Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Monday, 27 December 2021

रत्नपारखी


दुसऱ्यांशी चांगले वागूनही लोक आपल्याशी वाईट का वागतात?  जाणून घ्या कारणं...

आपण चांगले तर जग चांगले, ही थोरामोठ्यांची शिकवण आपण अंमलात आणतो. परंतु बरेचदा अनुभव असा येतो, की कितीही चांगले वागा, पण लोक आपल्याशी वाईटच वागतात. असे का? हा प्रश्न आपल्याला पडतो आणि चांगुलपणावरून आपला विश्वास उडायला लागतो. त्यावर उत्तर दिले एका साधूमहाराजांनी!


एका गावातला एक तरुण अतिशय साधा, भोळा आणि प्रेमळ होता. कोणी कसेही वागो, पण त्याने आपला चांगुलपणा कधीच सोडला नव्हता. परंतु एक वेळ अशी येते, जेव्हा संयमाचा बांध फुटतो आणि आपल्याला स्वत:च्या चांगुलपणाचाही राग येऊ लागतो. मन व्यवहारी होते, स्वार्थी होते, परंतु हा बदलही आपल्याला सहन होत नाही. कारण चांगले वागणे हा आपला स्थायी भाव असतो. 

त्या तरुणाच्या बाबतीतही तेच झाले. तो अतिशय अस्वस्थ होता. त्याने गावातल्या एका साधूबाबांकडे जाऊन शंकेचे समाधान विचारले. साधू महाराजांनी त्याला आपल्या सदऱ्याच्या खिशातून एक अंगठी दिली आणि म्हणाले, `पुढचा आठवडाभर ही अंगठी तू तुझ्याजवळ ये आणि त्याची किंमत किती मिळू शकेल याचा शोध घे. फक्त काही केल्या ही अंगठी विकू नकोस!'

प्रश्न आणि उत्तर यांचा परस्पर काहीही संबंध नसताना साधूमहाराजांनी दिलेले काम पाहून तरुण निराश झाला. परंतु त्याने दिलेले काम पूर्ण करायचे ठरवले. तो एका व्यापाऱ्याजवळ गेला. त्याला अंगठी दाखवली. तो त्या अंगठीचे हजार रुपये देईन म्हणाला. तरुण मुलगा दुसऱ्या व्यापाऱ्याकडे गेला,त्या व्यापाऱ्याने दहा हजाराची बोली लावली. तिथून तो एका सोनाराकडे गेला. सोनाराने अंगठी नीट पाहिली आणि म्हणाला एक लाख रुपए देतो, पण ही अंगठी मलाच विक! तरुण मुलगा गोंधळला. तिथून तो एका जवाहिराकडे गेला. त्याने मोल ठरवायला वेळ लावला पण त्याने जे उत्तर दिले ते ऐकून तरुण मुलगा चक्रावला. जवाहीर म्हणाला, `माझी सगळी संपत्ती देऊ केली तरी या अंगठीचे मोल मला फेडता येणार नाही,हे ऐकून गोंधळलेला तरुण साधूमहाराजांकडे परत आला. त्याने सगळी हकीकत सांगितली. त्यावर साधूमहाराज म्हणाले, बाळा, अंगठीची किंमत ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार सांगितली. जो खरा रत्नपारखी होता त्याने ही अंगठी अमुल्य आहे असे सांगितले. याचाच अर्थ आपले गुण ओळखणारा आणि त्या गुणांची कदर करणारासुद्धा तेवढाच गुणवान असावा लागतो. जे लोक तुझी किंमत करत नाहीत, ते त्यांच्या कुवतीप्रमाणे तुझ्याशी व्यवहार करतात. मात्र जे तुला ओळखतात ते तुझी किंमत , योग्यता समजतात. तू ही अंगठी आहेस हे आधी ओळख आणि तुझी किंमत सामान्य व्यापाऱ्याने ओळखावी अशी अपेक्षा करू नकोस. तू तुझा चांगुलपणा कायम ठेव. कोणीतरी रत्नपारखी आयुष्यात नक्कीच भेटेल.

No comments:

Post a Comment

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...