रशियन शरीरशास्त्रज्ञ एव्हान पॅवलॉव्ह कुत्र्याच्या पचनयंत्रणेचा अभ्यास करीत होता. अन्नाची थाळी दिसल्यानंतर कुत्र्याच्या तोंडातून लाळ गळते, तशीच अन्न घेऊन येणाऱ्या नोकराच्या पावलांचा आवाज ऐकला, तरी कुत्र्याच्या तोंडून लाळ गळते, ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. त्यानं एका ठरावीक वेळेला कुत्र्याला अन्न द्यायला सुरवात केली. पण, त्याच्या काही क्षण आधी तो घंटी वाजवायचा. हीच गोष्ट काही दिवस करीत राहिल्यावर अन्न न देता केवळ घंटी वाजवली, तरी कुत्र्याच्या तोंडून लाळ गळते, असं त्याला आढळलं. या प्रक्रियेला त्यानं 'क्लासिकल कंडिशनिंग' असं नाव दिलं. थोडक्यात, केवळ घंटी वाजली, तरी लाळ गळणं, याची कुत्र्याला लागलेली सवय. कुत्र्याला विशिष्ट सवय मुद्दाम ठरवून लावता येते, तशीच गोष्ट माणसाच्या बाबतीतही शक्य आहे, हे आणखी एका शास्त्रज्ञानं दाखवून दिलं आणि यातून बिहेविअरिझम ( वर्तनवाद ) नावाची शाखा मानसशास्त्रात उदयाला आली. डॉ. जे. बी. वॅटसन ज्याला 'वर्तनवादाचा जनक' म्हणतात, त्यानं अल्बर्ट या अकरा महिन्यांच्या मुलावर प्रयोग केला. सुरवातीला अल्बर्ट मजेत सशांसोबत खेळायचा. नंतर अल्बर्ट सशांना स्पर्श करायला जायचा, तेव्हा वॅटसन मोठा भीतीयुक्त आवाज त्याच्या मागं करायचा. हा प्रयोग ५-६ वेळा केल्यानंतर आधी मजेत सशांशी खेळणारा अल्बर्ट ससा दिसला, तरी रडायला लागायचा. वॅटसननं मुद्दाम ठरवून अल्बर्टच्या मनात सशाविषयी भीती निर्माण करून दाखवली.
आपलं प्रत्येक चांगलं आणि वाईट वर्तन म्हणजे आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांमधून झालेलं कंडिशनिंग (लागलेली सवय) आहे. मन एकाग्र न होणं, लक्षात न राहणं, प्रश्न विचारण्याचा, उत्तरं देण्याचा आत्मविश्वास नसणं, नेमक्या वेळी तयारी करूनही काहीच न आठवणं, घाम फुटणं, यासारख्या असंख्य गोष्टी आपल्या मनात कंडिशन्ड झालेल्या आहेत. सुरवातीला एक-दोनदा अशा घटना घडल्या, तरी त्या मनात कंडिशन्ड होतात आणि नंतर तशी विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली, की कंडिशन्ड झालेली (सवय झालेली) कृतीच दरवेळी आपल्या हातून घडते. कुणी टिंगलटवाळी केली, तर स्वतःची लाज वाटते, तुम्ही स्वत:ला दूषणं देता. हा प्रसंग मनात कंडिशन्ड झाला. दर वेळी मग तसंच घडतं. ही घटना आपल्याच बाबतीत घडली पाहिजे, असं नाही. दुसऱ्याच्या बाबत असं घडलं, तरी त्याचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो.
बऱ्याच समस्या अशाच पद्धतीनं कधीतरी मनात कंडिशन्ड होत जातात. त्याचे परिणाम आपण भोगत असतो. हे परिणाम घालवले नाहीत, तर त्याच चुका वारंवार घडतात, समस्या आणखी वाढतात. आपण हतबल होत जातो. चुकीच्या अनावश्यक गोष्टी आपल्या मनात कंडिशन्ड झाल्या, तशाच त्या घालवताही येतात. तीच कंडिशनिंगची प्रक्रिया वापरून मनाचं रिकंडिशनिंग करता येतं व समस्या घालवता येतात.
(प्रा. राजा आकाश, दै. सकाळ)
👍
ReplyDelete