या मानसिक विकृतीचे विविध प्रकार असून ते मज्जाविकृतीच्या सदरात पडतात कारण चित्तविकृतींच्या बाबतीत आढळून येणारे व्यक्तिमत्त्वाचे गंभीर विघटन या विकृतीच्या बाबतीत झालेले नसते. इंग्रजीत ह्या विकृतीस ‘हिस्टेरिया’ म्हणतात. प्राचीन ग्रीक वैद्य हिपॉक्राटीझ याची अशी समजूत होती, की तरुण स्त्रियांच्या अतृप्त गर्भाशयाचे (हिस्टेरा = गर्भाशय) ऊर्ध्व दिशेने चलनवलन होऊ लागल्यामुळे या विकृतीची लक्षणे उद्भवतात. ही कल्पना अर्थातच चुकीची ठरली आहे कारण लहान मुलांमध्ये, पौगंडावस्थेतील किशोरांमध्ये, त्याचप्रमाणे सैनिक, लेखनिक, तारखात्यातील संदेशप्रेषक वगैरे व्यक्तींमध्येही या विकृतीची काही लक्षणे आढळलेली आहेत. तथापि ‘हिस्टेरिया’ ही आता अन्वर्थक नसलेली संज्ञाच या विकृतीस रूढ होऊन बसली आहे.
लक्षणे व प्रकार : या विकृतीच्या लक्षणांच्या मुळाशी प्रत्यक्ष शारीरिक-इंद्रियांतील स्नायूंमधील वा केंद्रीय मज्जासंस्थेतील बिघाड नसतो परंतु रुग्णाच्या इंद्रियांची, कर्मेंद्रियांची, तसेच प्रत्यभिज्ञा, स्मृती वगैरे मनोव्यापारांसंबंधीची विक्रिया अथवा अक्षमता तीत निर्माण होते. त्यामुळे ही कार्यिक अक्षमता म्हणजे केवळ ढोंग वा कामचुकारपणाने केलेली बतावणी होय, असे लोकांना वाटण्याचा संभव असतो. परंतु असे समजणे बरोबर नाही कारण या अक्षमतेपायी व्यक्ती सुखाला पारखी होत असते इतकेच नव्हे, तर काही लक्षणे इतकी गंभीर असतात, की त्यापायी व्यक्तीच्या जिवास अपाय होण्याचाही संभव असतो.
या विकृतीच्या लक्षणांचे (१) कारक इंद्रियांशी संबंधित, (२) वेदनेंद्रियांशी संबंधित, (३) अंतस्थ इंद्रियांशी संबंधित आणि (४) मनोव्यापारांशी संबंधित असे प्रकार पडतात. हातापायांचा वा इतर स्नायूंचा लुळेपणा, स्नायुकंप, वांब येणे, सांधे जखडणे, स्वरयंत्राची अक्षमता, खुदूखुदू हसल्यासारखी शरीर चेष्टा होणे ही कारकइंद्रियांशी संबंधित लक्षणे होत.
त्वचेच्या विशिष्ट भागापुरतीच आग, कधी या तर कधी दुसऱ्याच एखाद्या भागाची स्पर्शबधिरता, अचानक झिणझिण्या, डोळे किंवा कान अगदी सुस्थितीत असूनही पूर्ण किंवा निवडक गोष्टींपुरतेच अंधत्व किंवा बहिरेपण, स्वतःच्या हालचालींचे वेदनच लुप्त होणे, डोकेदुखी तसेच पाठदुखी ही वेदनेंद्रियांशी संबंधित लक्षणे होत.
अंतस्थ इंद्रियांबाबतच्या लक्षणांमध्ये समाविष्ट होणारी या विकृतीची लक्षणे म्हणजे अन्न घशाखाली न उतरणे, श्वासनलिकेची विक्रिया होऊन श्वास घेण्यास त्रास वाटणे, खोकल्याची उबळ, गुदमरल्यागत वा गळा भरून आल्यागत अवस्था, वांतीची भावना, बद्धकोष्ठ, हृदयाची धडधड, हृदयाच्या वरच्या बाजूस छातीत दुखणे गर्भारपणाची भावना (वंध्या स्त्रियांना) वगैरे होत.
उन्माद विकृतीच्या मनोव्यापारांच्या पातळीवरील लक्षणांमध्ये स्मृतिलोप, निद्राभ्रमण, तंद्रावस्था, आपण कोण व कुठचे आहोत, हेच विसरून जाऊन आत्मविस्मृतिपूर्वक भ्रमण व व्यवहार, मूर्च्छा वगैरेंचा समावेश होतो. ही मूर्च्छा फक्त जागेपणीच व साधारणतः इतरांच्या उपस्थितीत येते. स्वतःस इजा न होईल अशा बेताने व्यक्ती जमिनीवर पडते, दातखीळ वा तोंडास फेस नसतो. या अवस्थेत होणाऱ्या हालचाली म्हणजे एक प्रकारचे नाट्य असते व या मूर्च्छेनंतर, अपस्माराच्या झटक्यानंतर येतो तसा थकवा न येता, उलट मोकळे वाटते. एकाच शरीरात दोन वा अधिक मने वा व्यक्ती, अथवा दुहेरी व्यक्तिमत्त्व तसेच व्यक्तिमत्त्व बाहुल्य हेही याच विकृतीचे अत्यंत नेत्रवेधक व नाट्यपूर्ण प्रकार होत.
उन्मादाची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व साधारणतः पुढीलप्रमाणे असल्याचे आढळते : त्यांच्या भावनिक प्रतिक्रियांमध्ये संयम कमी असतो व लहान मुलांप्रमाणे त्या प्रतिक्रिया अपरिपक्वतेच्या निदर्शक असतात. आप्त व मित्र यांबाबत त्यांची वागणूक लहरी कधी खूप प्रेमाची तर कधी द्वेषपूर्ण असते. इतरांनी आपल्याकडे लक्ष द्यावे व आपले कौतुक करावे, सहानुभूती दर्शवावी, अशी त्यांची अपेक्षा असते. संघर्षजनक समस्या जबाबदाऱ्या टाळण्याकडे तसेच त्या दुसऱ्यावर ढकलण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते. त्यांच्या भावनिक प्रतिक्रियांमध्ये उथळपणा व इतरांशी असलेल्या संबंधांमध्ये हिकमतीपणा व नाटकीपणा असतो. या व्यक्ती खूप सूचनक्षम असतात. त्यांना चिंताकुलतेचे अधूनमधून झटके येत असतात.
कारणमीमांसा: या विकृतीची लक्षणे शारीरिक दोषमूलक नसतात. काही काही लक्षणे सूचनवशतेमुळे निर्माण होतात, असे बॅबिन्स्की याने दाखवून दिले आहे. प्येअर झाने (१२५९–१९४७) याच्या मते ही विकृती म्हणजे मानसिक अवसन्नतेचाच एक प्रकार होय. त्याची उपपत्ती अशी आहे : (अ) काही व्यक्तींमध्ये आनुवंशिक कारणांमुळे मानसिक शक्तीची कमतरता असते. (ब) त्यातच मनोभावात्मक आघांताची किंवा ताणांची भर पडल्यामुळे, अशा व्यक्तींच्या मानसिक जीवनाचे संश्लेषण व्हावे तसे होत नसते. (क) अशा स्थितीत जर तीव्र मानसिक आघात करणाऱ्या अथवा मनःशक्तीचा अतोनात व्यय करणाऱ्या घटना घडल्या तर त्या घटना जाणिवेच्या प्रवाहात सामावून घेतल्या जाण्याऐवजी संपूर्णपणे किंवा अंशतः विलग म्हणजे वियुक्त राहतात. या वियोजन प्रक्रियेमुळे व्यक्तीच्या अंतरंगात जणू एक निराळी संघटना बनते व व्यक्तिमत्त्वात कार्यात्मक एकात्मता येत नाही. व्यक्तिमत्त्वाचा असा विलग राहिलेला भाग स्वतंत्र रीत्या कार्य करू लागतो व प्रसंगविशेषी या विकृतीच्या लक्षणांच्या रूपाने डोकावतो.
परंतु हे वियोजन का घडून येते ? झाने याच्या उपपत्तीत या प्रश्नाचे उत्तर नाही ते सिग्मंड फ्रॉइड (१२५६–१९३९) याने देण्याचा प्रयत्न केला.त्याची उपपत्ती अशी : व्यक्तीच्या अप्रशस्त प्रेरणा व वासना, तिच्या भावजीवनात दुःखदायक वा लज्जास्पद खळबळ उत्पन्न केलेल्या प्रसंगांच्या स्मृती इत्यादींचा व्यक्तीच्या ‘अहं’शी संघर्ष होतो व अहंकडून अर्धवट दडपल्या गेलेल्या व निराळी संघटना करून राहिलेल्या प्रेरणा, वासना व स्मृती नानाविध लक्षणांची रूपे घेतात व बोधमनात डोकावू लागतात. अर्थात त्यांचे ‘रूपांतरण’ झालेले असते. या दृष्टीने पहाता, ही विकृतिलक्षणे प्रयोजनगर्भ व अर्थपूर्ण असतात.
उन्माद विकृतीच्या कोणत्या लक्षणांचा अवलंब व्यक्तीकडून होईल हे दोन गोष्टींवर अवलंबून असते : (१) व्यक्तीचा स्वतःचा पूर्वानुभव आणि (२) इतरांचे तिच्या नजरेस पडलेले वर्तन. स्वतःला हवे असणारे कौतुक व सहानुभूती मिळवायला अथवा नको असलेले भावनाक्षोभक प्रसंग टाळायला अमुक अमुक प्रकारची शारीरिक तक्रार अथवा अमुक प्रकारची अवस्था उपयोगी पडेल, हे तिने लहानपणाच्या स्वानुभवांवरून तसेच इतरांचे वर्तन पाहून हेरलेले असते व मग स्वयंसूचनेद्वारा ती ती लक्षणे त्या त्या व्यक्तीत दृग्गोचर होऊ लागतात.
चिकित्सा: ही विकृती दूर होऊ शकते. रुग्णाचा मंत्रतंत्रादींवर विश्वास असला, तर त्याच्या सूचनवशतेचा फायदा घेऊन मंत्रतंत्रादींचा उपयोग करता येतो. काहीतरी औषध देणे वा दिल्यासारखे करणे तसेच वेळप्रसंगी शस्त्रक्रियेचे नाटक करणे म्हणजे अप्रत्यक्ष सूचनतंत्र वापरणे हेही उपयोगी पडू शकते. प्रत्यक्ष सूचनांचाही उपयोग होतो. संमोहनपूर्वक सूचनांचाही उपयोग होतो तथापि केवळ सूचनोपचार हा चिरपरिणामी ठरत नाही. कारण जोवर स्वतःच्या विकृतीचे अबोध मनात असलेले मूळ रुग्णाच्या बोध मनात आणले जात नाही तोवर त्याची विकृती या नाहीतर दुसऱ्या कोणत्यातरी लक्षणांच्या रूपाने शिल्लकच राहते. काहींच्या मते इतर कोणत्याही उपायांनी न सुधारणाऱ्या रुग्णांच्या बाबतीतच सूचनतंत्र वापरावे, एरव्ही वापरू नये कारण हे रुग्ण आधीच सूचनक्षम असतात व सूचनतंत्राने ते अधिकच सूचनक्षम होण्याचा संभव असतो.
रोग्याच्या मनातील (त्याची त्यालाच जाणीव नसलेलेही) काढून घेणे हा चिकित्सेचा उत्तम मार्ग होय. त्यासाठी त्याला संमोहित करून (हिप्नोअनॅलिसिस) किंवा औषध देऊन (नार्कोअनॅलिसिस) अथवा जागृत अवस्थेत मुक्तपणेबोलावयास लावून (सायकोअनॅलिसिस) आणि त्याबरोबरच त्याच्या स्वप्नांचा अन्वयार्थ लावून विश्लेषण करता येते. यांपैकी शेवटचा मार्ग श्रेयस्कर ठरतो कारण त्यायोगे रुग्णाचे मनोविरेचन होते व शिवाय स्वतःच्या विकृतीच्या मुळाशी असलेले संघर्षप्रसंग रुग्णाचे रुग्णालाच समजू लागतात. मात्र मनोविश्लेषण बरोबरच रुग्णाच्या ठिकाणी मानसिक परिपक्वता आणणे, त्याची स्वतःकडे व इतरांकडे पाहण्याची दृष्टी सुधारणे, त्याच्या सवयींत व अभिवृत्तींत बदल घडवून आणणे, हेही आवश्यक असते. यांशिवाय रुग्णाशी संबंधित असलेल्या व्यक्तींतही बदल घडवून आणणे पुष्कळदा आवश्यक असते.
अकोलकर, व. वि.
मराठी विश्वकोश
Very good information
ReplyDelete