलणं सोडलं नाही आणि आरतीने प्रत्येक शब्दाला प्रत्युत्तर करणे सोडलं नाही. घरातील परिस्थीती, तनावाचे वातावरण अजून तनावग्रस्त होऊ लागले. 

      आरती आता आपल्या सासूचा द्वेष करु लागली व तिच्या मनातून ती एकदम उतरली. आरती ला तेव्हा खूपच वाईट वाटायचे जेव्हा आपल्या भारतीय परम्परेनुसार दूसऱ्यांच्या समोर आपल्या सासूला मान द्यावा लागायचा, मनात नसताना पाया पडावे लागायचे.

        आता काहीही करून आरती आपल्या सासूच्या कचाट्यातून सुटण्याविषयी विचार करू लागली.

      एके दिवशी जेव्हा आरती चे अपल्या सासूशी कडाक्याचे भांडण झाले आणि नवराही आईची बाजू घेऊन बोलू लागला, तेव्हा ती नाराज होऊन माहेरी निघून गेली.

        आरती चे वडिल आयुर्वेदीक डॉक्टर होते. तिने रडत रडत आपली व्यथा वडिलांना सांगितली व म्हणाली, "तुम्ही मला एकादे विषारी औषध द्या. मी जाऊन त्या म्हातारीला पाजून देते. नाहीतर मी आता सासरी जाणारच नाही." 

     मुलीचे दुःख बघून वडिलांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले , “बाळा, जर तु तुझ्या सासूला विषारी औषध पाजून मारशील तर तुला पोलिस पकडून नेतील आणि सोबत मलाही, कारण ते औषध मी तुला दिलेले असेल, म्हणून असे करणे ठिक होणार नाही.”

     परंतु आरती हट्टाला पेटली की , “मला ते औषध तुम्हाला द्यावेच लागेल. आता काहीही झाले तरी मला तिचं तोंड पहायचं नाही."

       वडिलांनी काही विचार केला व म्हणाले– “ठीक आहे. तुझ्या मनासारखं होऊ दे. परंतु मी तुला कैद झालेलीही पाहू शकत नाही. म्हणून मी जसे सांगतो तसे तुला करावे लागेल. तुला हे चालेल तर हो म्हण."      

   आरती ने विचारले, "काय करावे लाग

       वडिलांनी एका पुडीत विषारी औषधाची पावडर बांधून आरती च्या हातात देत म्हणाले, “तू फक्त या पुडीतील फक्त एक चिमूट भर औषध दररोज तुझ्या सासूच्या जेवणात मिसळून द्यायचे आहे. औषधाचे कमी प्रमाण असल्याने त्या एकदम मरणार नाहीत परंतु हळूहळू आतून अशक्त होत जाऊन पाच- सहा महिन्यांत मरून जातील. लोकांना वाटेल त्या नैसर्गिक रित्या आपोआप वारल्या.”

        वडिलांनी सांगितले, “परंतू तुला खूपच सावध रहावे लागेल म्हणजे तुझ्या नवऱ्याला अजिबात संशय यायला नको, नाहीतर आपणा दोघांना पोलीस अटक करतील. यासाठी आजपासून तू सासूशी अजिबात भांडणार नाहीस, उलट त्यांची सेवा करशील 

       जर त्या तुला घालून पाडून बोलल्या तरी तु गुपचूप ऐकून घेशील. अजिबात प्रत्युत्तर करणार नाहीस. सांग, करू शकशील हे सर्व?

       आरती ने विचार केला की सहा एक महिन्यांची तर गोष्ट आहे. नंतर तर सुटका होऊनच जाईल. म्हणून तिने सर्व मान्य केले. 

     वडिलांनी दिलेली औषधाची पुडी घेऊन आरती सासरी आली. दुसऱ्याच दिवसापासून तिने सासूच्या जेवणात एक चिमूटभर 

औषध टाकणे सुरु केले. सासू सोबत आपले वागणे ही तिने बदलून टाकले. आता ती सासूच्या कशाही टोमण्यांना उलटून उत्तर देत नव्हती. उलट राग गिळून हसत ऐकून घेत असे. रोज सासू चे पाय चेपून देई आणि तिच्या प्रत्येक गरजांकडे लक्ष देऊ लागली. 

   सासू ला विचारुन तिच्या आवडीचे जेवण बनवू लागली. तिच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करु लागली. 

     असेच काही आठवडे गेले. सासूच्या स्वभावात ही बदल घडू लागला. आपल्या टोमण्यांना सुनेकडून उलट उत्तर न मिळाल्याने तिचे टोमणेही कमी होत गेले व कधी कधी सूनेच्या सेवेने प्रसन्न होऊन आशिर्वाद ही देवू लागली.  

      हळूहळू चार महिने उलटून गेले. आरती नियमित सासू ला जेवणातून एक चिमूट विषारी औषध देत आली होती. परन्तु त्या घरातील वातावरण अगदीच बदलून गेले होते. 

         सासू-सूनेचे भांडण ही जुनी गोष्ट झाली होती. आधी जी सासू आरती ला शिव्यांची लाखोली वाहण्यात थकत नव्हती, आता तीच शेजारीपाजाऱ्यांजवळ आरतीची स्तुती गात होती. सुनेला जवळ बसवून खायला घालत होती आणि झोपण्याआधी सुनेशी प्रेमाने गप्पा मारल्या शिवाय झोप येत नव्हती. 

       सहावा महिना येता येता आरती ला वाटू लागले की तिची सासू तिला अगदी मुलीसारखी 

मानू लागली आहे. तिला ही सासू मध्ये आपली आईची माया दिसू लागली होती. 

      ती जेव्हा विचार करत होती की तिने दिलेल्या विषामुळे थोड्याच दिवसात तिची सासू मरण पावेल, ती बेचैन होऊ लागली. 

       अशाच मनःस्थितीत एके दिवशी ती पुन्हा आपल्या माहेरी आली व वडिलांना म्हणाली, "बाबा, मला त्या विषाचा प्रभाव नष्ट करणारे औषध द्या, कारण मला माझ्या आई सारख्या सासूंना मारू नाही वाटत. त्या खूप चांगल्या आहेत आणि मी आता त्यांच्यावर आईसारखेच प्रेम करू लागले आहे."

      वडिल जोरजोरात हसायला लागले व म्हणाले, " विष? कोणते विष? मी तर तुला विषारी औषधांच्या नावाखाली 'पाचक चुर्ण' दिले होते......"


मुलींना चांगले मार्गदर्शन करा, आई वडिलांचे खरे कर्तव्य पाळा.


(कुणी लिहिलं ते माहीत नाही. मुळ हिंदी भाषेतील कथेचा  केलेला स्वैर मराठी अनुवाद. मुळ लेखकाचे नाव माहीत झाल्यास आवश्यक ती दुरुस्ती केली जाईल.

Friday, 26 February 2021

युद्ध कोरोना विरूद्ध


    हा लेख भारतातील प्रत्येक एका व्यक्तीसाठी आहे मग ती जेष्ठ नागरिक असो किंवा तरुण स्त्री, पुरुष किंवा लहान मुलं असो. कोरोना या Virus किंवा आजाराने प्रत्येक एका व्यक्तीच्या मनामध्ये भीती निर्माण केलेली आहे आणि या भीती पासून किंवा चिंता निर्माण करणाऱ्या विचारांपासून किंवा नैराश्यापासून आपल्याला प्रत्येकाला स्वतःला वाचवायचे आहे. मन आणि शरीर या दोन्हींना बळकट करून, तसेच स्वछता करून, कोरोना या आजाराला नष्ट करायचे आहे.

         आपण स्वतःला घरात बंद केलेले आहे, आणि आपण सरकार जे काही स्वच्छतेविषयी उपक्रम राबवता आहेत,  किंवा जनजागृती करीत आहेत त्याचे आपण पालनही करतो, पण कुठे तरी मनात पाल चुकचुकतेचं,  कारण आपण टीव्ही समोर जरी बसलो तरी न्यूज चॅनेल शिवाय काही पाहत नाही कारण मनात कोरोनाविषयीची भीती असतें, आणि मग आपल्याला सगळ्या जगाची स्थिती कळते,  जसेकी, स्पेन या देशात इतके संक्रमित,  फ्रान्स मध्ये इतके संक्रमित तसेच इटलीमध्ये आणि चीनमध्ये सुद्धा संक्रमितांची संख्या इतकी इतकी....... आणि मग एकूण पूर्ण जगात मरणाऱ्यांची संख्या इतकी इतकी......आहे असे समजते. आणि जेवढे लोक टीव्ही बघत असतात त्यांच्या मनात एकदम धस्स होते. आणि घरात बसून स्वतःची, कुटुंबाची आणि घराची स्वच्छता करूनही, मनात नकारात्मक विचार यायला सुरु होतात, आणि मग आपण सगळेच जण न्यूज चॅनल्स लाही दोष द्यायला लागतो. कारण आपल्या मनामध्ये येणारे नकारात्मक विचार आपल्याला दोष द्यायला भाग पाडतात. पण, माझे म्हणणे आहे, आपण नकारात्मक विचारच का करायचे  किंवा नकारात्मक विचार जरी मनात आले तरी, त्याला महत्व का द्यायचे? कारण न्यूज चॅनेल चालवणाऱ्यांचा उद्देश आपली मानसिकता खचविण्याचा मुळी नसतोच. ते फक्त इतर देशांची माहिती देऊन आपल्या भारताची अवस्थाही तशी होऊ नये,  तसेच काय काळजी घेऊन आपण या कोरोना नावाच्या आजारापासून आपल्या देशाचा बचाव करू शकतो! इतकाच काय तो उद्देश असतो. पण आपण टीव्ही बघून किंवा नकारात्मक चर्चेतून आपले मानसिक खच्चीकरण करून घेतो, आणि आपल्यापैकी बरेच जण नकारात्मक विचारांना महत्व देऊन डिप्रेशन मध्ये सुद्धा जातात आणि टोकाचे पाऊल उचलतात.

          आपल्याला नकारात्मक विचारांना बाजूला ठेऊन सकारात्मक विचार करून मीडिया च काय पण सरकार, डॉक्टर आणि जे जे लोकं सेवेत आहे त्यांची आपल्या सगळ्यांना वाचवण्याची धडपड पाहून, आपणही सकारात्मक विचार करून आणि त्याप्रमाणे वागून त्यांचे आणि स्वतःचे सहकार्य करूयात आणि कोरोनाला पळवून लावूयात.

