Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Wednesday, 6 October 2021

समायोजन - यशस्वी जीवनाचा मूलमंत्र

  


         समायोजन ही मानवी जीवनातील एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्याला इंग्रजीत Adjustment असे म्हटले जाते. व्यावहारिक भाषेत परिस्थितीशी, बदलाशी जुळवून घेणे तसेच जीवनात अंतर्गत सुसंगती टिकवणे याला समायोजन म्हणता येईल. मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने समायोजन ही रोजच्या जीवनात अतिशय महत्त्वाची व आवश्यक बाब आहे. आपण जन्मापासून मरेपर्यंत आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला अनेक शारीरिक, मानसिक, सामाजिक गरजा असतात. या सर्वच गरजांची पूर्तता होतेच असे नाही. बऱ्याचदा आपल्या ईच्छा, आकांक्षा, आवडी-निवडींना मुरड घालावी लागते तसेच आपल्या भावनांना आवर घालावा लागतो आणि समाजमान्य पद्धतीने प्रतिक्रिया द्यावी लागते. यालाच समायोजन म्हणतात. 

      जीवनात आपणास अनेक समस्यांना किंवा संघर्षाला सामोरे जावे लागते. या समस्या सोडविण्यासाठी विविध मार्ग वापरावे लागतात, स्वतःच्या क्षमतांचा कौशल्यपूर्ण पद्धतीने वापर करावा लागतो. समस्यात्मक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःमध्ये व परिस्थितीमध्ये योग्य ते बदल घडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजे समायोजन होय. समायोजन म्हणजे योग्य मार्गाने केलेली तडजोड होय. ती निरतंर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या जीवनातील आनंदाचा उपभोग, जीवन समाधान, प्रगती ही बहुतांशी समायोजनावर अवलंबून असते. समाज, संस्कृती, नीतिनियम, सभोवतालचे वातावरण, अपेक्षा याचे भान ठेवून केलेले समायोजन आपणास मानसिक स्वास्थ्य टिकविण्यास मदत करते. 

       जरी अनेक ठिकाणी आपल्याला समायोजन करावे लागत असले तरी प्रामुख्याने तीन क्षेत्रातील समायोजनाचा आपण या ठिकाणी विचार करूया. 

१) वैयक्तिक समायोजन

      व्यक्तिगत समायोजन ही मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असणारी सर्वांत महत्त्वाची पायरी म्हणता येईल. कारण हे समायोजन आपणच आपल्याबाबत करायचे असते. वैयक्तिक समायोजन करण्यासाठी स्वतःच्या क्षमता, मर्यादा, भोवतालची परिस्थिती, मिळणारी संधी याची योग्य जाणीव प्रत्येकाने करून घ्यावी. आपली ध्येये, उद्धिष्टये, जीवनाकडे पाहण्याचा 

दृष्टीकोन जितका वास्तव व सकारात्मक असेल तितके व्यक्तिगत समायोजन परिणामकारक होते. आपले वैयक्तिक समायोजन जितके चांगले असेल तितके संघर्ष, ताणतणाव, अपयश, नैराश्य आपण कौशल्यपूर्ण रीतीने हाताळू शकतो.


२) सामाजिक समायोजन

      वैयक्तिक समायोजनाइतकेच सामाजिक समायोजनास देखील महत्व आहे. आपण जर वैयक्तिक समायोजनात यशस्वी झालो तर सामाजिक समायोजन करणे सुलभ जाते. सामाजिक समायोजनात समाजमान्य वर्तन  करायला शिकणे, समाजाच्या अपेक्षा जाणून घेणे, समाजाच्या नितिनियमांचे पालन करणे, समाजाने मान्य केलेली भूमिका व दिलेले स्थान यास अनुसरून वर्तन करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याची जाणीव आपणास असायला हवी. समाजाप्रती प्रेम, आदर, आत्मीयता वाटायला हवी. बऱ्याचदा काही रूढी मान्य नसतात अशावेळी त्या बदलण्यासाठी त्यांना शरण न जाता समाजाची घडी बदलणारी कृती करायला हवी, परंतु ती करताना देखील बराच विरोध सहन करण्याची तयारी असावी लागते. हे ही एक प्रकारचे सामाजिक समायोजनच होय.  मानसिक स्वस्थतेसाठी सामाजिक समायोजन साधण्याचे उत्तम कौशल्य प्रत्येकाने विकसित करायला हवे. 


३) व्यावसायिक समायोजन

     नोकरी, व्यवसाय हे व्यक्तीच्या उपजीविकेचे साधन आहे. आपल्या व्यवसायावर, नोकरीवर  आर्थिक-सामाजिक दर्जा, समाजाकडून मिळणारी किंमत अवलंबून असते. आपला व्यवसाय आपल्याला मानमरातब, आत्मप्रतिष्ठा मिळवून देत असतो. व्यवसायाची योग्य निवड, त्यासाठी योग्य प्रशिक्षण, व्यवसायातील सुरक्षितता, प्रगतीची संधी, आर्थिक मोबदला, कामाचे स्वरूप, कर्तव्ये व जबाबदाऱ्या, व्यावसायिक समाधान, सहकारी वर्गाशी सुसंबंध या गोष्टी व्यवस्थित हाताळता येणे म्हणजे परिणामकारक व्यावसायिक समायोजन होय. 


      वरील तिन्ही प्रकारच्या समायोजनाशिवाय भावनिक समायोजन, शालेय समायोजन, वैवाहिक समायोजन या प्रकारचे देखील समायोजन आपणास करावे लागते. जेंव्हा आपण विविध प्रकारचे समायोजन साधण्यात यशस्वी होऊ तेंव्हा आपण मानसिक दृष्टया शांत, स्थिर राहू शकतो. त्यासाठी आपल्याला अपयशातून ज्ञान घेत जीवन जगण्याची कौशल्ये विकसित करावी लागतील. शेवटी काय तर, यशस्वी समायोजन हाच सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे हे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. 




संदर्भ : य.च.म.मु.वि. मानसिक स्वास्थ्य




No comments:

Post a Comment

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...