Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Tuesday, 10 September 2024

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

  
     आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्महत्येनंतर गेल्या काही वर्षांमध्ये समाजात त्या विषयी थोडी चर्चा होऊ लागली आहे. कोविड-19 नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आपण हे समजून घेतले पाहिजे की, गेली काही वर्षे जशी एखादी संसर्गजन्य आजाराची साथ पसरावी, त्याप्रमाणे आत्महत्यांची एक सुप्तसाथ आज आपल्या देशात पसरली आहे. 
     भारतात दरवर्षी दोन लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू आत्महत्या केल्याने होतो. त्यामधील निम्म्या म्हणजे साधारण एक लाख आत्महत्या या 15 ते 35 या वयोगटातील म्हणजे तरुणाईच्या असतात. आपण थोडे हळहळतो आणि काही दिवसांनी हे विसरून जातो. पण हा विषय खूप गंभिर आहे. 
     'युवाल नोवा हरारी' हा आजच्या जगातील एक महत्वाचा भाष्यकार असे म्हणतो की, ‘’युद्ध आणि दहशतवाद ह्यापेक्षा 'आत्महत्या’ हा आजच्या जगासाठी खूप अधिक महत्वाचा प्रश्न आहे. करोनाच्या साथीमुळे जे आर्थिक आणि सामाजिक परिणाम होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर समाजातील मानसिक ताणतणाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. बातम्यांमध्ये आपण रोज बेरोजगारीने कोणीतरी जीवन संपवून घेतल्याचे वाचतो. समाज म्हणून वरच्या प्राधान्य क्रमाने आपण हाताळायला पाहिजे, असा हा प्रश्न आहे. करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी ज्याप्रमाणे मास्क, शारीरिक अंतर राखणे आणि निर्जंतुकीकरण ह्याचा वापर आपण केला आणि आता लसीकरणाच्या माध्यमातून त्याच्याशी लढत आहोत. 'संवेदनशीलतेनं बघणं आवश्यक' तसेच, या आत्महत्यांच्या वाढत्या घटनांच्या विरोधी आपल्या सर्वांच्या मनाचे प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक होते आहे, असे म्हटले तर अनेकांना आश्चर्य वाटेल. पण लसीकरण ह्याचा अर्थ त्या आजाराच्या विषयी प्रतिकार क्षमता निर्माण करणारी गोष्ट अशा व्यापक पातळीवर आपण अर्थ घेतला तर ह्या विचाराचे महत्व आपल्या लक्षात येवू शकेल. ह्या मधील सगळ्यात मोठी अडचण जर कोणती असेल, तर ती म्हणजे मानसिक आरोग्य आणि आजार ह्या विषयी आपल्या समाजात असलेले प्रचंड अज्ञान आणि गैरसमज. शरीराचा आजार आपण जितक्या सहजपणे स्वीकारतो तसा मनाचा आजार अजिबात स्वीकारत नाही. मनाचे आजारपण हे अजून ही आपल्या समाजात लपवून ठेवण्याची गोष्ट समजली जाते. ‘’मनाचा आजार हा काहीतरी कलंक आहे’’ असे आपल्या समाजात त्या कडे बघितले जाते. स्वाभाविकपणे मानसिक आजाराचा उपचार घेण्यापेक्षा लोक तो लपविण्याचा प्रयत्न करतात. 
     यावरून जर कोणी उपचारपर्यंत पोहचला तर मानसिक उपचाराच्या विषयी असलेल्या प्रचंड गैरसमाजांच्यामुळे पूर्ण उपचार घेतला जात नाही. ‘मानसोपचारतज्ञ फक्त झोपेच्या गोळ्या देतात’, ‘त्यांच्या औषधांची सवय लागते!’ अशा अनेक गैरसमजांना बळी पडून लोक उपचार पूर्ण करत नाहीत. आत्महत्येचे विचार बोलून दाखवणाऱ्या व्यक्तींच्या बद्दल दखोलवर रुजलेले गैरसमज आपल्या समाजात आहेत. ‘आत्महत्येचा विचार बोलून दाखवणारे लोक हे नाटक करत असतात’ अथवा ‘जो गरजते है वो बरसते नाही’ असा आपल्याकडे मोठा गैरसमज आहे. प्रत्यक्षात जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्येचे विचार बोलून दाखवते तेव्हा ती,‘’माझे मन माझ्या ताब्यात रहात नाही आहे आणि मला मदतीची गरज आहे’’ असे सांगत असते. याकडे आपण खूप संवेदनशीलपणे बघणे गरजेचे आहे. 
     मानसशास्त्रातील अनेक अभ्यास असे सांगतात की, आत्महत्या करण्यापूर्वीच्या आठवड्यात बहुतांश लोक हे आपल्या जवळच्या व्यक्तीच्याकडे थेट किवा अप्रत्यक्षपणे हा विचार बोलून दाखवत असतात. अत्यंत ताणाच्या प्रसंगी स्वत:ला इजा करून घेण्याचे विचार हे 50% पेक्षा अधिक लोकांच्या मनात येत असतात. या पार्श्वभूमीवर आपण आपल्या जवळच्या व्यक्तीची भावनिक अस्वस्थता ऐकण्यासाठी उपलब्ध आहोत ही मोठी गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीचे आत्महत्येचे विचार शांतपणे ऐकूण घेणे आणि त्याला योग्यप्रकारे मार्गदर्शन करणे ही आव्हानात्मक गोष्ट आहे. यामध्ये आपण जभावनिक प्रथमोपचार कसे द्यावेत याचे जर छोटे प्रशिक्षण घेतले असेल तर आपण अधिक प्रभावी पणे हे काम करू शकतो. परिवर्तन संस्था आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या मार्फत भावनिक प्रथमोपचार देवू शकतील अशा दोनशे पेक्षा अधिक मानसमित्र आणि मैत्रिणीना मोफत प्रशिक्षण दिले. याचा त्यांना स्वत:ला आणि त्यांच्या कुटुंबाना जवळच्या लोकांना मोठा फायदा झाला.अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपण समाजात चांगले ऐकणारे मानस मित्र /मैत्रिणी तयार करू शकतो.केवळ भावनिक प्रथमोपचार देखील सर्व काही करू शकतील असे समजणे बरोबर नाही. आत्महत्या रोखण्याच्या प्रयत्नातील ती केवळ पहिली पण अत्यंत महत्वाची कडी आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यावर अशा प्रत्येक मानस मित्र /मैत्रिणीनी तज्ञ मानसोपचार तज्ञाच्या सोबत जोडलेले असणे आवश्यक आहे.त्यामुळे आत्महत्येच्या विचारांचे गांभीर्य आणि तीव्रता ओळखायला शिकणे आणि मानसोपचार तज्ञाच्या देखरेखीखाली हे करणे अत्यंत आवश्यक आहे. 
     जगभरात आत्महत्या रोखण्यासाठीच्या प्रयत्नात अशा गेट कीपर/भावनिक मदत देणारा द्वार रक्षकाचे महत्व दिसून आले आहे. काही वेळा मनात आत्महत्येचे विचार येणे हे तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजाराचे देखील लक्षण असते. या मध्ये व्यक्तीला भास आणि भ्रम होत असतात. अशा वेळी उपचार हे तज्ञाच्या थेट निगराणी खालीच होणे आवश्यक असते हे पण आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. 

 आत्महत्येचे विचार जन्म कसे घेतात?
     ‘आत्महत्या करणे’ हे कमकुवतपणाचे लक्षण आहे असे आपल्या कडे खोलवर रुजलेला आणखी एक गैरसमज आहे.सोशल मीडियावर अनेक लोक असे विचार व्यक्त करताना दिसतात. आपण हे समजून घेतले पाहिजे की, आत्महत्येचे विचार मनात येणे हे टोकाच्या भावनिक अस्वस्थतेचे लक्षण आहे. ही अस्वस्थता कोणालाही अनुभवला येवू शकते. त्याच्या मागे जैवि-मनो-सामाजिक अशी तीन प्रकारची कारणे असू शकतात. जैविक पातळीवर मेंदूतील सिरोटोनीन द्रव्य आणि काही जनुके याच्याशी निगडीत असल्याचे अनेक अभ्यास आता झाले आहेत. मानसिक पातळीवर स्वभाव दोष, टोकाचा उतावीळपणा ही करणे आहेत तर सामाजिक पातळीवर आर्थिक विषमता, व्यसनाधीनता अशा स्वरुपाची करणे दिसून येतात. या तिन्ही गोष्टींच्या मिश्रणातून हे विचार जन्म घेतात हे आपण समजून घेतले पाहिजे. 

काय करायला हवं? 
     स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबाच्या पातळीवर ह्या विषयी आपण अनेक गोष्टी करू शकतो. सतत निराश वाटणे, झोप न येणे अथवा जास्त झोप येणे, भूक कमी होणे, सारखी चिडचिड होणे, अस्वस्थता राहणे, टोकाचे विचार येणे अशी लक्षणे आपल्याला स्वत:ला किवा आपल्या जवळच्या व्यक्तीमध्ये दिसून आल्यास आपण तज्ञांची मदत घेतली पाहिजे. तरूणाईच्या आयुष्यात सध्याच्या कालखंडात करियर आणि प्रेम /आकर्षण ह्या मधील गोंधळाच्या मधून निर्माण होणारे प्रश्न हे मानसिक अस्वास्थ्य आणि आत्महत्येशी खूप जवळून संबंधित असल्याचे आपल्याला दिसून येते. याविषयी कुटुंबात मोकळेपणाने बोलण्याचे वातावरण निर्माण करण्यातून अनेक प्रश्नांची तीव्रता कमी होऊ शकते. 
     ‘आयुष्यात अपयश आले म्हणजे आता आपण जगण्यास लायक राहिलो नाही’ हा विचार अनेक लोकांना आत्महत्येच्या कृतीकडे नेतो. अपयशाला सहजपणे सामोरे जाणारी मानसिकता घडवण्याचे महत्व देखील ह्या निमित्ताने अधोरेखित होते. शासनच्या आरोग्य यंत्रणेच्या मार्फत ज्या विविध स्वरूपाच्या सुविधा दिल्या जातात त्यामध्ये मानसिक आरोग्याच्या आणि आत्महत्या प्रतिबंधक सुविधांचा मोठ्या प्रमाणावर समावेश करणे आवश्यक आहे. आत्महत्येच्या विषयी वार्तांकन करताना अनेक वृत्त वाहिन्या ह्या पुरेशी संवेदनशीलता दाखवली जात नाही. यामधून अनेक वेळा अनुकरणातून होणाऱ्या आत्महत्या वाढू शकतात. माध्यमांनी देखील आत्महत्या रिपोर्टिंग विषयीच्या मार्गदर्शकतत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईन हे देखील आत्महत्या टाळण्या साठी एक महत्वाची गोष्ट ठरू शकते. परिवर्तन संस्थेमार्फत चोवीस तास चालणारी आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईन( 7412040300) चालवली जाते. नुकत्याच राज्य आणि केंद्र शासनाने देखील अशा हेल्प लाईन सुरु केल्या आहेत. त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणप्रसारकरणे आवश्यक आहे. या मोफत हेल्प लाईन असून ह्यांच्या वरची माहिती गोपनीय ठेवली जाते. 
     आत्महत्यांची ही साथ रोखण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. लेखात वरती बघितलेल्या उपायांच्या अनुषंगाने आपण सगळे, शासन आणि माध्यमे ह्यांनी एकत्र प्रयत्न केले तर समाज मनाचे आत्महत्या विरोधी लसीकरण आपण नक्कीच करू शकू आणि त्यामधून अनेक आत्महत्येमधून होणारे मृत्यू टाळू शकू,असा विश्वास वाटतो.

 - डॉ. हमीद दाभोलकर (मनोविकार तज्ज्ञ)

(डॉ.हमीद दाभोलकर हे सामाजिक कार्यकर्ते आणि मनोविकार तज्ज्ञ आहेत. परिवर्तन संस्था आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीशी ते संलग्न आहेत.)

संदर्भ: BBC.Com

Saturday, 21 October 2023

चमत्कारावर विश्वास ठेवणारी मानसिकता...


अतींद्रियाचे विज्ञान


"विपरीत..विचित्र..अलौकिक.. अतींद्रिय..दैवी" अशा अनेक घटना घडतात व त्या सत्य आहेत असे मानणारे श्रद्धाळू आणि अंधश्रद्धाळू असतात. 


वास्तवात, अशा विपरीत, अलौकिक, घटना या प्रत्येकाच्या मनातून उद्भवतात! आणि जेव्हा त्या सामूहिक रूप घेतात तेव्हा अशा समजुती समाजामध्ये रुजून त्याच्या रूढी आणि परंपरा तयार होतात. 


खरे तर अशा प्रकारच्या अलौकिक, अतींद्रिय, विपरीत घटना या प्रत्येकाच्या समजूती असतात. म्हणजे एक प्रकारची सायकॉलॉजी तयार झालेली असते. आणि अशी समजूत, अशी सायकॉलॉजी, सामान्य किंवा नॉर्मल नसते. ती विसंगत असते. 

आणि ती विसंगत आहे हे मनोविज्ञानाच्या आधारे दाखवून देण्याचे काम आपल्या देशात खूप उशिरा सुरू झाले. 


पण युरोपमध्ये हे काम २०० वर्षांपूर्वी सुरु झाले. 