           आपल्याला सद्या फक्त जोही विचार येतो,  तो फक्त जगण्यासाठीचा असतो, माझं कुटुंब आणि मी, माझे शेजारी आणि माझा सम्पूर्ण देशच कसा जगवता येईल! या सकारात्मक विचाराने प्रत्येक एक व्यक्ती चिंतीत आहे, आणि विचार हा नकारात्मक असो किंवा सकारात्मक तो फक्त जगण्यासाठीचाच असतो. काही व्यक्ती अशाही दिसून येतात, कि साधी सर्दी जरी झाली तरी त्या व्यक्तीला वाटते कि मला कोरोना तर नाहीना झाला! आणि या वाटण्याने व्यक्ती नैराश्यात जाते,  आणि टोकाचे पाऊल उचलते. पण कधी विचार केला का नकारात्मक विचार सुद्धा जगण्यासाठीचाच असतो,  मग असे टोकाचे पाऊल का बरे उचलायचे? त्यापेक्षा आपण कोरोनासारख्या आजाराला कसे हरवायचे याचा  सकारात्मक विचार करू आणि आपल्या मनापासून आणि शरीरापासून कोरोनाला दूर ठेऊ.

           आपण तर फक्त घरात बसून नकारात्मक विचारांनी स्वतःला खचवतो,  पण कधीतरी  विचार केला आहे का! त्या डॉक्टरांचा?  जे कि संक्रमित असलेल्या रुग्णांची  रात्र आणि दिवस सेवा करीत आहेत, ते तर किती जवळून कोरोना अनुभवता आहेत त्यांचे मन काय म्हणत असेल!, हा विचार आपल्या मनात यायला हवा आणि आपणही सकारात्मक विचार करून कोरोना विरुद्ध विचार करून योग्य ती वर्तणूक करायला हवी.

          संक्रमित असलेल्या रुग्णांच्या सेवेत असणारे डॉक्टरांचे आपण खूप आभार मानायला हवेत. सेवा करणारे सगळेच मग ते आपलं सरकार असो किंवा डॉक्टर असो,  पोलीस कर्मचारी असो किंवा गरिबांना अन्नपाण्याची मदत करणारे असो,  या सर्वांचे आपण मनापासून खूप खूप आभार मानू आणि  कोरोनाशी  लढण्याची तयारी करू, मन आणि शरीर बळकट करू आणि स्वच्छ हाथ धुवू, कुटुंबालाही स्वच्छता करायला लावू आणि या स्वछतेवर विश्वास ठेवून कोरोना या आजाराला मुळापासून आपल्या देशातून नष्ट करू आणि हे मोठे युद्ध जिंकूनच राहू.


 (कॉपी पेस्ट)

Thursday, 25 February 2021

हिशोब

    जी व्यक्ती प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवते तिची प्रत्येक गोष्ट म्हणजे   त्या व्यक्तीची मदत जरी असेल तरी   त्या गोष्टीचा ती व्यक्ती वेळ आल्यावर कुठल्या न कुठल्या स्वरूपात वसूल करत असते 

नोंद ठेवणारी व्यक्ती कधी पाणी ही कुणाला विणा फायद्याचं  पाजत नाही  

वेळ आल्यावर आपला पाणी पाजण्याचा हिशोब ती व्यक्ती कुठल्या नकुठल्या रुपात वसूल करत असते  परत

त्याची हे सगळ करण्याची पद्घत ही वेगळी असते , 

अहो  अर्ध्या रात्री आम्ही  यांना   आमच्या घरी जागा दिली परत पाणी पाजल !  एवढं कुणी करत का ? कृतघ्न.  निघाले बघा ,. म्हणजे. आपण समोरच्या माणसावर अभाळ एवढा उपकार केला , आणि याला मात्र जाणीव नाही 

पण ही लोक ते पाणी पाजल्याचा हिशोब बरोबर वसूल करतात .

अशी लोक नेहमी नात्यानं मध्ये फूट पडून प्रत्येकाला  एकट पाडण म्हणा वेगल. करण म्हण  असे प्रोयग करत असता पण प्रत्येकाला  वया नुसार अनुभवा नुसार व्यक्ती कळायला हवी   आपल्याला  फरक करता यायलाच हवा नाहीतर आपण आपल्या माणसानं पासून दुरवतो  

आणि आपला stand. घेता. यायला हवा. नाहीतर आपल आपल्याच माणसानं मध्ये बुजगवन होत    खरतर आपल्याला वया नुसार  खरी मानस आणि   खरेपणा दाखवणारी मानस कळायला हवीत 

बुद्धिबळाच्या पटावर गेम प्लान करणारी मानस बोलतानाही कुणाशी सहज बोलत नाही   पुढे आपल्याला ह्या माणसाचा काही उपयोग होणार आहे का ? तर याला धरून ठेवा ,. नाही  '.   तर  सोडा.    अशी याची पद्धत असते  , दुसर म्हणजे अश्या लोकांना सगळी कडची माहिती हवी असते कोण काय म्हणत कोणाचं काय चालू आहे आपल्या  विषयी. काही आहे का ,  ही लोक चवकस असतात  प्रत्येक शब्दाचा प्रत्येकाचा बोलण्याचा आपल्या विचारा नुसार अर्थ लावत असतात 

समोरच्याचा बोलण्याचा उद्देश काय ? याचे विविध अर्थ ते आपल्या पद्घतीने घेतात आपल्याला  कुठल्याही बाबतीत कोण विरोध करू शकत याचा अंदाज घेत मग त्या बाजूने पूर्ण ताकदीने मोर्चा उघडतात 

बुध्दी बळा चां वापर करत कमजोर प्यादे हाताशी ठेवायचे आणि मग fkt प्यादेच तो गेम पूर्ण करतात उंट घोडे हत्ती राखून गेम तेव्हाच जिंकून घेतात  

अशी लोक आपल्या आजूबाजूला असतात   ते कळतात ही पण पण कळल्यावर मात्र. आपल्याला बाजूला  होता अल पाहिजे मनाला गुलाम करून जगणं म्हणजे कुत्र्या मांजराच जगणं अस्त  आपण मानस आहोत हाडा मासा. चे त्यात एक सवेदन सिल मन अस्त जे riyakt होत बुध्दी असते जी सारा सार विचार करते , तिला विचारव. खरच हे अस आहे का ,. ती उत्तर देते  अगदी खर , 

भले आपण एकटे ह्वाऊ पण समाधान असते जगण्यात एवढं निश्चित।  


संदर्भ : आपलं मानसशास्त्र

Wednesday, 24 February 2021

एक पत्र आईच

प्रिय राजू,


            तुझ्या लॅपटाॅपजवळ हे माझं पत्र पाहून तू कसा चकित झाला असशील हे मला कल्पनेने दिसत आहे. आपण घरात रोज भेटतो , तरी असं पत्र लिहण्याचा वेडेपणा आईने का बरं केला , असाही तुला प्रश्न पडला असेल; पण तरीही तू हे पत्र वाचणार आहेस.


कारण काल रात्री माझ्या प्रमाणे तूही रात्री खुप वेळ झोपू शकला नसशील . तुझ्या संवेदनशीलतेवर माझा तेवढा विश्वास आहे .म्हणून तर मी हे पत्र लिहीत आहे.


तू म्हणशील ,त्यात पत्र काय लिहायचं ? बोलायचं ,स्पष्ट सांगायचं .पण गेल्या वर्ष -दीड वर्षाचा माझा अनुभव वेगळा आहे.' मनातलं काही सांगायची माझी हक्काची जागा असलेला तु फक्त समोर दिसतोय; पण समोर नसतोस.तुझ्यातच तू इतका रमलेला असतोस की, तुझ्यावर जीव लावणारे आई आणि बाबा घरात आहेत याचाच तुला विसर पडलाय की काय असं वाटतंय.


       एखादी न थांबणारी गाडी स्टेशनवरुन धडधडत जावी तसं तुझं घरात येणं अन् दिवसाचे अनेक तास निघुन जाणं,मग उरतं फक्त वाट पहाणं;खिडकीला डोळे आणि फोनला कान लावून !.


कालच्या तुझ्या वाढदिवसाला आवडेल ते आणि तसं करण्याच्या मागे मी होते .तब्बेत बरी नव्हती , संध्यकाळी औक्षणाचे ताम्हण देव्हार्याजवळ तयार होते.रात्र वाढत गेली.फोन उचलत नव्हतास.मग बंद केलास .

बाबा दमून झोपले.शेवयाच्या खिरीवर थंडपणाची साय आली.मऊ पुर्या सुकत गेल्या.हूरहुर वाढत होती.वाट पहाताना केव्हातरी डोळा लागला .लॅच की नं तू आलास तेव्हा चाहुलीनं मी जागी झाले ,तेव्हा दीड वाजला होता.मी जेवलेही नव्हते रे.!


     फक्त एवढा उशीर? एवढंच विचारलं आणि एक अनोळखी अहंकाराचं , फार ह्रदयद्रावक दर्शन घडलं ." 


आता माझी वाट पहाण्याइतका मी लहान उरलोय का?'


फ्रेण्डस् नी पार्टी केली .जरा मजा करीत होतो ,तोच तुझे इरिटेटिंग फोन ! वैताग ! मूडषजात होता . 

मग बंद केला फोन आणि हे ओवाळणं बिवाळणं बकवास रीतीरिवाज यात मला काडीचा इंटरेस्ट नाही ! 

यापुढे हे बंद !


    मला वाटलं तु शुद्धीवर नसावास! पण असावासही ! काही नीटसं कळत नव्हतं .एक-दोन वर्ष तु थोडा तापट झालायस मला माहित आहे ; पण त्या क्रोधानं इतकं आधळं रुप घेतलंय हे माहित नव्हतं . 


तरीही मी म्हटलं ,"बाळा ठिकाय् , पण तुझ्या आवडीची शेवयाची खीर केलेय् थोडी खा ना !"


 तर तु उसळलासच !

खीर ! शेवयाची ? नाॅनव्हेज खाऊन आलोय . त्यावर खीर ! इरिटेटिंग ! कुणी  सांगितलं खीर करायला ? 

चिकन मोगलाई कुठे- खीर कुठे ?' 

धक्काच बसला .मी तरीही चिवटपणे म्हटलं ," निदान वाढदिवसाला तरी तु ?' '

ते आता जुनं झालं . 


