रोजच्या दैनंदिन जीवनात आपला संपर्क अनेक व्यक्तींशी येतो. त्यापैकी आपण काही व्यक्तींना बरोबर ओळखतो. काही व्यक्ती ओळखण्यात आपण चूक करतो. एखादी व्यक्ती चुकीची वाटल्यास आपण त्या व्यक्तीबद्दल अनेक मते तयार करतो. एखादी व्यक्ती आपल्याला मैत्रीस योग्य वाटते तर एखादी व्यक्ती अयोग्य वाटते. एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे त्याबाबत चुकीचे मत तयार करणे याला चुकीची छाप म्हणजेच Mistaken Impressions असे म्हणतात. आपण अपुऱ्या माहितीवरून एखाद्या व्यक्तीला आकार देत असतो. जेव्हा चटकन एखाद्याचे मूल्यमापन करतो तेंव्हा आपण आपल्या मानसिक पातळीवरती जवळचा मार्ग शोधतो. त्यामुळे चुकीचा निर्णय घेतला जातो. चुकीची छाप पडण्यामागे काही कारणे आहेत. त्यामध्ये साचेबंदपणा, सकारात्मक व नकारात्मक पूर्वग्रह आणि आरोपण इत्यादी घटकांचा परिणाम होतो.
१. साचेबंदपणा : आपण बरेचदा एका समस्येतून सर्वच व्यक्तींबद्दलचे मूल्यमापन करत असतो. त्यामुळे चुकीची छाप पडत असते. उदा. सगळे शिक्षक सारखेच असतात. पोलीस, वकील, शासकीय क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्तींबद्दल साचेबंदपणातून पाहिले जाते. त्यामुळे चुकीची छाप निर्माण होते. चित्रपट, विविध टिव्ही मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करणाऱ्या पात्रांचे सादरीकरण ठराविक साच्यातून केले जाते. उदा. पुरुष अधिक स्वावलंबी आणि सर्जनशील असतात. स्त्रीया अधिक स्वावलंबी व सर्जनशील नसतात. जाहिरातीमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांनाच अधिक प्रमाणात दाखविले जाते. काही संशोधनानुसार, साचेबंदपणा हा नैसर्गिक व आपोआप येत असून साचेबंदपणाविषयी सार्वजनिक जीवनात आक्रमक प्रतिक्रिया दिसते. दुर्देवाने साचेबंदपणा नकारात्मक असेल तर त्याचा नातेसंबंधांवर प्रतिकूल परिणाम होतो.
२. सकारात्मक आणि नकारात्मक पूर्वग्रह : लोकांना काही गुणविशेषणाच्या आधारे चांगले व वाईट असे लेबल लावण्याची वृत्ती आपल्याकडे असते. असे लेबल लावताना आपण व्यक्तींमधील आपण एखादाच चांगला गुण विचारात घेतो व संबंधित व्यक्ती चांगली आहे असे समजतो. काही गुणविशेष नकारात्मक असणाऱ्या व्यक्तीचे संवेदन नकारात्मक होते. उबदार, हुशार, उदयोगशीलता या गुणांच्या आधारे सकारात्मकता ठरवली जाते. तर माघार घेणाऱ्या, शांत व अबोल व्यक्ती असतील तर त्यांची छाप नकारात्मक पडते. खरेतर व्यक्ती चांगल्या व वाईट गुणांचे एक मिश्रण असते. प्रत्येकाचा इतरांकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो व त्यातून छाप निर्माण होते.
३. आरोपण : आपण लोकांच्या बाह्य किंवा सभोवतालच्या परिस्थितीचा वर्तनावर होणारा परिणाम विचारात न घेता त्याच्या बाबतीत गैरसमज करून घेतो; त्या संदर्भातील त्रुटी म्हणजे आरोपण होय. आपण वर्तनाचे मूल्यमापन करताना काही मानदंड वापरतो आणि इतरांच्या वर्तनाचे मापन करतो. लोक नेहमी एकाच भूमिकेतून वावरत असतात, असे आपण गृहीत धरतो. उदा. एखाद्याच्या हातून कॉफीचा कप पडला तर त्या संबंधित दोन प्रकारे आरोपण केले जाते. पहिले म्हणजे, ती व्यक्ती अडाणी आहे; तर दुसरे म्हणजे, कॉफी गरम असल्याने कप पडला असेल. खरे सत्य हे आहे की, लोक क्षणिक परिस्थितीशी बांधील असतात. आरोपणाचा सहसंबंध व्यक्तिमत्वाशी जोडला जातो. सभोवतालच्या परिस्थितीचा विचार केला जात नाही असे सामाजिकदृष्ट्या घडत असते. यास मूलभूत आरोपणाची त्रुटी असे म्हणतात.
शेवटी काय तर एखाद्या व्यक्तीबद्दल आपण किती जाणून घेतो. त्याच्याशी आपल्या आंतरक्रिया कशा होतात यावर अचूक छाप अवलंबून असते. एखाद्या व्यक्तीला सारासार समजून न घेता काढलेला निष्कर्ष हा चुकीचा ठरु शकतो. त्यामुळे संभाषणाची शैली, सामाजिक मानदंड, शाब्दिक संकेत, अशाब्दीक संकेत, भावनाविष्कार याचे अचूक मूल्यमापन करण्याचे कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे.
(संदर्भ: उपयोजित मानसशास्त्र : नाईक, शिरगावे, घस्ते, बिराजे)
No comments:
Post a Comment