सध्याच्या धकाधकीच्या, गतिमान व स्पर्धात्मक जीवनात ताणतणावाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. कोविड १९ सारख्या महामारीने त्यामध्ये आणखी भर घातली आहे. अशा तणावजन्य परिस्थितीत सक्षमपणे उभे राहण्यासाठी आणि कार्यक्षम आयुष्य जगण्यासाठी शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य संवर्धनाची गरज आहे. जीवनातील संघर्ष, अपयश, नैराश्य, आघातजन्य , कौटुंबिक वंचितता यामुळे मानसिक स्वास्थ्य धोक्यात येते. अती मानसिक ताणामुळे व्यक्तीची मनःशांती कमी होते. अशा प्रसंगी मग व्यक्तीने नित्य जीवनाची पुनर्रचना करण्याची गरज निर्माण होते. मानसिक आरोग्याची जोपासना ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येकाने स्वतःच्या दिनचर्येत आणि मनोवृत्तीत काही विधायक बदल करणे आवश्यक असते. सुखी व समाधानी जीवनाचे गुपित ग्रीकांनी फार पूर्वीच सांगितले आहे. आपले काम व आवडते कृत्य यांचा रोजच्या कार्यात समतोल राखला तर जगण्याचा उत्साह वाढतो. मानसिक स्वास्थ्य संवर्धनासाठी नित्य जीवनाची पुनर्रचना करताना खालील बाबी आचरणात आणता येतील.
१. कामाचे नियोजन करा
आपल्या दैनंदिन कामात शिस्त राखणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीवर काही विशिष्ट कामांची जबाबदारी असते. व्यक्तीने आपले काम आवडीने व पूर्ण क्षमतेने करावे. तसेच कामातील जबाबदारी स्वीकारावी. कामाचे नीट नियोजन करावे. कामाचे नियोजन करताना कोणते काम जास्त महत्वाचे त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवावा. असे केल्याने काम वेळेत पूर्ण व पद्धतशीरपणे करायची सवय लागते. काम वेळेत पूर्ण झाले तर इतर छंद जोपासण्यासाठी, करमणुकीसाठी व समाजकार्यासाठी वेळ मिळतो.
२. फावल्या वेळाचे नियोजन
व्यक्तीला फावल्या वेळाचा उपयोग आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी होतो. फावल्या वेळेत स्वतःचे कलागुण विकसित करण्यासाठी गाणे, नाच, चित्रकला, भरतकला, विणकाम, वाद्य वाजविणे अशा कला शिकता येतात. हे छंद पुढे कामाचा ताण घालविण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी, करमणुकीसाठी उपयुक्त असतात.
३. नियमित आहार
शरीर स्वस्थ तर मन स्वस्थ, त्यामुळे योग्य वेळी नियमित आहार घेतला पाहिजे. शरीराला आवश्यक असणारी कार्यशक्ती पोषक आहार घेतल्याने मिळते. खाल्लेल्या अन्नातून पोषण मूल्ये शरीराला मिळावी यासाठी जेवताना व्यक्तीने प्रसन्न राहावे. वाचत किंवा टी. व्ही. पाहत जेवू नये. जेवताना गप्पा असाव्यात परंतु त्या गप्पा भांडण वाढवणाऱ्या, एकमेकांवर दोषारोप करणाऱ्या नसाव्यात.
४. व्यायाम
निरोगी आरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते. सध्या लोकांचे बैठे काम वाढले आहे. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. व्यायाम केल्याने मन प्रसन्न राहते, कामात उत्साह वाढतो. शरीराप्रमाणे मनही लवचिक असणे गरजेचे असते. निराशाजनक, भीतीदायक विचारांना थांबवून मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी मनाचे व्यायाम आवश्यक असतात.
५. सुसंवाद साधणे
हल्लीच्या विभक्त कुटुंब पद्धतीत घरामध्ये परस्पर सुसंवाद कमी होत चालला आहे. घरातील व्यक्तींमध्ये परस्पर संभाषण होणे आवश्यक असते. अशा संभाषणातून एकमेकांच्या गरजा, अपेक्षा, विचार, भावना जाणून घेता येतात. एकमेकांशी बोलल्याने तसेच घरातील वातावरण मोकळे राहते. परस्परांच्या सुख-दुःखात सहभागी होता येते.
६. झोप व विश्रांती
सकस आहार, व्यायाम यासोबत शांत झोप व विश्रांती देखील मानसिक शांतीसाठी महत्वाची आहे. शांत झोप लागणे हे निरोगी आरोग्याचे लक्षण आहे.
७. भावना व्यक्त करणे
मानसिक स्वास्थ्यासाठी स्वतःच्या भावना स्वीकारा. राग, भीती, दुःख, आक्रमकता, हेवा, तिरस्कार या भावना सुद्धा मान्य करा. भावना टाळण्याचा किंवा दडपण्याचा प्रयत्न करू नका. भावना व्यक्त केल्याने मन हलके होते. मानसिक स्वास्थ्यासाठी प्रत्येक दिवशी थोडेतरी मनमोकळे हसले पाहिजे. हसण्यामुळे चेहऱ्याचे स्नायू, श्वसन संस्था व पचनसंस्था यांना चांगला व्यायाम मिळतो. आनंद व समाधान हे मानसिक स्वास्थ्याचा प्राणवायू आहेत. त्यामुळे व्यक्त व्हायला शिका.
८. व्यसने टाळा
दुःख कमी करण्यासाठी काही व्यक्ती तंबाखू, दारू, मादकद्रव्य सेवनाच्या आहारी जातात. ही व्यसने ताण कमी करणारी नसून स्वास्थ्य बिघडवणारी असतात. त्यामुळे व्यसनांपासून दूर रहा.
९. आत्मविश्लेषण करा
स्वतःच्या वर्तनाचे, कृतीच्या परिणामांचे, विचारांचे वस्तुनिष्ठ परीक्षण करा. त्यातून स्वतःच्या क्षमतांची, मर्यादांची जाणीव होईल. त्यातून आपल्या वर्तनात सुधारणा करता येते. स्वतःचे विश्लेषण करताना न्यूनगंड मात्र निर्माण होऊ देऊ नका.
१०. जगण्यावर प्रेम करा
आयुष्यात धनात्मक आणि ऋणात्मक असे दोन्ही प्रकारचे अनुभव येतात. सभोवतालच्या सुखद-दुःखद, चांगल्या-वाईट घटनांपैकी तुम्ही काय पहायचे हे तुमच्यावर अवलंबून असते. आयुष्यातील आव्हाने स्वीकारणे हे जगण्याचे सूत्र आहे. व्यक्तीने आशावादी वृत्ती जपली पाहिजे. आयुष्य अनिर्बंधपणे उधळून टाकू नये. होकारात्मक विचारांचा व कृतींचा व्यक्तीने निश्चय केला, तर व्यक्तीला स्वास्थ्य संपन्न, आनंदी, निरामय जीवन जगता येईल.
छान लेख
ReplyDelete