आई तु आता अगदी जुनी- जुनाट  झालीस गं ! 

आता इतकं ऑर्थोडाॅक्स ?

बर्थ डे पार्टी म्हणजे नाॅनव्हेज आणि सगळंच आलं ! 

झोप आता ! आणि सकाळी लवकर उठवू नकोस ! आणि आता कायम ध्यानात ठेव ,तुझा राजू कुक्कुलं बाळ राहिलेला नाहो .बावीशीचा आयटीत शिकलेला आणि पंधरा- वीस लाखांच्या पॅकेज असलेल्या कंपनीची ऑफर आलेला जवान आहे .

एकटं रहायची सवय ठेव.हां कदाचित पुढल्या वाढदिवसाला मी सॅन फ्रान्सिसकोला असेन!'


     तुझ्या बेडरुमचा दरवाजा धाडकन लागला आणि मी एकटी पडले .सून्न झाले .


         तुला काही ऐकण्याची ती वेळही नव्हती आणि मनःस्थितीही नव्हती तुझी .म्हणूनच खुप दिवसांनी कोरे कागद पुढे ठेवले आणि थोडं शोधल्यावर पेनही मिळाला .


म्हटलं मीच कशाला आज असंख्य आयांचे असे राजू घराघरात आहेत आणि त्यांची आईही ! 

त्यांच्याच वतीनं त्या सगळ्या राजूंना पत्र लिहावं , 

त्यांच्या आईच्या वतीनं !


     बाळा तुम्ही तरुण झालात , हा आमच्या आनंदाचा सोहळा आहे .गर्भातल्या पहिल्या चाहूलीचा स्पर्श, पुढे गंध ,पुढे दुपट्यातील अस्तित्वाचा गंध पहिल्यांदा कलेला 'आ..ई...! '


हा उच्चार  ! रांगता रांगताच बसणं न मग कशाला तरी धरुन उठणं आणि मग पहिलं पाऊल टाकणं ..

मग शाळेतला पहिला दिवस एक पाऊल पुढे शाळेकडे  न् एक पाऊल मागे घराकडे .भोकाड पसरुन आ....ई ...नाही जायचं मला शाळेत .इथपासून 'आयटी 'शिकलेला पंधरा लाखांच्या पॅकेज पर्यंत वाढवलेला आपला राजू वाढत असतांना माझं आईपण वाढत गेलं. 


बाळा आमची आई - बाबांची पिढी इतकी भाबडी नाही.परावलंबी तर नाहीच ; पण आम्ही मधल्या पिढीतले पन्नाशीचे आई-बाबा पूर्ण शुष्क-कोरडेही नाही . 

बाळा, भरारी घेऊन विश्व काबीज करण्याचं शिक्षण देताना ,ही भरारी ज्या घरातून घेतली, ती घरे आणखी काही देण्यात कमी पडली असावीत.

पण अता त्याची शिक्षा तुम्ही खरंच आम्हाला देऊ नये .हे 'आणखी काही ' म्हणजे , आम्ही तुम्हाला प्रार्थनेनं , 

शुभम् करोतिचं ,चागल्या वाचनाचं बाळकडू नीट नाही दिलं . फक्त टक्के , आणखी टक्के , एवढीच अपेक्षा केली.


 माणूस घडवायचाच राहून गेला. त्याचंच हे फळ आहे बेटा ! 

तुमच्या पिढीची चूक तितकीशी नाही. एवढी माझ्या पिढीची आहे. विशेष म्हणजे आम्ही तुम्हा मुलांची मातृभाषा तोडली!


 आई तुटण्याची सुरुवात मातृभाषा तोडण्यापासून होते.हे आमच्या  पिढीतील आईला आणि बाबांना कळलंच नाही. हे सगळं खरं, पण आता समजून घ्यायला ते जमलं नाही ते तुम्ही करावं म्हणून या प्रेमासाठीच ! 

पण त्याची किंमत आमची उपेक्षा करुन आम्हाला चुकती करायला लावू नका.


 बाहेरच्या जगाचा चकचकीतपणा आणि घरची ऊब जशी बाळाला हवी असते ना ,तशीच पिकत चाललेल्या आमच्या कोवळ्या प्रौढपणाला बाळाच्या मिठीचीही ऊब हवी असते.थोडी माया ,थोडी दखल,पाय घसरु न देणारी  मजा ,प्रसारभाध्यमांच्या मोहजालाचा फजूलपणा, अगदी वर्षभर नाही;  पण मोजक्या सणवारी -वाढदिवशी काही तासांचा सहवास , जरा प्रेमाने बोललेले दोन शब्द ! 

बस्स , एवढंच हवं असतं .नको पैसा - नको तुमचा - तुमच्या  प्रगतीआड येणारा वेळ !

 फक्त कृतज्ञता ! 


एक आई - तुझ्या बावीसाव्या वाढदिवशी तुझ्याकडे हे गिफ्ट मागतेय !


- प्रवीण दवणे

Tuesday, 23 February 2021

पुस्तक वाचनाचे मानसशास्त्रीय फायदे

 

(वाचनात आलेला एक सुंदर लेख संदर्भासहित पोस्ट करत आहे)

*पुस्तक वाचनाचे मानसशास्त्रीय फायदे*📚📖

1. काळ : एखादी व्यक्ती पुस्तक लिहीते तेव्हा काही महीने ते काही वर्ष ती त्या विषयावर संशोधन, माहीतीची जुळवाजुळव करीत असते, त्या लेखकाचं जगणं, त्याने घेतलेले अनुभव या सगळ्यांच प्रतिबिंब त्या पुस्तकात उमटलेल असतं.

तुम्हीं ते पुस्तक ४ ते ५ दिवसात वाचून काढता तेव्हा खरतर तुम्ही केलेला तो एक काळ प्रवास असतो..


2. संघर्ष : काही वेळेस माणसाला स्वत: समोरील समस्याच मोठ्या वाटत असतात. पण जेव्हा तुम्ही मोठ्या थोर व्यक्तींची आत्मचरीत्र वाचता, त्यांनी केलेला संघर्ष, शोधलेले मार्ग हे जाणून घेता तेव्हा त्यांच्या संघर्षा पुढे आपल्या समस्या खुप लहान आहेत याची जाणीव होते आणि त्यांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास येतो..


3. नशीब : भविष्य जाणून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ते निर्माण करणं. एक चागलं पुस्तक सकारात्मक विचारांची श्रूखंला तयार करते, उद्या या विचारांचच क्रूती मध्ये रुपातर होइल. तुम्हीं आज जे काही आहात ते भूतकाळातील तुमच्या विचारांच फलित आहे आणि उद्या तुम्हीं जे असाल ते आज मेंदूत काय विचार आहेत याच फलित असेल. आज केलेल्या सकारात्मक विचारातच चांगल्या नशिबाची बीजं असतात..


4. सर्जनशिलता , तार्कीकता : प्रवास वर्णन, कथा, कादंबरी वाचताना मनामध्ये जी कल्पना चित्रे निर्माण होतात ती जेवढी विविधांगी असतील, तेवढी व्यक्ति फोटोग्राफी, सिनेमेटोग्राफ़ी यासारख्या कलांमध्ये पारंगत होण्याची शक्यता अधिक असते. वाचनामुळे सौंदर्यद्रूष्टी बहरते, तसेच चांगल लिहीण्या आगेदर चांगल वाचलेल ही असाव लागतं. कुठलाही शोध लागण्यापूर्वी त्याच कल्पना चित्र त्या शास्त्रज्ञाने पाहीलेलं असत..


5. मानसिक लवचिकता : कवितेचा अर्थ लावतांना, अवघड लेख समजून घेताना मेंदू मध्ये बरेच बदल होत असतात,दिसत असलेले शब्द आणि त्यामागे लपलेला अर्थ ही सगळी प्रक्रिया होताना मेंदूची जागरूक अवस्था वाढलेली असते. मानसिक लवचिकता असलेली व्यक्ति एखाद्या समस्येचे नाविन्यपूर्ण उत्तर शोधू शकते, स्वत: चे वर्तन आणि परिस्थिति यात चांगल समायोजन साधू शकते.


6. संवाद : काही वेळेस फक्त काहीतरी प्रतिक्रिया द्यायची आहे म्हणून समोरच्या व्यक्तीच ऐकलं जाते, समेारच्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे तेच समजलेल नसते यातूनच वाद, विवाद निर्माण होतात, वाचनात एकाग्रता दाखविणारी व्यक्ती दुसर्याच मत ऐकून घेण्यात ही एकाग्रता दाखवू शकते. चांगला वाचक हा चांगला संवाद साधू शकतो.


7. भावनिक बुध्दीमत्ता : कथा कांदबरी वाचत असतांना त्यामधील नायक - नायिकेच्या दु:खात, आनंदात, संघर्षात व्यक्ती एकरूप झालेली असते. यातूनच सहानुभूति विकसित होते. काही काळासाठी का असेना पण त्या पात्राच्या भावना तुम्हीं अनुभवत असता. हे चागंल्या भावनिक बुध्दीमत्तेच लक्षण आहे. संशोधनानूसार चांगला भावनिक बुध्दीगुणांक (EQ) असलेली व्यक्ती ही चांगला बुध्दीगुणांक (IQ) असलेल्या व्यक्तीपेक्षा जीवनात यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते.


8. ताण तणाव : माहिती आणि ज्ञानाचाअभाव हे ताण निर्माण होण्याच एक कारण असते, वाचनाने नवीन माहिती आणि ज्ञानात भर पड़त असते. ज्ञानी माणूस आत्मविश्वासाने नवीन परिस्थिति ला सामोरे जाउ शकतो.


9.मेडीटेशन : पुस्तकाचे वाचन करतांना आणि मेडीटेशन करतांना यादोनही क्रिया घडतांना मेंदूतील क्रियांमध्ये कमालीचं साम्य असल्याच आढळून आले आहे. मेडीटेशन मूळे मिळणारे फ़ायदे जसे रिल्याक्सेशन, आंतरिक शांती हे सर्व वाचनातूनही मिळतात.


10. यश : जीवनात असामान्य यश मिळवलेल्या लोकांमध्ये एक साम्य दिसून येते, ते म्हणजे पुस्तक वाचनाची आवड. यश आणि पुस्तक वाचनाचा सकारात्मक सहसंबंध दिसून येतो. याच कारण नवीन पुस्तक नवीन प्रकारची माहिती देते. आणि अशी माहिती गुंतवणुकी सारखी  वापरता येते. 


11. संवेदना : असं म्हणतात की पुस्तक न वाचलेला मनुष्य त्याच्या पूर्ण जीवन कालखंडात एकच आयुष्य जगतो त्याचं स्वतःच , तर चांगला वाचक हा त्याच्या एकाच जीवनात हजारो आयुष्य जगलेला असतो. आपण इतरांना जेव्हा चांगलं म्हणतो तेव्हा ते संवेदनशील आहेत असच आपल्याला म्हणायचं असत.


12. एकाग्रता : यशस्वी माणसं एकाच कामावर खूप काळ लक्ष केंद्रित करू शकतात,म्हणून ती यशस्वी असतात, जसं काचेच भिंग हलवत राहील तर कागद जळणार नाही त्यासाठी एकाच ठिकाणी ते स्थिर पकडावे लागते. आजच्या मोबाइल च्या काळात एकाग्र असणं अजुनच कठीण झालं आहे, पुस्तक वाचनाने एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याची सवय लागते त्यामुळे व्यक्तीची एकाग्रता वाढते.

- *प्रा. सुनील शिंदे*

Monday, 22 February 2021

बबड्या


     एखाद्या कुटुंबातल्या मुलाचा *बबड्या* कसा होतो? हा खरोखरच आवर्जून वेळ काढून अभ्यासण्यासारखा विषय आहे. वयाची विशी उलटून गेलेल्या आपल्या बबडूच्या अंथरूणाची घडी घालणं, बेडवरची विस्कटलेली बेडशीट व्यवस्थित घालणं, बबडूचे कपडे धुवायला टाकणं, त्याच्या खोलीतलं टाॅयलेट स्वच्छ करणं, चहा-काॅफी-दूध-नाश्ता सगळं सगळं अगदी हातात आणून देणं, बबडूला डबा देणं, रोज संध्याकाळी त्याच्या सॅकमधून तो डबा काढून धुवून ठेवणं, बुटात तसेच राहीलेले किंवा इतरत्र पडलेले पायमोजे शोधून धुवायला टाकणं इत्यादी कामं रोजच्या रोज अगदी नियमितपणे करणाऱ्या आया मी पाहिल्या आहेत. माझ्या पाहण्यात अशी कित्येक घरं आहेत जिथं केवळ मुलाला अमुक भाजी आवडत नाही म्हणून दुसरी केली जाते. सकाळी झोपेतून उठवून टूथब्रशवर पेस्ट लावून हातात देणाऱ्या सुद्धा आया आहेत. या घरातल्या बबड्यांना साधं शर्टाचं तुटलेलं बटणसुद्धा सुईदोरा घेऊन शिवता येत नाही, इस्त्री करता येत नाही, भाज्या निवडतां येत नाहीत, दळणाचा डबा घेऊन पिठाच्या गिरणीत जाणं त्यांना कमीपणाचं वाटतं, घरातला संडास धुणं कमीपणाचं वाटतं. मंडईतून घेवडा आण असं म्हटलं की बबडू फरसबी घेऊन येतो. फळं आणायला सांगितलं तर त्याला ती निवडून घेता येत नाहीत. कारण बबडूला कुणी कधी कामच सांगितलेलं नाही. लाडोबाला कधी कुणी कामाला लावतात का? 


     शाळेचा अभ्यास, एखादी कला किंवा एखादा खेळ यांपैकी कशाततरी बबडू आघाडीवर असेल, पण तेही नाही. बबडूच्या मनाप्रमाणे सगळं घर चालतं. त्यामुळं एखादी गोष्ट मागण्याकरिता आपणही काहीतरी मिळवून दाखवावं अशी त्याची मानसिकताच नाही. आईनं सगळं करायचं हीच पक्की धारणा. ही अशी धारणा व्हायला कारणीभूत कोण? तर आईच....! 


     आया हतबल का बरं होतात? त्या मुलांपुढं शरणागती का पत्करतात? मुलं म्हणतील ते, म्हणतील तसं आणि म्हणतील तेव्हा केलंच पाहिजे असं कुठलं बंधन आयांवर असतं? आपण मुलांच्या मनासारखं वागलो नाही तर जणू काही आभाळच कोसळेल असं आयांना का वाटतं? ह्या सगळ्या प्रश्नांची उकल योग्य प्रकारे झाली पाहिजे. 


     ‘आई, तू मॅड आहेस’ असं चारचौघात आईला म्हणणारी मुलगी मी पाहिली आहे. ‘ओ बाबा, आपल्याला ज्यातलं कळत नाही ना, त्यात पचकू नये’ असं वडिलांना म्हणणारी मुलं मी पाहिली आहेत. “हे माझं पर्सनल लाईफ आहे, मी काहीही करेन. इट्स नन आॅफ युअर बिझनेस” असं पालकांना पदोपदी ऐकवणारी पोरं मी पाहतो. मला त्या मुलांपेक्षाही त्यांच्या पालकांविषयीच जास्त वाईट वाटतं. 


     अनेकदा या सगळ्या कौटुंबिक प्रश्नांमध्ये घरात वडीलधारी माणसं नाहीत म्हणूनच या समस्या निर्माण होतात असा निष्कर्ष काढला जातो. पण आजकाल अनेक घरांमध्ये वडीलधाऱ्या माणसांकडूनही नातवंडांविषयी अपेक्षा करता येणं कठीण होत चाललंय. कारण त्यांनाही स्वातंत्र्य हवंय, मनसोक्त जगायला हवंय. मुलांच्या अभ्यासाच्या वेळीच त्यांच्या आवडत्या सीरियल्स लागतात, त्यांना त्या पहायच्याच असतात. एकही एपिसोड चुकवायचा नसतो. तीन-चार खोल्यांच्या घरात दुसरीकडे बसून अभ्यास करायचा म्हटलं तरी त्या टीव्हीचा आवाज येतोच. बरं, जे ऐकू येतं ते ऐकण्यासारखं नसतंच. मग शाळेचा अभ्यास व्हावा तरी कसा? आणि घराघरातला बबडू एक उत्तम माणूस म्हणून घडावा तरी कसा? 


     या सगळ्या गोंधळात एक मोठा आणि महत्वाचा प्रश्न अनुत्तरितच राहतो, तो म्हणजे - मुलांना बबडू होण्यापासून वाचवण्याची जबाबदारी कुणाची? खरं सांगायचं तर, काही वर्षांपूर्वी हा प्रश्नच मुळात विसंगत होता. कारण तेव्हा ‘आपला तो कारटा आणि दुसऱ्याचा तो बाब्या’ असाच कुटुंबांमधला नियम होता. भाचा किंवा पुतण्याची पूजा घातली  की आपल्याही पोराची मंत्रपुष्पांजली म्हणायची रितच होती. शिक्षेच्या बाबतीत समानतेचा कायदा कुटुंबांमध्ये संमत होता. 


     आजकाल आपल्या मुलांच्या बाबतीत सगळ्याच भूमिका आईवडीलांनाच कराव्या लागतात. पण काही वर्षांपूर्वी तसं नव्हतं. मोठे काका, मोठी काकू, मधला काका, मधली काकू, धाकटा काका, धाकटी काकू यांच्यामध्ये दंड किंवा शिक्षा मंत्रालय, न्यायालय, गृहपाठ विभाग, परवचा विभाग, व्यायाम विभाग, घरकाम विभाग, स्वच्छता विभाग, हट्ट किंवा लाड पुरवणे विभाग यांची वाटणी झालेली होती. जो विभाग ज्याच्याकडे असेल त्याचे सर्वाधिकार त्याच व्यक्तीकडे असत. दुसऱ्या कुणीही मध्ये हस्तक्षेप करण्याचा किंवा रदबदली करण्याचा प्रश्नच नव्हता. उदाहरणार्थ, धाकटी काकू परवचा म्हणवून घेत असेल आणि एखाद्या दिवशी उच्चार चुकले म्हणून तिने दोन छड्या मारल्या तर कुणीही मधे पडत नसत. संध्याकाळी घरी यायला सात पेक्षा उशीर होणार असेल तर वडील सरळ ‘मोठ्या काकांना विचारून काय ते ठरव’ असं सांगत. काहीतरी कमवून दाखवल्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळतच नसे. आठवडाभर रोज काकांची सायकल स्वच्छ पुसली तरच शनिवारी किंवा रविवारी चार-पाच चकरा मारायला मिळत. संपूर्ण गृहपाठ झाला असेल तरच रविवारचा दुपारचा मराठी सिनेमा पहायला मिळण्याची शक्यता असायची. कारण, इतकं सगळं करूनही सिनेमाचा विषय बामविप (बाल मनावर विपरित परिणाम) करणारा असेल तर तो सिनेमा पाहण्याचा विषयच बंद व्हायचा. मोठी माणसंसुद्धा तो सिनेमा बघत नसत. थोडक्यात काय तर, ‘मी म्हणेन ती पूर्व दिशा’ अशा पद्धतीनं कुठल्याही मुलानं घरात वागण्याची प्राज्ञाच नव्हती. 


     आई, वडील किंवा एकूणच वडीलधाऱ्यांशी वागण्याच्या शिष्टाचारांच्या चौकटी अत्यंत कठोर आणि भक्कम होत्या. त्या चौकटी मोडणाऱ्याला त्याची जबर किंमत मोजावी लागायची. आता हे सगळं इतिहासजमा करण्यात आलं आहे. का करण्यात आलं? कारण एकच आहे, पालकांना त्यांची मुलं प्रसिद्ध आणि यशस्वी व्हायला हवी आहेत, तीही कुणीही वेळ न देता. मग अशा परिस्थितीत घराघरांमध्ये बबडू नाही तर काय श्रावणबाळ निपजणार आहे का? 


     मुलं टोकाची आत्मकेंद्रित, टोकाची स्वार्थी आणि टोकाची अप्पलपोटी होण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढतंय, हे पालकांच्या लक्षात येतंय का? शिक्षकांच्या लक्षात येतंय का? विविध तज्ञांच्या लक्षात येतंय का? ज्येष्ठ नागरिकांच्या लक्षात येतंय का? माझ्या मते, हे सगळ्यांच्याच लक्षात येतंय. पण सगळ्यांनीच ह्या प्रश्नाचा फुटबाॅल केला आहे आणि हा प्रश्न एकमेकांकडे टोलवण्याकडेच सगळ्यांचा कल दिसतो. 

