Wednesday, 24 November 2021
Friday, 12 November 2021
मनाची भूमिका आणि शारीरिक आजार
*कुठलाही आजार आपल्याला का होतो?*
तर त्याचे सहज सोपे उत्तर आहे.
*तुम्ही स्विकारल्यामुळे!*
आपल्या शरीरात पाण्यावर तरंगण्याची नैसर्गिक शक्ती आहे. पण तरीही माणूस पाण्यात बुडून मरतो. याला काय म्हणाल आपल्या मनाने अतिशय स्ट्रॉंगली स्विकारलेय की मला पोहायला येत नाही आणि कोणालाही पोहायला येत नाही ही अंधश्रद्धा आहे. हत्ती किती जड आहे तोही पोहतो. कारण त्याने ठरवलेले नाही. त्याला माहीतच आहे तो पाण्यावर तरंगणार आहे. अहो सापाला हात पाय नसतात. तोही पाण्यात पोहतो. म्हणजे हात पाय हलवले, तरच आपण पाण्यावर तरंगू शकतो हाही गैरसमजच आहे. बघा जी माणसं पाण्यात बुडून मरतात त्यांचे शरीर काही वेळाने पाण्यावर तरंगायला लागते. याप्रमाणेच आपल्यात प्रतिकारशक्ती आहे.
ती आपल्याला कसलाच आजार होऊ नये यासाठी सतत काम करत असते. तिला मनापासून स्ट्रॉंगली मान्य करा. हेच खरे शरीर शास्त्र आहे. मेडीकल सायन्स ही शक्ती तुमच्यात नसेल तर काहीच करू शकत नाही. तर ताप आल्यावर,सर्दी झाल्यावर, शिंक आल्यावर कसलाही आजार झाल्यावर थोडे थांबा.
*तुमच्यातील प्रतिकारशक्तीला काम करू द्या.*
अशा आजारांवर वारेमाप खर्च करणे *शरीरावर अत्याचार* आहेत. ही अंधश्रद्धा आहे.
शरीरशास्त्रात नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजे खरे विज्ञान आहे.
आपल्या शरीरातली अर्ध्याहून अधिक आजारांच्या मागे आपलं अज्ञ मन असतं. पण कित्येकदा पेशंटला याची माहीती नसते. डॉक्टरांकडे गेलं आणि उपचार घेतले की तात्पुरतं बरं वाटतं, थोड्या दिवसांनी पुन्हा दुखणं, उफाळून येतं, काय करावं, ते समजत नाही.
*मन आणि शरीर यांना जोडणारी काही लक्षणे बघू या.*
१) एखाद्या गोष्टीची जबरदस्त भिती किंवा चिंता वाटली की घशाला कोरड पडते.
२) परीक्षेचा किंवा अजून कसला तणाव असेल तर पोटात गोळा येतो,
३) समोर एखादा अपघात किंवा दुर्घटना पाहिली की हातापायातली शक्ती गळून जाते.
४) आणि याविपरीत सतत हसतमुख असणारी व्यक्ती नेहमी क्वचितच आजारी पडते.
तर हे सिद्ध झाले आहे की, आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही अज्ञात मनाची सत्ता चालते. जसं की, समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या दहाव्या भागात लगेच पापण्या मिटतात. अज्ञात मन शक्तीशाली आहे पण एखाद्या सेनापतीसारखं, त्याच्यावर सत्ता चालते विचारांची!
ताकतवार असला तरी तो गुलामच! दिलेला आदेश पाळणं एवढचं त्याचं काम!
आपण जे काही बोलतो तेच आपले विचार आहेत.
१) ब्लडप्रेशर आणि हृदयविकार -
समजा एखादा माणुस, नकळत, अशी वाक्ये पुन्हा पुन्हा वापरत असेल,
उदा.
- त्याला बघितलं की माझं रक्तच खवळतं!
- ह्यांच्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं, आणि हे बदलले!
- माझी तळपायाची आग मस्तकाला जाते!
