Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Saturday, 21 October 2023

चमत्कारावर विश्वास ठेवणारी मानसिकता...


अतींद्रियाचे विज्ञान


"विपरीत..विचित्र..अलौकिक.. अतींद्रिय..दैवी" अशा अनेक घटना घडतात व त्या सत्य आहेत असे मानणारे श्रद्धाळू आणि अंधश्रद्धाळू असतात. 


वास्तवात, अशा विपरीत, अलौकिक, घटना या प्रत्येकाच्या मनातून उद्भवतात! आणि जेव्हा त्या सामूहिक रूप घेतात तेव्हा अशा समजुती समाजामध्ये रुजून त्याच्या रूढी आणि परंपरा तयार होतात. 


खरे तर अशा प्रकारच्या अलौकिक, अतींद्रिय, विपरीत घटना या प्रत्येकाच्या समजूती असतात. म्हणजे एक प्रकारची सायकॉलॉजी तयार झालेली असते. आणि अशी समजूत, अशी सायकॉलॉजी, सामान्य किंवा नॉर्मल नसते. ती विसंगत असते. 

आणि ती विसंगत आहे हे मनोविज्ञानाच्या आधारे दाखवून देण्याचे काम आपल्या देशात खूप उशिरा सुरू झाले. 


पण युरोपमध्ये हे काम २०० वर्षांपूर्वी सुरु झाले. 

म्हणजे, तसे पाहिले तर अतिइंद्रिय, दैवी, अलौकिक आणि विपरीत घटना या मनाच्या खुळ्या किंवा बिघडलेल्या समजूती असतात. असे मानण्याच्या बाबतीत आपण अजूनही २०० वर्षे मागे आहोत. 


अशा सर्व घटनांचा अभ्यास करणारे स्वतंत्र विज्ञान निर्माण झालं ते युरोपमध्ये. आणि विशेषतः अशा मानसिकतेचा अभ्यास करणारं असं एक मनोविज्ञान विकसित झालं! ज्याला "अॅनोमॅलिस्टिक सायकोलॉजी" असे म्हटले जाते किंवा 'विसंगत मानसविज्ञान' म्हटले जाते. 


या विसंगत मानस विज्ञानात स्पष्टपणे हे नोंदविले आहे की अशा दैवी, अतींद्रिय, अलौकिक, विपरीत, चमत्कारी, घटनांच्या मागे दोन कारणे असतात. एक असते मानसिक कारण व दुसरे असते भौतिक  कारण. आणि या कारणांच्या आधारे आपण अशा प्रत्येक दैवी, चमत्कारी, अतींद्रिय शक्तींच्या दाव्यांच्या मागील सत्य सांगू शकतो. 


बरोबर २१० वर्षांपूर्वी इंग्लंडमधील एक डॉक्टर जॉन फेरिअर याने 'पिशाच्च आणि भूतांचे प्रकटीकरण' यावर थेट मत मांडून एक पुस्तक लिहिले. ज्यात त्याने स्पष्ट नमूद केले की, भुते व पिशाच्य यांचे दिसणे म्हणजे डोळ्याचे भ्रम किंवा ऑप्टिकल इल्युजन आहे.


त्याच काळात तिकडे फ्रान्स मध्ये अलेक्झांड्रि बाॅईसमाँट याने संशोधनपर पुस्तक लिहिले..भुते,पिशाच्च दिसणे, स्वप्न पडणे, आत्यानंद अवस्था, चुंबकोपचार, झोपेत बडबडणे व चालणे या विषयावर त्याने स्पष्ट वैज्ञानिक मते मांडली. आणि असे प्रकार म्हणजे भ्रम होत असे म्हटले. या पुस्तकाचे नाव होते, 'ऑन हॉल्युसिनेशन्स'. 


विशेष म्हणजे त्या काळात अध्यात्म या विषयाची सुद्धा चिरफाड केली गेली. याविषयी विल्यियम बेंजामिन कार्पेंटर याने असे स्पष्टपणे नोंदविले की, अध्यात्म म्हणजे स्वयंसूचना, संमोहन, बनवाबनवी आणि विचारभ्रम या गोष्टींचे मिश्रण होय. त्याच्या पुस्तकाचे नाव होते, 'मेस्मेरीझम स्पिरीच्युअॅलीझम". 

ब्रिटिश मनोरोगतज्ञ हेन्री माॅडस्ले याने, "नॅचरल कॉजेस अँड सुपर नॅचरल सिमिंग्ज" हे पुस्तक १८८६ मध्ये लिहिले. त्यात तो म्हणतो..

 "अमानवी, अतिदैवी किंवा अतींद्रिय घटना ज्या घडतात  त्या मागे मानसिक रोग हे कारण असते. आणि अशा अवस्थेतील लोक अशा घटनांकडे पाहताना चुकीच्या नजरेने पाहतात आणि नैसर्गिक नियमांचा चुकीचा अर्थ लावतात. 


अल्बर्ट मोल या सायकीयाट्रिस्टने व मॅक्स डेसोर या सायकॉलॉजिस्टने जर्मनीमध्ये गुढवादावर (ऑकल्टिझम) संशोधन केले आणि गुढवाद म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अंतर्मनातील संकेत, संमोहनाच्या स्वयंसूचना, बनवाबनवी, मानसिक कारणे यांचे मिश्रण होय असे नोंदविले.  


१८९१ मध्ये सायकियॅट्रिस्ट लिओनेल वेदर्ली आणि जादूगार जाॅन मस्केलीन या दोघांनी मिळून, 'द सुपरनॅचरल?' म्हणजे 'अतिनैसर्गिक?' या नावाचे पुस्तक लिहिले. यामध्ये धार्मिक अनुभव आणि अपसामान्य अनुभव ज्यांना अतींद्रिय अनुभव म्हटले जाते यांच्या मागील रॅशनल कारणे सांगितली आहेत. 

१९१३ मध्ये कार्ल जेस्पर यांनी जनरल सायकोपॅथाॅलॉजी नावाचे पुस्तक लिहून त्यात स्पष्टपणे नोंदविले की सर्व अतींद्रिय, अद्भुत, अतर्क्य  आणि दैवी घटना या दुसरे तिसरे काही नसून मनोरोगांचे अविष्कार आहेत. 


जाणिव, देहभान किंवा शुद्धी या अवस्था मानवामध्ये आहेत. पण जेव्हा या अवस्था बदलतात तेव्हा वेगवेगळे अनुभव येतात. ज्याला इंग्रजीमध्ये 'आल्टर्ड  कॉन्शियसनेस' असे म्हणतात. त्या जाणिवेचे अनेक अविष्कार हे अतींद्रिय शक्ती, परामानस शक्ती, अद्भुत शक्ती आणि दैवी शक्ती या स्वरूपात आहेत असे म्हटले जाते. वास्तवात या ज्या शक्ती आहेत या फसव्या किंवा खोट्या विज्ञानाच्या आधारे सिद्ध करण्याचा प्रयत्न पॅरासायकॉलॉजी नावाच्या विज्ञानात करण्यात आला होता. पण आज अखेर अशा शक्ती अस्तित्वात आहेत असा कोणताही पुरावा आढळलेला नाही. उलट यामागे मानसिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत असे सिद्ध झाले आहे. ही सिद्धता देण्यासाठी जे शास्त्र उदयास आले तेच अॅनोमॅलिस्टिक सायकॉलॉजी होय. 


लिओनार्ड झुस्ने आणि वॅरन जोन्स या सायकॉलॉजिस्टनी  अॅनोमॅलिस्टिक सायकॉलॉजी हा शब्द प्रथम वापरला. एवढेच नव्हे तर त्यांनी, "अॅनोमॅलिस्टिक  सायकॉलॉजी: ए स्टडी ऑफ मॅजिकल थिंकिंग" नावाचा ग्रंथ देखील लिहिला. हे घडले १९८९ मध्ये. 