     आईवडीलांनी स्वत:ची आयुष्यं नको इतकी व्यस्त करून घेतली आहेत. कौटुंबिक आयुष्यातली त्यांची मानसिक, भावनिक गुंतवणूकच कमी आहे. व्यक्तिगत इच्छा, आकांक्षा, ध्येयं यांच्या पूर्ततेसाठीच त्यांना वेळ पुरत नाही, तर मग मुलांसाठी वेळ कुठून आणायचा? मूल गर्भात वाढत असतं तेव्हा प्रोफेशनल क्लासेस लावून गर्भसंस्कार करायचे आणि नंतर मात्र त्याला वेळच द्यायचा नाही, हे दुर्दैवानं अनेक कुटुंबांमध्ये घडताना दिसतं. 


     मेणाहून मऊ होणाऱ्यानं वज्राहूनही कठोर होण्याची क्षमता स्वत:मध्ये वेळीच विकसित केली पाहिजे, हेच या प्रश्नावरचं सगळ्यात प्रभावी उत्तर आहे. बोटभर उसवलेलं असेल तर टाका घालता येतो, पण हातभर फाटलं असेल तर? “इतकं होईपर्यंत तुम्ही काय करत होतात?” हा प्रश्न येणारच... पालकमित्रांनो, स्वत:ला वेळीच बदला किंवा या प्रश्नाचं समोरच्याला पटेल असं विश्वासार्ह उत्तर चांगलं तोंडपाठ करून ठेवा...!


©️मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ञ, संचालक-प्रमुख

आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पुणे.

Sunday, 21 February 2021

डॉ. अल्बर्ट एलिस

      अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ म्हणजे डॉ. अल्बर्ट एलिस. यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल . विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (rational emotive behaviour thearapy ) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध . अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता . या शोधाची सुरुवात त्यांनी लहानपणीच  केली होती . भावनेच्या आहारी न जाता , तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला . त्यासाठी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले . आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले . त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे आहेत .


१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात , तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो आणि त्या घटनाक्रमाचा अर्थ कसा लावतो यावर अवलंबून असतात . त्यामुळे जर तुम्ही नकारात्मक घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले  आणि वाईट घटनेचा वाईटच अर्थ लावणे थांबवले तर मनावरचा अनाठायी ताण कमी होतो .


२) माणसाला वाटणारी भीती ही  कोणत्याही गोष्टीची नसून ती त्याच्याच मनात दडलेल्या भीती या संकल्पनेची असते . ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट प्रत्यक्षात भीतीदायक नसते , परंतु आपण ती करायला गेल्यास नक्कीच काहीतरी भीतीदायक घडणार असे आपल्याला वाटत असते . पण ती गोष्ट केल्यानंतर लक्षात येते कि असे काही घडलेच नाही . म्हणजेच भीती हि काल्पनिक असते .


३)निराशा येणे ही  मनाची स्थिती खरी नसून ती स्वतःविषयीच्या अवाजवी अपेक्षांमुळे तुम्ही स्वतःच निर्माण करता . जगातली दुसरी कोणतीही व्यक्ती `तुम्हाला निराश करू शकत नाही . तुम्ही स्वतःच तसे वाटून घेता.यश आणि अपयश या दोनच पारड्यांमध्ये  स्वतःचे आयुष्य तोलू नका . तुमचे यश  हे दुसऱ्या कुणासाठीतरी अपयश असू शकते . तसेच तुमचे अपयश हे कुणाचेतरी  यश असू शकते . त्यामुळे कधीच स्वतःची तुलना दुसर्यांशी करू नका .


४) जग काय म्हणेल हा विचार खोटा  आहे . प्रत्यक्षात कुणालाही काहीही बोलायला वेळ नसतो . आणि जर कुणी काही बोलत असेलच तर ते मनापर्यंत झिरपू  द्यायचे कि कानांवरूनच परतवायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे . कोणी काहीही बोलले तरी जर तुमचा तुमच्या कृतीवर विश्वास असेल तर तुम्ही कायम आनंदी राहू शकता .


५) अमुक एका व्यक्तीशिवाय आपण जगूच शकत नाही असे वाटणे हे उत्तुंग प्रेम नाही तर स्वतःला कस्पटासमान लेखणे आहे . स्वतःचे अस्तित्व , आपले कुटुंबातील स्थान , समाजातील स्थान यांची जर पक्की जाणीव असेल तर तुमचे कोणावाचून काहीही अडत नाही . दुसर्यांवर प्रेम जरूर करा पण त्या आधी स्वतःवर प्रेम करा .


६) स्वतःला स्वीकारा . तुम्ही जसे आहात तसे . आपल्या अपयशाकडे फक्त त्या घटनेपुरतेच पहा . संपूर्ण आयुष्याचे अपयश म्हणून पाहू नका  . कारण आयुष्य अजून संपलेले नाही .  दुसर्यांच्या चुका तर तुम्ही नेहमीच माफ करता . कधीकधी स्वतःच्या चुका सुद्धा माफ करा . जर तुम्ही स्वतःला स्वीकारलेत तरच जग स्वीकारेल .


७) नैतिक आणि अनैतिक या संकल्पना व्यक्तीसापेक्ष बदलतात . त्यामुळे स्वतः मूल्यमापन करून स्वतःच्या नैतिकतेच्या चौकटी आखा . दुसर्यांच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करू नाका .


८  ) शारीरिक व्याधींशी सामना करताना बर्याचदा मानसिक संतुलन सांभाळणे कठीण जाते . अशा वेळी शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींकडे स्वतंत्रपणे पाहायला शिका . कोणतेही दुखणे माझ्या शरीराला इजा  पोहोचवू शकते परंतु मनाला नाही हा विचार मनात करा . मानसिक संतुलन आजारातून लवकर बाहेर पडण्यासाठी महत्वाचे असते .


९) दुसऱ्या व्यक्तीच्या  विचारांवर आणि घडणाऱ्या घटनांवर तुमचा ताबा असू शकत नाही . माणूस आपल्याला हवे तसे जगाने  बदलावे म्हणून जीवाचा आटापिटा करत राहतो . परंतु प्रत्यक्षात ज्या गोष्टींवर तुमचा ताबाच नाही त्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही . तुम्ही फक्त स्वतःला बदलू शकता . वाईट घटना घडल्याच का असा विचार करत बसणे  फायद्याचे नसते . तर यानंतर पुढे काय करायचे याचा तर्कसंगत बुद्धीने विचार करणे गरजेचे असते . तसंच  अमुक एक व्यक्ती अशी का वागली ? याचा फार विचार न करता तुम्ही कसे वागायचे हे ठरवा .


१०) कोणताही मनुष्य स्वतःचे त्रासदायक विचार आमुलाग्र  बदलवू शकतो . फक्त बदलण्याची गरज आहे ही जाणीव स्वतःला होणे आवश्यक आहे . हि प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ  आहे . कारण विचारांच्या बदलांना तुमचे स्वतःचेच विचार आड येत असतात . एक एक नकारात्मक विचार दूर करून त्याजागी सकारात्मक विचाराची रोपण करावी लागते . परंतु एकदा मनातली अडगळ दूर केल्यावर ती पुन्हा तुमच्याकडे परतत नाही .


११) वैयक्तिक मालकी हक्क हा फक्त भौतिक गोष्टींना लागू होतो . मानसिक नाही . तुम्ही  व्यक्तीवर हक्क सांगता म्हणजे फक्त त्याच्या शरीरावर


हक्क सांगता. त्याच्या मनावर आणि भावनांवर तुम्ही हक्क सांगू शकत नाही . प्रत्येक व्यक्ती हि भावनिकदृष्ट्या स्वतंत्र असते .


हे  नियम कालाबाधित आहेत . म्हणूनच या थोर मानसोपचार तज्ञाला आदराने प्रणाम !

Saturday, 20 February 2021

डिडरोट इफेक्ट

 *🔥डेनिस डिडरोट इफेक्ट🔥*

     रशियात डेनिस डिडरोट नावाचा एक अभ्यासू वाचक होता. इ.स. 1765 मध्ये त्याचे वय जवळ पास 52 वर्ष होते. त्याने खूप ग्रंथ वाचले होते. त्याचे स्वत:चे मोठे ग्रंथालय होते. त्याचे संपूर्ण आयुष्य वाचनात; पण गरिबीत गेले. मुलीच्या लग्नासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. इतका तो गरीब होता. त्या वेळी रशियाची राणी कँथरीनला डेनिस डिडरोटच्या गरीबीबद्दल कळले. तिने डिडरोटला त्याच्याकडील लायब्ररी विकत घेण्यासाठी 1000 GBP, म्हणजेच 50 हजार डॉलर्स म्हणजे; आजचे जवळपास साडेतीन कोटी रुपये डिडरोटला देऊ केले. डेनिस डिडरोटने मान्य केले व त्याने आपले ग्रंथालय विकून टाकले.

डेनिस डिडरोट एका दिवसांत खूप श्रीमंत झाला. त्याने त्या पैशातून लगेच 'स्कार्लेट रॉब';  म्हणजे एक उच्च प्रतीचा व महाग असा पोषाख खरेदी केला. हा सदरा वापरत असतांना त्याला वाटले की; आपण उच्च प्रतीचा पोषाख घालतोय; पण आपल्या घरात मात्र तशा उच्चप्रतीच्या वस्तू नाहीत. मग त्याने हळूहळू घरातल्या वस्तू बदलल्या. किचन रूममधल्या वस्तू बदलल्या. फर्निचर बदलले. सगळं काही नवं नवं. आता त्याचं संपूर्ण घर आणि पोषाख दोन्ही ही शोभून दिसत होते. परंतु हे सगळं केल्याने तो पुन्हा कंगाल झाला आणि कर्ज ही वाढत गेले. मोठ्या दु:खाने डेनिस डिडरोटने हे सहन केले आणि मग त्याने हे सगळे अनुभव आपल्या एका निबंधांत लिहून ठेवले. यालाच मानस शास्त्रातील 'डिडरोट इफेक्ट' (Diderot Effect) म्हणतात. 

भारतातले मोठे उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स, डेव्हलपर्स पुढारी सुद्धा; या 'इफेक्ट'चा छुप्या पद्धतीने अवलंब करतात. याचे निरीक्षण आपण स्वत: बद्धल करून पहाण्यास हरकत नाही. कसे?

समजा आपण महागडे कपडे घेतले; तर त्याला मॅचिंग घड्याळ, पेन, बूट, गाडी.... इ. घेणार. 

घरात मोठा टी.व्ही. आणला की चांगला टेबल, फर्निचर,टाटा स्काय, HD वाहिन्या सुरु करणार. घराला नवा रंग लावला की त्याला मॅचिंग पडदे लावून सजावट करणार.

समजा आपण पन्नास हजार रूपयांचा मोबाईल घेतला; तरी  आपल्याला आणखी काहीतरी कमी आहे असे वाटते. मग अजून 600 रुपयांचा गोरील्ला ग्लास लावणार. दर महिन्याला 500 रुपयांचे कव्हर बदलणार. शंभर रुपयांचा हेडफोन चालला असता; पण अडीच तीन हजाराचा हेडफोन घेणार. कारण या मोबाईलला स्वस्त शोभून दिसत नाही. हे सर्व कशासाठी? इतरांवर इंप्रेशन मारण्यासाठी. यालाच म्हणतात 'डिडरोट इफेक्ट'

थोडक्यात सांगायचे तर; एक नवीन वस्तू विकत घेतली की; तिच्यामुळे दुसऱ्या वस्तूंचा दर्जा आपोआपच कमी होतो; आणि तो वाढविण्यासाठी आपण आणखी जास्त खर्च करीत जातो.

सर्वच उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स या 'इफेक्ट'चा छुप्या पद्धतीने वापर करतात. 

एक laptop विकत घेतांना त्यासोबत हजार दोन हजाराचा antivirus टाकून देतो. हजार बाराशेचं कव्हर घेतो; ज्याचा क्वचितच वापर केला जातो. कुंडी वा फुलझाड विकत घेतलं की; सोबत शे दोनशे रुपयाचे खत माथी मारलं जातं. लग्न समारंभात तर या प्रदर्शनाची चढा ओढ लागलेली दिसून येते. अशी असंख्य उदाहरणे आहेत.

आपण एक वस्तू घ्यायला गेलो की; दुसऱ्या वस्तू आपोआपच घेतो; गरज नसली तरी. अशा पद्धतीने आपण एक एक वस्तू घेऊन अनेक अनावश्यक किंवा फारशा महत्वाच्या नसणाऱ्या वस्तू घेत असतो; आणि ते आपणास कळत सुद्धा नाही. यालाच 'spiraling consumption' म्हणतात. म्हणजे; एका वस्तूमुळे दुसऱ्या वस्तूची गरज वाटणे आणि ती विकत घेणे. हाच तो 'डिडरोट इफेक्ट' (Diderot Effect) होय. ही सामान्य मानवी प्रवृत्ती (human tendency) आहे.

या प्रवृत्तीचे परिणाम भयानक होत असतात; पण ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. आपण नकळतपणे अनावश्यक खर्च करत जातो. काही लोकांच्या हे लक्षात येतं; तर काहींच्या लक्षात खूप उशिरा लक्षात येतं पण अनेकांच्या हे लक्षातच येत नाही. म्हणून ते खूप खर्च करीत असतात. 

माणसाला खर्च करताना भीती वाटत नाही; पण नंतर हिशोब लागत नाही; तेव्हा त्याचा त्रास होतो. म्हणून कोणतीही वस्तू खरेदी करताना; या वस्तूची मला कितपत गरज आहे? असा स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारावा. विचार करून त्याचं उत्तर जर होय आलं तरच ती वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा. असा निर्णय घेतल्यावर त्या वस्तूचा दर्जा आणि किंमत वाजवी आहे कां? याचा विचार करून मिळेल त्या किंमतीत न घेता ती वाजवी किंमतीत घेण्याचा प्रयत्न करावा. 

दुकानदार एक वस्तू समोर ठेवतो; लगेच तो दुसरी वस्तू दाखवून संभ्रम निर्माण करतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की; ती वस्तू कितीही चांगली असली; तरी तिचा आपल्या उपयोगितेशी व आनंदाशी काही संबंध नसतो. तो आनंद क्षणिक असतो. कालांतराने तो आनंद ही संपतो आणि पैसे ही जातात. म्हणून या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे. पण त्यासाठी स्वतःच प्रयत्न करावा लागतो. 


संदर्भ :

'डिडरोट इफेक्ट'

(Diderot Effect)


*Understanding the 'Diderot Effect' and how to overcome it?*

Thursday, 18 February 2021

भावनिक बुद्धिमत्ता

 

मनातलं..मनासाठी...भावनिक बुद्धिमत्तेचा उगम

भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? ती कशी ओळखावी, याबद्दल अजूनही अनेकांना माहिती नाही. याच भावनिक बुद्धिमत्तेमुळे आयुष्यातील विविध समस्यांवर आपण मात करू शकतो.
भावभावनांविषयीची जाणीव आजमितीइतकी पूर्वी कधीही नव्हती. यापूर्वी तर भावना दाबून ठेवणे हा गुणधर्म मानला गेला. आज लोकांच्या भावनिक अडचणींकडे सहानुभूतीने पाहिले जाते; तसेच तुमच्या भावना व्यक्‍त करण्यासाठी प्रोत्साहन दिले
जाते. आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये भावनांचे महत्त्व आजइतके पूर्वी कधीच डोळसपणे पाहिले गेले नाही. मानसिक ताणतणाव हा मोडलेल्या हाडाइतका किंवा त्याहूनही भयानक असू शकतो याबद्दल आज दुमत नाही.
आजच्या काळातील मानसशास्त्रातील संशोधन पूर्वी उपलब्ध नव्हते. मानवी मनोव्यापाराबद्दलची जिज्ञासा या संशोधनांच्या मुळाशी होती.
सिग्मंड फ्रॉइड यांनी सर्वप्रथम मानवी मन आणि त्याला अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी या संबंधात सिद्धांत मांडले. त्यानंतरही अनेक सिद्धांत मांडले गेले; पण मूळ उद्देश अर्थातच लोकांच्या मानसिक यातना कमी करणे हा होता. भावनिक स्वास्थ्य (Emotional Health) विषयी बोलताना 8 पासून 0 पर्यंतची अवस्था मनस्वास्थ्य कमी असणारी तर 0 पासून 8 पर्यंत चांगले मनस्वास्थ्य असणारी अशी मोजपट्टीही सांगितली गेली. नंतरच्या काळात फक्‍त अस्वस्थता दूर करणे एवढाच उद्देश न ठेवता एरिक्‍सन बॅंडर आणि ग्राईंउर यांनी Neuro Linguistic Programming म्हणजे NLP द्वारा 0 पाशी न थांबता 4, 5, 6, 7 अशी स्थिती मिळवण्यावर भर दिला. 1990 च्या दशकात सेलिग्मन यांनी "How to be as happy as possible' या कल्पनेवर भर दिला. आणि 1995 मध्ये डॅनियल गोलमन यांनी Emotional Intellegence यामध्ये मानवी जीवनातील व्यावसायिक यश व वैयक्‍तिक सुख यासाठी आवश्‍यक असे काही घटक मांडले. या घटकांचा एकत्रितपणे विचार म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता.
भावनिक बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ता गुणांक यातील फरक : बुद्धिमत्ता गुणांक चाचण्या सुमारे 100 वर्षांपासून बुद्धिमापन चाचण्या म्हणून वापरल्या जात आहेत. या संदर्भाने बुद्धिमत्ता म्हणजे 1. तर्कसुसंगतता क्षमता. 2. विश्‍लेषणात्मक विचार चाचण्या 3. भाषिक कौशल्य 4. इतर चाचण्या
या चाचण्या आपल्या मेंदूची वस्तुनिष्ठ माहिती संदर्भातील आकलन साठवून ठेवण्याची क्षमता व स्मरण याबद्दलची पडताळणी करतात. या चाचण्या आपली तोंडी आणि गणिती पद्धतीने विचारक्षमता तपासतात; तसेच समस्या सोडवण्याची क्षमता व काल्पनिक व पृथ:करणात्मक विचारक्षमता तपासतात.
याचा परिणाम म्हणून ज्यांचा बुद्‌ध्यांक उच्च आहे. (100 हा साधारण बुद्‌ध्यांक) ते शैक्षणिकदृष्ट्या यशस्वी होण्याची शक्‍यता असते. या लोकांना सामान्यपणे चांगल्या नोकऱ्या मिळतात व सर्वसाधारपणे त्यांचे आयुष्य यशस्वी म्हणता येईल. यशस्वी आयुष्यासाठी बुद्‌ध्यांक ही एकमेव गुरुकिल्ली मानली गेली; पण एखाद्या व्यक्‍तीची जीवनातील आनंद लुटण्याची क्षमता किंवा अगदी वेगळ्या प्रकारची जीवन कौशल्ये वापरून यशस्वी होण्याची क्षमता, सुखीसमाधानी आयुष्य जगण्याची क्षमता याविषयी बुद्‌ध्यांक काहीही सांगत नाही. आज 21 व्या शतकात भावनिक बुद्धिमत्ता आणि "सुखसमाधान असलेले यशस्वी जीवन' या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. इतकेच नव्हे तर "भावनिक बुद्धिमत्ता' ही सुखी जीवनाची मोजपट्टी म्हणावी लागेल.
बुद्‌ध्यांक आणि भावनिक बुद्धिमत्ता या जरी दोन वेगळ्या गोष्टी असल्या तरी बऱ्याचदा त्या ऐकमेकांना पूरक असतात. या दोघांच्या संयोजनाने कोणचेही आयुष्यातले यशापशय व सुख ठरविले जाते.