म्हणजे, तसे पाहिले तर अतिइंद्रिय, दैवी, अलौकिक आणि विपरीत घटना या मनाच्या खुळ्या किंवा बिघडलेल्या समजूती असतात. असे मानण्याच्या बाबतीत आपण अजूनही २०० वर्षे मागे आहोत. 


अशा सर्व घटनांचा अभ्यास करणारे स्वतंत्र विज्ञान निर्माण झालं ते युरोपमध्ये. आणि विशेषतः अशा मानसिकतेचा अभ्यास करणारं असं एक मनोविज्ञान विकसित झालं! ज्याला "अॅनोमॅलिस्टिक सायकोलॉजी" असे म्हटले जाते किंवा 'विसंगत मानसविज्ञान' म्हटले जाते. 


या विसंगत मानस विज्ञानात स्पष्टपणे हे नोंदविले आहे की अशा दैवी, अतींद्रिय, अलौकिक, विपरीत, चमत्कारी, घटनांच्या मागे दोन कारणे असतात. एक असते मानसिक कारण व दुसरे असते भौतिक  कारण. आणि या कारणांच्या आधारे आपण अशा प्रत्येक दैवी, चमत्कारी, अतींद्रिय शक्तींच्या दाव्यांच्या मागील सत्य सांगू शकतो. 


बरोबर २१० वर्षांपूर्वी इंग्लंडमधील एक डॉक्टर जॉन फेरिअर याने 'पिशाच्च आणि भूतांचे प्रकटीकरण' यावर थेट मत मांडून एक पुस्तक लिहिले. ज्यात त्याने स्पष्ट नमूद केले की, भुते व पिशाच्य यांचे दिसणे म्हणजे डोळ्याचे भ्रम किंवा ऑप्टिकल इल्युजन आहे.


त्याच काळात तिकडे फ्रान्स मध्ये अलेक्झांड्रि बाॅईसमाँट याने संशोधनपर पुस्तक लिहिले..भुते,पिशाच्च दिसणे, स्वप्न पडणे, आत्यानंद अवस्था, चुंबकोपचार, झोपेत बडबडणे व चालणे या विषयावर त्याने स्पष्ट वैज्ञानिक मते मांडली. आणि असे प्रकार म्हणजे भ्रम होत असे म्हटले. या पुस्तकाचे नाव होते, 'ऑन हॉल्युसिनेशन्स'. 


विशेष म्हणजे त्या काळात अध्यात्म या विषयाची सुद्धा चिरफाड केली गेली. याविषयी विल्यियम बेंजामिन कार्पेंटर याने असे स्पष्टपणे नोंदविले की, अध्यात्म म्हणजे स्वयंसूचना, संमोहन, बनवाबनवी आणि विचारभ्रम या गोष्टींचे मिश्रण होय. त्याच्या पुस्तकाचे नाव होते, 'मेस्मेरीझम स्पिरीच्युअॅलीझम". 

ब्रिटिश मनोरोगतज्ञ हेन्री माॅडस्ले याने, "नॅचरल कॉजेस अँड सुपर नॅचरल सिमिंग्ज" हे पुस्तक १८८६ मध्ये लिहिले. त्यात तो म्हणतो..

 "अमानवी, अतिदैवी किंवा अतींद्रिय घटना ज्या घडतात  त्या मागे मानसिक रोग हे कारण असते. आणि अशा अवस्थेतील लोक अशा घटनांकडे पाहताना चुकीच्या नजरेने पाहतात आणि नैसर्गिक नियमांचा चुकीचा अर्थ लावतात. 


अल्बर्ट मोल या सायकीयाट्रिस्टने व मॅक्स डेसोर या सायकॉलॉजिस्टने जर्मनीमध्ये गुढवादावर (ऑकल्टिझम) संशोधन केले आणि गुढवाद म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अंतर्मनातील संकेत, संमोहनाच्या स्वयंसूचना, बनवाबनवी, मानसिक कारणे यांचे मिश्रण होय असे नोंदविले.  


१८९१ मध्ये सायकियॅट्रिस्ट लिओनेल वेदर्ली आणि जादूगार जाॅन मस्केलीन या दोघांनी मिळून, 'द सुपरनॅचरल?' म्हणजे 'अतिनैसर्गिक?' या नावाचे पुस्तक लिहिले. यामध्ये धार्मिक अनुभव आणि अपसामान्य अनुभव ज्यांना अतींद्रिय अनुभव म्हटले जाते यांच्या मागील रॅशनल कारणे सांगितली आहेत. 

१९१३ मध्ये कार्ल जेस्पर यांनी जनरल सायकोपॅथाॅलॉजी नावाचे पुस्तक लिहून त्यात स्पष्टपणे नोंदविले की सर्व अतींद्रिय, अद्भुत, अतर्क्य  आणि दैवी घटना या दुसरे तिसरे काही नसून मनोरोगांचे अविष्कार आहेत. 


जाणिव, देहभान किंवा शुद्धी या अवस्था मानवामध्ये आहेत. पण जेव्हा या अवस्था बदलतात तेव्हा वेगवेगळे अनुभव येतात. ज्याला इंग्रजीमध्ये 'आल्टर्ड  कॉन्शियसनेस' असे म्हणतात. त्या जाणिवेचे अनेक अविष्कार हे अतींद्रिय शक्ती, परामानस शक्ती, अद्भुत शक्ती आणि दैवी शक्ती या स्वरूपात आहेत असे म्हटले जाते. वास्तवात या ज्या शक्ती आहेत या फसव्या किंवा खोट्या विज्ञानाच्या आधारे सिद्ध करण्याचा प्रयत्न पॅरासायकॉलॉजी नावाच्या विज्ञानात करण्यात आला होता. पण आज अखेर अशा शक्ती अस्तित्वात आहेत असा कोणताही पुरावा आढळलेला नाही. उलट यामागे मानसिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत असे सिद्ध झाले आहे. ही सिद्धता देण्यासाठी जे शास्त्र उदयास आले तेच अॅनोमॅलिस्टिक सायकॉलॉजी होय. 


लिओनार्ड झुस्ने आणि वॅरन जोन्स या सायकॉलॉजिस्टनी  अॅनोमॅलिस्टिक सायकॉलॉजी हा शब्द प्रथम वापरला. एवढेच नव्हे तर त्यांनी, "अॅनोमॅलिस्टिक  सायकॉलॉजी: ए स्टडी ऑफ मॅजिकल थिंकिंग" नावाचा ग्रंथ देखील लिहिला. हे घडले १९८९ मध्ये. 


भविष्याविषयी होणाऱ्या घटनांचे थेट आकलन होणे किंवा प्री कॉग्निशन, शरीरातून आत्मा बाहेर पडणे किंवा आऊट ऑफ बॉडी एक्स्पिरियन्स, परलोकविद्या शास्त्र वगैरे सर्व अतींद्रिय व अंधश्रद्ध गोष्टींचा भांडाफोड करण्यास मानसविज्ञान समर्थ आहे असे अॅनोमॅलिस्टिक सायकॉलॉजी मानते. 


थोडक्यात, 

शहाणपणाचा अभाव.. 

तर्कहिनता किंवा कॉग्निटिव्ह एरर.. 

मनोभंगाची अवस्था किंवा डिसोसिएटिव्ह स्टेट्स.. 

भ्रम किंवा ईल्युजन्स.. 

व्यक्तिमत्व दोष.. 

मनाचा विकास होत असताना निर्माण होणारे दोष व व्याधी.. 

स्मृतीची स्थिती.. 

चमत्कारावर विश्वास ठेवणारी मानसिकता.. 

अतिकल्पनारम्यता... 

वैयक्तिक व्यक्तिगत दावे.. 

अपघाताने निर्माण झालेली स्थिती.. 

संमोहन.. 

निद्रा लकवा.. 

- असे अनेक मानसिक घटक अशा अतींद्रिय आणि अंधश्रद्ध घटनांच्या भांडाफोडीस पुरेसे आहेत. 


अतीन्द्रिय संवेदनांच्या वर लिहिला गेलेला एक ग्रंथ आहे. "एक्स्ट्रा सेंसरी पर्सेप्शन: ए सायंटिफिक इव्हॅल्युएशन". या ग्रंथाचा लेखक हँसेल म्हणतो.. 'गेली शंभर वर्षे अतिंद्रीय शक्तीच्या दाव्यावर संशोधन चालले आहे. पण आज अखेर एकही पुरावा दाखवता आलेला नाही व सिद्धही करता आलेला नाही.' 


अशा पद्धतीने वैज्ञानिक पायावर उभारून मानस विज्ञानाच्या आधारे सर्व दैवी शक्तींमागील कारणे सांगणारे अॅनोमॅलिस्टिक सायकॉलॉजी हे इटलीतील युनिव्हर्सिटी ऑफ मिलानो बिकोकका या विद्यापीठात अॅनोमॅलिस्टिक सायकाॅलाॅजिस्ट मसिमो पाॅलीडोरो यांच्या नेतृत्वाखाली शिकवले जाते.


लंडनच्या गोल्ड स्मिथ विद्यापीठात क्रिस फ्रेंच या सायकॉलॉजिस्टनी अॅनोमॅलिस्टिक सायकाॅलाॅजीची स्वतंत्र संशोधन शाळा खोलली आहे.


भारतात या पातळीवर घडणे अशक्य आहे! कारण जुन्या-पुराण्या कुठल्यातरी ग्रंथात जाऊन विज्ञान शोधत बसण्याची पद्धत ही वैज्ञानिक पद्धत नव्हे. ती अत्यंत घातक आणि नवनवीन संकल्पना निर्मितीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे आपल्याकडे अशा सखोल संशोधनास कोणतेही वातावरण नाही आणि पाठिंबा देखील नाही. आणि याच कारणाने आपला देश अतिंद्रिय दावे, दैवी शक्ती, जादूटोणा, पुनर्जन्म आणि भुतेखेते यातच रुतून राहिलेला आहे यात काही शंका नाही.


- डॅा. प्रदीप पाटील 

Monday, 9 October 2023

World Mental Health Day

 जाणून घेऊयात मानसिक आरोग्य  दिनाविषयी...

आजच्या काळात मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या जसे की नैराश्य, चिंता आणि तणाव इत्यादींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक लोक मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. मानसिक आरोग्य ही गंभीर समस्या म्हणून पाहिली जाते. याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो.

जागतिक मानसिक आरोग्य दिनाचा इतिहास-

संयुक्त राष्ट्र संघाने 1992 मध्ये पहिल्यांदा जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला. या वर्षीपासूनच हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर, 1994 मध्ये, संयुक्त राष्ट्रांचे तत्कालीन महासचिव, यूजीन ब्रँड यांनी तो साजरा करण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून हा दिवस इतर देशांमध्येही साजरा केला जातो. 

महत्त्व-

मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यामागचा उद्देश हा आहे की लोकांना या विषयाची जवळून माहिती व्हावी. अनेक लोक नैराश्य आणि तणाव ही एक छोटी समस्या मानून दुर्लक्ष करतात, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. ही एक अतिशय गंभीर समस्या आहे, ज्यामुळे दरवर्षी शेकडो लोकांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जाते. या दिवशी ठिकठिकाणी शिबिरे घेण्याबरोबरच लोकांना त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी चर्चासत्रही दिले जातात आणि ते टाळण्याचे उपायही सांगितले जातात. 

थीम-

दरवर्षी जागतिक मानसिक आरोग्याची थीम वेगळी असते. या वर्षी (2023) या दिवसाची थीम वर्ल्ड फाउंडेशन ऑफ मेंटल हेल्थने मानसिक आरोग्य हा सार्वत्रिक मानवी हक्क ही ठेवली आहे. 

उपचार- 

बहुतेक लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त असतात. काही लोक या विषयावर उघडपणे बोलण्यासही लाजतात, परंतु असे केल्याने त्यांच्या शारीरिक आरोग्यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. कोणत्याही प्रकारच्या मानसिक विकाराच्या बाबतीत, त्याला हलके घेऊ नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या जेणेकरुन  वेळीच  समस्याचे निराकरण करता येईल. 


संदर्भ: वेबदुनिया


Sunday, 8 October 2023

निरोगी आयुष्यासाठी....

प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचे वैद्यकीय क्रमांक

 1. रक्तदाब: 120/80

 2. नाडी: 70 - 100

 3. तापमान: 36.8 - 37

 4. श्वसन: 12-16

 5. हिमोग्लोबिन: पुरुष (13.50-1

  महिला ( 11.50 - 16 )

 6. कोलेस्टेरॉल: 130 - 200

 7. पोटॅशियम: 3.50 - 5

 8. सोडियम: 135 - 145

 9. ट्रायग्लिसराइड्स: 220

 10. शरीरातील रक्ताचे प्रमाण: 5-6 लिटर

 11. साखर: मुलांसाठी (70-130)

  प्रौढ: 70 - 115

 12. लोह: 8-15 मिग्रॅ

 13. पांढऱ्या रक्त पेशी: 4000 - 11000

 14. प्लेटलेट्स: 150,000 - 400,000

 15. लाल रक्तपेशी: 4.50 - 6 दशलक्ष..

 16. कॅल्शियम: 8.6 - 10.3 mg/dL

 17. व्हिटॅमिन डी3: 20 - 50 एनजी/मिली (नॅनोग्राम प्रति मिलीलीटर)

 18. व्हिटॅमिन बी12: 200 - 900 pg/ml


 काही महत्वाचे टिप्स:

             पहिली सूचना:

  तुम्हाला आजारी वाटत नसताना किंवा कोणताही आजार नसला तरीसुद्धा चुंबकीय पद्धतीचा अवलंब करा चुंबकीय वस्तू सतत आपल्या जवळ असले पाहिजे त्यामुळे शरीराचे रक्ताभिसरण क्रिया व्यवस्थित होते व शरीराला ऑक्सिजन व्यवस्थित मिळतो


          दुसरी सूचना:

  तुम्हाला तहान लागली नाही किंवा गरज नसली तरीही नेहमी पाणी प्या... आरोग्याच्या सर्वात मोठ्या समस्या आणि त्यापैकी बहुतेक शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे आहेत.


           तिसरी टीप:

  तुम्ही तुमच्या व्यस्ततेच्या शीर्षस्थानी असतानाही खेळ खेळा... शरीराला हालचाल करणे आवश्यक आहे, जरी फक्त चालणे... किंवा पोहणे... किंवा कोणत्याही प्रकारचे खेळ.


  चौथी टीप

 जेवण कमी करा...

  जास्त अन्नाची लालसा सोडा...कारण ते कधीही चांगले  स्वतःला वंचित ठेवू नका, पण प्रमाण कमी करा.


          पाचवी टीप

  शक्य तितके, अगदी आवश्यक असल्याशिवाय कार वापरू नका... तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी तुमच्या पायावर पोहोचण्याचा प्रयत्न करा *(किराणा, एखाद्याला भेटणे...) किंवा कोणतेही ध्येय*.


           सहावी टीप

  राग सोडा...

  राग सोडा...

  राग सोडा...

  काळजी सोडून द्या... गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा...

 गडबडीच्या परिस्थितीत स्वतःला गुंतवू नका... ते सर्व आरोग्य कमी करतात आणि जगण्यातील वैभव काढून घेतात.  


          सातवी टीप

  म्हटल्याप्रमाणे..तुमचे पैसे उन्हात सोडा..आणि सावलीत बसा..स्वत:ला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना मर्यादित करू नका..पैसा त्याच्यासाठी  बनवला आहे, जगण्यासाठी नाही.


       आठवी टीप

  स्वतःला कोणाबद्दल वाईट वाटून घेऊ नका,

  किंवा ज्या गोष्टीवर तुम्ही साध्य करू शकत नाही,

   किंवा तुमच्या मालकीची नसलेली कोणतीही गोष्ट.

  त्याकडे दुर्लक्ष करा, विसरा;


           नववी टीप

 नम्रता..पैसा,प्रतिष्ठा,सत्ता आणि प्रभावासाठी..त्या सर्व गोष्टी  अहंकाराने भ्रष्ट झालेल्या आहेत.

  नम्रता ही लोकांना प्रेमाने तुमच्या जवळ आणते.


           दहावी टीप

  जर तुमचे केस राखाडी झाले तर याचा अर्थ आयुष्याचा अंत होत नाही.  चांगले जीवन सुरू झाल्याचा तो पुरावा आहे.  आशावादी, आठवणीने जगा, प्रवास करा, स्वतःचा आनंद घ्या.


  शेवटचा आणि सर्वात महत्वाचा सल्ला

            🙂स्वतःची काळजी घ्या🙂

Thursday, 18 May 2023

स्किझोफ्रेनिया

 सगळं मन फाटलं की माणूस मनोरोगी बनतो. या रोगाचं नाव आहे स्किझोफ्रेनिया. 

या मनोरोगातील लक्षणं आणि धर्मात संपूर्ण बुडून गेलेल्यांचे वागणं बहुतांशी समान असतं!

भ्रम आणि भास हे समान असतात.

स्किझोफ्रेनिया रोगाची लक्षणे अशी आहेत...

● कोणीतरी आपल्या शरीरातील सर्व इंद्रीयं अशी काढून घेतली आहेत की त्याची कोणतीच खूण शरीरावर दिसत नाही! 

● असा विचार की कोणीतरी आपल्यावर नियंत्रण ठेवत आहे.

● कोणीतरी आपल्याला अजिबात किंमत देत नाही किंवा आपल्यावर कोपले आहे. 

● आपण स्वतः एक अतिशय सर्व शक्तीमान असे देव आहोत. 

● कोणाच्यातरी डोक्यातून हात उगवले आहेत किंवा एखाद्याला आठ हात असून ते आठही हात जगावर नियंत्रण ठेवतात. 

● माझ्या विचारांवर, भावनांवर, वागण्यावर, कोणीतरी लक्ष ठेवून आहेत आणि ती अज्ञात शक्ती वाटेल तसे मला वागायला  भाग पाडत आहे.

● मी अस्तित्वातच नाही.. मी हा कोणी दुसराच आहे.. तरीही मी अमर्त्य आहे! 

● आपल्या जोडीदाराचे कोणाबरोबर तरी अफेयर चालू आहे. पुरावा नसला तरी चालूच आहेच. 

● मी त्या अज्ञात शक्तीला दुखावले आहे याचं मनात खूप वाईट वाटतंय, स्वतःला दोष द्यावसं वाटतंय, अपराधीपणा वाटतो. 

● अज्ञात शक्तीला माझे विचार समजत आहेत. 

● माझ्या मनाचा वापर करून दुसरे विचार करून स्वतःचा फायदा करून घेत आहेत. 

● माझा कोणीतरी छळ करत आहे. 

● आजूबाजूच्या प्रत्येक वस्तूला प्राणीमात्राला निसर्गाला काही ना काही तरी अतिशय महत्त्वाचा अर्थ आहे. आणि तो दडलेला आहे. 

● माझ्यावर समोरच्याचे अतिशय प्रेम आहे, पण मला तो ते सांगत नाहीये. 

● मला देवाने देव होण्यास सांगितले आहे आणि दैवी शक्तीने माझी तशी निवड केली आहे. 

● मानवाचे शरीर म्हणजे रोगांचा अड्डा होय आणि असे अनेक जीवजंतू तेथे राहतात. त्यामुळे प्रत्येक मानव हा  रोगट आहे. त्यातून मुक्त होणे म्हणजेच मोक्ष मिळणे होय.

● मला दूर वरचे आवाज देखील ऐकू येत आहेत. कोणीतरी बोलून सांगते आहे. सूक्ष्मात सूक्ष्म असलेला आवाज देखील मी ऐकू शकतो. 

● देव हा माझ्या शरीरावरून प्रेमाने हात फिरवत आहे. 

● अनेक दिवस एक शब्दही बोलत नाही कारण आनंद, दुःख, वगैरे सर्व मोहमाया आहेत. आणि त्याची जाणीव सुद्धा मला होत नाही. 

● सर्व नात्यांचा आणि संसाराचा त्याग करून मला सत्याच्या अंतिम शोधात निघून जायचे आहे.

● मी स्वतः देवच आहे. 

● मी स्वतः प्रेषित आहेत. 

● मी देवाशी सतत बोलतो. विश्वातील अज्ञात शक्तीशी माझा संपर्क आहे. 

● मी अंतराळात विहार करतो. 

● माझे स्थान हे आत्म्याप्रमाणे बदलत असते.


 थोडक्यात भ्रम आणि भास हे स्किझोफ्रेनिया या रोगातही दिसतात आणि ते अतितीव्र धार्मिकता असलेल्या लोकांमध्येही दिसतात. 


जर अशी लक्षणे कोणात आढळत असतील व ते हे सर्व धार्मिक वागणे आहे असे म्हणत असतील तर हा स्किझोफ्रेनिया रोग आहे का हे तपासून बघणे आवश्यक आहे. जर तो स्किझोफ्रेनिया असेल आणि त्याचे वागणे धार्मिक आहे असे समजून तुम्ही गप्प बसाल तर तो रोग बळावत जातो. रोग बरा होण्याऐवजी कमी जास्त होत राहील. तेव्हा अशी लक्षणे आढळून आली तर तात्काळ मनोरोगतज्ञ किंवा सायकीयाट्रिस्टना दाखवून उपचार सुरू करा. 

धर्माच्या साक्षात्कारात किंवा देवाच्या आदेशात अडकून पडू नका!

- डाॅ. प्रदीप पाटील

Friday, 3 February 2023

मानसिक आजार समजून घेताना

 





संदर्भ: मानसिक आजार समजून घेताना (अनिल वर्तक)

Friday, 4 November 2022

बदक की गरुड ?

एकदा विमानतळावर असताना माझी एका टॅक्सी चालकाशी  गाठ पडली आणि त्याच्या टॅक्सीत सर्वप्रथम माझ्या नजरेस एक गोष्ट पडली ती म्हणजे, एक पाटी जिच्यावर लिहिले होते की 

"बदक की गरुड

तुमचे तुम्हीच ठरवा."


दुसरी गोष्ट जाणवली ती स्वच्छ आणि चकचकीत गाडी, ड्रायव्हर अतिशय टापटीप आणि स्वच्छ आणि इस्त्रीच्या ड्रेस मध्ये होता. स्वच्छ पांढरा इस्त्रीचा शर्ट आणि पँट वर टाई.

ड्रायव्हर स्वतः उतरून गाडीबाहेर आला आणि त्याने माझ्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला.  आणि बोलला, 

" माझे नाव जॉन आहे. आणि मी तुमचा वाहक आहे. जो पर्यंत मी तुमचे समान गाडीच्या डिकीत ठेवतो तोपर्यंत आपण माझे हे मिशन कार्ड वाचावे सर."

त्या कार्ड वर लिहिले होते,

जॉन चे मिशन

माझ्या ग्राहकांना लवकरात लवकर, सुरक्षित आणि रास्त दरात त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवणे आणि तेसुद्धा आल्हाददायक आणि मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये.


मी भारावून गेलो होतो.

गाडीतील आतील बाजूही तेवढीच टापटीप आणि स्वच्छ, नीटनेटकी होती. 

जॉन ने मला विचारले. 

"आपल्याला कॉफी घ्यायला आवडेल काय?"

मला त्याची गंमत करायची लहर आली म्हणून मी त्याला म्हणालो. "नाही, मला ज्यूस हवा आहे."

तात्काळ जॉन उत्तरला... 

"काही हरकत नाही सर, माझ्याकडे तीन वेगवेगळ्या थर्मास आहेत. ह्यापैकी एकात ज्यूस, एकात डायट ज्यूस आणि एकात पाणी आहे."

तुम्हाला वाचायचे असेल तर माझ्याकडे आजचे वर्तमानपत्र आणि काही मासिके आहेत. 

जेव्हा आमचा प्रवास चालू झाला तेव्हा जॉन मला म्हणाला की जर मला गाणी किंवा बातम्या ऐकायच्या असतील तर हा रिमोट आहे आणि ह्या वरील नंबर्स प्रमाणे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्याचा आनंद घेऊ शकता. 

मला अजूनही धक्का बसायचा बाकी होता. कारण 

पुढे त्याने अत्यंत मार्दवपूर्ण  स्वरात विचारले. "सर, एसी चे तापमान ठीक आहे की आपणास काही वेगळे हवे आहे?" त्यानंतर त्याने मला माझ्या गंतव्य स्थानी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता आहे हे सांगितले आणि पुढे विचारले की, तो माझ्याशी बोललेले चालेल की त्याने शांत राहावे ? 

न राहवून मी त्याला विचारले, 

_"तू नेहमी तुझ्या ग्राहकांना अशी सेवा देतोस?"_ 


त्यावर तो उत्तरला. "नेहमी नाही, दोन वर्षांपासून देतो आहे. माझ्या सुरवातीच्या काळात मीही इतर टॅक्सी चालकांसारखा सतत तक्रार करीत असे आणि असमाधानी राहत असे, पण एकदा एका डॉक्टर कडून मी व्यक्तिमत्त्व सुधारणांबाबत ऐकले. 


त्यांनी एक पुस्तक लिहिले होते.  त्याचे नाव होते. "तुम्ही जे कोणी आहात त्याने फरक पडतो" ज्यात  पुढे लिहिले होते.  जर तुम्ही सकाळी उठून असा विचार कराल की आज दिवस वाईट जाणार आहे. फक्त अडचणीच आहेत तर खरेच तसेच होईल.  तुमचा तो दिवस वाईट आणि अडचणींचा जाईल. 


बदक बनू नका

गरुड बना

बदक फक्त आणि फक्त आवाज करतो. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देतो. आणि गरुड सर्व समुदायापासून वेगळा आणि उंच उडतो.

आणि माझ्या लक्षात आले की मी सतत रडतो आहे फक्त तक्रारी करतो आहे. 

म्हणून मी स्वत:ला बदलण्याचे ठरविले. माझ्या दृष्टिकोनात बदल करून गरुड बनण्याचे ठरविले. 


मी इतर टॅक्सी चालकांकडे बघितले. अस्वच्छ, गलिच्छ टॅक्सीज आणि आडमुठे चालक आणि म्हणून असमाधानी ग्राहक. असे चित्र होते ते.


मी काही बदल करायचे ठरवले. आणि माझ्या ग्राहकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे नंतर आणखी काही बदल करीत गेलो. 


आणि गरुड बनण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी माझा व्यवसाय दुप्पट झाला आणि ह्यावर्षी आत्तापर्यंतच्या चौपट झालेला आहे. 

तुम्ही सुदैवी आहात की आज मी तुम्हाला इथे सापडलो. अन्यथा आजकाल माझे ग्राहक माझ्याकडे आगाऊ रिझर्व्हेशन करून माझी टॅक्सी सेवा घेत असतात. किंवा मला मेसेज करून माझी टॅक्सी बुक करतात. मला शक्य नसेल तेव्हा मी  अन्य गरुड बनलेल्या टॅक्सीचालक द्वारे ती सेवा ग्राहकाला पुरवतो. 

जॉन बदलला होता. तो साध्या टॅक्सीतून लीमोझीन कार सर्व्हिस पुरवत आहे.  जॉन ने  बदका सारखे सतत आवाज करत, सतत तक्रार करणे सोडून दिले आहे.  आणि गरुडासारखी भरारी मारायला सूरूवात केली आहे.


तुम्ही कुठे आणि काय काम करता याने काहीही फरक पडत नाही तर तुम्ही ते कसे आणि  कोणत्या मनोभूमिकेतून करता याने नक्की फरक पडतो.


 CP

Sunday, 9 October 2022

जागतिक मानसिक आरोग्य दिन


दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी मानसिक आरोग्य शिक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो.हा दिवस पहिल्यांदा १९९२ मध्ये वर्ल्ड मेंटल हेल्थ असोसिएशनच्या पुढाकाराने साजरा करण्यात आला, १५० पेक्षा जास्त देशांमध्ये सदस्य आणि संपर्क असलेली जागतिक मानसिक आरोग्य संस्था.या दिवशी, हजारो समर्थक मानसिक आजार आणि जगभरातील लोकांच्या जीवनावर होणारे त्याचे मोठे परिणाम याकडे लक्ष वेधण्यासाठी हा वार्षिक जागरूकता कार्यक्रम साजरा करण्यासाठी येतात.ऑस्ट्रेलियासारख्या काही देशांमध्ये हा दिवस मानसिक आरोग्य सप्ताहाचा भाग असतो.


१० ऑक्टोबर १९९२ रोजी प्रथम उप-महासचिव रिचर्ड हंटर यांच्या पुढाकाराने जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.इ.स. १९९४ पर्यंत या दिवसाची सामान्य मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देणे आणि जनतेला शिक्षित करणे याशिवाय कोणतीही विशिष्ट संकल्पना नव्हती.

तत्कालीन महासचिव यूजीन ब्रॉडी यांच्या सूचनेनुसार १९९४ मध्ये पहिल्यांदा जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. पहिली थीम होती "जगभरातील मानसिक आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारणे".

जागतिक मानसिक आरोग्य दिनाला विश्व स्वास्थ्य संस्था (WHO) ने पाठिंबा दिला आहे, जो जगभरातील आरोग्य मंत्रालये आणि नागरी समाज संस्थांशी असलेल्या मजबूत संबंधांचा वापर करून मानसिक आरोग्याच्या समस्यांवर जागरूकता निर्माण करतो. डब्ल्यूएचओ तांत्रिक आणि संप्रेषण सामग्री विकसित करण्यात देखील मदत करते.


मानसिक आरोग्य म्हणजे काय?

देशाच्या विकासासाठी आपले आरोग्य फार गरजेचे आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने आरोग्याची परिभाषा अशी दिली आहे, “शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वस्थता असणे आणि फक्त आजार किंवा दौर्बल्याचा अभाव नाही.” वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने मानसिक आरोग्याची परिभाषा अशी दिली आहे, “मानसिक स्वस्थता ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेचा अनुभव येतो, ती जीवनातले सर्वसामान्य ताणतणाव सांभाळू शकते, उत्पादक काम करू शकते आणि समाजाला योगदान देऊ शकते”. या निर्णायक तात्पर्याने असे म्हणता येईल की मानसिक आरोग्य हे व्यक्तीच्या स्वस्थतेची आणि सामाजिक प्रभावी कार्यासाठी संस्थापना आहे.

मानसिक आरोग्याचे प्रभाव ह्यांवर दिसतात -

  • शैक्षणिक निकाल
  • उत्पादनक्षमता
  • सकारात्मक व्यक्तिगत संबंधाचा विकास
  • गुन्हेगारीचे दर
  • मद्य आणि अमली पदार्थाचे वाईट उपयोग / व्यसन

मानसिक आरोग्य का महत्त्वाचे आहे?

४५०० लाख पेक्षा जास्त लोक मानसिक विकाराचा शिकार आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, २०२० साली औदासीन्य (depression) चा दबाव पूर्ण जगात दुस-या क्रमांकावर असेल. (मरे आणि लोपेज, १९९६). मानसिक आरोग्याचा जागतिक दबाव हे विकसित आणि विकास होणा-या देशाच्या उपचारा क्षमता पेक्षा जास्त असेल. मानसिक विकाराच्या वाढत्या भाराशी संबंधित सामाजिक व आर्थिक खर्चा मुळे मानसिक आरोग्याचा प्रचार करण्यास आणि पायबंद व उपचार करण्यास केंद्रित झाले. म्हणून, मानसिक आरोग्य वर्तणुकीवर अवलंबून आहे, आणि शारीरिक आरोग्य व जीवनाच्या दर्जासाठी प्रामुख्याने आवश्यक आहे.

  • शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा फार जवळचा संबंध आहे. आणि हे निःसंदिग्धपणे सिद्ध झाले आहे की औदासीन्यामुळे ह्रदयरोग व नाडी संबंधित रोग होऊ शकतात.
  • मानसिक विकारांचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या दररोजच्या बाबींवर होऊ शकतो, उदा. व्यवस्थित जेवणे, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे, मद्य आणि तंबाखूचे सेवन न करणे, औषधोपचार नियमित घेणे इ. ह्यांचा शारीरिक आरोग्यावर प्रभाव पडू शकतो.
  • मानसिक विकारांमुळे सामाजिक समस्या वाढू शकतात, उदा. बेरोजगारी, विस्कळित कुटुंब, गरिबी, अमली पदार्थाचे व्यसन आणि त्याच्याशी संबंधित गैरकृत्ये इ.
  • कमजोर मानसिक आरोग्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेच्या कार्यावर मोठा प्रभाव पडू शकतो.
  • औदासीन्य असलेल्या रुग्णांना, औदासीन्य नसते अशा रुग्णांपेक्षा जास्त त्रास होतो.
  • मधुमेह, कर्करोग, ह्रदय रोग असल्याने औदासीन्याचे धोके वाढू शकतात.
सर्वांना निरोगी मनस्वास्थ्यासाठी शुभेच्छा🌹🌷


संदर्भ : vikaspedia

Monday, 2 May 2022

विश्रांतीचा अपराध..

 

स्त्रीला निसर्गतः विश्रांतीची गरज असते. ती दुबळी नसते पण तिची यंत्रणा वेगळया पध्दतीनं काम करत असते. एक तास अभ्यास करुन 60% मिळत असतील तर दोन तास अभ्यास करुन 120% मिळणार नाहीत, हे आपल्याला कधी कळणार ?

पुरुषांकडे पाहून तुलना करत स्वतःला आळशी समजणं म्हणजे स्वतःला त्रास देणं आहे. पुरुषाच्या वेळापत्रकात मासिकधर्म नाही, त्याच्या आयुष्यात बाळंतपण नाहीत, मुलांची 'आई' होणं नाही, तरीही विश्रांती घेताना मात्र स्त्रीच्या मनात अपराधीभाव असेल तर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे.

स्त्री हक्कांसाठी लढता लढता विश्रांतीचा हक्कच दुर्लक्षित राहिलाय. कदाचित सुपरवुमन होण्याच्या नादात तिचं स्वतःचंच दुर्लक्ष झालंय. बिरबलाच्या गोष्टीतल्या बाभळी आणि बोरी वेगळया असतात हे विसरुन इतरांना काॅपी करताना स्वतःच्या गरजा, मर्यादा, वेगळेपण ती विसरतेय.

सेलिब्रिटिजवरचे सिनेमे, सोशल मिडियावरचे मोटिवेशनल स्पिकर यशाचे फाॅर्म्युले सांगत असतात. या जगात कष्टाचे गोडवे गाण्याची जुनी प्रथा आहे. सहज यश मिळालं म्हटलं की, त्यात मजा नसते, ड्रामा नसतो. 

टिव्हीवरचे रियालिटी शोज बघा. घरची गरीबी दाखवून कलेला फ्रेम केलं जातं, का?

कलाकार हा कलाकार असतो त्याच्या बॅकग्राऊंडशी तुम्हाला काय करायचंय ? पण नाही ! 

आपल्याला साधं सरळ यश पचत नाही. आपण यशाचा संबंध टाॅर्चरशी जोडलेला आहे, मग तसंच आपल्या अंतर्मनाचं प्रोग्रॅमिंग होतं.

आपण इतरांचं पहातो. लाॅ ऑफ अट्रॅक्शननुसार कष्ट आणि अडचणी मागतो मग यश मिळाल्यावर ते दु:ख मिरवतोसुध्दा ! आपलं मन सहज सोपा मार्ग नाकारतं हे अनकाॅन्शस लेवलला चाललेलं असल्यानं आपल्याला  कळतही नाही. परत प्रश्न विचारत फिरतो की माझ्या मार्गात इतक्या अडचणी का आहेत?

कारण बिलिफ, मनात खोलवर रुजलेलं कष्टाचं व्यसन !

यशस्वी लोकं जे बोलतात ते पुर्ण नसतं. बाह्यमन 10% असतं, अंतर्मनाचं गूढ 90% असतं. मग यशाची सूत्रं विचारली की ते कष्ट सांगतात. त्यांनी स्वतःवर प्रेम केलं, स्वतःला महत्व दिलं, हवा तेव्हा आराम केला हे अस सांगतील तर त्यांच्यावर विश्वास कोण ठेवेल? मी सहज गेले आणि जिंकले अस म्हटलं तर कोण ऐकेल? आपल्याला वेदना ऐकायच्या असतात. डोळयात पाणी आलं पाहिजे.

का? तर उद्या आपल्याला पळ काढायचा असेल किंवा अपयश आलं तर आपले कष्ट कमी पडले असं म्हणता यावं. कारण अहंकार स्वतःचे दोष तर पहातच नाही तो शरीराला दोष देऊन मोकळा ! 

ऐकलंय कधी पालकांना बोलताना, मुलगा / मुलगी हुशार आहे हो, फक्त कष्ट कमी पडतात ! 


दुसरं 

आपला न्यूनगंड आपल्याला सुखानं बसू सुध्दा देत नाही. माझी किंमत मला काम करून सिध्द करावीच लागेल. तरच मी worthy आहे असं आपल्याला वाटतं. यु ट्युबवरचे स्त्रियांचे व्हिडियो पहा, तव्याच्या काळया कडा कशा चमकवायच्यापासून अमक्यापासून तमुक तयार करण्याचे भरमसाठ DIY आहेत. मुलांच्या संगोपनावर तर आयुष्य संपलं तरी शिकणं संपत नाही इतका आईला गिल्ट असतो.

आपण चांगली आई नाहीच असं वाटत असतं. 

कधी विचार केलाय? का? कशासाठी?

कारण स्वतःबद्दल खोलवर मुरलेला न्यूनगंड ! मी गृहिणी आहे तर आहे, आराम करतेय, मला नाही येत एखादी कला, नाही जमत इतरांसारखं. काय हरकत आहे साधं रुटीन आनंदानं जगायला?

आयुष्यभर सासरचं केलं माहेरचं केलं मुलं शिकली यशस्वी झाली. धाव धाव धावले आता आणखी काय? 

अजूनही किंमत कुठे आहे? आता मी सोशल मिडियावर पाहीन कुणी गृहउद्योग करतेय, कुणी कला शिकतेय, कुणी.....

आता मी स्वतःला फटके मारेन, स्वतःला युसलेस म्हणत परत धावायला सुरुवात करेन. त्याला स्वतःची ओळख वगैरे छानसं नाव देईन आणि दमलेली थकलेली परत नवी रेस शोधून काढेन. ताजं फ्रेश दिसण्यासाठी मेक्अप करेन, हसेन.

Stop ! कुठेतरी हे थांबवा, स्वतःला फसवणं.

आपल्याला इतरांच अप्रूवल हवं असतं सारखं काहीतरी करुन. त्यासाठी आपण गिल्ट न बाळगता निवांत बसतही नाही, शांत बसून शरीराला आराम देणंच आपल्याला माहीत नाही.

असच नुसतं बसायचं दहा मिनिटं ?असं कसं ?

ध्यान करु, मंत्र म्हणू पण काहीतरी करु ! 

सतत काहीतरी केलंच पाहिजे या प्रोग्रॅमिंगमधून आपण बाहेर पडलं पाहिजे.

शरीराचं ऐकलं पाहिजे ते बोलत असतं अंग दुखतंय कंबरेत वेदना आहे. खांदा ठणकतोय... ते एका लहान मुलासारखं आई आई ...करतंय पण आई लक्ष देत नाही. एक दिवस ते टाहो फोडतं जोरात रडतं. शरीराचा आक्रोश म्हणजेच आजारपण ! 

तेव्हा शरीराकडे लक्ष जातं, औषधाचा पैसा खर्च करुन आपण विकत काय घेतो तर सक्तीची विश्रांती !  

बरं होऊन आपण परत त्याच जुन्या कामाला लागतो. 


आराम करता आला पाहिजे. लेख वाचणा-या प्रत्येकीला  गिल्ट फ्री विश्रांतीच्या शुभेच्छा... 👍🏻


साभार: आरोग्य मानसशास्त्र

Tuesday, 12 April 2022

स्त्री सुलभ मन गेलं कुठे?

 

माझ्या देशातील भगिनींनो, आपण महिला, क्लारा झेटकीन याना, त्यांनी महिलांसाठी केलेल्या चळवळीसाठी मनापासून  धन्यवाद देत आलोय,देतोय. त्यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय महिला दिन सुरू झाला. स्त्रीला स्वतःचा हक्क मिळाला. ती आपली मतं मांडू शकली. 

  पण, सख्यानो, तुम्हाला माहिती आहे का?स्वतःची मत मांडणं, हक्कासाठी झगडणं, न्यायासाठी पुढे येणं ह्या गोष्टी सुरू असताना, त्या हक्कांचा काही वेळेस गैरवापर होतोय का? हे सुद्धा समाजात, महिलांनी पाहिलं पाहिजे ना?

  महिलांना, योग्य वेळी,योग्य त्या कारणासाठी झगडताना,लढताना पाहिलं की अभिमान वाटतो. आम्हीही आहोत त्यांच्यासोबत!  समाजातील स्त्री वर मानसिक ,शारीरिक अत्याचार,स्त्री भ्रुण हत्या, बलात्कार, शोषण कितीतरी क्लेशदायक गोष्टी पूर्वीपासून आणि अजूनही सुरू आहेत...ह्या घटना एकीकडे हृदय पिळवटून टाकतात. मग, त्यांच्यासाठी आपल्याकडून खारीचा वाटा मदत करताना, शब्दांनी त्यांची पाठ थोपटावी, आधार द्यावा,त्यांना वर उचलून घ्यावं ,त्यांना नवीन जीवन जगण्यास प्रेरणा द्यावी  आणि त्याच शब्दांनी समाजात कस पेटून उठावं? हे ही शिकवलं जातं. आणि त्या महिलांनाही आपला हक्क काय हे समजावं  हे साधे सहज कार्य हे  सुरू असत. पण दुसरीकडे चित्र दिसतंय ते खूपच भयंकर!

     सखी, आपल्यातल्याच काहीजणी आपल्या देशाची संस्कृती , धर्माचे संस्कार पायदळी तुडवत आहेत. विसरत चाललीय का संस्कृती? की साता समुद्रापलीकडच्या मॉड संस्कृतीच आकर्षण वाटून आपल्या संस्कारांचा अवलंब मुद्दाम केला जात नाहीए? तुम्हाला आपले संस्कार 'चीप' वाटू लागलेत? 

   ...हो आता तुम्हाला कसलंही बंधन नको असत. बरोबर ना? तुम्ही लग्नासारख्या पवित्र संस्काराला लाथाडून 'सिंगल' राहण पसंत करत आहात. कारण चतुर्भुज होण्यातली जबाबदारी आता नकोय तुम्हाला.  हवं तेव्हा गरजेपुरत डबल होणं...हे स्वीकारता तुम्ही. कारण त्यात भावनिक गुंतवणूक नसते. तुमच्या अपेक्षा वाढल्यात.. कारण तुमचं पॅकेज वाढलंय! अशा वेळी तुमच्या वयाचा विचार करता? हल्लीची आई सुद्धा मुलीला काय शिकवण देते कुणास ठाऊक? ...मुलीच लग्नाचं वय, मानसिक,शारीरिक बदल ,त्या त्या वयातील गरजा ,गरोदरपण, बाळंतपण , मुलांची वाढ ह्या सर्व गोष्टींचा सारासार विचार आज करण्यात येतो का? कितीतरी मुली फॅशन म्हणून गर्भाशयाच काढून टाकत आहेत. मग गरोदरपण , बाळंतपण काय? हाताचा झुला काय? नी अमृताचा पान्हा काय?  महिलांचं स्त्री सुलभ मन कुठे गेल? त्यांच्या ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक मार्ग मूलं आणि मुलीही शोधतात. अनेक ऑफिस मध्ये, कॉर्पोरेट मध्ये,  अनेक...अनेक... ठिकाणी आज जे चित्र दिसत, ऐकिवात येत,ते भयंकर आहे. विचित्र आहे.

   काही ठिकाणी महिला पुरुषांचं आणि महिलांचंही मानसिक आणि शारीरिक शोषण करत आहेत. मग स्वतः लग्न केलेलं असो वा नसो, बेताल वागणे, कोणतीही मर्यादा नसणे, स्वतःसोबत दुसऱ्याच चारित्र्य ही नष्ट करणे. क्षणभंगुर सुखासाठी दुसऱ्याच्या वैवाहिक जीवनात महिला लुडबुड करताना, व्यभिचार करताना दिसत आहेत.

    हक्क,स्वातंत्र्य याचा योग्य अर्थ न समजून घेता... चक्क अनेक ठिकाणी स्वैराचार करत आहेत. अशा महिलांना सखी म्हणण्याचीही लाज वाटते.

    आणखी एक गोष्ट विचारविशी वाटते,किती स्त्रिया एकमेकींना समजून घेतात? की जगासमोर आम्ही समजून घेतो असा आव आणतात? सासू,सून,नणंद,बहीण,आई, वहिनी,मैत्रीण, शेजारीण? कितीतरी स्त्री नाती... असूया,मत्सर असा काही तुडुंब भरलेला असतो की जर कुणी आपल्या पुढे जाते म्हटलं की एकमेकांचे पाय ओढणे, गॉसीपिंग करणं सुरू होत. आज आपल्याला 'टिपिकल स्त्री' म्हणून जगत, मिळालेल्या संधी वाया घालवायच्या आहेत? की काहीतरी वेगळं करायचंय?  आपला आदर्श ठेवायचा आहे? आपण पुढे जात असताना, 'ती' आणि 'त्या' सोबत येत असतील तर त्यांचा हात धरावा की मागे ढकलाव? काही वेळेस तर स्त्री कडून स्त्रीलाच माणूस म्हणूनही वागणूक मिळत नाही. मग समाज, पुरुष आणि जगाच काय घेऊन बसलात? 

    सर्वतोपरी  विकास साधायचा असेल तर उच्च ध्येयासोबत, निरामय पारदर्शकता , सहिष्णुता, मैत्रीपूर्ण संबंध, सहनशीलता, चिकाटी  या गोष्टी अतिशय गरजेच्या असतात. 

   आपला, आपल्या कुटुंबाचा, राज्याचा,देशाचा विकास आपण स्त्री म्हणून करू शकतो. तेवढं सामर्थ्य आपल्यात आहे. पण प्रत्येक स्त्री ने आज, मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या वागणुकीचा स्वतः विचार करावा.  आपण कुठे योग्य ,अयोग्य वागत आहोत का? आपली विचारसारणी आपलं वर्तन आणि त्यानुसार भोवतालच वलय तयार करत असते. मग त्या वलयातील आजची झाशी, जिजाबाई, सावित्रीबाई ,रमाबाई व्हायचं की अनेकांचे संसार उध्वस्त करण्यास कारणीभूत ठरायच याचा विचार तीनच केला पाहिजे.


*©® सौ अश्विनी कुलकर्णी*

*सांगली*

Friday, 1 April 2022

जागतिक स्वमग्नता दिन विशेष

 आज 2 एप्रिल, जागतिक स्वमग्नता जनजागृती दिवस. या दिनानिमित्ताने जाणून घेऊयात स्वमग्नतेविषयी....











संदर्भ : vachanmitra. com

Tuesday, 29 March 2022

मनाचं कंडिशनिंग

   रशियन शरीरशास्त्रज्ञ एव्हान पॅवलॉव्ह कुत्र्याच्या पचनयंत्रणेचा अभ्यास करीत होता. अन्नाची थाळी दिसल्यानंतर कुत्र्याच्या तोंडातून लाळ गळते, तशीच अन्न घेऊन येणाऱ्या नोकराच्या पावलांचा आवाज ऐकला, तरी कुत्र्याच्या तोंडून लाळ गळते, ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. त्यानं एका ठरावीक वेळेला कुत्र्याला अन्न द्यायला सुरवात केली. पण, त्याच्या काही क्षण आधी तो घंटी वाजवायचा. हीच गोष्ट काही दिवस करीत राहिल्यावर अन्न न देता केवळ घंटी वाजवली, तरी कुत्र्याच्या तोंडून लाळ गळते, असं त्याला आढळलं. या प्रक्रियेला त्यानं 'क्लासिकल कंडिशनिंग' असं नाव दिलं. थोडक्यात, केवळ घंटी वाजली, तरी लाळ गळणं, याची कुत्र्याला लागलेली सवय.                 कुत्र्याला विशिष्ट सवय मुद्दाम ठरवून लावता येते, तशीच गोष्ट माणसाच्या बाबतीतही शक्य आहे, हे आणखी एका शास्त्रज्ञानं दाखवून दिलं आणि यातून बिहेविअरिझम ( वर्तनवाद ) नावाची शाखा मानसशास्त्रात उदयाला आली. डॉ. जे. बी. वॅटसन ज्याला 'वर्तनवादाचा जनक' म्हणतात, त्यानं अल्बर्ट या अकरा महिन्यांच्या मुलावर प्रयोग केला. सुरवातीला अल्बर्ट मजेत सशांसोबत खेळायचा. नंतर अल्बर्ट सशांना स्पर्श करायला जायचा, तेव्हा वॅटसन मोठा भीतीयुक्त आवाज त्याच्या मागं करायचा. हा प्रयोग ५-६ वेळा केल्यानंतर आधी मजेत सशांशी खेळणारा अल्बर्ट ससा दिसला, तरी रडायला लागायचा. वॅटसननं मुद्दाम ठरवून अल्बर्टच्या मनात सशाविषयी भीती निर्माण करून दाखवली. 

         आपलं प्रत्येक चांगलं आणि वाईट वर्तन म्हणजे आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांमधून झालेलं कंडिशनिंग (लागलेली सवय) आहे. मन एकाग्र न होणं, लक्षात न राहणं, प्रश्न विचारण्याचा, उत्तरं देण्याचा आत्मविश्वास नसणं, नेमक्या वेळी तयारी करूनही काहीच न आठवणं, घाम फुटणं, यासारख्या असंख्य गोष्टी आपल्या मनात कंडिशन्ड झालेल्या आहेत. सुरवातीला एक-दोनदा अशा घटना घडल्या, तरी त्या मनात कंडिशन्ड होतात आणि नंतर तशी विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली, की कंडिशन्ड झालेली (सवय झालेली) कृतीच दरवेळी आपल्या हातून घडते. कुणी टिंगलटवाळी केली, तर स्वतःची लाज वाटते, तुम्ही स्वत:ला दूषणं देता. हा प्रसंग मनात कंडिशन्ड झाला. दर वेळी मग तसंच घडतं. ही घटना आपल्याच बाबतीत घडली पाहिजे, असं नाही. दुसऱ्याच्या बाबत असं घडलं, तरी त्याचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो. 

       बऱ्याच समस्या अशाच पद्धतीनं कधीतरी मनात कंडिशन्ड होत जातात. त्याचे परिणाम आपण भोगत असतो. हे परिणाम घालवले नाहीत, तर त्याच चुका वारंवार घडतात, समस्या आणखी वाढतात. आपण हतबल होत जातो. चुकीच्या अनावश्यक गोष्टी आपल्या मनात कंडिशन्ड झाल्या, तशाच त्या घालवताही येतात. तीच कंडिशनिंगची प्रक्रिया वापरून मनाचं रिकंडिशनिंग करता येतं व समस्या घालवता येतात.


(प्रा. राजा आकाश, दै. सकाळ)

Monday, 7 March 2022

शब्दांनी घोळ घातलाय !!

 

बाई...महिला...स्त्री हे शब्द बरोबर आहेत कारण ते स्त्रीलिंगी आहेत. पण... 

हे सर्व शब्द 'मानव' या शब्दाखाली मांडले जातात ! बाई असो, महिला असो, स्त्री असो. त्या सर्व 'मानव' आहेत.

मानव हा शब्द मनु या शब्दापासून बनलाय. मनुचा अर्थ आहे ब्रम्ह्याचा पुत्र, अंतःकरण, मंत्र. 

पुत्र हा अर्थ घेतला तर स्त्री पुत्र होऊ शकत नाही. म्हणजे पुल्लिंगी होऊ शकत नाही. मग स्त्रीसाठी 'मानव' या अर्थी स्त्रीलिंगी शब्द कोणता?

कोणताच नाही.

मग स्त्रीने पुरूषी, पुल्लिंगी शब्दाचा आधार घेऊन स्वतःला मानव म्हणवून घ्यायचे.

पुरूषांच्या आधारे स्वतःचे अस्तित्व दाखविणे हे स्त्रीसाठी क्लेशकारक स्त्रीलाच वाटत नाही.

स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी झगडणार्या सर्व स्त्रिया पुरूषी शब्द 'मानव व मनु' वर परावलंबी आहेत.

कारण मानव या पुरूषी शब्दाला स्त्रीलिंगी पर्यायी शब्दच उपलब्ध नाही!

मग परंपरा म्हणून तोच शब्द  वर्षानुवर्षे वापरणे चालूच आहे.  स्त्री मुक्त शब्दशः अजुनही व्हायची आहे!!

सामान्य बोलीत त्या माणूस आहेत. बोलताना देखील 'बाईमाणूस' असा शब्द वापरला जातो. शब्दांचा घोळ आहे तो इथेच. म्हणजे... 

माणूस हा शब्द पुल्लिंगी आहे. आणि पुल्लिंगी शब्द हा या सर्व मानवजातीचा प्रमुख बनला आहे. म्हणजे स्त्री, बाई किंवा महिला यांच्यासाठी मानव किंवा माणूस हा शब्द सर्रास वापरला जातो. 

भाषा जेव्हा निर्माण झाली तेव्हा ती आदिम अवस्थेत होती. आणि आदिम अवस्थेतला मानव हा नरपशू होता. माद्यांवर मालकी, अत्याचार आणि अंकुश ही त्याची शस्त्रे तो अथकपणे वापरत होता. स्त्री आणि पुरुष हे सुरुवातीला नर आणि मादी या नावाने ओळखले जात. म्हणजेच शब्दाने ओळखले जात. पण नराचे वर्चस्व अबाधित होते. हेच वर्चस्व शब्दांमध्ये देखील उतरले आहे. स्त्री साठी वापरले जाणारे शब्द हे नरप्रधान आहेत! पुरुषप्रधान आहेत!! 

माणूस प्रधान आहेत!!! 

मानव प्रधान आहेत..!

म्हणजे तुम्ही-आम्ही सहज बोलताना देखील स्त्रियांवर पुरुषी शब्द लादत असतो. माणूस हा शब्द आपण  माणुसकी या अर्थाने जर बघितला तर स्त्री साठी सुद्धा  माणुसकी या अर्थाने शब्द माणूस शब्दांतून येतो. म्हणजे विशेषण जे आपण वापरतो स्त्रीसाठी ते पुरुषी आहे किंवा पुल्लिंगी आहे.

स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी हे व्याकरण दृष्ट्या आणि आणि जीवशास्त्रदृष्ट्या भाषेसाठी स्पष्टपणे व्यक्त व्हायला हवे. अन्यथा पुरुष वाचक शब्द स्त्रीवर लादले जाणे सहज शक्य होते. किंबहुना ते आत्ता झालेच आहे. 

जीवशास्त्र दृष्ट्या बघितले तर नर आणि मादी हे शब्द योग्य आहेत. पण स्त्री साठी इतर शब्द जर पाहिले तर मात्र प्रत्येक शब्द हा 'पुरुष' गृहीत धरून बनला आहे.

म्हणजे इथेही शब्दांचा घोळ आहे...

स्त्री हा शब्द संस्कृतमध्ये ज्या अर्थाने वापरलेला आहे तो असा- 

" त्सायेते शुक्र शोणिते यस्याम सा स्त्री ". 

याचा अर्थ असा आहे की, स्त्री म्हणजे जिच्यामध्ये शुक्र आणि रक्त यांचा संचार असतो ती व्यक्ती. शुक्र म्हणजे पुरूषांचे वीर्य. म्हणजे इथे स्त्री कोण आहे ? 'तो' वीर्य जिच्यात सांडतो 'ती'! वीर्याशिवाय स्त्री बनू शकत नाही का? 

सूत्री किंवा सोत्रि या शब्दापासून बनलेल्या स्त्रीचा एक अर्थ आहे जी मुलं धारण करते ती. स्त्री फक्त मुलं पैदा करते? त्यापलीकडे ती काहीच करत नाही? 

स्त्रीचा दुसरा अर्थ असा आहे की स्त्री म्हणजे भार्या, बायको, मादी. जी पुरूषाशिवाय राहते ती कोण?

आयुर्वेदात म्हटले आहे... स्त्रवते अशी जी स्त्रावण म्हणजे स्त्री.

पुरूष देखील स्त्रवतो. दुसरे म्हणजे रक्त स्त्रावणे एवढे एकच काम स्त्रीचे असते का?

'स्त्यै' या धातूपासून स्त्री हा शब्द बनला आहे असेही म्हटले जाते. याचा अर्थ आहे, लाजून चूर होणे म्हणजे..

" लज्जार्थस्य लज्जन्तेपि हि ता:l" 

स्त्री लाजते..पण पुरुषही लाजतो. पण त्यांची कारणे ही जन्मताच नसतात. लाजणे ही एक समाजामध्ये संस्काराने निर्माण होणारी गोष्ट आहे. आज तर स्त्री डोळ्यात डोळे घालून पुरुषाच्या बरोबरीने कामे करते आहे. ती कुणी लाजणारी बाहुली बनलेली नाही. 

पतंजलीने पाणिनीय सूत्र घेऊन म्हटले आहे की.. 

" स्तन-केशवती स्त्री स्यात्लोमशः पुरूष: स्मृत: l"

 म्हणजे जिला स्तन आणि केस असतात अशी स्त्री. खरेतर पुरुष आणि स्त्री दोघांनाही केस असतात. जीवशास्त्रीय दृष्ट्या स्तन दोघांनाही असतात. सस्तन प्राणी फक्त स्त्री नसते. पुरूषही आहे.  

ऋग्वेदात म्हंटले आहे.. 

" स्त्रिय: एव एता: शब्द-स्पर्श-रूप-गन्धहारिण्य: l"

म्हणजे स्त्रीच्या शब्द, स्पर्श, रूप, वगैरेंनी पुरुष आपली मानसिक तृप्ती करतो. पण स्त्री देखील आपली मानसिक तृप्ती पुरुषाच्या शब्द,रूप, इत्यादींनी करते. मग पुरुषाच्या तृप्तीची गोष्ट समोर ठेवून स्त्रीचा शब्द तयार करणे हे पुन्हा पुरुषसत्ताक शब्द लादणे होय. 

ज्योतिषशास्त्र लिहिणाऱ्या वराहमिहिर याने...' जिला नुसते पाहिले किंवा जिचे नुसते ऐकले किंवा तिची नुसती आठवण झाली तरी सुखच सुख मिळते अशी म्हणजे कोण असेल तर ती स्त्री होय' असे बृहत्संहिता या ग्रंथात म्हटले आहे. 

" श्रुतं दृष्टं स्पृष्टं स्मृतमपि नृपा ह्लादजननं न रत्न स्त्रीभ्योन्यत् क्वचिदपि कृतं लोकपतिना l"

पुरूषाची स्त्रीभोगी लालसा यातून व्यक्त होते. स्त्रीसुख एवढ्याच चौकटीत जर, पुरूषांनी आपली नजर ठेवली तर प्रत्येक स्त्री मादीच राहील. आणि तो नर. पशुपातळीवरील व्यवहार!

नारी हा शब्द नर पासून बनलेला आहे. काहींच्या मते नर याचा अर्थ आहे नाचणारा पुरुष. जेव्हा कामपूर्ती साठी हातापायाने जो नाचतो व नाचवतो तो नर होय. आणि नराच्या या कामपुर्तीत स्त्री सहभागी होते म्हणून ती नारी ठरते. 

स्त्रीयांविषयी विचार करताना सेक्सच्या पलीकडे पुरूषाची नजर "या" अर्थाने कशी जाणार?

 तीच गोष्ट महिला या शब्दाची आहे. पतीचा सन्मान करणारी म्हणजे महिला. स्त्री साठी वापरल्या जाणार्या प्रत्येक शब्दात पुरूष कशासाठी? 

माणूस या अर्थाने स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी इंग्रजीत देखील ह्युमन हा शब्द वापरला जातो. यामध्ये ह्यु+मॅन आहे.  मॅन म्हणजेच पुरुष याचा अंतर्भाव आहे. तिथेही परंपरेनं सुरुवातीपासून स्त्रीसाठी मानव या अर्थाने योग्य शब्द तयार केला नाही.

इंग्रजीत 'वुमन आणि फीमेल' असे शब्द आहेत. म्हणजे इथेही 'मॅन किंवा मेल' हे पुरुष आलेच. म्हणजे स्त्री शब्दांसाठी  जिकडंतिकडं पुरूष चिकटलाय!

स्त्रियांसाठी असलेल्या भाषेच्या  दुर्भिक्ष्यासाठी बदल घडवायला हवंय. नवीन शब्द शोधून काढायला हवेत. यासाठी स्विडन देशात सातत्याने प्रयत्न होत आहेत. भाषिक वृद्धीची चळवळ व्हायला हवीय. जर भाषेतच लिंग भाव असेल तर लिंग द्वेष किंवा लिंग असमानता फैलावलेलीच राहील. 

स्त्रीवादी भाषा सुधारणा किंवा फेमिनिस्ट लँग्वेज रिफाॅर्म आंतरराष्ट्रीय स्तरावर ५० वर्षापूर्वी ध्यानात आलं होतं. अँड्रोसेंट्रीजम इन ग्रामर या अर्थाने त्याकडे लक्षही वेधण्यात आले. मराठीत तर या सगळ्याचा विचार देखील झालेला नाही. आॅस्ट्रेलिया, फ्रान्स या देशांनीही या विषयी पुढाकार घेतला होता. 

पुरूषसत्ताक व्यवस्था मोडीत काढायची असेल तर भाषा आणि शब्दांपासून सुरवात करावी लागेल!

- डाॅ. प्रदीप पाटील

Friday, 18 February 2022

मानसशास्त्रीय विचारधारा

 

  • आपल्या हावभावांसह कसे बोलायचे हे आपणास कधीच शिकवले जात नाही, परंतु आपल्याला शब्दांद्वारे बोलणे शिकविले जाते.  

                                    - पौल एकमन


  • ज्या लोकांचा आम्ही तिरस्कार करतो त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जर आपला विश्वास नसेल तर आम्ही त्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही.                                   -नोम चॉम्स्की

  • माझ्या पिढीचा महान शोध असा आहे की मनुष्य त्यांच्या मनोवृत्तीत बदल करून आपले जीवन बदलू शकतो.                                                           -  विल्यम जेम्स


  • अप्रभाषित भावना कधीही मरत नाहीत. त्यांना जिवंत पुरले आहे आणि नंतर ते आणखी वाईट मार्गाने बाहेर येतात.

                                         - सिगमंड फ्रायड


  • ज्या लोकांचा असा विश्वास आहे की त्यांच्या जीवनात काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्याची शक्ती आहे, त्या लोकांपेक्षा आरोग्यासाठी अधिक प्रभावी आणि यशस्वी आहेत ज्यांना त्यांच्या जीवनात बदल करण्याची क्षमता नाही यावर विश्वास नाही 

                                        -अल्बर्ट बंडुरा


  • एखादी व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या निष्क्रीय असेल तर तो नैतिकदृष्ट्या मुक्त होऊ शकणार नाही.

                                        -जीन पायगेट

  • तुम्हाला सर्व काही माहित आहे असे कधीही समजू नका. आपण स्वत: ला किती उच्च महत्त्व देता, तरीही स्वत: ला सांगण्याची हिम्मत ठेवा: मी अज्ञानी आहे 

                                           -इवान पावलोव्ह


  • पूर्णत: साध्य नसतानाही आपण उच्च ध्येय राखण्याचा प्रयत्न करून चांगले होऊ.

                                        - विक्टर फ्रेंकल


  • बर्‍याच सामाजिक घटना संदर्भात समजल्या पाहिजेत कारण वेगळ्या झाल्यास त्यांचा अर्थ गमावतो.

                               -सोलोमन अस्च


  • आपल्याला खरोखर काहीतरी समजून घ्यायचे असल्यास ते बदलण्याचा प्रयत्न करा.

                                           -कर्ट लेविन


  • आपल्या अंतःकरणाचे अनुसरण करा परंतु आपल्या मेंदूला आपल्याबरोबर घ्या 

                                         -अल्फ्रेड अँडलर


  • देणे हे प्राप्त करण्यापेक्षा अधिक आनंद देते, कारण ते वंचित आहे असे नव्हे तर देण्याच्या कृतीतून माझे चैतन्य व्यक्त होते.

                                                -एरिक फ्रोम


  • अपरिपक्व प्रेम म्हणतात: "मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मला तुझी गरज आहे." प्रौढ प्रेम म्हणतात: "मला तुझी गरज आहे कारण मी तुझ्यावर प्रेम करतो".

                                                 -एरिच फोरम


साभार :  https://mr1.warbletoncouncil.org 

Saturday, 29 January 2022

रोगप्रतिकारशक्ती कमी झाली.. कसं ओळखाल?

 संवाद हा आपल्या जगण्यातला अतिशय महत्त्वाचा घटक. कोणी आपल्याशी बोलायला नसलं, आपण एकटे असलो तरी संवाद थांबत नाही. आपण मनातल्या मनात आपल्या स्वत:शी संवाद साधत राहातो. संवादामुळे मन मोकळं होतं, ज्ञान मिळतं, असलेलं ज्ञान  इतरांपर्यंत पोहोचतं. रंजन-मनोरंजन होतं.  माहितीची देवाण घेवाण होते. जगण्यात संवाद नसता तर काय झालं असतं? आपण कसे जगलो असतो, याचा विचार देखील करवत नाही. इतका संवाद महत्त्वाचा आहे. पण म्हणून आपण संवादाकडे खरंच लक्ष देतो का? असा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे आपलं आपल्या शरीराकडे. आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष. शरीराच्या आत विविध क्रिया सुरु असतात. त्या जाणवतही नाही इतक्या त्या सहज होतात. पण त्यात काही अडथळा आल्यास, काही बिघाड झाल्यास त्याची कुणकूण शरीराला लागते. शरीर आपल्याला आरोग्याबाबतीत काहीतरी बिघडलंय हे सांगण्याचा प्रयत्न विशिष्ट लक्षणांद्वारे करत असतं. पण शरीर आपल्याशी साधणाऱ्या संवादाकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आजारी पडतो. म्हणून तज्ज्ञ म्हणतात, की शरीर काहीतरी सांगत असतं, ते ऐकायला, समजून घ्यायला शिकलात तर निरोगी राहाण्याचा मार्ग सहज सापडतो.  आपण निरोगी आहोत, सशक्त आहोत  हे जसं आपलं शरीर सांगतं तसेच आपल्या आरोग्याचं रक्षण करणारी रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे हे देखील  शरीर आपल्याला सांगत असतं. याकडे जर दुर्लक्ष झालं तर आजारांपासून आपण आपल्या आरोग्याचं रक्षण करु शकत नाही. 


    कोरोना संसर्गापासून आपल्याला रोगप्रतिकारशक्तीची आपल्या आरोग्य राखण्यातली भूमिका किती महत्त्वाची आहे हे कळायला लागलं. विविध प्रकारच्या विषाणुंचा, घातक जिवाणुंचा संसर्ग होण्यापासून केवळ आपल्याकडील रोगप्रतिकारशक्तीच आपल्याला वाचवू शकते असं आरोग्यतज्ज्ञ सांगत आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे लक्ष देऊन आपली  रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं आपण मनावर घ्यायला हवं. आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती  चांगली की ढासळलेली हे समजून घेण्यासाठी  कुठल्याही बाहेरच्या तपासण्यांची गरज नसते. आपलं शरीर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचं विशिष्ट लक्षणांद्वारे सांगत असतं.  लक्षणांद्वारे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे हे ओळखता येतं. या लक्षणांकडे लक्ष देण्याची, ती वेळेत लक्षात घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवून आपण आपल्या आरोग्याचं रक्षण करु शकतो. 


रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याची काही लक्षणे

1. सतत थकवा वाटणं

शारीरिक किंवा बौध्दिक कष्टाचं काम केल्यानंतर शरीराला, मेंदूला थकवा येतो. थोडासा आराम केला, काही खाल्ल्यास ऊर्जा येते.   झोपेतून उठल्यानंतर सकाळी छान वाटतं. ताजंतवानं वाटतं.  पण रात्री खूप वेळ झोपूनही सकाळी आपल्याला जर थकवा वाटत असेल, उत्साह वाटत नसेल , कष्टाचं काम न करताही थकल्यासारखं वाटत असेल, उठल्यानंतरही परत झोपावसं किंवा सुस्त वाटत असल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे हे समजावं.  रोज व्यायाम केल्यास थकलेल्या शरीरला ऊर्जा मिळते. त्याचा परिणाम रोगप्रतिकारशक्ती वाढण्यावर होतो. पण व्यायाम करुनही थकवा जात नसेल, व्यायाम केल्यानंतरही थकवा जास्त वाटत असल्यास वैद्यकीयतज्ज्ञांचा सल्ला घेण्याइतपत आपली रोग प्रतिकारशक्ती कमी झाली आहे हे समजावं.


2. टिकून रहाणारी सर्दी आणि खोकला

प्रौढ व्यक्तींना वर्षातून दोनदा सर्दी पडसं होणं, खोकला होणं ही सामान्य बाब आहे असं तज्ज्ञ  म्हणतात. सर्दी  खोकला झाल्यावर त्याचा मुकाबला करण्यासाठी शरीर औषधं घेण्याआधीच सज्ज होतं. सर्दी खोकल्याशी नैसर्गिक रित्या लढण्यासाठी आवश्यक ती प्रतिपिंडं ( ॲण्टिबाॅडीज)विकसित करण्यासाठी आणि त्यांच्याशी लढण्यासाठी किमान 3 ते 4 दिवस लागतात. 4-5 दिवसानंतर सर्दी खोकला औषधाशिवायही कमी व्हायला लागतो.  याचं कारण आपली रोगप्रतिकारशक्ती. पण तिच जर कमजोर असेल तर सर्दी खोकला 4-5 दिवसात आपोआप कमी न होता, तो वाढतो, आठवडा उलटून गेल्यावरही टिकून राहातो. दीर्घकाळ टिकून रहाणारी सर्दी आणि खोकला आपली रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याचं सांगते. 


3.  पोटाच्या पचनाच्या समस्या

पचनाचा थेट संबंध हा रोगप्रतिकारशक्तीशी असतो. एखाद्याचं पोट जर कायमच खराब असेल, पचनाशी निगडित समस्या जर एखाद्याला कायमच सतावत असतील तर तज्ज्ञांच्या मते अशी व्यक्ती कधीच निरोगी राहात नाही. वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात की आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या ऊती आपल्या आतड्यात असतात.  वारंवार जुलाब होणं, आतड्यांना सूज येणं, बध्दकोष्ठतेचा त्रास कायम जाणवणं या पोटाशी, पचनाशी निगडित समस्या आपली रोगप्रतिकारशक्ती कमजोर असल्याचं सांगतात.


4. नेहमीपेक्षा जास्त तणाव घेणे

रोगप्रतीकारशक्ती कमी झालेली असल्यास छोट्याछोट्या गोष्टींचा ताण येतो, सोपी सहज कामं करताना चिडचिड होते. ताणतणाव जास्त झाल्यास , चिडचिड होत असल्यास  त्याचा परिणाम म्हणून रोगप्रतिकारशक्ती आणखी कमी होते. आपली रोगप्रतिकारशक्ती ही रक्तातील पांढऱ्या पेशी, लसिका ग्रंथी आणि शरीरातील प्रतिपिंडांवर अवलंबून असते.  मानसिक ताणतणावाचा परिणाम या तिन्ही गोष्टींवर होतो. म्हणून एरवीपेक्षा आपण जास्तच चिडचिड करतोय किंवा सततच्या तणावानं अस्वस्थ वाटत असल्यास आधी डाॅक्टरांकडे जावं. दुर्लक्ष केल्यास कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती आणखी कमकुवत होते. 


5. जखमा भरायला उशीर लागणे

काम करताना, चालताना हातापायाला छोटी जखम झाली तर ती दोन तीन दिवसात भरायला लागते, हे प्रत्येकाला कळतं. पण छोट्या जखमा भरायलाही शरीर जास्त वेळ घेत असेल तर त्याचा संबंध कमी झालेल्या रोगप्रतिकारशक्तीशी असतो.  म्हणून सावध होवून डाॅक्टरांकडे जाणं हा योग्य उपाय ठरतो.


(संदर्भ :  लोकमत)


Monday, 3 January 2022

सोशल मीडिया आणि मेंदू


पहिली पिढी

जिच्या सामाजिक आंतरक्रिया आणि संवाद प्रामुख्याने ऑनलाईन जगात आकाराला येतात, अशी मानवी इतिहासातील पहिली किशोरवयीन पिढी आपण एकविसाव्या शतकात पाहतो आहोत. तिचे भावविश्व सोशल मिडियाने व्यापलेले आहे. या माध्यमाने देहाने दूर असणाऱ्यांना परस्परांच्या जवळ आणले. जीवनातल्या सुख-दु:खाला त्वरित व्यक्त करण्याची संधी दिली. जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटनांची माहिती २४×७ पुरवायची जबाबदारी घेतली. आणीबाणीच्या प्रसंगात तात्काळ मदतीसाठीचे मार्ग उपलब्ध करून दिले. अन्न-वस्त्र-निवारा या शारीरिक गरजांइतकीच ‘संवाद’ ही मूलभूत मानसिक गरज असल्याने ती भागवण्याची मोठीच सोय करणारा हा ‘सोशल मिडिया’ आता केवळ त्यांच्याच नाही तर प्रौढांच्याही जीवनाचा अविभाज्य घटक बनू पाहतो आहे! मात्र, छोट्या-छोट्या सुखांचे आवळे सतत चाखायला देणाऱ्या या सोशल मीडियाला त्याबदल्यात आपण ‘बुद्धीचा कोहळा’ तर काढून देत नाही आहोत ना? प्रश्न थोडा विचित्र वाटेल, पण मेंदूचे अभ्यासक, डॉक्टर्स, मानसोपचारतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, सुजाण पालक या साऱ्यांनाच हा प्रश्न भेडसावतो आहे. एवढेच नव्हे, तर ज्यांनी हा उद्योग यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली त्यांनीही आता ‘जागल्या’ची भूमिका घेत या संभाव्य धोकयांचे स्पष्ट संकेत दिले आहेत.


हि खालील काही उदाहरणे पहा :

१. ‘मादक द्रव्यसेवन आणि जुगार खेळताना मेंदूतील जे चेतामार्ग उत्तेजित होतात, तेच मार्ग स्मार्टफोनवर सोशल मीडिया वापरताना उत्तेजित होतात’ – ख्रिस मारसिलिनो, ‘आय फोन’चे ‘पुश’ नोटिफिकेशन विकसित करणारा तज्ञ


२. ‘मेंदूतील डोपामाइन या चेतरसायनावर आधारीत तात्काळ सुख देणारी जुळणी खऱ्याखुऱ्या सामाजिक संवादास मारक ठरेल हे माहीत असूनही, याच मानवी कमजोरीचा फायदा घेत आम्ही ‘फेसबुक’चे आर्थिक साम्राज्य उभारले. त्याबद्दल मला प्रचंड अपराधी वाटते’. – चामथ पलिहापितीया, माजी व्हाईस प्रेसिडेंट, ‘फेसबुक’ ग्राहक वृद्धी विभाग


३. ‘अवधान क्षमतेचा ऱ्हास/नाश करणारी बलाढ्य अर्थव्यवस्था आम्ही निर्माण केलीयं. आता तिचे धोके समाजाला समजावून सांगत, तिचा सर्व पातळ्यांवर विवेकी वापर वाढावा यासाठी मी प्रयत्नशील आहे’. – ट्रायस्टन हॅरिस, प्रॉडक्ट व्यवस्थापक, ‘गुगल’ कॉर्पोरेशन


४. ‘स्क्रीनच्या वापराने होणाऱ्या अवधान क्षमतेच्या ऱ्हासापासून आपल्या देशाची पुढची पिढी वाचवण्यासाठी शाळांमध्ये स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घातलेली आहे’. – जिन-मिशेल ब्लॅक्वेर, फ्रान्सचे शिक्षण मंत्री (सप्टेंबर, २०१८ पासून हा कायदा तिथे अंमलात आलाय).


डोपामाईनवर आधारीत उद्योग...


मानवी उत्क्रांतीचा विचार केला तर सुख देणाऱ्या वर्तनाची माणूस पुनरावृत्ती करताना दिसतो. चविष्ट अन्नाची मेजवानी, लैंगिक सुख, केली गेलेली स्तुती अशा अनेक गोष्टींसाठी माणूस हपापलेला असतो. ते मिळाले की डोपामाईन नावाचे रसायन (तांत्रिक भाषेत चेतपारेषक) मेंदूत स्त्रवते आणि सुखाची अनुभूती येते. मात्र, हे हवहवेसे वाटणारे सुख तात्पुरत्या काळापुरते असते. त्यामुळे ते पुन्हापुन्हा मिळावे यासाठी माणूस खटपट करीत राहतो. नेमकी हीच मानवाची कमजोर बाजू सोशल मिडियाने विविध संशोधनांतून सखोल अभ्यासली आहे. त्यांचे फायद्याचे गणितच मुळात जाहिरातींवर आधारलेले असल्याने त्या मिळवण्यासाठी वापरकर्त्यांची नजर सतत स्क्रीनवर खिळवून ठेवण्याची आवश्यकता त्यांना आधी जाणवलेली होतीच. मग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर सुखाची झुळूक सतत निर्माण करण्यासाठी  ‘डोपामाइन’ कार्यन्वित करू शकणारे अत्युच्च दर्जाचे संगणकीय ‘अल्गोरीदम्स’ म्हणजेच प्रोग्राम्स या कंपन्यांनी बनवले आणि अब्जावधी डॉलर्सचा धंदा उभारला! विविध प्रकारचे भाव व्यक्त करणारे इमोजी, रंगीबेरंगी शब्दांच्या-चित्रांच्या-‘गिफ’च्या माध्यमातून केलेले कौतुक, ओळखीच्या व्यक्तींचे सकारात्मक संदेश, चोवीस तास नोटिफिकेशनची आणि अलर्टची सुविधा, भूतकाळातील स्मृतींचे कोलाज उपलब्ध करून देणे, लाईक्सची संख्या देणे, अनेकांशी संपर्क करण्यास सुचवणे, आवडीनिवडीनुसार विविध गोष्टी सतत पुरवत राहणे...किती गोष्टी सांगाव्यात! अशा सुखावणाऱ्या पर्यावरणाची करोडो लोकांना भुरळ पडली नसती तरच नवल! त्यातही तात्कालिक सुखाच्या पाठीमागे धावण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांना तर सोशल मिडियाचे व्यसन लागणेही ओघानेच आले. कोरोनाच्या महामारीने यात भरच घातली आणि आता सोशल मीडिया नियमितपणे न वापरणारे शोधावे लागतील अशी स्थिती आहे.


माणसाची आवड सवयीत कशी बदलते आणि सवय व्यसनात कशी परावर्तित होते याबाबतचे अनेक सिद्धांत मानसशास्त्रातील संशोधकांनी प्रस्थापित केलेले आहेत. त्यातील स्कीनर नावाच्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने (याने पहिल्या महायुद्धात कबूतरांना प्रशिक्षण देऊन शत्रूपक्षांवर बॉम्ब टाकण्याचा प्रस्ताव अमेरिकन लष्कराला सादर केला होता.) प्रथम सिद्ध करून दाखवलेली ‘बदलती प्रबलन सारणी’ सोशल मीडिया कंपन्या सर्रास वापरताना दिसतात. यात वापरकर्त्याची आशा सतत वाढती राहील आणि तो पुन्हापुन्हा आपल्या वॉलवर येत राहील अशा पद्धतीने त्याला संदेश देण्याची व्यवस्था अतिशय सूत्रबद्ध रीतीने केलेली असते. त्यासाठी जागतिक दर्जाच्या तज्ञांची भलीमोठी फौज कंपन्यांच्या दिमतील असते. ‘डोपामाइन लॅब’ या कॅलिफोर्नियामधील कंपनीच्या अभ्यासानुसार इन्स्टाग्राम नव्या ग्राहकांना मिळणारे सुरुवातीचे ‘लाईक्स’ हेतूपूर्वक दडवून ठेवते की जेणेकरून वापरकर्त्यांचे मन खट्टू होईल आणि ते पुन्हापुन्हा ‘इन्स्टा’वर येतील. नंतर मग एकदम सारे ‘लाईक्स’ दाखवले जातात आणि डोपामाइनचा प्रवाह मेंदूत वाहू लागून ते खूप खुश होताना दिसतात! ‘फेसबुक’ यासाठी शब्दांचे रंग, उडणारे फुगे आदी अनेक क्लृप्त्या सतत लढवत असते. नोटिफिकेशन ‘ऑन’ ठेवण्याचे डिफॉल्ट सेटिंग यासाठीच तर असते. आता आपण म्हणू की छोटे-छोटे विरंगुळयाचे, संवादाचे, विनोदाचे, कौतुकाचे क्षण आपल्याला सोशल मीडिया उपलब्ध करून देत असेल तर छानच आहे की. त्यात बिघडले कोठे? तर्क खरंच बिनतोड आहे पण जरा गंभीर विचार केला तर दुसरी बाजूही समोर येते.


... अवधानक्षमतेचा ऱ्हास


एकाचवेळी अनेक कामांमध्ये लक्ष विभागले जात असेल तर ‘समग्रतेकडून सूक्ष्माकडे’ जाण्याचा प्रक्रियेस खीळ बसते. आपली खोलात जाऊन आकलन करण्याची क्षमता कमी कमी होत जाते आणि दीर्घकालीन स्मृती विकसित होण्यात अडथळा निर्माण होतो. खरेतर कोणत्याही कामातली अत्युच्च गुणवत्ता गाठण्यासाठी त्यात खोलवर बुडी मारावी लागते. आजूबाजूची सारी व्यवधाने गळून पडावी लागतात आणि दीर्घकाळ एकाग्रचित्ताने कार्यरत व्हावे लागते. त्यातूनच  सर्जनशील आनंदाची आणि सार्थकतेची अनुभूती येते. सोशल मिडियावर दीर्घकाळ राहणारी मंडळी या अनुभूतीला पारखी होत आहेत अशी अनेक संशोधने सांगत आहेत (उदा. ली, २०१५). त्यांच्या मेदूतील ऍन्टिरिअर सिंग्यूलर कॉर्टेक्समधील ग्रे मॅटरची दिसून आलेली कमतरता याचेच निदर्शक आहे. नोमोफोबिया (नो मोबाईल फोन फोबिया) असणाऱ्या कुमारांच्या मेंदूमध्ये ‘गाबा’ रसायनाची अतिरिक्तता आणि ‘ग्लुटामेट-ग्लुटामाइन’ची कमतरता आढळल्याने अवधान केंद्रित करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दक्षिण कोरियन विद्यापीठातील अभ्यासात दिसून आले आहे. कोणतेही काम करत असताना १५ सेकंदांपेक्षा जास्त काळ इतर गोष्टींकडे आपले अवधान गेल्यास मुख्य कामामधल्या चुकांची संख्या लक्षणियरीत्या वाढते असे अनेक संशोधनांचे एकत्रित निष्कर्ष सांगतात. २००० ते २०१३ या कालावधीत कॅनडामधील लोकांच्या अवधान क्षमतेमध्ये ३३ टक्क्यांनी घट झाल्याचा निष्कर्ष ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीच्या २०१५ च्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलने सोशल मिडियाच्या वापरवृध्दी बरोबरच अवधान अक्षमतेने बाधित विद्यार्थ्यांच्या संख्येतही प्रचंड वाढ होत असल्याचा इशारा दिला आहे. चीनमधील ७००० शालेय विद्यार्थ्यांवरील संशोधनातूनही असेच निष्कर्ष हाती आलेले आहेत. सततच्या सोशल मिडियामध्ये डोकावण्याच्या सवयीमुळे कामातली एकाग्रता वारंवार भंग पावत आहे. त्यामुळे  उत्पादक कार्याचा कालावधी जवळपास ४० टक्क्यांनी कमी होत असून (उदा. मेयर) भविष्याचा सारासार विचार करून बौद्धिक नियमन करणाऱ्या मेंदूमधील प्री-फ्रन्टल कॉर्टेक्सच्या कार्यात गोंधळ निर्माण होतो आहे (लोह व कानाई, २०१५, मोईसाला व सहकारी, २०१६). ‘जगाशी जोडले जात आहोत’ या क्षणभंगूर सुखाच्या लकेरीत बहुतेकांचे या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे.


सोशल मिडियामुळे आपल्याला हवी ती माहिती, फोटो, व्हिडिओ इ. कधीही उपलब्ध होऊ शकणार असल्याने प्रत्यक्ष अनुभव घेताना करावयाचे सूक्ष्म निरीक्षण, होणारी तरल भावनांची निर्मिती, त्रिमीतिय अवकाशाचा विचार आणि त्यातून जगावायचे वर्तमान याकडे माणूस दुर्लक्ष करू लागला आहे. परिणामी, नव्या पिढीला ‘डिजिटल स्मृतिनाश’ नावाच्या नव्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची भीती शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत (काहानमान, २०११; कासपेरस्की लॅब, २०१५). वास्तविक पाहता, हा ‘केवळ व्यत्यय’ नाहीयं. तो आपल्या मनात एकाचवेळी आपण खूप गोष्टी करतो आहोत असा भ्रमित आनंद निर्माण करतो आहे आणि प्रत्यक्षात मात्र आपल्याला प्राधान्याने करावयाच्या गोष्टींपासून भरकटायला लावतो आहे. त्यामुळे वेळीच सावध होणे आवश्यक आहे.


ताण – भीती – बर्नआउट - नैराश्य...


जेव्हा आपण समाज माध्यमावर सतत सक्रीय राहतो तेव्हा मेंदूकडून ग्लुकोजचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे, सततचा ताण, मानसिक ओझे, काम करताना लवकर थकायला होणे, बर्नआउट/कार्य-क्लांती, सहनशीलता कमी होऊन चटकन चिडचिड होणे आदी वर्तनातील बदल होताना दिसत आहेत. मेंदूत ‘ताण-भीती व त्यांची स्मृती’ असे जाळे विकसित होऊन चिंता, नैराश्य, विचारांमधील अस्पष्टता, वास्तवातील सामाजिक संवाद करताना येणारे अडथळे, झोपेच्या समस्या आदी तक्रारींमधील वाढीबाबतही अनेक संशोधने आपल्याला जागे करू पाहात आहेत (अमेरिकन सायकॉलॉजीकल असोसिएशन सर्वेक्षण; कंझ्यूमर मोबिलिटी रिपोर्ट, २०१५; मॅक्स विन्टरमार्क, न्यूरोरेडिओलॉजिस्ट, स्टॅनफोर्ड विद्यापीठ; ह्यूंग सुक सिओ, न्यूरोरेडिओलॉजिस्ट, कोरिया; लस्टिंग, एंडोक्रोनोलॉजिस्ट).    


विचारप्रक्रियेचे ध्रुवीकरण


सोशल मिडियाच्या वापरकर्त्याला हवी तेवढी पण एकाच प्रकारची माहिती सतत पुरवत राहण्याच्या व्यावसायिक गरजेमुळे आभासी दुनियेतील संवादामध्ये समाजाचे वैचारिक ध्रुवीकरण होतानाही दिसते आहे. समोरासमोर होणाऱ्या संवादातील संवेदनशीलता, आपुलकी, आदर कमी होत जाऊन माणसे आक्रमक, तर्कदुष्ट आणि एकारलेपणाकडे झुकत आहेत. मेंदूमध्ये विचारांचे पूर्वग्रहात आणि कट्टरतेत रूपांतर होऊन सामाजिक सौहार्द आणि विविधतेचा आदर कमी होत चालला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोशल मिडियाच्या बेलगाम व्यवहारावर वाजवी बंधने घालण्याबाबत जनमत तयार करण्याच्या चळवळी हळूहळू मूळ धरू लागल्या आहेत.        


विवेकी वापर शक्य आहे


मानवाच्या प्राणीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या ‘तात्काळ सुख’ मिळवण्याच्या सहजप्रवृत्तीला समाज-माध्यमांमधून आता ‘सामाजिक दर्जा/स्टेटस’चे रूप प्राप्त झाले आहे. ह्या ‘आभासी दर्जा’मध्ये अडकून न राहता अधिक तारतम्याने वागण्याची निकड समजावून घेण्याची आता हीच वेळ आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या चौथ्या क्रांतीचा हा संक्रमणकाळ आहे. अशा संक्रमणकाळात नेहमीच ‘जुने ते सारे कालबाह्य’ आणि ‘नवे ते सारे सोने’ वाटत असते. अशावेळी योग्य काय अन् अयोग्य काय, चूक काय अन् बरोबर काय, इष्ट काय अन् अनिष्ट काय हे ठरवता येणारा सारासार विवेक निरंतर प्रयत्नांनी रूजवावा लागतो. वैज्ञानिक निरीक्षणांचा आधार इथे विशेषत्वाने उपयुक्त ठरतो. सोशल मिडियाने मेंदूलाच ‘लक्ष्य’ केल्याने अवधानक्षमतेबाबत आधुनिक विज्ञान काय सांगते हे पाहणे म्हणूनच कळीचे आहे. ज्याप्रमाणे पैसा हे आर्थिक व्यवहाराचे चलन आहे आणि ते काटकसरीने वापरून आपण आपली प्रगती साधायला शिकलो त्याप्रमाणेच ‘अवधानक्षमता’ हे बौध्दिक व्यवहाराचे चलन आहे! निसर्गाने आपल्याला ते मर्यादीत स्वरूपात दिलेले आहे हे उत्क्रांतीच्या वैज्ञानिक अभ्यासात अधोरेखितही झालेले आहे. सोशल मिडियाच्या आहारी जाऊन तिची उधळपट्टी न करता आपल्या संपन्न आणि समाधानी आयुष्यासाठी ते पैशासारखेच जपून वापरणे म्हणूनच शहाणपणाचे ठरणार आहे. उन्नत अशी मानवी स्तरावरील दीर्घकालीन उद्दिष्टांची निर्मिती करणे, ध्येयपूर्तीसाठी निरंतर ‘लगे रहो’ची वृत्ती घडवणे, प्रतिकूल परिस्थितीतही निर्धाराने उभे राहण्याची ताकद कमावणे आदींसारख्या कुवती विकसित करण्यासाठी अवधानक्षमतेचाच प्रमुख आधार आपल्याला असणार आहे. जागतिक स्पर्धेचे २१ वे शतक छोट्या-छोट्या मोहांना वा व्यत्ययांना बळी न पडता ठरवलेल्या कार्यावर दीर्घकाळाकरता लक्ष केंद्रित करून ते उत्कृष्टरित्या पार पाडणाऱ्यांनाच करिअर बहाल करणार आहे. ‘सोशल मिडियाची आकर्षक भूल’ विरुद्ध ‘स्वयं-शिस्तीचे व्यवधान’ या नव्या द्वंद्वाची सोडवणूक कठोर आत्मपरीक्षणाने शक्य होणार आहे. नोटिफिकेशन ऑफ करणे, स्क्रीनचा प्रकाश मंद करणे, उठसूट स्क्रीन पाहून संदेश पाठवण्यावर लगाम घालणे आदींसारख्या नव्या सवयी आता अंगिकाराव्या लागणार आहेत. स्मार्टफोनमध्ये व्यसनी बनविण्याचे अंगभूत गुण असल्याने आपण ‘मानसिक आजारी तर बनत नाही ना’ हा प्रश्न रोखठोक पद्धतीने विचारावा लागणार आहे. सोशल मिडियावर जाण्याऐवजी पुस्तक वाचणे, वाद्य वाजवणे, मैदानावर खेळणे, न थांबता सलग ३० मिनिटे लिहीणे, गाणे गाणे, व्यायाम करणे, नवी भाषा शिकणे, छंदासाठी पुरेसा वेळ देणे, छोटे- छोटे समाजोपयोगी कार्य करणे, ध्यान करणे, निसर्गात भटकंती करणे, फोटोग्राफी करणे, चित्रे काढणे, नृत्य करणे... अशा कितीतरी उत्पादक गोष्टींची कास धरावी लागणार आहे. दिवसातून विशिष्ट वेळीच सोशल मिडियावर जाणे आणि आठवड्यातून काही दिवस ‘नो सोशल मीडिया डेज’ म्हणून साजरे कराणे ही काळाची गरजसुद्धा ओळखावी लागणार आहे. मेंदूचे आरोग्य तो तरतरीत, तल्लख आणि सर्जनशील राहण्यात आहे ही खूणगाठ मनाशी बांधून आपण सोशल मिडियाचा विवेकी वापर करू शकलो तरच नवे तंत्रज्ञान रुजवू पाहात असलेल्या माहिती-क्रांतीच्या संक्रमणकाळाला सकारात्मक प्रतिसाद दिला असे आपण ठामपणे म्हणू शकू.


- प्रा. डॉ. शिरीष शितोळे, मानसशास्त्र विभाग, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...