क्वचित अशी वाक्ये वापरली गेली, तर हरकत नाही, पण पुन्हा पुन्हा हेच बोलल्यास आणि ते सुप्त मनात गेल्यास त्याचा विपरीत परिणाम रक्ताभिसरणावर नक्कीच होतो.
डॉक्टरकडे गेल्यावर औषध-उपचाराने काही काळ बरं वाटतं, पण अज्ञात मन त्याचा पिच्छा सोडत नाही.
ही सर्व वाक्य सतत तणावात असणार्या व्यक्तीच्या सवयीचा भाग बनतात आणि लवकरच तिला ब्लडप्रेशर आणि मोठ्या स्वरुपाचे हृदयाचे विकार घेरण्यास सुरुवात करतात.
थोडक्यात सतत मानसिक तणाव, हताशपणा आणि निराशा अनुभव करणाऱ्या व्यक्तीला हृदयाचे विकार लवकर घेरतात.
२) आतड्यांचे विकार – जी व्यक्ती स्वतःलाच घालून पाडून बोलते, स्वतःची निंदा करते, स्वतःला दुबळा समजते, तिला छोट्या आतड्यांच्या विकारांची समस्या उदभवते.
३) अपचन – बहुसंख्य लोक ह्या आजाराने त्रस्त आहेत, खरं तर मलविसर्जन ही अतिसहज आणि नैसर्गिक क्रिया आहे, तरीही काही जणांना ‘धक्का देण्यासाठी’ कृत्रिम उपायांचां, जसं की एखादे चुर्ण किंवा एखादं औषध ह्यांचा आधार घ्यावा लागतो.
आता ह्याची बरीचशी कारणं आहेत, इथे एका उदाहरणची चर्चा करुयात.
काही वेळा ह्याचं कारण बाल्यावस्थेत दडलेलं सापडतं, कडक शिस्तीच्या नादात आई वडीलांनी मुलाला एखादी शिक्षा केलेली असते, त्याचा राग त्याच्या मनात असतो, लहान मूल आईवडीलांवर राग काढू शकत नाही, त्याला त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकावीच लागते, त्यांना विरोध म्हणून ही क्रिया तो रोखून धरतो.
ह्या ठिकाणी आई वडील त्याला जबरदस्ती करु शकत नाहीत, हळुहळू तो मोठा होतो, शिस्तीचा बडगाही संपतो पण आपल्या आतड्यांवरचं नैसर्गीक नियंत्रण तो हरवून बसतो.
असं ही बघण्यात आलं की जेव्हा व्यक्ती आर्थिक संकटात सापडते, तेव्हा तिची पचनशक्ती कमजोर होते. जे लोक कंजुष वृत्तीचे असतात, त्यांच्यामध्ये मुळव्याध्याची समस्या जास्त आढळते.
४) छोट्याछोट्या गोष्टींवरही एखादी व्यक्ती वारंवार उत्तेजित होते, चिडते, अस्वस्थ होते, त्याचा परिणाम जठर आणि पित्ताशयावर पडतो.
५) डोकेदुखी –
आजकाल बहुतांश भगिनीवर्गाला झंडुबाम शिवाय झोप येत नाही. कारण काय असेल बरं?
- ह्या व्यक्तीला बघितलं की माझं डोकं दुखतं!
- त्याने माझं खुप डोकं खाल्लं!
- आमच्या ह्यांच्यासमोर कितीही डोकं फोडा, काही फायदा नाही,
निरंतर, नकळत असं बोलत राहील्याने अज्ञ मनात संदेश पोहचतो की माझ्या डोक्याला दुखायचे आहे.
आणि मायग्रेनचा त्रास चालू!
डोकेदुखीची अजुनही काही कारणे आहेत, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अप्रिय घटना घडलेली असतेच, पण तिला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा तिला उगाळण्याचा स्वभाव असेल तर डोकेदुखी सुरु होते.
तेव्हा असे कटु अनुभव विसरुन जाणेच इष्ट!
कधी नकोसे वाटणारे काम, त्रासदायक काम अंगावर येऊन पडते, आणि डोके दुखते. जितके पोस्टपोन केले तेवढा त्रास होतो, तेव्हा अशी कामे तात्काळ निपटून काढावीत.
६) पाठदुखी वा कंबरदुखी –
एखादी व्यक्ती सतत जबाबदारीच्या ओझ्याने वाकून थकुन गेली असेल तेव्हा तिला पाठदुखीला वा कम्बरदुखीला सामोरं जावं लागतं. असह्य वेदना होतात, ह्यात मानेपर्यंतचे स्नायू आखडले जातात. त्यांच्यावरचा ताण जाणवतो.
चेहरा मूळ स्थानी न राहता उजवीकडे किंवा डावीकडे कलतो.
आता सर्वात महत्वाचे, ह्यावर उपाय काय आहे?
आपापले औषधौपचार चालू ठेवा, पण हे रोग शरीरातून समूळ उपटून काढायचे असतील तर स्वयंसुचन हाच ह्यावरचा एकमेव उपाय आहे.
जसं की डोकेदुखीचं उदाहरण घेऊ – तंद्रावस्थेत जाऊन आपल्या अज्ञात मनाला सुचना द्या –
आता माझं डोकं एकदम हलकं हलकं होत आहे,
आता ते अजून शिथील आणि हलकं झालं आहे,
डोके दुखण्याचे प्रमाण कमी होत आहे, माझ्या डोक्यात जमा झालेलं अतिरीक्त रक्त आता शरीराच्या इतर भागात सुरळीतपणे पसरत आहे.
माझा डोकेदुखीचा त्रास नाहीसा होत आहे, काही क्षणांमध्ये ही बैचेनी दुर होईल!
आणि डोकेदुखी गायब!
प्रत्येक रोगासाठी अशा सुचना तयार करुन त्या अज्ञ मनापर्यत पोहचवून रोगमुक्त होता येते.
सारांश काय तर मित्रांनो, भावनांची कोंडी करुन जगू नका, रोग बनून ते शरीराला पोखरतील, राग व्यक्त करा, आणि मोकळे व्हा!
इथे मला एका महापुरुषाचा दृष्टांत आठवतो, त्यांना राग आल्याक्षणी ते कागद घ्यायचे आणि सविस्तर लिहून काढायचे, मनातले संपुर्ण भाव ओतून रिते व्हायचे, ते कागद दोन चार दिवस तसेच टेबलावर ठेवायचे आणि नंतर जाळून किंवा फाडून टाकायचे.
अशा प्रकारे मनातली सारी खळबळ बाहेर काढून टाकता येते. आता क्रोधाची भावना नाहीशी होते आणि हलकं हलकं वाटतं.
चला तर मग सर्वांनी निरोगी आणि ठणठणीत आयुष्यासाठी प्रयत्न करूया..
Sunday, 7 November 2021
भावना दुखावण्याच्या आजारावर औषध!
‘भावना दुखावण्या’चे परिणाम वाईटच : अपमान / अपयश / टीका सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन, टोकाचे पाऊल उचलले जाते… हे व्यक्तींच्याच नव्हे, तर समाजांच्याही बाबतीत होऊ शकते. या आजारावर मात कशी करायची, याची पद्धती शोधणारे डॉ. आरॉन बेक नुकतेच दिवंगत झाले…
डॉ. आरॉन बेक या जगविख्यात मनोविकारतज्ज्ञाचे नुकतेच फिलाडेल्फिया येथील राहत्या घरी निधन झाले. शंभर वर्षांचे अत्यंत अर्थपूर्ण आणि समाधानी आयुष्य त्यांना मिळाले. मानवी मनाची ‘अव्यक्त मन आणि व्यक्त मन’ अशी मांडणी करणारा सिग्मंड फ्रॉइड आपल्याला थोडाबहुत माहीत असतो; पण डॉ. आरॉन बेक आणि त्यांचे मनोविकार क्षेत्रातील काम यांविषयी आपण ऐकले किंवा वाचले नसणे अगदी स्वाभाविक आहे. या पार्श्वभूमीवर मानवी मनाचे आणि वर्तनाचे आकलन मूलगामी पद्धतीने बदलणाऱ्या डॉ. आरॉन बेक यांचे काम समजावून घेणे हे त्यांचे स्मरण करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे असे वाटते. त्यांच्या कामाला आपल्या काळाचादेखील एक अत्यंत महत्त्वाचा संदर्भ आहे. एवढ्या तेवढ्या कारणांवरून भावना दुखावल्या जाणाऱ्या कालखंडात आपण सगळे जगात आहोत! केवळ त्या भावना स्वत: दुखावून घेऊन आपण थांबत नाही तर सगळ्या समाजाला आपल्या दुखण्यासाठी वेठीस धरण्याची एक पद्धत आपल्याकडे रूढ झाली आहे. अशा कालखंडात तर, ‘भावना दुखावण्याच्या आजारावर औषध शोधणाऱ्या’ डॉ. आरॉन बेक यांचे विचार खूपच अधिक महत्त्वाचे ठरतात.
भावना दुखावण्याचे दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंग आपण सहज आठवू शकतो. कामाच्या ठिकाणी बॉस घालून-पडून बोलतो म्हणून अस्वस्थ होणे, परीक्षेत अपेक्षेइतके गुण मिळाले नाहीत म्हणून येणारे वैफल्य, प्रेमाच्या नात्यात किंवा लग्नात अपयश आल्याने झालेले अतीव दु:ख अशा अनेक गोष्टी आपण आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या स्वत:च्या आयुष्यात अनुभवत असतो. यामधून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भावना दुखावण्याच्या कारणांचा आपण जर लसावि काढला तर तो, ‘परिस्थिती अशी निर्माण झाली म्हणून माझ्या भावना दुखावल्या’ किंवा ‘दुसऱ्याने मुद्दामच माझ्या भावना दुखावल्या’ हा निघतो. थोडक्यात, आपल्या अस्वस्थतेसाठी दुसऱ्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला दोष देणे सुरू होते. याची पुढची पायरी म्हणजे, ‘समोरची व्यक्ती किंवा परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत माझे भावनिक दुखणे दुरुस्त होणार नाही,’ अशी धारणा करून घेतली जाते. यातूनच परिस्थिती शरणता आणि परिस्थिती बदलावी म्हणून कर्मकांडे, त्यामधून येणारी फसवणूक, हे सारे सुरू होते. डॉ. बेक यांनी हा भावना दुखावल्या जाण्याचा जो आजार आहे, त्याविषयी नवीन- कोरी करकरीत- मांडणी केली. अगदी मुळावरच घाव घातला म्हटले तरी चालेल.
त्या मांडणीनुसार, ‘कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला होणारा भावनिक त्रास हा प्रत्यक्षातील घटनेचा नसून त्या घटनेचा आपण जो अर्थ लावतो त्याचा असतो!!’ एक छोटे उदाहरण घेऊ. दरवर्षी हजारो मुले परीक्षेत नापास होतात. पण त्यामधली फारच थोडी नापास झालो म्हणून आत्महत्येचा प्रयत्न करतात. आता याचा अर्थ सरळ आहे की, आत्महत्येचे विचार हे परीक्षा नापास होण्याच्या घटनेशी थेट संबंधित नाहीत. तसे असते तर प्रत्येक नापास मुलाने आत्महत्येचा विचार केला असता. प्रत्यक्षात असे होताना आपल्याला दिसत नाही. मग काय घडते तर ज्या मुलांचे मन असा विचार करते की, ‘आपण परीक्षेत नापास झालो म्हणजे आपण जगण्यास लायक नाही’ तीच मुले आत्महत्येचा विचार करतात. जी मुले, ‘आता नाही तर पुढच्या वेळी पास होऊ!’ असा विचार करतात; ती आत्महत्येच्या वाटेला जात नाहीत. याचाच अर्थ असा की, आपल्याला होणारा भावनिक त्रास हा त्या नापास होण्याच्या घटनेमुळे नसून त्या घटनेचा आपण जो अर्थ लावतो त्याच्याशी संबंधित आहे! म्हणजे हा ‘भावना दुखावण्याचा आजार’ नसून ‘भावना दुखावून घेण्याचा आजार’ आहे. डॉ. बेक यांच्या मांडणीतून हे सत्य पुढे आले. तेवढेच महत्त्वाचे दुसरे सत्य असे की, एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखे हे विचार आपल्या मनाच्या पटलावर उमटत असतात. त्यांच्या या स्परूपामुळे आपण असे धरून चालतो की ते विचार योग्यच आहेत. प्रत्यक्षात मात्र परिस्थितीच्या पलीकडे जाऊन, स्वत: निर्णय घेऊन आपण कुठल्याही परिस्थितीला दिलेला स्वत:चा प्रतिसाद बदलू शकतो; अधिक विवेकी आणि विधायक करू शकतो, असा त्या उपचार पद्धतीचा गाभा आहे. एकदा का आपण अशा प्रकारे ‘स्वत:चे विचार तपासायची आणि बदलायची सवय’ स्वत:ला लावली की आपल्याला परिस्थितीमधून येणारी भावनिक हतबलतासुद्धा बदलता येते. आपल्या मनावर आपला ताबा मिळवण्याच्या दृष्टीने आपले एक महत्त्वाचे पाऊल पडते.
साधारण १९६० ते ७० च्या दशकाच्या दरम्यान ही मांडणी जेव्हा डॉ. बेक यांनी केली, तेव्हा ‘मानवी वर्तनाला त्याच्या अव्यक्त मनातील आणि बालपणातील अनेक घटनांशी संबंधित कारणे असतात,’ या स्वरूपाची सिग्मंड फ्रॉइड यांची मांडणी प्रबळ होती. मानवी मनाच्या अभ्यासात तिचे म्हणून एक स्वतंत्र महत्त्व आहे. त्या अभ्यासावर मानवी अंतर्मन आणि अव्यक्त भावना यांचा खूप मोठा प्रभाव आहे. आपल्या सर्व भावभावना या अंतर्मनाच्या गुलाम आहेत आणि अंतर्मनाचा गुंता सुटल्याशिवाय आपण आपली वर्तणूक बदलू शकत नाही, अशी एक हतबलता आणि परिस्थिती शरणता त्यामध्ये आहे. डॉ. बेक यांनीदेखील या ‘सायकोअॅनालिसिस’ (मनोविश्लेषण) म्हटले जाणाऱ्या पद्धतीचा अभ्यास केला होता. मात्र ‘सायकोअॅनालिसिस’च्या मर्यादाही लक्षात आल्यामुळे त्यांनी ही मानवी विचारांना केंद्रस्थानी ठेवणारी आणि प्रत्येक माणसाला- परिस्थिती कशीही असली तरी- आपल्या भावनांचा लगाम आपल्या हातात घेता येऊ शकेल अशी विचारनिष्ठ उपचार पद्धती शोधून काढली.
याच स्वरूपाची मांडणी आणि काम करणारे डॉ. अल्बर्ट एलीस आणि डॉ. आरॉन बेक हे दोघेही साधारणत: समकालीन होते. डॉ. एलीस यांनी ही विचार आणि उपचार पद्धती सामान्य लोकांपर्यंत नेण्यासाठी त्यांची हयात खर्च केली; तर डॉ. बेक यांनी त्याचा शास्त्रीय अभ्यास, संशोधन आणि त्याविषयी प्रशिक्षण देणे यांवर आयुष्यभर जोर दिला.
जगप्रसिद्ध जर्नल्समध्ये साधारण ६०० शोधनिबंध आणि दोन डझन पुस्तके ह्यांच्या माध्यमातून त्यांनी आपले विचार आणि संशोधन मांडून ठेवले आहे. आजअखेर लाखो लोकांनी मानसिक अस्वस्थतेच्या वेळी त्यांनी शोधलेल्या उपचार पद्धतीचा वापर करून स्वत:ला सावरले आहे आणि येत्या कालखंडात ही संख्या वाढतच जाणार आहे.
डिप्रेशनच्या आजाराच्या सौम्य टप्प्यावर ही उपचार पद्धती औषधांच्या इतकीच प्रभावी ठरते, असे संशोधन आता जगभर मान्य आहे. केवळ डिप्रेशन नव्हे, तर व्यक्तिमत्त्व दोष, व्यसनाधीनता यांच्यापासून ते तीव्र मानसिक आजारापर्यंत अनेक आजारांमध्ये या विचारकेंद्री उपचार पद्धतीचा वापर केला जातो.
नातेसंबंध टिकावे आणि बहरावे यासाठी त्यांनी ‘लव्ह इज नॉट इनफ!’ (केवळ प्रेम पुरेसे नाही..) अशा गंमतशीर नावाचे पुस्तक लिहिले आहे. चांगल्या आणि अर्थपूर्ण नात्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नसते. त्याबरोबर मनाची संवेदनशीलता, उदारता, जबाबदारीचे भान, निष्ठावानपणा असे अनेक महत्त्वाचे गुण असतात हे डॉ. बेक यांनी आपल्या लक्षात आणून दिले आहे. एकमेकांच्यावर अतीव प्रेम करणारी अनेक नाती दीर्घकाळ का टिकू शकत नाहीत आणि फारसे प्रेम नसलेली नातीदेखील अनेक वेळा कशी दीर्घकाळ टिकतात याचे उत्तर हे पुस्तक वाचताना मिळू शकते.
डॉ. बेक यांनी दोन वेळा- २००२ आणि २०१५ मध्ये – दलाई लामा यांच्याशी संवादाचा कार्यक्रम केला. ही विचारकेंद्री उपचार पद्धती आणि बुद्धविचार यांमध्ये मोठे साम्य असल्याचे निरीक्षण डॉ. बेक यांनी नोंदवून ठेवले आहे. विविध धर्मांमधील पुनर्जन्म, ‘मागच्या जन्मीचे पाप’, स्वर्ग-नरक या संकल्पनांच्या पलीकडे जाऊन आपल्या जीवनातील दु:खाचे ‘स्वत:च्या आत असलेले कारण’ शोधणाऱ्या ज्या परंपरा आहेत त्यांनादेखील पुढे नेणारा हा विवेकवादी विचार आहे. केवळ वैयक्तिक दु:ख आणि भावनांचे दुखावणे नाही; तर समाजपातळीवरदेखील हे विचार खूप महत्त्वाचे आहेत. ‘शत्रूकेंद्री जगणे’ आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्या कोणाला तरी जबाबदार धरण्याची जणू एक पद्धत आपल्याकडे निर्माण झाली आहे. या शत्रूकेंद्री आणि भूतकाळवादी विचारधारेला एक सशक्त पर्याय देण्याचे सामथ्र्य या ‘स्व’लक्ष्यी, विचारनिष्ठ आणि वर्तमानाला महत्त्व देणाऱ्या पद्धतीमध्ये आहे.
शेवटपर्यंत कार्यरत राहिलेल्या डॉ. बेक यांचे काम हे आता बेक इन्स्टिट्यूटच्या (स्थापना : १९९४) माध्यमातून पुढे जात राहील. ‘मनाच्या पृष्ठभागावरदेखील खूप काही असते- आपण केवळ डोळे उघडून बघायला हवे,’ हा डॉ. बेक यांचा संदेश आपण ध्यानात घेतला पाहिजे. आपले स्वत:चे, आपल्या कुटुंबाचे आणि एकुणात समाजाचे खूप भले करण्याची ताकद या विचारात आहे!
संदर्भ : दै. लोकसत्ता
आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?
आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...
-
आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...
-
संवाद हा आपल्या जगण्यातला अतिशय महत्त्वाचा घटक. कोणी आपल्याशी बोलायला नसलं, आपण एकटे असलो तरी संवाद थांबत नाही. आपण मनातल्या मनात आपल्या स...
-
जाणून घेऊयात मानसिक आरोग्य दिनाविषयी... आजच्या काळात मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या जसे की नैराश्य, चिंता आणि तणाव इत्यादींमध्ये लक्षणीय...