भावनिक बुद्धिमत्ता आणि सॉफ्ट स्किल्स

ज्या कौशल्यांमध्ये आपल्याला डिग्री, डिप्लोमा किंवा प्रशस्तिपत्रके मिळतात. त्यांना हार्ड स्किल्स म्हणतात. हार्ड स्किल्स अचूकपणे मोजता येतात. आपण पदवी किंवा इतर परीक्षेत मिळवलेले गुण याच प्रकारातले. हार्ड स्किल्सना आज बाजारात चांगली मागणी आहे. शैक्षणिक गुणवत्ता, एखादी गोष्ट प्रत्यक्ष करायला शिकणे यात अगदी नवशिक्‍यापासून ते तज्ज्ञांपर्यंत स्तर उपलब्ध असतात. उदा. बॅंकिंग, आयटी, इंजिनिअरिंग इ. हार्ड स्किल्समध्ये प्रावीण्य मिळविण्याचे मार्ग त्यामानाने साधे, सरळ असतात. हार्ड स्किल्स शिकण्याच्या पद्धती बहुतांश साचाबंद असतात. तुमची सर्टिफिकेट्‌स, तुमच्या डिग्री, तुमचे त्या विषयातील प्रावीण्य सिद्ध करतात.
आज 21 व्या शतकात फक्‍त हार्ड स्किल्स पुरेशी नाहीत, तर अतिशय उच्च दर्जाची सॉफ्ट स्किल्स मागितली जातात. 
उदाहरणे:
1. इतरांशी मिळून मिसळून वागण्याची वृत्ती व क्षमता.
2. परिणामकारक नेतृत्वशैली. 
3. इतर लोकांचा विकास व त्यांना नवीन शिकण्याची संधी देणे इ. 
4. स्वत:च्या क्षमता अधिक प्रगल्भ करणे.
5. इतरांशी सुसंवाद व संभाषण कौशल्य 
6. आपल्या विचारप्रणालीचा यथायोग्य उत्तम वापर.
7. टीका किंवा अवघड प्रसंगातील सकारात्मक दृष्टिकोन
8. धोक्‍याच्या काळात शांत व स्थिर राहणे. 
9. इतरांची मते आणि विचार समजावून घेण्याची क्षमता.

वरील सर्व सॉफ्ट स्किल्स म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता होय.

लेखक : प्रा. कालीदास देशपांडे

स्त्रोत : साप्ताहिक सकाळ

माहिती संकलन : छाया निक्रड

मानसशास्त्रातील करिअरच्या संधी

 मानसशास्त्र विषयाचे पदवी- पदव्युत्तर अभ्यासक्रम, हे अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या शिक्षणसंस्था आणि त्यातील करिअर संधींचा सविस्तर परिचय-

      एखादी तरल भावकविता लिहिणाऱ्या कवींपासून थेट विज्ञानाच्या संशोधकांपर्यंत, प्रत्येकासाठी, अदृश्य मानवी मन हा कायमच कुतूहलाचा विषय राहिला आहे. मानवी मनाचा आणि मानवी वर्तणुकीचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून केलेला शास्त्रोक्त अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र (सायकॉलॉजी).
     खरे पाहता मानसशास्त्राच्या अभ्यासाचा उगम ग्रीक संस्कृतीत सापडतो. साधारण एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत मानसशास्त्र हा तत्त्वज्ञान शास्त्राचाच एक भाग मानला जात असे. भारतात १९१६ साली सर्वप्रथम कोलकाता विद्यापीठात ‘एक्स्पिरिमेंटल सायकॉलॉजी’ या अभ्यासविषयाचा अंतर्भाव करण्यात आला.
जागतिकीकरण, झपाटय़ाने होणारे शहरीकरण, आरोग्य सेवा उद्योगात होत असलेली जागतिक वाढ, मानवी आरोग्याबद्दलची वाढती जागरूकता, वाढते वैयक्तिक आणि सामाजिक ताणतणाव, वाढती गुन्हेगारी या सर्व घटकांचा
विचार केल्यास मानसशास्त्राच्या अभ्यासकांना काम करायला मोठा वाव आहे, हे सुस्पष्ट आहे.
    मानसशास्त्राच्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर मानवी भावनांचा आणि त्यांच्या वर्तणुकीचा अर्थ लावण्याची मनापासून आवड, संवेदनशीलता, तारतम्य, सतत निरीक्षणे घेण्याची आणि त्यातून निष्कर्षांप्रत पोहोचण्याची चिकाटी आणि संयम, मेहनत या गोष्टी खूप आवश्यक ठरतात. बहुतेकदा या कार्यक्षेत्रातील व्यक्ती, आरोग्य क्षेत्रातील अथवा समाजातील अन्य व्यावसायिकांच्या सहकार्याने काम करत असल्याने संघभावना आणि सामंजस्य हेही स्वभावात बिंबवणे गरजेचे ठरते.
    अनेक महाविद्यालयांमध्ये तसेच विद्यापीठ स्तरावर मानसशास्त्रातील विविध पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणक्रम उपलब्ध असलेले दिसतात. सामान्यत: कोणत्याही अभ्यासशाखेतून १०+२ शिक्षण पूर्ण केल्यानंतर मानसशास्त्रातील पदवी शिक्षणक्रम पूर्ण करता येतो. मानसशास्त्राचे उपयोजन व्यवसाय-उद्योगाच्या अनेक शाखांतून आणि विविध स्तरांतील समाज घटकांसाठी होताना दिसते. याचाच परिणाम म्हणून मानसशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणात अनेक अभ्यासशाखा समाविष्ट झालेल्या दिसून येतात.
क्लिनिकल सायकॉलॉजी- या प्रकारातील तज्ज्ञ रुग्णालये, आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी काम करतात. भावनिकदृष्टय़ा दुर्बल, मनोरुग्ण किंवा प्रदीर्घ आजारामुळे त्रस्त रुग्णांवर उपचार करून त्यांच्या मनाला उभारी देण्याचे काम क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट करतात. रुग्णाच्या मानसिक समस्यांच्या मुळापर्यंत जाऊन त्यावर ते उपाय सुचवतात.
क्लिनिकल न्यूरो सायकॉलॉजी- मेंदूच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या मनोवस्था सांभाळणे किंवा तत्संबंधी अडचणी सोडवणे.
समुपदेशन मानसशास्त्र (कौन्सेिलग सायकॉलॉजी) – या विषयाचे तज्ज्ञ समाजातील सर्व घटकांच्या (स्त्री, पुरुष, वृद्ध) कौटुंबिक किंवा नातेसंबंधांतील अडचणींवर समुपदेशन करतात.
शैक्षणिक मानसशास्त्र – शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना भेडसावणाऱ्या मानसिक समस्या तसेच पालक, पाल्य, शिक्षक यांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्यांचा अभ्यास करून मुलांच्या सक्षम, निकोप वाढीसाठी योग्य समुपदेशन करतात.
औद्योगिक मानसशास्त्र (इंडस्ट्रियल सायकॉलॉजी) – या शाखेतील तज्ज्ञ सरकारी, खासगी तसेच अन्य व्यवसायातील निगडित समस्यांचा अभ्यास करून कामगारांच्या कार्यपद्धतीत, मानसिकतेत सुधारणा घडवून आणत उत्पादन क्षमता आणि कार्यक्षमतेत सुधार घडवतात.
क्रीडा मानसशास्त्र (स्पोर्ट्स सायकॉलॉजी) – या विषयातील तज्ज्ञ खेळाडूंच्या मनोवस्थेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्यांची  कामगिरी उंचावण्यासाठी योग्य ती उपाययोजना करतात.
गुन्हे तपासासाठी मानसशास्त्र (क्रिमिनल सायकॉलॉजी) – गुन्हेगार, कैदी, आरोपी शोधण्यासाठी गुन्हा कोणत्या मानसिकतेतून घडला असेल हे शोधून काढत या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती गुन्हेतपासात योगदान देतात. गुन्हेगार किंवा गुन्ह्य़ाने पीडित व्यक्तींचे समुपदेशनही या अंतर्गत केले जाते.

मानसशास्त्राचे विविध शिक्षणक्रम उपलब्ध असणाऱ्या शिक्षणसंस्था
* सेंट झेवियर महाविद्यालय, मुंबई.
वेबसाइट- www.xaviers.edu
* ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई.
वेबसाइट- www.sndt.ac.in
* रामनारायण रुईया महाविद्यालय, माटुंगा, मुंबई.
वेबसाइट- www.ruiacollege.edu
* मुंबई विद्यापीठ, कालिना. (मानसशास्त्र विभाग) – पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (क्लिनिकल सायकॉलॉजी, कौन्सेिलग सायकॉलॉजी, इंडस्ट्रियल सायकॉलॉजी, ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजी,
सोशल सायकॉलॉजी). पीएच.डी. आणि अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा कोर्स इन कौन्सेिलग सायकॉलॉजी, अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा कोर्स इन क्लिनिकल सायकॉलॉजी, अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा कोर्स इन इंडस्ट्रियल सायकॉलॉजी . कालावधी- एक वर्ष. अर्हता- मानसशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी. संबंधित विषयात स्पेशलायझेशन असल्यास प्राधान्य मिळू शकते. वेबसाइट- www.mu.ac.in
* मुंबईच्या रुपारेल, कीर्ती, के. जे. सोमया आणि जयहिंद महाविद्यालयात मानसशास्त्र विषयक अभ्यासक्रम शिकवले जातात.
* निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सायकॉलॉजी, मुंबई.
* सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्स, पुणे.
* फग्र्युसन कॉलेज, पुणे.
मानसशास्त्राचा पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (इंडस्ट्रियल सायकॉलॉजी आणि क्लिनिकल सायकॉलॉजी).
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कौन्सेिलग सायकॉलॉजी,
कालावधी- एक वर्ष. अर्हता- संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी.
वेबसाइट- www.fergusson.edu
* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (मानसशास्त्र विभाग) अभ्यासक्रम- एमए आणि पीएच.डी. इन सायकॉलॉजी
वेबसाइट- www.unipune.ac.in
* नागपूर विद्यापीठ (मानसशास्त्र विभाग)- एमए आणि पीएच.डी. वेबसाइट- www.nagpurunivercity.org
* हिस्लॉप कॉलेज, नागपूर – बीए आणि एमए इन सायकॉलॉजी ई-मेल- principal@hislopcollege.ac.in
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (मानसशास्त्र विभाग)- एमए आणि पीएच.डी.
ई-मेल- head.psychology@bamu.net
* शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर - एम. ए. क्रिमिनल सायकॉलॉजी
- महावीर महाविद्यालय, कोल्हापूर : कोन्सिलिंग सायकॉलॉजी
- राजाराम कॉलेज, कोल्हापूर : इंडस्ट्रियल सायकॉलॉजी
- श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज, सांगली : क्लिनिकल सायकॉलॉजी
- के. बी. पी. कॉलेज, उरुण-इस्लामपूर : क्लिनिकल सायकॉलॉजी
- एस. जी. एम. कॉलेज, कराड : कोन्सिलिंग सायकॉलॉजी

मानसशास्त्राचे उच्च शिक्षण देणाऱ्या इतर राज्यांतील शिक्षण संस्था
* पीएच. डी.(स्ट्रेस अ‍ॅनालिसिस) – युनिव्हर्सटिी ऑफ दिल्ली, वेबसाइट- director@ducc.du.ac.in
* एम. फील. अप्लाइड सायकॉलॉजी – जस्टीस बशीर अहमद विमेन्स कॉलेज, तामिळनाडू.
वेबसाइट- jbascollege@gmail.com
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायकॉलॉजिकल रिसर्च, बंगळुरू – पदव्युत्तर तसेच पदवी शिक्षणक्रम उपलब्ध आहेत.
वेबसाइट- www.iipr.in
* इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, दिल्ली.
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत ‘ह्य़ुमॅनिटीज अ‍ॅण्ड सोशल सायन्सेस’ या शाखेअंतर्गत मानसशास्त्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणक्रम शिकवले जातात.
(लखनौ, वाराणसी, दिल्ली, रुरकी, कानपूर)
वेबसाइट- www.iit.ac.in

(संदर्भ : लोकसत्ता)

Tuesday, 16 February 2021

अर्थ सुखाचा

 #सुखाची_गुरुकिल्ली


    परवाच एका स्नेह्यांना भेटायला एका नामांकित हॉस्पिटलमध्ये गेले होते .

समोरून आलेल्या डॉ . समिक्षा ने मला Hi मावशी , आज इथे कशी काय ? म्हणून प्रश्न केला .

      क्षणभर तिचा .... आत्मविश्वास , रुबाबदार व्यक्तिमत्व !! हॉस्पिटलमध्ये  तिला मिळणारा मान बघून माझा ऊर अभिमानाने भरून आला . तिने मला आग्रह करून  तिच्या केबिनमध्ये नेऊन कॉफी ऑफर केली . गप्पांच्या ओघात अनेक विषय झाले ....नुकतीच तिचे कॉन्फरन्स निमित्ताने अनेक परदेशी दौरे झाले होते .....!! बोलता बोलता

      समिक्षा म्हणाली खरे सांगू मावशी तू जर मला त्या वेळेस खडे बोल सुनावले नसतेस ...... थोडक्यात  माझे counselling केले नसते तर मी त्या धक्क्यातून सावरले नसते तुझे माझ्या कुटुंबावर , माझ्यावर खूप उपकार आहेत !! ....बास कर समिक्षा !! ....जो तो आपआपल्या परीने झगडत असतो . आपला मार्ग शोधतो फक्त मी एक तुझ्यासाठी निमित्त ठरले !

      बस इतकंच !! ...चल पुन्हा भेटूया या रविवारी नक्की म्हणून मी तिचा निरोप घेतला .... घरी परतताना राहून राहून समिक्षा प्रकरणाची आठवण होत होती ....!!

      समिक्षा तिच्या आई व भावासह आमच्या सोसायटीत राहायला आली ....आपल्या बोलक्या , मनमिळावू स्वभावाने ती लवकरच आमच्यात मिसळून गेली 

.....तिची आई रमाताई फारच बुजऱ्या स्वभावाच्या त्यातून छोट्या गावाकडून पुण्यासारख्या शहरात आल्याने त्या भांबावून गेल्या होत्या . पण माझ्या  सहवासात आमची नाती फुलत गेली ....

    समिक्षा १२ वि ची परीक्षा , NEET वगैरे उत्तम गुणांनी प्राविण्य मिळवून पास झाली .तिने मेडिकल ला ऍडमिशन घेतली . तर छोटा भाऊ सुजय १०वी नंतर नुकताच डिप्लोमा मेकॅनिकल ला होता ....!!

      दोघेही बहीण भाऊ खूप हुशार !! गावी शेती वाडी , वडील नामांकित बागायतदार द्राक्ष , ऊस मळा शेतीवाडी यात ते रममाण !! स्वतः शिकलेले असूनही त्यांनी हेतुपुरस्सर ही वाट चोखाळली होती !! अनेक आधुनिक , सुधारित बदल करून त्यांनी शेती - व्यवसाय मध्ये आपले पाय भक्कम रोवले होते .

आजही त्यांचा शेतीचा माल फॉरेनला जातो ....

आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे हा एकच ध्यास या दांपत्यानी घेतला होता . 

     पुण्यात मुलांकडे येताना ते आम्हालाही भाजीपाला वगैरे आणत .

दोन्ही मुलांकडे त्यांचे खुप चांगले लक्ष असायचे

आम्हालाही ते मुलांवर लक्ष ठेवा .....वगैरे सूचना देत असत !! असे हे समाधानी कुटुंब !! 

   समिक्षा कॉलेजमध्ये पहिल्यापासून आघाडीवर

पण एका छोट्या गावातून

आलेल्या मुलीचा पाणउतारा करण्यात काही स्टायलिश मुली आघाडीवर होत्या . सुरुवातीला समिक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले .....हळूहळू ती कॉलेजमध्ये रुळली , ओळखी झाल्या !! .....

कॉलेजचे फंक्शन , गॅदरिंग सगळ्यात तिचा उस्फुर्त सहभाग असे !!

आवाज ही गोड असल्याने गाणी अतिशय सुंदर म्हणत असे !! .....

हळूहळू पाहिले वर्ष सरले

.....अपेक्षेप्रमाणे समिक्षा  कॉलेजमध्ये पहिली आली .....!! आता मात्र टिकाटिपण्णी करणारे तिच्याकडे अभिमानाने पाहू लागले . समिक्षा सगळ्यांचा कौतुकाचा विषय झाली .....!!

    नंतर दुसऱ्या वर्षात असताना ती कॉलेजमध्ये न जाता चार चार दिवस घरातच राहू लागली . रमाताईंनी तिला खोदून खोदून माहिती विचारली तरीही ती काही बोलेना . अबोल होऊन हताश बनून राहिली .....!!

     रमाताईंनी घाबरून आम्हा दोघांच्या कानावर ही गोष्ट घातली . मी ह्यातून नक्की मार्ग काढेन असे आश्वासन देऊन रमाताईंची पाठवणी केली     ठरल्याप्रमाणे ....बोलता बोलता मी व समिक्षा एका सांस्कृतिक गाण्याच्या कार्यक्रमाला जाणार असे सांगून तिला घेऊन गेले . संपूर्ण कार्यक्रमात तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मी कळून चुकले की ही कुठल्यातरी पेचप्रसंगात सापडली ... कार्यक्रम पार पडल्यावर मस्तपैकी हॉटेलमध्ये नेऊन तिला बोलते केले .....!!

      त्यातून तिच्याबद्दल कॉलेजमध्ये होत असलेले  गॉसिप न चर्चा याला ती जाम वैतागली होती .....!!

कोमल मनाची समिक्षा पार कोमेजून गेली होती .

तिला मी ह्यातून बाहेर काढण्याचा निर्धार केला सलग एक आठवडा तिला अनेक प्रकारे समजावून सांगितले .

    समिक्षा ....हे बघ तुझ्यापुढे तुझे ध्येय , करियर  चे विश्व आहे ...

तू स्वतःप्रति प्रामाणिक आहेस . सगळ्यांशी मिळून मिसळून वागतेस वेळेला मदत करतेस !! कोणात दुजाभाव करत नाहीस , वादविवाद या पासून चार हात लांब राहतेस !! ....मग तू कोणत्याही गोष्टीला घाबरायचे कारण नाही ...

आणि विशेष म्हणजे तुझे मनोधैर्य खच्चीकरण करण्यासाठी हे डावपेच असतात !! ....यातून तू सावरलीस तरच तुझे भले होईल !! ....जर लोकांना घाबरून तू घरात स्वतःला कोंडून घेतलंस तर तुझे आयुष्य उध्वस्त होईल !!

       या ज्या काही कॉलेजमधील बड्या लोकांच्या मुली आहेत त्या तुला डिवचायला पाहतात . त्याचे कारण तू त्यांच्याकडे लक्ष देतेस म्हणूनच !!

      अगं ! एखादे परके कुत्रे भुंकते आहे म्हणून आपण घेतो का त्याची दखल ? तसेच हे आहे !! तुला मिळणारी वाहवा , शाबासकी ही ह्यांची खरी पोटशूळ आहे !! तर ......

सावर  स्वतःला !! तुझ्या आई - बाबांचे कष्ट विचारात  घे !! लहान सुजय ने तुझा आदर्श घ्यावा असे तुझे वर्तन हवे नुसताच वेष झकपक असून चालत नाही तर त्याला मन ही निर्मळ असले पाहिजे हे लक्षात घे !!

       आणि शेवटी मी इतकंच सांगेन समिक्षा तुझ्या सुखाची गुरुकिल्ली तू स्वतःहून का त्यांच्या हाती सोपवत आहेस ?

     .....त्या नंतर समिक्षा यातून बरीच सावरली आज ती नामांकित डॉक्टरांच्या पंक्तीत जाऊन बसली . नंतर या कुटुंबीयांनी दुसरीकडे फ्लॅट घेतला , घर बदलले पण माझ्याप्रति असलेला तिचा आदर ....!! 

फोनवर प्रत्यक्ष अधूनमधून भेटीगाठी होतातच !! एका मुलाखतीत तर तिने तिच्या यशाचे गमक म्हणजे माझी मावशी .....

की जिने मला सुखाचा मूलमंत्र दिला . वेळीच मला डिप्रेशन मधून सावरायला मदत केली !!

स्वतःच्या सुखाच्या चाव्या स्वतःच्याच हाती ठेवण्यास भाग पाडले ....

म्हणूनच आज मी ती सुखाची गुरुकिल्ली जोपासत , समाजसेवेचे व्रत घेतलंय !! तिच्या या वाक्यावर अनेकांचे रिप्लाय पेपरमध्ये वाचून मी अलवार माझ्या डोळ्यातील अश्रू टिपले ..

तो प्रसंग अजूनही डोळ्यासमोर येतो ......!!

म्हणतात ना !! आठवणी या मोरपिसासारख्या असतात !! ह्रदयाच्या गाभाऱ्यातील आवाज त्यांना साद घालतो !! म्हणूनच त्या आपण प्राणापालिकडे जपतो !!


🌹🤝🌹🤝🌹🤝


©️सौ राजश्री भावार्थी

         पुणे


  ( रिपोस्ट )

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...