Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Saturday, 9 October 2021

संतुलित मन, समाधानी जीवन

आपल्या मनाला कसं सांभाळावं


जसं एखादं वाद्य वाजवण्यासाठी त्यामध्ये संतुलन जसं गरजेचं असतं. तंबोऱ्याच्या तारा कसल्या तर त्या तुटून जातील आणि त्या जर ढिल्या सोडल्या तर त्यामध्ये नाद निर्मिती होणार नाही. म्हणजेच त्याच्यामध्ये योग्य संतुलन असणं गरजेचं आहे. तसंच आपलं देखील आहे. आपलं शरीर हे यंत्र आहे. शरीर-मन-मेंदू यामध्ये देखील योग्य संतूलन असणं गरजेचं आहे. शरीराचं यंत्र हे मनावर अवलंबून आहे. यासाठी आपलं मन सतत सकारात्मक विचारांमध्ये गुंतवूण ठेवणं गरजेचं आहे. थोडासाही ताण जाणवला तर त्यावर वेळीच उपचार करणं महत्त्वाचं आहे. जसं आपण पाय दुखतोय, गुडघा दुखतोय म्हणून डॉक्टरकडे जातो तसंच जरासंही मन दुखलं तरी डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे. मन आनंदी नसेल तर आपण समाधानी राहू शकत नाहीत.


ताण - तणाव घालवण्यासाठी सोपे उपाय


सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या आवडीचा छंद जोपासणं गरजेचं आहे. सर्वांनी खेळायला पाहिजे कारण खेळ आपल्याला चांगल्या पद्धतीनं जगण्याचं शिकवत असतं. खेळामुळे आपण खूप आनंदी राहत असतो. वर्तमानात कसं आनंदी रहावं हे आपण खेळातून शिकतो. जसं की एखाद्या खेळाडून गोल केला तर तो आनंद साजरा करतो त्याला याची चिंता नसते की आपण उद्याचा सामना जिंकणार की हारणार. तो फक्त आजचा क्षण आनंदानं साजरा करत असतो. त्यामुळे सर्वांनी खेळणं खूप गरजेचं आहे. शिवाय आपल्याला ज्या गोष्टीमध्ये वेळ घालवणं गरजेचं आहे. ध्यानधारणा, सूर्य नमस्कार, योगा यामुळे देखील ताण तणाव खूप प्रमाणात कमी होतील. तसेच आपल्याला खूपच ताण जाणवत असेल तर मानसोपचार तज्ज्ञाचा किंवा समुपदेशकाचा सल्ला घेणं कधीही आवश्यक आहे.


मानसिक आरोग्य बिघडण्याचं कारणं


मानसिक आरोग्य बिघडण्याचं मुख्य कारण म्हणजे आजची जीवनशैली होय. आजच्या स्पर्धेच्या युगात मनात आलेली आणि हवी असलेली गोष्ट लगेच हवी आहे. कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी जो संयम लागतो तो आजच्या पिढीमध्ये दिसून येत नाही. महत्त्वाकांक्षा असणं वेगळं आणि अतिमहत्त्वाकांक्षा असणं हे वेगळं. या अतिमहत्त्वाकांक्षेपायी आजचा तरूण तणाखाली येत आहे.


गंभीर मानसिक आजाराचं प्रमाण


साधारणपणे गंभीर मानसिक आजाराचं प्रमाण ३० टक्के आहे. तसं पाहिलं तर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता ताण असतोच. अनेक जण आपण केलेल्या कामाबद्दल समाधानी नसतात, ८ ते १० तास काम करुनही काम केल्याचं समाधान मिळत नाही. अशावेळी आपण आपल्या जीवनशैलीकडे बारकाईने पाहणं गरजेचं असतं. आपला जास्तीत जास्त वेळ कशात जात आहे, आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे. याकडे दुर्लक्ष केलं तर आपला प्रवास गंभीर मानसिक आजाराकडे होऊ शकतो.


मानसिक रुग्णांबद्दल महत्त्वाची बाब


ही महत्त्वाची बाब आहे. कारण रुग्ण तर सोडाच पण कुटूंबिय देखील हे मान्य करत नाहीत की आमच्या कुटूंबात कोणी मानसिक रुग्ण आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारे रुग्णांना डॉक्टरपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. जसे की त्याला डॉक्टरकडे जायचे आहे असं न सांगता आपल्याला एका मॅडमला भेटायला जायचे आहे असे सांगावे लागते. त्याला आवडणाऱ्या गोष्टींवर पहिल्यांदा चर्चा केली जाते. एकदा त्याचा विश्वास संपादन केला की, मग उपचाराला सुरूवात केली जाते.


मानसिक आजारामध्ये अनुवांशिकता आणि परिस्थितीजन्य प्रकार


तसं पाहिलं तर अनुवांशिकता खूप महत्त्वाची आहे. आपल्या आजोबा, वडील यांना जर एखादा मानसिक आजार असेल तर शक्यता असते की पुढल्या पिढीला याचा धोका असतो. तसंच परिस्थितीजन्य प्रकारात कुटूंब देखील महत्त्वाचा भाग असतो. आपण एका कुटूंबाचे घटक असतो. आपण कोणत्या कुटूंबातून आलोत, कुठल्या वातावरणात वाढलो आहोत, शिक्षण कोणत्या क्षेत्रात घेतलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. यातून देखील ते तणावाखालून जातात. तरूण पिढीमध्ये तर तणावाचं कारण खूप वेगवेगळे असल्याचं दिसून येत आहे कारण बरेच तरूण फेसबुकवर मला खूप लाईक्स मिळाले, मला गर्लफ्रेंड नाही, मला बॉयफ्रेंड नाही अशा गोष्टींवरून देखील तणावाखाली जाताना पहायला मिळतात.


मानसिक रुग्णाच्या प्रमाणात उपलब्ध मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशक


तसं पाहिलं तर मानसिक रुग्णाच्या प्रमाणात खूपच कमी मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक उपलब्ध आहेत. समाजातील संतुलन योग्य ठेवण्यासाठी तरूणांनी या क्षेत्राकडे वळणे गरजेचे आहे. करिअरसाठी हे क्षेत्र चांगलं आहे.ज्यांना समाजासाठी काहितरी करायचं आहे त्यांनी निश्चितच याकडे वळणं योग्य राहिल. मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र या विषयात पदवी अथवा पदविका प्राप्त करुन समुपदेशानाचे कार्य करता येते. महत्त्वाचे म्हणजे समुपदेशकामध्ये संयम खूप महत्त्वाचा असतो. कारण मानसिक रुग्ण हा पूर्णपणे खचलेला असतो अशा वेळी समुपदेशकाने त्यामध्ये सामावून जाता तटस्थ राहून त्याच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. कंटाळून न जाता त्याला वारंवार मार्गदर्शन करणं गरजेच आहे.



संदर्भ : आरोग्यविद्या डॉट कॉम

No comments:

Post a Comment

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...