*जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त कन्या महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार*
*(देशभरातून सुमारे १२०० व्यक्तींचा सहभाग)*
मिरज : तार्किक दोष आपल्याला नकारात्मकतेकडे घेऊन जातात. कोणत्याही गोष्टीचे भयंकरीकरण केल्याने त्याचा मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. त्यासाठी सकारात्मक आणि विवेकवादी विचार अंगीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रदीप पाटील यांनी केले. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त कन्या महाविद्यालय, मिरज, श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी आणि शिवाजी विद्यापीठ मानसशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने "सकारात्मक आणि विवेकवादी विचार: मानसिक स्वास्थ्य" या विषयावर आयोजित ऑनलाइन राष्ट्रीय वेबिनारमध्ये ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. देशभरातून सुमारे 1200 व्यक्तीनी यामध्ये सहभाग नोंदवला. अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत चव्हाण होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून कोविड विषयी समाजमनात असणारे समज-गैरसमज, त्याचे मानसिक स्वास्थ्यावर होणारे परिणाम स्लाईड शो द्वारे उलगडून सांगितले. शिवाजी विद्यापीठ मानसशास्त्र अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ. भरत नाईक यांनी बीजभाषण केले. त्यांनी आपल्या बीजभाषणातून परिस्थिती कितीही कठीण असेल तरी त्यातून बाहेर पडता येते, त्यासाठी दुःख न बाळगता सकारात्मक प्रेरणा निर्माण केली पाहिजे. गौतम बुद्धांनी सुमारे 2500 पूर्वी सांगितलेल्या विवेकवादी विचारांचा स्वीकार करून जीवन समृद्ध बनवता येते. शासनाने मानसिक आरोग्यात गुंतवणूक केली पाहिजे. आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था बळकट झाल्या पाहिजेत. असे मौलिक विचार मांडले.
सुरवातीला वेबिनारचे संयोजक प्राचार्य डॉ. अनिल पाटील व प्रभारी प्राचार्या डॉ. शर्वरी कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले व सर्वाना शुभेच्छा दिल्या. वेबिनारच्या समन्वयक प्रा. प्रमिला सुर्वे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समन्वयक प्रा. रमेश कट्टीमनी यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. आभार परिषदेचे सचिव डॉ. विकास मिणचेकर यांनी मानले. प्रा. बाबासाहेब सरगर यांनी तांत्रिक सहकार्य केले.
या वेबिनारमध्ये संस्थेचे पदाधिकारी, कन्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. राजू झाडबुके, शिवाजी विद्यापीठ मानसशास्त्र परिषदेचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, पर्यवेक्षिका डॉ. सुनीता माळी, प्रा. माधुरी देशमुख, प्रा. तुषार पाटील, प्रा. बी. आर. पवार, प्रा. जे. पी. चंदनशिवे, डॉ. सागर लटके, प्रा. विनायक वनमोरे, प्रा. गंगाधर चव्हाण दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, मानसशास्त्र विभागातील विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment