Pages

Tuesday, 5 October 2021

मन:स्वास्थ्य म्हणजे काय ?

       मन व शरीर एकमेकांना पूरक आहेत. मन स्वस्थ असेल तर व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीवरही मात करू शकते. परंतु सध्याच्या स्पर्धात्मक, धकाधकीच्या जीवनात मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष झाल्याने वेगवेगळे मानसिक आजार बळावत आहेत. शिवाय समाज मनोरुग्णांकडे आणि मानसिक आजारांकडे कलंकित नजरेने पाहतो. हा कलंक पुसून काढण्यासाठी दरवर्षी 10 ऑक्‍टोबर हा दिवस "जागतिक मानसिक आरोग्य दिन' तसेच 4 ऑक्‍टोबर ते 10 ऑक्‍टोबर "जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात मन:स्वास्थ्याविषयी थोडेसे....

       शारीरिक आरोग्याबाबत आपण नेहमीच जागरूक असतो. शासन स्तरावरदेखील शरीर स्वास्थ्यविषयक प्रश्नांना जास्त महत्व दिले जाते. मानसिक स्वास्थ्याबाबत मात्र इतकी जाणीव समाजमनापर्यंत असलेली आढळत नाही. उच्च शिक्षित लोकांमध्येही ही जाणीव फार कमी प्रमाणात असल्याचे दिसून येते. जाणीव असली तरी मानसिक स्वास्थ्याबाबत अनेक गैरसमज आढळतात. शारीरिक स्वास्थ्य बिघडले तर ते ग्राह्य आहे. परंतु एखादी व्यक्ती तऱ्हेवाईक किंवा अपेक्षित वर्तनापेक्षा/नेहमीपेक्षा वेगळी वागत असेल तर त्याला लगेच मनोरुग्ण, वेडा असे शब्दप्रयोग वापरले जातात. खरं तर ही समजूत कितपत बरोबर आहे? मानसिक स्वास्थ्य बिघडणे म्हणजे त्याला मानसिक आजार/विकृती आहे असे मानता येणार नाही. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आढळतात की, जे क्षुल्लक गोष्टीवरून लक्षणीय चिडतात, कारणे सांगून जबाबदारी टाळणारे असतात, इतरांच्या कामात चुका दाखवणाऱ्या, आपल्या मागण्यांसाठी हट्ट धरून बसतात. मग या सर्वांनाच मनोविकृती किंवा सर्वांचेच मानसिक स्वास्थ्य हरवले आहे असे म्हणता येणार नाही. कारण स्वस्थ मन आणि अस्वस्थ मन यातील सीमारेषा स्पष्ट करता येत नाही. 

        फक्त शरीराचे आरोग्य चांगले असणे आणि शारीरिक रोगापासून वंचित असणे म्हणजे आरोग्य नव्हे. आरोग्य किंवा रोगाचा अभाव या संकल्पनेमध्ये शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक पैलूंचा समावेश होतो. जी व्यक्ती या सर्व पैलूंनी संपन्न आहे, तिला स्वस्थ व्यक्तीमत्वाची व्यक्ती असे म्हणता येईल. स्वस्थ व्यक्तीमत्वाद्वारे  सर्वांगीण विकास साधण्यासाठी मानसिक दृष्टया स्वस्थ असणे आवश्यक आहे. मन आणि शरीर या दोन घटकांची यात महत्वाची भूमिका आहे. मन आणि शरीर या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोन्ही परस्पर पूरक आहेत. या दोहोंमधील क्रिया जोपर्यंत परस्परपूरक असतात तोपर्यंत व्यक्ती स्वस्थ असते. या दोन्हीत असंतुलन निर्माण झाला की अस्वस्थ मन निरोगी शरीरालादेखील रोगट करून टाकते. त्यामुळे मन जर स्वस्थ असेल तर शरीरदेखील तंदुरुस्त राहते. 

       या वरील विवेचनावरून आता मन:स्वाथ्य म्हणजे नेमके काय ते जाणून घेऊयात. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केलेल्या व्याख्येनुसार, "मानसिक अनारोग्याचा अभाव, उत्पादकता, धनात्मक अभिवृत्ती आणि समायोजनाची तयारी या गुणांनी युक्त असे वर्तन म्हणजे मानसिक स्वास्थ्य होय." वरील व्याख्येचा विचार केल्यास स्वास्थ्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नसून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टया स्वस्थ असणारी अवस्था. मानसिक स्वास्थ्य संपन्न असणाऱ्या व्यक्तीची काही वैशिष्टये. 

१. स्वतःला समाधानी ठेवू शकणे.

२. स्वतःच्या मर्यादा व उणीवा जाणणे. 

३. अपेक्षित यश मिळवू शकणे.

४. ज्ञान मिळवु शकणे. 

५. सामाजिक संबंधाची योग्य जाण असणे. 

६. सामाजिक समायोजन साधता येणे. 

७. मन:शांतीचा आंतरिक आनंद मिळवू शकणे. 

८. निवडलेल्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करत राहणे. 

९. मानसिक तोल ढासळू न देता वास्तवता स्वीकारून परिस्थितीला तोंड देणे.

१०. व्यक्तिगत, कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी पार पाडणे. 

      आपल्या व्यक्तिमत्वाच्या अनेक बाजू एकत्र करून एकमेकांशी गुंफण घालतो तेंव्हाच आयुष्यातले यश, अपयश, ताणतणाव, आनंद, दुःख, निराशा इत्यादी सर्व चढउतार आपण यशस्वीरीत्या, तार्किकरित्या पार पाडू शकतो. मनाची बौद्धिक व भावनिक बाजू, त्याचे हित व कल्याण ही मानसिक स्वास्थ्याची महत्वाची बाजू आहे. आजच्या या स्पर्धेच्या युगात चिंता, ताणतणाव, संघर्ष यामुळे मानसिक व्याधींचे प्रमाण वाढत आहे. कोविड सारख्या महामारीच्या काळात शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य जपण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर उभे आहे. एकंदरीत आयुष्यातील संघर्षांवर व समस्यांवर यशस्वीपणे मात करून तसेच प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील आयुष्याची प्रगती कायम राखून सुखासमाधानाने जगणे म्हणजे मानसिक स्वास्थ्य होय. 


संदर्भ : य.च.म.मु.वि. मानसिक स्वास्थ्य

3 comments: