Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Friday, 4 November 2022

बदक की गरुड ?

एकदा विमानतळावर असताना माझी एका टॅक्सी चालकाशी  गाठ पडली आणि त्याच्या टॅक्सीत सर्वप्रथम माझ्या नजरेस एक गोष्ट पडली ती म्हणजे, एक पाटी जिच्यावर लिहिले होते की 

"बदक की गरुड

तुमचे तुम्हीच ठरवा."


दुसरी गोष्ट जाणवली ती स्वच्छ आणि चकचकीत गाडी, ड्रायव्हर अतिशय टापटीप आणि स्वच्छ आणि इस्त्रीच्या ड्रेस मध्ये होता. स्वच्छ पांढरा इस्त्रीचा शर्ट आणि पँट वर टाई.

ड्रायव्हर स्वतः उतरून गाडीबाहेर आला आणि त्याने माझ्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला.  आणि बोलला, 

" माझे नाव जॉन आहे. आणि मी तुमचा वाहक आहे. जो पर्यंत मी तुमचे समान गाडीच्या डिकीत ठेवतो तोपर्यंत आपण माझे हे मिशन कार्ड वाचावे सर."

त्या कार्ड वर लिहिले होते,

जॉन चे मिशन

माझ्या ग्राहकांना लवकरात लवकर, सुरक्षित आणि रास्त दरात त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवणे आणि तेसुद्धा आल्हाददायक आणि मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये.


मी भारावून गेलो होतो.

गाडीतील आतील बाजूही तेवढीच टापटीप आणि स्वच्छ, नीटनेटकी होती. 

जॉन ने मला विचारले. 

"आपल्याला कॉफी घ्यायला आवडेल काय?"

मला त्याची गंमत करायची लहर आली म्हणून मी त्याला म्हणालो. "नाही, मला ज्यूस हवा आहे."

तात्काळ जॉन उत्तरला... 

"काही हरकत नाही सर, माझ्याकडे तीन वेगवेगळ्या थर्मास आहेत. ह्यापैकी एकात ज्यूस, एकात डायट ज्यूस आणि एकात पाणी आहे."

तुम्हाला वाचायचे असेल तर माझ्याकडे आजचे वर्तमानपत्र आणि काही मासिके आहेत. 

जेव्हा आमचा प्रवास चालू झाला तेव्हा जॉन मला म्हणाला की जर मला गाणी किंवा बातम्या ऐकायच्या असतील तर हा रिमोट आहे आणि ह्या वरील नंबर्स प्रमाणे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्याचा आनंद घेऊ शकता. 

मला अजूनही धक्का बसायचा बाकी होता. कारण 

पुढे त्याने अत्यंत मार्दवपूर्ण  स्वरात विचारले. "सर, एसी चे तापमान ठीक आहे की आपणास काही वेगळे हवे आहे?" त्यानंतर त्याने मला माझ्या गंतव्य स्थानी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता आहे हे सांगितले आणि पुढे विचारले की, तो माझ्याशी बोललेले चालेल की त्याने शांत राहावे ? 

न राहवून मी त्याला विचारले, 

_"तू नेहमी तुझ्या ग्राहकांना अशी सेवा देतोस?"_ 


त्यावर तो उत्तरला. "नेहमी नाही, दोन वर्षांपासून देतो आहे. माझ्या सुरवातीच्या काळात मीही इतर टॅक्सी चालकांसारखा सतत तक्रार करीत असे आणि असमाधानी राहत असे, पण एकदा एका डॉक्टर कडून मी व्यक्तिमत्त्व सुधारणांबाबत ऐकले. 


त्यांनी एक पुस्तक लिहिले होते.  त्याचे नाव होते. "तुम्ही जे कोणी आहात त्याने फरक पडतो" ज्यात  पुढे लिहिले होते.  जर तुम्ही सकाळी उठून असा विचार कराल की आज दिवस वाईट जाणार आहे. फक्त अडचणीच आहेत तर खरेच तसेच होईल.  तुमचा तो दिवस वाईट आणि अडचणींचा जाईल. 


बदक बनू नका

गरुड बना

बदक फक्त आणि फक्त आवाज करतो. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देतो. आणि गरुड सर्व समुदायापासून वेगळा आणि उंच उडतो.

आणि माझ्या लक्षात आले की मी सतत रडतो आहे फक्त तक्रारी करतो आहे. 

म्हणून मी स्वत:ला बदलण्याचे ठरविले. माझ्या दृष्टिकोनात बदल करून गरुड बनण्याचे ठरविले. 


मी इतर टॅक्सी चालकांकडे बघितले. अस्वच्छ, गलिच्छ टॅक्सीज आणि आडमुठे चालक आणि म्हणून असमाधानी ग्राहक. असे चित्र होते ते.


मी काही बदल करायचे ठरवले. आणि माझ्या ग्राहकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे नंतर आणखी काही बदल करीत गेलो. 


आणि गरुड बनण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी माझा व्यवसाय दुप्पट झाला आणि ह्यावर्षी आत्तापर्यंतच्या चौपट झालेला आहे. 

तुम्ही सुदैवी आहात की आज मी तुम्हाला इथे सापडलो. अन्यथा आजकाल माझे ग्राहक माझ्याकडे आगाऊ रिझर्व्हेशन करून माझी टॅक्सी सेवा घेत असतात. किंवा मला मेसेज करून माझी टॅक्सी बुक करतात. मला शक्य नसेल तेव्हा मी  अन्य गरुड बनलेल्या टॅक्सीचालक द्वारे ती सेवा ग्राहकाला पुरवतो. 

जॉन बदलला होता. तो साध्या टॅक्सीतून लीमोझीन कार सर्व्हिस पुरवत आहे.  जॉन ने  बदका सारखे सतत आवाज करत, सतत तक्रार करणे सोडून दिले आहे.  आणि गरुडासारखी भरारी मारायला सूरूवात केली आहे.


तुम्ही कुठे आणि काय काम करता याने काहीही फरक पडत नाही तर तुम्ही ते कसे आणि  कोणत्या मनोभूमिकेतून करता याने नक्की फरक पडतो.


 CP

No comments:

Post a Comment

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...