भविष्याविषयी होणाऱ्या घटनांचे थेट आकलन होणे किंवा प्री कॉग्निशन, शरीरातून आत्मा बाहेर पडणे किंवा आऊट ऑफ बॉडी एक्स्पिरियन्स, परलोकविद्या शास्त्र वगैरे सर्व अतींद्रिय व अंधश्रद्ध गोष्टींचा भांडाफोड करण्यास मानसविज्ञान समर्थ आहे असे अॅनोमॅलिस्टिक सायकॉलॉजी मानते. 


थोडक्यात, 

शहाणपणाचा अभाव.. 

तर्कहिनता किंवा कॉग्निटिव्ह एरर.. 

मनोभंगाची अवस्था किंवा डिसोसिएटिव्ह स्टेट्स.. 

भ्रम किंवा ईल्युजन्स.. 

व्यक्तिमत्व दोष.. 

मनाचा विकास होत असताना निर्माण होणारे दोष व व्याधी.. 

स्मृतीची स्थिती.. 

चमत्कारावर विश्वास ठेवणारी मानसिकता.. 

अतिकल्पनारम्यता... 

वैयक्तिक व्यक्तिगत दावे.. 

अपघाताने निर्माण झालेली स्थिती.. 

संमोहन.. 

निद्रा लकवा.. 

- असे अनेक मानसिक घटक अशा अतींद्रिय आणि अंधश्रद्ध घटनांच्या भांडाफोडीस पुरेसे आहेत. 


अतीन्द्रिय संवेदनांच्या वर लिहिला गेलेला एक ग्रंथ आहे. "एक्स्ट्रा सेंसरी पर्सेप्शन: ए सायंटिफिक इव्हॅल्युएशन". या ग्रंथाचा लेखक हँसेल म्हणतो.. 'गेली शंभर वर्षे अतिंद्रीय शक्तीच्या दाव्यावर संशोधन चालले आहे. पण आज अखेर एकही पुरावा दाखवता आलेला नाही व सिद्धही करता आलेला नाही.' 


अशा पद्धतीने वैज्ञानिक पायावर उभारून मानस विज्ञानाच्या आधारे सर्व दैवी शक्तींमागील कारणे सांगणारे अॅनोमॅलिस्टिक सायकॉलॉजी हे इटलीतील युनिव्हर्सिटी ऑफ मिलानो बिकोकका या विद्यापीठात अॅनोमॅलिस्टिक सायकाॅलाॅजिस्ट मसिमो पाॅलीडोरो यांच्या नेतृत्वाखाली शिकवले जाते.


लंडनच्या गोल्ड स्मिथ विद्यापीठात क्रिस फ्रेंच या सायकॉलॉजिस्टनी अॅनोमॅलिस्टिक सायकाॅलाॅजीची स्वतंत्र संशोधन शाळा खोलली आहे.


भारतात या पातळीवर घडणे अशक्य आहे! कारण जुन्या-पुराण्या कुठल्यातरी ग्रंथात जाऊन विज्ञान शोधत बसण्याची पद्धत ही वैज्ञानिक पद्धत नव्हे. ती अत्यंत घातक आणि नवनवीन संकल्पना निर्मितीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे आपल्याकडे अशा सखोल संशोधनास कोणतेही वातावरण नाही आणि पाठिंबा देखील नाही. आणि याच कारणाने आपला देश अतिंद्रिय दावे, दैवी शक्ती, जादूटोणा, पुनर्जन्म आणि भुतेखेते यातच रुतून राहिलेला आहे यात काही शंका नाही.


- डॅा. प्रदीप पाटील 

No comments:

Post a Comment

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...